Saturday, 30 September 2017

बॉलीवूडच्या सप्तनायिका

मला भावलेल्या बॉलीवूडच्या सप्तनायिकांविषयी हे थोडसं आणि थोडक्यात...

प्रभावी रम्या 
बाहुबली सीरिजमधील शिवगामी देवीच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखली जाणारी पसुपुलेती रम्या म्हणजेच रम्या क्रिष्णन. आतापर्यंत तिने 200 सिनेमांमध्ये काम केलंय. त्यात हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचा समावेश आहे. तिला तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत आणि इतर दक्षिणेकडील सिनेक्षेत्रातही पुरस्कार मिळवले आहेत. तिने अभिनयाची सुरुवात केली फक्त 13 वर्षांची असल्यापासून. "सूत्रधारुलु' या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. तमीळ कुटुंबात जन्मलेल्या रम्याला तिचे काका म्हणजेच प्रसिद्ध विनोदी अभिनेते चो रामास्वामी यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. रम्या क्रिष्णनने विविध नृत्य प्रकार अथक साधनेने आत्मसात केले आहेत. कुचीपुडी, भरतनाट्यमसोबत पाश्‍चात्य नृत्य प्रकारांचीही तिला चांगली जाण आहे. नेरम पलारुमबोल हा तिचा पहिला सिनेमा मल्याळम भाषेत होता. हिंदीमध्ये बडे मिया छोटे मिया, शपथ, बनारसी बाबू, दयावान, चाहत, परंपरा या सिनेमांमधील काम विशेष लक्षात राहिलं; पण तिची शिवगामीची भूमिका स्त्री शक्तीची वेगळी ओळख करून देणारी ठरली. 


मेहनती भूमी 
यशराज फिल्म प्रॉडक्‍शनसाठी सहायक कास्टिंग डिरेक्‍टर म्हणून काम करणारी भूमी पेडणेकर. "दम लागे हईशा' या सिनेमासाठीही ती नेहमीप्रमाणेच बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच कास्टिंग करत होती. त्यांना ती भूमिका समजावून सांगत होती. एकेदिवशी लेखक, दिग्दर्शक शरत कटारिया तिला म्हणाला, "तू ही भूमिका खूप छान समजावून सांगतेस, तूही ऑडिशन दे.' आणि काय आश्‍चर्य तिची निवड झाली. त्यानंतर भूमीच्या रूपातील अभिनेत्रीने प्रेक्षकांची वाहवाच मिळवली आहे. तिने यशराज फिल्म प्रॉडक्‍शन सोबत आणखी तीन सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. या 27 वर्षीय अभिनेत्रीचा सोशल मीडियावर जास्त वावर नसतो; पण तिच्या ट्विटर हॅंडल आणि इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर तिच्याविषयी तिने लिहिलंय की ऍक्‍टर ड्रीमर, फ्युचर लीडर... हे वाचून ती पुढे राजकारणात जाणार आहे की काय असंही बोललं जातंय. भूमी लहानपणापसूनच एक फिल्मी गर्ल आहे. तिला सिनेमाविषयी खूप जिव्हाळा आहे. तिच्या पहिल्याच सिनेमासाठी तिला पदापर्णाचा पुरस्कार मिळाला. एकूणच दम लगा के हईशासाठी तिला एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत. तिने आतापर्यंत काम केलेल्या दम लगा के हईशा, टॉयलेट एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान हे तिन्ही सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या हिट आहेत. त्यातील तिच्या भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरल्यात. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या तिन्ही भूमिका स्त्रीमधला ठामपणा मांडणाऱ्या 
होत्या. 


चुलबुली आलिया 
संघर्ष या सिनेमात प्रीती झिंटाने साकारलेली रित ओबेरॉयच्या भूमिकेत लहानपणीची रित आलियाने साकारली होती. तेव्हापासून खरंतर आलियाचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला होता. चार वर्षांची असतानाच आपण छोट्या मोठ्या बाळबोध घोषणा करतो तसं तिने केलं होतं की मी अभिनेत्री होणार... आणि खरंच एकूण नऊ सिनेमांमध्ये काम करून आलिया बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालीय. स्टुडंट ऑफ द इयरमध्ये तिने कथेप्रमाणे छानच अभिनय केला होता; पण हायवे सिनेमातील भूमिकेत तिने खरंच मेहनत केलेली दिसली. मग तिला कोणीच रोखू शकलं नाही. 2 स्टेस्टस्‌, हम्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उडता पंजाब, बद्रीनाथ की दुल्हनिया यातल्या तिच्या भूमिका उत्तम होत्याच; पण डिअर जिंदगी सिनेमातील तिने साकारलेल्या कायराला तर कोणीच विसरू शकत नाही. तिला सेल्फी काढायला खूप आवडतं. 4 वर्षांची असल्यापासून तीने शामक दावर अकादमीमध्ये डान्स शिकायला सुरुवात केली. हायवेमधील सुहा साहा या गाण्यात तिची गाण्याची झलक दिसली. ती फिटनेस फ्रिक आहे. चुलबुली आलिया भूमिका निवडण्याबाबत चोखंदळ राहिली तर खास तिच्यासाठी भूमिका लिहिल्या जातील. 


