Saturday, 9 September 2017

देशप्रेमाचं ‘लागीरं’!

आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून देशरक्षण करणाऱ्या जवानांबाबत आपल्याला सगळं माहीत असतंच असं नाही. झी मराठीवरच्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून अजिंक्‍य आणि शीतलच्या अलवार नात्याबरोबर सैनिकांची खासगी आयुष्यातली लढाईही पोहोचतेय, त्याचबरोबर देशप्रेमाचं ‘लागीरं’ होतं तेव्हाच जवान बनता येतं ही वस्तुस्थितीही. या मालिकेत काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा जवानांबद्दल बोलतातच, पण त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना काय वाटतं त्याबद्दल? खास स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांची ‘सकाळ’साठी मी घेतलेली मुलाखत...



वीरभूमीत जन्मल्याचा अभिमान...
अगदी मनापासून सांगतोय, भारतीय जवान हे माझ्यासाठी देवच आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाच्या सैनिकांचं आपल्या देशावर खूप प्रेम आहे. जवानांचं आपल्या देशासाठी समर्पण खूप महत्त्वाचं ठरतं. सीमेवर सदैव दक्ष राहून देशसेवा करणं हे सामान्य काम नव्हे. त्यामुळे त्यांना माझ्या मनात देवाचा दर्जा आहे. मी मूळचा साताऱ्याचा. मला अभिमान आहे, की मी या वीरांच्या भूमीत जन्मलो. कारण, आपल्या सैन्यात भरती होणारे जास्तीत जास्त जवान हे साताऱ्याचे आहेत. त्यामुळे सैन्याचा आणि सैनिकांचा विषय निघाला, की अभिमानाने माझा ऊर भरून येतो.
माझ्या शाळेतला एक मित्र अनेक वर्षांनंतर हल्लीच भेटला. तो आर्मीत होता. एका चकमकीत त्याच्या पोटात गोळी लागली होती. त्याविषयी आणि एकूणच आर्मीविषयी खूप बोललो आम्ही. त्याने मला आर्मीची एक कॅप भेट म्हणून दिली जी माझ्यासाठी अनमोल आहे. सैनिकांचं हे असं योगदान आपल्या लक्षात येत नाही, पण ते खूपच महत्त्वाचं असतं. अशा प्रत्येक लढाऊ सैनिकामुळेच आपलं सैन्य बळकट होतं.
स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची, देशप्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असेल, पण माझ्या मते प्रत्येकाने किमान एक दिवस सीमेवर जाऊन देशसेवा करावी आणि मी हे नुसतं सांगत नाही, मी स्वतःही हे करणारच आहे. सीमेवरच्या खडतर आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर मग आपल्याला आपल्या सुखासीन आणि सुरक्षित आयुष्याची किंमत आणि सैनिकांची महानता कळेल.
या मालिकेसाठी माझी निवड झाली तेव्हा माझ्या मनात आनंदाशिवाय दुसरी भावना नव्हती, पण घरात मी हे कुणालाही सांगितलं नव्हतं. या मालिकेचा जेव्हा पहिला टीझर झी मराठीवर माझ्या आई-बाबांनी पाहिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मी दिलेलं सरप्राईज त्यांना खूप आवडलं होतं. त्यांना माझा अभिमान वाटतोय. कारण साताऱ्याला सैन्यात भरती होण्याची मोठी परंपरा आहे. जवानांच्या आयुष्यावरील मालिकेत मुख्य भूमिका करतोय म्हटल्यावर त्यांना खूपच भरून आलं होतं. आमच्या सेटवरही आर्मीतील काही सैनिक, काही अधिकारी येतात. तेव्हा ते आम्हाला विचारतात, की खरंच तुम्हीही आर्मीत आहात का, तेव्हा खूप आनंद होतो. कारण माझी पार्श्‍वभूमी नृत्याची होती. माझी साताऱ्यात जेन नेक्‍स्ट नावाची डान्स ॲकॅडमी आहे. तिथे मी मुलांना डान्स शिकवतो. मला वेस्टर्न, हिप हॉप, फ्री स्टाईल, कंटेम्पररी, बॉलीवूड हे डान्स प्रकार खूप आवडतात. सध्या मी शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे माझ्या डान्स ॲकॅडमीला मिस करतोय.
माझ्या साताऱ्यातील सगळ्या मित्रमंडळींना ही मालिका आवडते. प्रेक्षकांनाही आवडते याचंही कारण त्यातला हा देशप्रेमाचा भागच असावा. या मालिकेत सगळं खरं खरं दाखवलंय. ही चार भिंतीत घडणारी मालिका नाहीय. या मालिकेत अख्खं गाव दिसतं, ते सर्वांना आपलंसं वाटतं, अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा खूप छान वाटतं. मला एक गोष्ट आर्वजून सांगावीशी वाटते, इस्त्राईलमध्ये प्रत्येकाला सैनिकी प्रशिक्षण घ्यावंच लागतं. कुटुंबातील एकाला तरी सैन्यात जाऊन देशसेवा करावीच लागते. भारतातही प्रत्येक घरातून किमान एक जण तरी सैन्यात भरती झालाच पाहिजे असा नियमच केला पाहिजे.
आर्मीच्या वर्दीचं मला पहिल्यापासून आकर्षण आहे. मालिकेतल्या पहिल्याच सीनसाठी मी जेव्हा अंगात वर्दी घातली, तेव्हा मला असं वाटलं, की खरोखर सीमेवर गेलोय, शत्रूशी सामना करतोय. इतकी त्या वर्दीत ताकद आहे. ती वर्दी घातल्यावर आपोआपच तो रुबाब आपल्या अंगी येतो.
स्वातंत्र्य म्हणजे काय? असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा मला वाटतं, की आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेलंच नाहीय. कारण स्रियांना अजूनही ते खऱ्या अर्थाने अनुभवता येतच नाही. स्त्री-पुरुष दोघांनाही समान स्वातंत्र्य मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय असं म्हणता येईल.

