निसर्गातील पाना-फुलांचे रंग पाहताना हरवून जाणं...
रात्रीच्या वेळी फांदीआडून दिसणारा चंद्र पाहताना निःस्तब्ध, मूक होणं...
ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील एखादा चित्रपट आठवून तो पाहणं आणि त्यातील
कलाकारांच्या अदाकारीनं अवाक होणं...
गुलजारच्या कवितांमधली वेदना आणि गाण्यांमधल्या हळवेपणानं त्या शब्दांच्या
प्रेमात पडणं...
सागराची गाज ऐकता ऐकता त्याच्या निळ्या कॅनव्हासवर हरवून जाणं...
गुरुदत्त ते अलिकडच्या इम्तियाज अलीचे सिनेमे पाहिल्यावर आपलं मत आवर्जून
मांडावसं वाटणं …
एखाद्या कोरीव शिल्पावरील भाव आणि व्हिन्सीच्या मोनालिसाच्या हास्याने मोहित होणं...
व्हॅनगॉगची नक्षत्र उधळणारी निळीरात्र आणि पिवळा रंग उधणारी सूर्यफुलांची शेतं
सारखीच गूढ वाटणं...
कवी ग्रेस आणि आरती प्रभूंच्या कवितेतील पावसाने मनाला न्हाऊ घालणं, अस्वस्थ
करणं...
घर शोपीस ने भरून न जाता प्रेम आणि विश्वासाच्या नात्यांनी भरून जाणं...
हुसेनच्या चित्रांतला घोडा, राजा रविवर्माच्या चित्रांमधल्या नऊवारी साडीतल्या
अप्रतिम लावण्यामागची प्रेरणा जाणून घेणं...
प्रियकराने दिलेल्या गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि प्रेयसीने दिलेलं
मोरपीस वहीत असणं...कधीतरी एकटे असताना एखादी कविता किंवा गाणं गुणगुणं...
दिवसभरात एकदातरी बागेतली फुलं आणि बागडणारी मुलं पाहून आपणही मनमोकळं हसणं...
पुन्हा लहान मूल होऊन आईच्या कुशीत शिरणं...
भावनांचा हा निरागस हळवा कॅनव्हास कुठेतरी हरवलाय...
म्हणून त्यावरील चित्रं आता खोटी वाटू लागलीत...
No comments:
Post a Comment