स्ट्रॉंग तापसी
तेलुगू, तमीळ, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषेत अभिनय करणारी तापसी एक दिल्लीवाली गर्ल आहे. एका वाहिनीच्या शोसाठी मॉडेल बनली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आली. मॉडेलिंग करताना प्रसिद्ध ब्रॅंडसाठी काम केलंय. डेविड धवन यांच्या चश्‍मेबद्दूर सिनेमातून तिने हिंदीत प्रवेश केला. आतापर्यंत तिने बेबी, पिंक, नाम शबाना, रनिंग शादी, गाझी अटॅक, जुडवा 2 या सिनेमांमध्ये लक्ष्यवेधी भूमिका साकार केल्यात. खास करून पिंक आणि नाम शबाना हे तिच्यासाठीच बनलेले सिनेमा वाटावेत इतका अप्रतिम अभिनय तिने केला. लहानपणी ती कसलीच काळजी नसलेली एक मुक्त मुलगी होती. मॅगी हे तिचं निक नेम. ती ब्युटी विथ ब्रेन आहे...कारण ती अभ्यासात अतिशय हुशार होती. अजूनही ती तिच्या दिल्लीतल्या शाळेला भेट देते आणि शाळेसाठी काहीना काही करत असते. तिला इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही रस आहे. तिची वेडिंग प्लॅनिंग करणारी द वेडिंग फॅक्‍टरी नावाची कंपनी आहे. तिच्यासोबत या कंपनीत दोन पार्टनर आहेत. ते काम बघतात. सामाजिक कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांच्या जीवनावर सिनेमा बनतोय आणि यात तापसी काम करतेय, अशी चर्चा आहे. तिला स्क्वॅश हा खेळ खेळायला आवडतं. सिनेमातले सगळे स्टंट ती स्वतः करते. 2011 मध्ये या एका वर्षात तिचे 7 सिनेमे प्रदर्शित झाले. अशी ती एकमेव अभिनेत्री असावी. तिच्या भूमिका तिच्यासारख्याच स्ट्रॉंग होत्या.
 


 शिस्तप्रिय अनुष्का 
सध्या विराट कोहलीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत असली तरी अनुष्का शर्मा अभिनेत्री, मॉडेल आणि यशस्वी निर्माती आहे, हे विसरून कसं चालेल? रब ने बना दी जोडीमधील अनुष्का ते जब हॅरी मेट सेजलमधील अनुष्का...तिने आपलं वेगळेपण प्रत्येक वेळी दाखवून दिलंय. तिच्यावर लहानपणासून आर्मीचे संस्कार झालेत आणि शिस्तही. तिचे वडील आर्मी ऑफिसर आणि तिचा भाई मर्चंट नेव्हीमध्ये. तिने लहानपणापासून मॉडेल व्हायचं स्वप्नं पाहिलं होतं. त्यासाठी ती बंगलोरहून मुंबईला आली. तिने जर्नालिझमचं शिक्षण घेतलं. कारण तिने मॉडेलिंग आणि जर्नालिझम असे दोन पर्याय समोर ठेवले होते. रणबीर कपूरने एकदा बॉम्बे वेल्वेट सिनेमाच्या सेटवर तिची गंमत करावी म्हणून एक प्रॅंक केला होता; पण तिला ते कळलं नाही. तिला त्यावेळी रडू आलं. तो खूप मस्तीखोर असल्यामुळे मग तिने त्याला माफ केलं. बॅंड बाजा बारात, सुलतान, एनएच 10 आणि फिल्लौरीमधील भूमिकांसाठी तिचं कौतुक केलंच पाहिजे. हम भी कुछ कम नही हे वेळोवेळी ती दाखवून देते. 


कणखर स्वरा 
बॉलीवूड नायिकांच्या मुख्य प्रवाहातील यादीत स्वरा भास्कर नसली तरी तिने आपलं अभिनयातील वेगळंपण नेहमीच सिद्ध केलंय. बहीण, मैत्रीण किंवा नायिकेच्या कुणी जवळची अशा व्यक्तिरेखा साकारणारी स्वरा काही सिनेमात मुख्य भूमिकेत दिसलीय, हे विसरून चालणार नाही. संजय लीला भन्साळींच्या गुजारिशमधून हिंदी सिनेमात काम केलं तरी तनू वेड्‌स मनूमधील पायलच्या व्यक्तिरेखेमुळे ती लक्षात राहिली. त्यानंतर चिल्लर पार्टी, औरंगजेब, रांझणा, प्रेम रतन धन पायो या सिनेमांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. मग नील बाटे सन्नाटा आणि अनारकली ऑफ आराह या दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ज्या की तिच्याच व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱ्या होत्या. 
इट्‌स नॉट दॅट सिंपल या मिनी वेब सीरिजमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली. टीव्हीवर काही कार्यक्रमांचं निवेदन तिने केलंय. स्वरा आपली राजकीय आणि सामाजिक मत व्यक्त करायला अजिबात घाबरत नाही. याबाबतीत तिला मानायलाच हवं, कारण तिला ट्रोल करणाऱ्यांना ती पुरून उरलीय. 


स्पष्टवक्ती कंगना 
सध्या बॉलीवूडमधली फटकळ अभिनेत्री म्हणून चर्चेत असणारी कंगना अभिनयातही तितकीच ग्रेट आहे. एक विलक्षण तेज आहे तिच्यात असं नेहमी वाटतं. तिचे सिनेमे पाहताना. क्वीन सिनेमात काम केलं म्हणून नाही, तर ती आहेच बॉलीवूडची राणी. 2006 मध्ये गॅंगस्टर सिनेमापासून ते सिमरनपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. 2011 मध्ये तनू वेड्‌स मनूमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि अभिनयाचं शिखर गाठलं. उंचपुरी, कुरळे केस, बोलके डोळे, उत्तम बोली यामुळे ती उठून दिसते. तनूची व्यक्तिरेखा दोन्ही वेळेस ती अक्षरशः जगली. क्वीनमधला तिचा प्रत्येक संवाद सिनेमागृहात टाळ्या वाजवायला लावणारा होता. तमीळ आणि तेलुगू सिनेमातही तिने काम केलंय. तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा मिळालाय आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत. ती स्पष्टवक्तेपण अनेकदा फटकळपणाकडे झुकतं. तिने सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत काम करायला सुरुवातीपासूनच नकार दिलाय. एका मध्यमवर्गीय घरातील मुलीने स्वप्न पाहिलं तर किती मोठं यश मिळवू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कंगना. तिने मुंबईत आल्यावर मॉडेलिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कथ्थक शिकली. आता ती गाणंही शिकतेय. माझे सत्याचे प्रयोग हे तिचं आवडतं पुस्तक आहे. विश्‍वास नाही बसत पण आहे. लेखन करणं, स्वयंपाक करणं, वाचणं आणि बास्केटबॉल खेळणं तिला खूप आवडतं. महिला सक्षमीकरण हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. तेच ती मणकर्णिका सिनेमातूनही दाखवून देणार आहे.


