(अपूर्वाने फेसबुक ओपन केलं आहे, ती स्वतःची वॉल बघते आहे, त्यातले स्वतःचे
फोटो बघून खूश होते आहे. तितक्यात तिचा फोन वाजतो, म्हणून ती फोन उचलून बाहेर बोलत जाते. तितक्यात विपुल तिथे येतो आणि तिची फेसबुक वॉल बघू लागतो... आणि
त्याचा चेहरा गंभीर होतो.)
अपूर्वा – (विपुल तिच्या मागे येऊन उभा राहतो. तिचं लक्ष नाहीय. मग लक्षात
येतं) विपुल हे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या नकळत त्याचं फेसबुक अकाऊंट बघणं.
विपुल – कम ऑन अप्पू, मी नवरा आहे तुझा... कुणी परका नाही...
अपूर्वा – पण मी आजवर तुझ्या कुठल्या सोशल गोष्टीत ढवळाढवळ केलीय का?
विपुल – पण इतकी का चिडतेस...आणि मला एक सांग...तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं
ना, हे फोटो काढून टाक म्हणून...पण अजूनही तू ते फोटो तसेच ठेवलेस...
अपूर्वा – ते माझे फोटो आहेत...आणि ते माझं अकाऊंट आहे, मी ठरवणार कुठला फोटो
ठेवायचा आणि कुठला नाही ते...तू मला धमकी देऊ नकोस...कळलं ना...
विपुल – पण एवढी काय मिरवायची हौस आहे तुला...फोटोच्या खाली कमेंट्स बघ...
अपूर्वा – हे बघ...तुला शेवटचं सांगतेय...तू यात अजिबात पडू नकोस...मला एक
गोष्ट कळत नाही, तुला का इतका राग येतोय. मला कोणी छान कॉम्प्लीमेंट्स दिल्या तर
तुला वाईट का वाटतंय.... आणि एक मिनिट, त्या दिवशी तू माझा फोनही चेक करत
होतास...मी पाहिलं तुला...पण तेव्हा काही बोलले नाही... तुझा माझ्यावर विश्वास
नाही. तुला इतकं कमकुवत वाटतं आपलं नातं...
विपुल – मी फक्त बघत होतो, फोन ब्लिंक होत होता म्हणून..
अपूर्वा – आणि फोनवर आलेला मॅसेजही तू वाचलास, पाहिलं मी ते... पण मी म्हणते
का...गरजच काय त्याची...
विपुल – का म्हणजे...तू माझी बायको आहेस...तुला कोणी (त्याचं वाक्य पुरं करू
देत नाही)
अपूर्वा - मग तुझा विश्वास का नाही माझ्यावर, त्या दिवशी माझ्यासाठी एक ऑफिशियल लेटर
आलं तेही तू उघडून पाहिलंस...बस, आता मी हे सहन करू शकत नाही...तू तुझ्या
बालमैत्रिणीला कॉफी शॉपमध्ये भेटतोस. आणि मला सांगतोस… ऑफिसची मिटिंग होती
म्हणून...तुला काय वाटतं...मला हे कळणार नाही...
विपुल – अगं तू समजतेस तसं काही नाही...तिला काही गोष्टी माझ्याशी मित्र म्हणून शेअर
करायच्या होत्या, म्हणून आम्ही दोनदा भेटलो... बस एवढंच...तू त्याचा इतका इश्यू का
करतेस...
अपूर्वा – नाही, मला कसलाही इश्यू करायचा नाही. पण तुझ्या खोट्या वागण्याचा
मला कंटाळा आलाय...
(ती आपलं सामान पॅक करू लागते.)
विपुल- अगं अप्पू ऐक माझं...तुझं तिच्याशी पटत नाही, म्हणून नाही सांगितलं की
मी तिला भेटायला गेलो होतो...
अपूर्वा - पण का...लपवलंस माझ्यापासून...
विपुल – कारण मला भीती वाटली...
अपूर्वा – कसली भीती...
विपुल – तू मला सोडून जाशील म्हणून...
अपूर्वा – मला आता तुझ्यासोबत रहायचंच नाही...(अपूर्वा बॅग भरते. लॅपटॉप बंद
करते. आणि निघू लागते.)
विपुल - ए ऐक ना माझं...चुकलो मी ...आय अम सॉरी...
अपूर्वा – (त्याचं काहीही ऐकत नाही. निघून जाते.)
No comments:
Post a Comment