Tuesday, 26 September 2017

गरबा झुमे छे!

नवरात्राच्या काळात कुणी गुजरातला चाललोय, असं म्हटलं की लगेच प्रश्‍न येऊ शकतो... गरबा रमवा माटे? कारण- गरबा, नवरात्र आणि गुजरात हे आता समानार्थी शब्द झालेत. नवरात्रीच्या दिवसांत तर गुजरातचा कोपरा न्‌ कोपरा गरब्याच्या उत्साहात रममाण दिसतो. पाहावं तिकडे जो-तो देवीच्या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेला आणि रात्री देवीची स्तुती करणाऱ्या गरब्यात रमलेला... पर्यटकांसाठी तर पर्यटन आणि प्रत्यक्ष उत्सवात सहभागी होणं हा दुहेरी आनंद असतो... गुजरात भेटीनंतरचा हा स्पेशल रिपोर्ट ...



नवरात्री एटले,                                    
भक्ती अने शक्ती नु पर्व...
गुजरातमा गरबा रमवा नथी, झुमे छे...
अशा काही वाक्‍यांनी आणि
सनेडो सनेडो सनेडो लाल सनेडो...
तारा विना शाम मने एकलडु लागे रास रमवाने वहेलो आवजे... अशा काही गाण्यांनी माझी गुजरातच्या नवरात्रीविषयीची उत्सुकता काही वर्षांपासून वाढवली होती. आणि या वर्षी थेट गुजरातमध्ये जाऊन नवरात्रीचं अक्षरशः वेड अनुभवण्याचा योग जुळून आला.
 
अहमदाबाद एअरपोर्टपासूनच नवरात्रीची चाहूल लागत होती. ठिकठिकाणी नवरात्रीच्या शुभेच्छांचे संदेश, तर कुठे आमच्या इथे गरबा रमवायला या, अशा निमंत्रणांचे फलक अन्‌ त्यासोबत ठिकाणाचा पत्ता. हॉटेलवर उतरल्यापासून त्या उत्सुकतेची जागा कुतूहलानं घेतली आणि या नऊ दिवसांतलं गुजरात काही वेगळंच असतं. याची प्रचिती येऊ लागली. रात्री गरब्याला जायचं तर जरा पारंपरिक वेशातच जाऊ, असं आमच्या ग्रुपचं ठरलं. नवली नवरात्र हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उद्‌घाटनाचा औपचारिक कार्यक्रम जीएमडीसी मैदानात थाटामाटात पार पडला. गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी आणि इतर मान्यवरांच्या छोटेखानी भाषणानंतर देवीच्या शक्ती रूपाची, दुष्टांचा संहार करणारी छबी इथे पाहायला मिळाली. जणू काही छोटेखानी सिनेमाच बघतो आहोत, असा भास झाला. तिथल्या सादरीकरणाने सर्वांना खिळवून ठेवलं. पारंपरिक लोकनृत्य आणि विविध नृत्यप्रकारांचा तो अनोखा मेळ पाहायला या वेळी सुमारे चार ते पाच हजार पर्यटक आणि स्थानिक लोकांनी हजेरी लावली होती. 
 
दुसऱ्या दिवशी त्याच मैदानात रंगलेल्या रास गरब्यामध्ये सामील होण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही. आम्ही मनसोक्त त्यांच्यासोबत गरब्यामध्ये रंगलो. सुरुवातीला नीट जमत नव्हतं. त्यामुळे तिथे गरब्यात धुंद झालेल्या काहींशी आपटाआपटी झाली. धक्का लागला. तरी त्यांनी हसून ‘ओके’ म्हणत आम्हाला कसं नाचायचं त्याच्या टिप्स दिल्या आणि दाखवलंही.
रात्री १२ नंतर पावलं घराकडे, हॉटेलकडे वळू लागली. आम्ही फेस्टिव्हल टुरिझम या मस्त संकल्पनेचे साक्षीदार होत होतो. दिवसभर पर्यटकांचा ओघ हॉटेलच्या दिशेनं जाताना दिसायचा. हॉटेल्सही नवरंगांनी नटली होतीच. तिथेही देवीच्या पारंपरिक गाण्यांचं लाईव्ह सादरीकरण आणि सोबत गुजराती, तसंच इतर भारतीय व पाश्‍चात्त्य जेवण आणि सोबत हटके खाद्यपदार्थांची रेलचेल.
 
नवरात्रीच्या दिवसांत गुजरातमधे सगळीकडे असा एकूण नजारा बघायला मिळतो. फेस्टिव्हल टुरिझममुळे पर्यटकांना रात्री गरब्याच्या ठिकाणांना भेट द्यायची आणि दिवसभर आजूबाजूची पर्यटनस्थळं बघत शॉपिंगही करायची पुरेपूर संधी मिळते. गुजरात टुरिझमची ही एक खासियत आहे.  
 
नवरात्रीचा हा मॅडनेस, लाईव्हनेस असे कितीतरी उत्साहवर्धक शब्द वापरून वर्णन करता येणार नाही इतकी धमाल अगदी गल्लोगल्ली दिसते. संध्याकाळच्या वेळात सगळ्यांची लॉ गार्डन, मंगल मार्केट, अलकापुरी अशा ठिकाणी पारंपरिक घागरा चोली, कुर्ता, फेटे, पगडी असं सगळं खरेदी करायला झुंबड उडते. कारण- गरब्याच्या ठिकाणचा तसा अलिखित नियमच आहे आणि तो पाळावाच लागतो. पारंपरीक पोशाखात आला नाहीत तर गरब्यात रमण्याच्या उत्साहावर पाणी पडू शकतं. डेस्पॅसिटो गाणं गुणगुणत शॉपिंग करणारी तरुणाई वडोदरा, अहमदाबाद बाजारपेठांमध्ये पारंपरिक पोशाख गरब्यासाठी खरेदी करताना दिसते. आणि तीच तरुणाई कुठल्याही बॉलीवूड गाण्याचा किंवा मॉडर्न संगीताचा आग्रह न धरता पारंपरिक गरबा गीतांवर बेधुंद थिरकते. हे विशेष. 


नवरात्रीचा मॅडनेस
नवरात्रीच्या नवलाई दिवसांतील मॅडनेस अनुभवायचा असेल, तर गरब्याची उत्सुकता जिथे शिगेला पोहोचते अशी काही ठिकाणी गुजरातमध्ये आहेत. तिथे आवर्जून जायला हवं. द युनायटेड वे गरबा, फाईन आर्ट फॅकल्टी गरबा, नवलाखी गरबा, मा शक्ती गरबा, वडोदरा नवरात्री फेस्टिव्हल, जीएमडीसी मैदान, अहमदाबाद त्याचबरोबर गुजरातमध्ये देवीची शक्तीपीठं असलेल्या खोडियार, पावागड, कच्छ (आशापुरा मंदिर), अंबाजी मंदिर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गरबा रंगतो. ते नुसतं बघणं हेही पर्यटकांसाठी आकर्षण असतं.
 
एक भारत श्रेष्ठ भारत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली संकल्पना म्हणजे एक भारत - श्रेष्ठ भारत. यामध्ये दोन राज्यांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये गुजरातची जोडी छत्तीसगडसोबत आहे. या संकल्पनेला आजपासून सुरुवात करत आहोत, अशी घोषणा या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपानी यांनी केली. त्यानिमित्ताने छत्तीसगडची लोककला, संस्कृती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. नवली नवरात्र कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी छत्तीसगडच्या लोककलावंतांनी ठकसाडी नृत्य सादर केलं आणि विविध स्टॉल्समध्ये खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या.
ठकसाडी हे लोकनृत्य सादर करताना छत्तीसगडचे लोककलावंत
 
 
कसे जाल?
विमानाने किंवा रेल्वेने अहमदाबाद किंवा आणि वडोदरा एअरपोर्ट किंवा रेल्वेस्थानकावर उतरून तिथेच गुजरात टुरिझमच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता. ते पर्यटकांना गाईड आणि कुठल्या ठिकाणांना भेट द्यायची, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं याचं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर एकेकटे जाणार असाल, तर थेट अहमदाबाद, वडोदरा, सौराष्ट्र या ठिकाणी पोहोचून खासगी बसेस, रिक्षांनी गरब्याच्या ठिकाणी आरामात पोहोचू शकता. अगदी रिक्षावालाही तुम्हाला कुठे जायचं, खरेदी, खाद्यपदार्थ कुठे छान मिळतात. हे सांगतो. याचा अनुभव आम्हालाही आला. गरबा रात्री सुरू होतो. त्यामुळे दिवसभरात साबरमती आश्रम, नदीचा परिसर, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस, पिकॉक गार्डन आणि त्याचं म्युझियम, मोढेराचं सूर्यमंदिर अशी आसपासची पर्यटनस्थळं बघता येतात. 

 
 

Saturday, 9 September 2017

देशप्रेमाचं ‘लागीरं’!

आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून देशरक्षण करणाऱ्या जवानांबाबत आपल्याला सगळं माहीत असतंच असं नाही. झी मराठीवरच्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून अजिंक्‍य आणि शीतलच्या अलवार नात्याबरोबर सैनिकांची खासगी आयुष्यातली लढाईही पोहोचतेय, त्याचबरोबर देशप्रेमाचं ‘लागीरं’ होतं तेव्हाच जवान बनता येतं ही वस्तुस्थितीही. या मालिकेत काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा जवानांबद्दल बोलतातच, पण त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना काय वाटतं त्याबद्दल? खास स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांची ‘सकाळ’साठी मी घेतलेली मुलाखत...



वीरभूमीत जन्मल्याचा अभिमान...
अगदी मनापासून सांगतोय, भारतीय जवान हे माझ्यासाठी देवच आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाच्या सैनिकांचं आपल्या देशावर खूप प्रेम आहे. जवानांचं आपल्या देशासाठी समर्पण खूप महत्त्वाचं ठरतं. सीमेवर सदैव दक्ष राहून देशसेवा करणं हे सामान्य काम नव्हे. त्यामुळे त्यांना माझ्या मनात देवाचा दर्जा आहे. मी मूळचा साताऱ्याचा. मला अभिमान आहे, की मी या वीरांच्या भूमीत जन्मलो. कारण, आपल्या सैन्यात भरती होणारे जास्तीत जास्त जवान हे साताऱ्याचे आहेत. त्यामुळे सैन्याचा आणि सैनिकांचा विषय निघाला, की अभिमानाने माझा ऊर भरून येतो.
माझ्या शाळेतला एक मित्र अनेक वर्षांनंतर हल्लीच भेटला. तो आर्मीत होता. एका चकमकीत त्याच्या पोटात गोळी लागली होती. त्याविषयी आणि एकूणच आर्मीविषयी खूप बोललो आम्ही. त्याने मला आर्मीची एक कॅप भेट म्हणून दिली जी माझ्यासाठी अनमोल आहे. सैनिकांचं हे असं योगदान आपल्या लक्षात येत नाही, पण ते खूपच महत्त्वाचं असतं. अशा प्रत्येक लढाऊ सैनिकामुळेच आपलं सैन्य बळकट होतं.
स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची, देशप्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असेल, पण माझ्या मते प्रत्येकाने किमान एक दिवस सीमेवर जाऊन देशसेवा करावी आणि मी हे नुसतं सांगत नाही, मी स्वतःही हे करणारच आहे. सीमेवरच्या खडतर आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर मग आपल्याला आपल्या सुखासीन आणि सुरक्षित आयुष्याची किंमत आणि सैनिकांची महानता कळेल.
या मालिकेसाठी माझी निवड झाली तेव्हा माझ्या मनात आनंदाशिवाय दुसरी भावना नव्हती, पण घरात मी हे कुणालाही सांगितलं नव्हतं. या मालिकेचा जेव्हा पहिला टीझर झी मराठीवर माझ्या आई-बाबांनी पाहिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मी दिलेलं सरप्राईज त्यांना खूप आवडलं होतं. त्यांना माझा अभिमान वाटतोय. कारण साताऱ्याला सैन्यात भरती होण्याची मोठी परंपरा आहे. जवानांच्या आयुष्यावरील मालिकेत मुख्य भूमिका करतोय म्हटल्यावर त्यांना खूपच भरून आलं होतं. आमच्या सेटवरही आर्मीतील काही सैनिक, काही अधिकारी येतात. तेव्हा ते आम्हाला विचारतात, की खरंच तुम्हीही आर्मीत आहात का, तेव्हा खूप आनंद होतो. कारण माझी पार्श्‍वभूमी नृत्याची होती. माझी साताऱ्यात जेन नेक्‍स्ट नावाची डान्स ॲकॅडमी आहे. तिथे मी मुलांना डान्स शिकवतो. मला वेस्टर्न, हिप हॉप, फ्री स्टाईल, कंटेम्पररी, बॉलीवूड हे डान्स प्रकार खूप आवडतात. सध्या मी शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे माझ्या डान्स ॲकॅडमीला मिस करतोय.
माझ्या साताऱ्यातील सगळ्या मित्रमंडळींना ही मालिका आवडते. प्रेक्षकांनाही आवडते याचंही कारण त्यातला हा देशप्रेमाचा भागच असावा. या मालिकेत सगळं खरं खरं दाखवलंय. ही चार भिंतीत घडणारी मालिका नाहीय. या मालिकेत अख्खं गाव दिसतं, ते सर्वांना आपलंसं वाटतं, अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा खूप छान वाटतं. मला एक गोष्ट आर्वजून सांगावीशी वाटते, इस्त्राईलमध्ये प्रत्येकाला सैनिकी प्रशिक्षण घ्यावंच लागतं. कुटुंबातील एकाला तरी सैन्यात जाऊन देशसेवा करावीच लागते. भारतातही प्रत्येक घरातून किमान एक जण तरी सैन्यात भरती झालाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे.
आर्मीच्या वर्दीचं मला पहिल्यापासून आकर्षण आहे. मालिकेतल्या पहिल्याच सीनसाठी मी जेव्हा अंगात वर्दी घातली, तेव्हा मला असं वाटलं, की खरोखर सीमेवर गेलोय, शत्रूशी सामना करतोय. इतकी त्या वर्दीत ताकद आहे. ती वर्दी घातल्यावर आपोआपच तो रुबाब आपल्या अंगी येतो.
स्वातंत्र्य म्हणजे काय? असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा मला वाटतं, की आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेलंच नाहीय. कारण स्रियांना अजूनही ते खऱ्या अर्थाने अनुभवता येतच नाही. स्त्री-पुरुष दोघांनाही समान स्वातंत्र्य मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय असं म्हणता येईल.

 नितीश चव्हाण 
(अजिंक्य शिंदे)



जवानांना द्या आदर आणि प्रोत्साहन...

माझं कॉलेज सुरू असतानाच माझं ऑडिशन देणं सुरू होतं. ‘लागीरं’साठीही ऑडिशन क्‍लीप पाठवली होती. माझी पहिली ऑडिशन क्‍लीप बघून मुंबईची मुलगी साताऱ्याकडच्या भाषेत कशी बोलू शकेल अशी शंका निर्मात्यांना वाटू शकली असती, म्हणून मग मी माझी दुसरी ऑडिशन क्‍लीप पाठवली. मग त्यांना विश्‍वास वाटला की मी करू शकेन शीतलची भूमिका. अर्थात मीही या भूमिकेवर मेहनत घ्यायची तयारी दाखवली. मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होण्याआधी मी एक महिना साताऱ्यात जाऊन राहिले. तिथल्या माणसांमध्ये मिसळले. ते कसं बोलतात, कसं वावरतात त्याचं निरीक्षण केलं. मग हळूहळू मला भाषेतले बारकावे कळू लागले. मी एक खास वहीच केली होती, त्यात वेगवेगळे शब्द लिहून ठेवायचे. त्यांची उजळणी करायचे.
मालिका लेखक तेजपाल वाघ यांनी मला सैनिकांविषयी काही माहिती दिली. काही गोष्टी, किस्से सांगितले. मीही स्वतः काही माहिती मिळवायला सुरुवात केली. सैनिकांच्या आयुष्यावर आधारित काही लघुपट पाहिले. काही पुस्तकं वाचली. आमच्या साताऱ्यातील शूटिंगच्या ठिकाणी बऱ्याच सैनिकांच्या कुटुंबांना जवळून पाहिलं. माझ्या घरातलं किंवा आजूबाजूचं सैन्यात कोणीच नाहीय, पण माझे बाबा मला आर्मीमध्ये मेडिकलला जॉईन हो असं सांगायचे, पण मला मेडिकलचे विषय खूप कठीण वाटायचे. त्यामुळे मेडिकलच्या वाट्याला गेले नाही, पण बाबांची इच्छा अशी मालिकेच्या रूपाने पूर्ण झाली.
मला वाटतं आपण सैनिकांना सन्मान दिला पाहिजे. आपल्या घरचं कोणी एक आठवडा किंवा १५ दिवस पिकनिकला किंवा बाहेरगावी गेलं तर आपण हजारदा फोन करून विचारतो कसा आहेस, कुठे आहेस? कधी येणार... पण सैनिकांना कधी वर्ष, दोन वर्ष सुट्टी मिळत नाही. आपल्या घरापासून दूर राहावं लागतं. तेव्हा त्यांच्या घरातल्या माणसांना काय वाटत असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आता मालिकेत भूमिका साकारतेय म्हणून नव्हे, पण मला नेहमीच सैनिकांविषयी जिव्हाळा आहे. त्यांचा युनिफॉर्म, त्यांची शिस्त, त्यांचं बोलणं, एकूणच सैनिकांचं व्यक्तिमत्त्व मला खूप आवडतं.
आम्ही आमच्या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करायचो. तेव्हा आमच्या हातातील झेंडे कधीच जमिनीवर पडू द्यायचो नाही. आमच्या शाळेची शिस्तच तशी होती. झेंडा जमिनीवर पडलेला दिसला, तर दंड व्हायचा. मला वाटतं सर्वांनी हा दिवस साजरा करताना दुसऱ्या दिवशीही त्याचं पावित्र्य राखलं जाईल हे पाहायला हवं.
माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवं तसं वागणं असं नव्हे... स्वातंत्र्यामुळे आपली जबाबदारीही तितकीच वाढते. सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याची जबाबदारी जरी आपण पाळली, तरी खूप मदत होईल. कारण सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासूनच होते. आपले हक्क आपल्याला समजतात तशी काही कर्तव्येही आपल्याला पार पाडली पाहिजेत. आपला देश सक्षम होण्यासाठी आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.
शीतल पवार या माझ्या भूमिकेतून मला प्रेक्षकांना असं सांगायचंय, की सैनिकांना नेहमीच प्रोत्साहन द्या. तो तुमच्या जवळचा नसला तरी आणि असला तरी! देशप्रेमाची आवड असलेल्या आपल्या कुटुंबातील कुणाच्याही मार्गात तुम्ही अडचण निर्माण करू नका. त्यांची साथ सोडू नका. त्यांना विश्‍वास द्या.
मुलींना आपला नवरा आपल्या सोबत असावा असं वाटणारच, पण पती सैन्यात असला तर तुमचीही जबाबदारी खूपच वाढते. कारण आमच्या मालिकेतला तो संवाद तुम्हाला माहीत असेलच, फौजी हा लाखात एक असतो, आणि त्याची बायको दहा लाखात एक असते!

शिवानी बावकर
(शीतल पवार)

(शब्दांकन ः भक्ती परब)


मनोरंजन क्षेत्रातील क्रांती

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका फिचरसाठी लिहिलेलं...उशीर झाला पोस्ट करायला...पण वाचा आणि प्रतिक्रिया कळवा...





काय झालं? 
- 24 तास मनोरंजनाच्या हेतूने सुरू झालेल्या वाहिन्या आणि न्यूज वाहिन्या असे दोन भाग झाले. मनोरंजन वाहिन्यांना जनरल एंटरटेनमेंट चॅनल असं संबोधलं जातं. 24 तास कार्यक्रम प्रसारित करण्याऐवजी एक "प्राईम टाईम' निश्‍चित करून त्यावेळेत नवे कार्यक्रम आणि इतर वेळेत त्यांचे रिपिट टेलिकास्ट दाखवण्याचे ठरले. पण त्यातही आता प्राईम टाईम संध्याकाळी 5 वाजताचा झाला आहे. पहिला तो 8 किंवा 7 मानला जाई.
- वाहिन्यांनी आपले कार्यक्रमाचे एपिसोड यूट्यूबचा आधार घेत संपूर्ण एपिसोड यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्यांना टीव्हीवरच्या मालिकांच्या वेळात त्या पहाणं शक्‍य नव्हतं त्यांना याचा फायदा झाला.
- आपल्या मालिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन मालिकांनी युट्यूबर पूर्ण एपिसोड अपलोड करणे बंद केले. आता वाहिन्या टीझर, प्रोमो, बेस्ट सीन किंवा एपिसोडचा दोन ते 7 मिनिटांचा भाग अपलोड करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात.
- वेबसिरिजचं नवं माध्यम खुलं झालं. फक्त महोत्सवात पहायला मिळणाऱ्या शॉर्ट फिल्मस यूट्यूबर अपलोड होऊ लागल्या.
- वाहिन्यांनी सोशल मीडियावरून खास करून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्ट्‌विटरचा वापर करून जोरदार मार्केटिंग करण्यास सुरुवात केली.
- स्टार, सोनी, झी आणि कलर्स वाहिन्यांच्या समूहाने आपापली अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आणली. त्याला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून ऑन एअर एपिसोडच्या वेळीच तो एपिसोड बघायचा झाल्यास अॅप्स पाहणाऱ्या ऑनलाईन प्रेक्षकांकडून ठरावीक मूल्य आकारायला सुरुवात केली. नेटफ्लीक्‍सने भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले.
- सोशल मीडिया वाहिन्यांशी स्पर्धा करू लागला. आणि वेबसिरिजचं नवं आव्हान मालिकांसमोर उभं राहिलं.
- सिनेमासुद्धा अॅमेझॉनने घरबसल्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर चॅनलच्या अॅपवरही सिनेमे पाहता येणे शक्‍य झाले. मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध नाव एकता कपूरने स्वतःचं अल्ट बालाजी हे अॅप सुरू केलं.
बार्कने फक्त हिंदी मालिकांसाठी रिजनल आणि अर्बन असे दोन विभागात टीआरपी मेजर्स द्यायला सुरुवात केली. आणि स्टार प्लस आणि झी मराठीने दुपारचा प्राईम टाईम बॅन्ड सुरू केलाय.
- लाईफ ओके या स्टार समुहाच्या वाहिनीचं रिब्रॅंडींग होऊन स्टार भारत नावाची वाहिनी सुरू झाली.
- इश्कबाज या मालिकेने तीन भावांची गोष्ट सांगून पहिल्यांदा पुरुष पात्रांभोवती फिरणारी मालिका म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. आणि मालिका सुरू झाल्यापासून कायम चर्चेत राहिली. ऑनलाईन प्रेक्षकांनी त्यांना हवी तशी घडवलेली ही पहिलीच मालिका.

काय होईल?
- प्राईम टाईमचं युद्ध आता हातातल्या मोबाईलवर सुरू होईल.
- ऑनलाईन प्रेक्षकांचा दबावगट मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसेल. कारण अॅप्सवर मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. एकही मालिका किंवा तिचा एपिसोड फ्री पाहता येणार नाही.
- यूट्यूबही चॅनल्सना लाईव्ह स्ट्रीमिंग साठी एक वेगळा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
- सध्या सेन्सॉर बॉर्ड सिनेमांवर "बाळबोध' नियम लावून काटछाटीचा पर्याय सुचवतं. याला येत्या काळात आव्हान म्हणून सिनेमे थेट यूट्यूबवर किंवा ऑनआईन रिलिज केले जातील.
- येत्या काळात प्रादेशिक भाषांमधील "कॉन्टेट'ला (कार्यक्रमांना) जास्त मागणी असेल आणि असेच कार्यक्रम जास्त पाहिले जातील.
- अलिकडच्या 2-3 वर्षात फूड आणि संगीत याविषयांवर जास्त प्रमाणात कॉन्टेट निर्माण झाला. यात यापुढे वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

थेट ताटातून... सुक्‍या माशांचं लाईव्ह

लाईक, कमेंट, शेअर आणि ऑनलाईन, लाईव्हचं हे जग. आता तर पावसाळाही लाईव्ह सुरू आहे. कशा कशाची कमी नाहीय. पावसाला लाईक करतोय. अती झाला की कमेंट करतोय. पावसातल्या आठवणी शेअर करतोय आणि सगळं काही लाईव्ह करावंसं वाटतंय. अशा वेळी ज्यांनी आपल्या पावसाळी जेवणात लाईव्हनेस आणलाय त्या सुक्‍या माशांविषयी लिहिलं पाहिजे ना. म्हणूनच ही ‘पोस्ट’ तुमच्यासोबत शेअर करतेय...



पावसाळ्यात तरव्याच्या काढणी-लावणीचे दिवस सुरू होतं... आणि आई पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या गरमागरम भाकरीवर सुकटाचा एकेक तुकडा ठेवी. मग आम्ही ती हातात घेऊन खात खात शेत गाठत असू... कधी कधी शेजारची आजी म्हणायची, चेडवा माजो घास काय घशाखाली उतारना नाय. याक सुकाट तरी भाज गो... नकुटभर सुकाट ताटात आसला तरी लय झाला... मग चुलीत फुललेल्या रसरशीत निखाऱ्यावर सुकाट भाजलं जाई... तो वास अजूनही हवाहवासा वाटतो. 
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतील दिवसात कोकणात सगळ्याच गोष्टींची रेलचेल. किती खाऊ नी किती ठेऊ असं व्हायचं... मग त्यातल्या काही गोष्टी पावसाळ्यासाठी खास राखून ठेवल्या जात. अख्खे काजू कडक ऊन दाखवून ठेवायचे. फणसाच्या आठिळा भाजीसाठी किंवा उकडून खाण्यासाठी म्हणून सुकवून ठेवल्या जात. कैरीच्या फोडी, मिठ लावलेल्या मिरच्या असं बरंच काही सुकवून पावसाळ्यातली बेगमी होई. त्यात (त्यांच्या वासामुळे) लपवूनही न लपणारे हे सुके मासेही असत. 
पावसाळ्याचे दिवस सुरू होण्यापूर्वी आठवडी बाजारातून सुके मासे आणले जात. सुके बोंबिल, सुकी बारीक आणि जाडी कोलंबी, पेडवे, तारले, बांगडे किंवा बांगडुले, मोतकं, दोडीया अशी नावं घेत सुक्‍या माशांची दुकानं पालथी घालून नीट खरेदी करून ते घरी आणले जात. मग ते साफ करून दोन-तीन उन्हं दाखवून व्यवस्थित कोरड्या स्वच्छ पुसून घेतलेल्या डब्यात ठेवले जात. मग पाऊस पडू लागला की, कधी एकदा तो डबा उघडला जातोय, याची वाट बघायचो.
एकीकडे चढणीचे मासे, कुर्ल्या हे सगळं ताजं ताजं मिळेच; पण सुक्‍या माशांचं सार किंवा नुसता तो भाजून खाल्याशिवाय चैन पडत नसे. तसा कोकणी माणूस अस्सल मासेखाऊ. माशांचा अलगद काटा काढायचा, तर तो त्यानेच. बाबांना माशांचं जेवण असलं की काटा कसा काढायचा, हे आम्हाला सांगण्याचा मोह आवरत नसे. मासे खाण्यातली, काटा काढण्यातली चलाखी त्यांच्याएवढी अजूनही जमलेली नाहीय; पण सुक्‍या बोंबलांना काट्यासहित खायचं असंही नंतर कळलं. सुके मासे मग ते बोंबील, बांगडे किंवा पेडवे असो... नुसते भाजून भाकरीसोबत किंवा पिठी भात आणि त्यासोबत एखादा भाजलेल्या सुकटाचा तुकडा अहा हा... ही चव ज्याने चाखली त्याने अगदी खाण्यातला स्वर्ग अनुभवला. 
निखाऱ्यावर भाजलेले सुके मासे म्हणजे आयत्या वेळी तोंडी लावण्याची सोय. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात फक्त मोड आलेल्या कडधान्यांची पातळ आमटी किंवा सांबार करायचं. उकडा भात करायचा आणि तोंडी लावण्यासाठी सुकट भाजायचं म्हणजे भाजीची गरज भासत नाही. त्याचबरोबर सुक्‍या माशांची भाजी, सार किंवा कालवण करणं तसं वेळकाढू काम; पण त्याची चव पावसाळी दिवसात भारीच लागते. त्यामुळे ते करण्यावाचून राहवत नाही.
सुक्‍या बेडगी मिरच्या, लसूण, धणे, बडीशेप, ओलं खोबरं, तिरफळं यांचं वाटण घालून सुक्‍या बांगड्याचं किंवा पेडव्याचं सार भन्नाट लागतं. भाताबरोबर फक्त हे सार घेऊन खायचं. फाईव्ह स्टारचं जेवण विसरून जाल. खात्रीच.
त्यानंतर सुकी कोलंबी (बारीक-जाडी) जोवलो, गोलमो किंवा काही ठिकाणी याला सुकट असंच म्हटलं जातं. किंवा एकदम छोटे सुकवलेले मासेही मिळतात. तेही छान चविष्ट लागतात. सुक्‍या कोलंबीची कांदा, मालवणी मसाली, ओलं खोबरं घालून केलेली झटपट भाजी भारीच लागते. 
एके दिवशी आईने भाकरी भाजण्याआधी सुकी बारीक कोलंबी कोरडीच तव्यावर भाजून घेतली आणि बाजूला ठेवली. मग भाकऱ्या भाजल्या आणि नंतर खोबऱ्याची हिरवी मिरची (सुकी बेडगी मिरचीही चालेल.) घालून पाट्यावर चटणी वाटली. आम्ही कुतूहलाने बघत बसलो की, आई करतेय तरी काय? सुकी बारीक कोलंबी भाजलीय आणि चटणी का वाटतेय. मग तिने सुकी भाजलेली कोलंबी पाण्यातून निथळून काढली आणि चटणीत घालून चमच्याने ढवळली. चवीपुरतं मिठ घालून आमच्या ताटात वाढली. त्या चटणीची चव काय भारीच होती. सुक्‍या जाड्या कोलंबीची कांद्याची पात घालून केलेली भाजीही मस्त लागते. 
सुक्‍या माशात उठून दिसणारे बोंबिल आणि त्याच्या पाककृतींचा तर वेगळाच थाट. बोंबील साफ करून त्याचे दोन-तीन तुकडे करून त्यांची भाजी करायची किंवा पातळ रस्सा करायचा. आणि तोही बटाटा घालून. ओलं खोबरं, कांदा आणि लसणाचं वाटण करून मालवणी मसाला घालून झणझणीत जाडसर रस्सा करायचा. वरून चार कोकमं घालायला विसरायचं नाही. मग भाकरीसोबत किंवा भाताबरोबर खायचा. 
कधी कधी लावणीच्या दिवसात कामांमुळे दमछाक व्हायची की भाकरीसोबत कुठली भाजी करायची? आणि तो प्रश्न सुक्‍या माशांमुळे पटकन सुटे. बारीक सुकी कोलंबी कोरडी भाजून पाण्यातून निथळून काढायची आणि त्यात कांदा बारीक चिरून घालायचा. मग मालवणी मसाला घालून वरून तेल टाकायचं आणि मस्त ढवळायचं की ही झटपट भाजी तयार. तसंच सुके बांगडे भाजून त्याचा काटा काढून त्यात कांदा, खोबरं, मालवणी मसाला, तेल मीठ टाकून किसमूर करायची हाही एक भारी प्रकार. किंवा भाजी करायला अजून वेळ मिळाला तर वांग्याची वाटण घालून पातळ थपथपीत भाजी करायची. त्यात सुकी कोलंबी कोरडी भाजून टाकायची किंवा सुक्‍या बोंबलाचे छोटे तुकडे करून त्यात घालायचे. अशी वांग्याची भाजी भाकरीसोबत किंवा आमटी न घेता भाताबरोबर खायला छान लागते.

सुके मासे आपल्या खाद्यसंस्कृतीतला आता एक अविभाज्य भाग आहे. आपल्या सोईने आवडीने कधीही बेत करून आपलं जेवणाचं ताट त्यांनी परीपूर्ण करू शकतो. सुके मासे म्हणजे पावसातली सोय... पावसातली बेगमी... पण त्या पलीकडेही त्याचं कवित्व आहे. आपण शहरात राहणारी माणसं सुक्‍या माशांचा बेत केव्हाही आखू शकतो; पण गावाकडे पावसाळ्याआधीच त्याची साठवण करावी लागते. पावसाळी दिवसात... चवीढवीचं काही खासकरून खावंसं वाटतं किंवा कुणीतरी आपल्याला गरमागरम जेवण करून वाढावं, असं वाटतं. खाण्याच्या बाबतीत आपले कुणीतरी लाड करावेत, असं वाटणं हे साहजिकच आहे. अशा वेळी घरातल्या सगळ्यांनी एकत्र या. सुक्‍या माशांच्या वर सांगितल्याप्रमाणे भन्नाट रेसिपी करा. शेतातल्या बांधावर जाऊन बसता नाही येणार; पण सगळ्यांनी मिळून ताव मारा. आणि हो त्याचबरोबर सोशल मीडियावरील आपल्या मित्रांना जळवायला विसरू नका. फोटो पोस्ट करा आणि लिहा भक्ती परब इंटिंग सुक्‍या बांगड्याचं सार विथ फिफ्टीन अदर्स... आणि टॅग करा त्यांना... मीही आता तेच करतेय... 
वास इलो की नाय सुकटाचो?

पूर्वप्रसिद्धी जुलै २०१७, सकाळ मुंबई आवृत्ती

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...