 नितीश चव्हाण 
(अजिंक्य शिंदे)



जवानांना द्या आदर आणि प्रोत्साहन...

माझं कॉलेज सुरू असतानाच माझं ऑडिशन देणं सुरू होतं. ‘लागीरं’साठीही ऑडिशन क्‍लीप पाठवली होती. माझी पहिली ऑडिशन क्‍लीप बघून मुंबईची मुलगी साताऱ्याकडच्या भाषेत कशी बोलू शकेल अशी शंका निर्मात्यांना वाटू शकली असती, म्हणून मग मी माझी दुसरी ऑडिशन क्‍लीप पाठवली. मग त्यांना विश्‍वास वाटला की मी करू शकेन शीतलची भूमिका. अर्थात मीही या भूमिकेवर मेहनत घ्यायची तयारी दाखवली. मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होण्याआधी मी एक महिना साताऱ्यात जाऊन राहिले. तिथल्या माणसांमध्ये मिसळले. ते कसं बोलतात, कसं वावरतात त्याचं निरीक्षण केलं. मग हळूहळू मला भाषेतले बारकावे कळू लागले. मी एक खास वहीच केली होती, त्यात वेगवेगळे शब्द लिहून ठेवायचे. त्यांची उजळणी करायचे.
मालिका लेखक तेजपाल वाघ यांनी मला सैनिकांविषयी काही माहिती दिली. काही गोष्टी, किस्से सांगितले. मीही स्वतः काही माहिती मिळवायला सुरुवात केली. सैनिकांच्या आयुष्यावर आधारित काही लघुपट पाहिले. काही पुस्तकं वाचली. आमच्या साताऱ्यातील शूटिंगच्या ठिकाणी बऱ्याच सैनिकांच्या कुटुंबांना जवळून पाहिलं. माझ्या घरातलं किंवा आजूबाजूचं सैन्यात कोणीच नाहीय, पण माझे बाबा मला आर्मीमध्ये मेडिकलला जॉईन हो असं सांगायचे, पण मला मेडिकलचे विषय खूप कठीण वाटायचे. त्यामुळे मेडिकलच्या वाट्याला गेले नाही, पण बाबांची इच्छा अशी मालिकेच्या रूपाने पूर्ण झाली.
मला वाटतं आपण सैनिकांना सन्मान दिला पाहिजे. आपल्या घरचं कोणी एक आठवडा किंवा १५ दिवस पिकनिकला किंवा बाहेरगावी गेलं तर आपण हजारदा फोन करून विचारतो कसा आहेस, कुठे आहेस? कधी येणार... पण सैनिकांना कधी वर्ष, दोन वर्ष सुट्टी मिळत नाही. आपल्या घरापासून दूर राहावं लागतं. तेव्हा त्यांच्या घरातल्या माणसांना काय वाटत असेल याचा आपण विचार केला पाहिजे. आता मालिकेत भूमिका साकारतेय म्हणून नव्हे, पण मला नेहमीच सैनिकांविषयी जिव्हाळा आहे. त्यांचा युनिफॉर्म, त्यांची शिस्त, त्यांचं बोलणं, एकूणच सैनिकांचं व्यक्तिमत्त्व मला खूप आवडतं.
आम्ही आमच्या शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करायचो. तेव्हा आमच्या हातातील झेंडे कधीच जमिनीवर पडू द्यायचो नाही. आमच्या शाळेची शिस्तच तशी होती. झेंडा जमिनीवर पडलेला दिसला, तर दंड व्हायचा. मला वाटतं सर्वांनी हा दिवस साजरा करताना दुसऱ्या दिवशीही त्याचं पावित्र्य राखलं जाईल हे पाहायला हवं.
माझ्या मते स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवं तसं वागणं असं नव्हे... स्वातंत्र्यामुळे आपली जबाबदारीही तितकीच वाढते. सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याची जबाबदारी जरी आपण पाळली, तरी खूप मदत होईल. कारण सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासूनच होते. आपले हक्क आपल्याला समजतात तशी काही कर्तव्येही आपल्याला पार पाडली पाहिजेत. आपला देश सक्षम होण्यासाठी आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.
शीतल पवार या माझ्या भूमिकेतून मला प्रेक्षकांना असं सांगायचंय, की सैनिकांना नेहमीच प्रोत्साहन द्या. तो तुमच्या जवळचा नसला तरी आणि असला तरी! देशप्रेमाची आवड असलेल्या आपल्या कुटुंबातील कुणाच्याही मार्गात तुम्ही अडचण निर्माण करू नका. त्यांची साथ सोडू नका. त्यांना विश्‍वास द्या.
मुलींना आपला नवरा आपल्या सोबत असावा असं वाटणारच, पण पती सैन्यात असला तर तुमचीही जबाबदारी खूपच वाढते. कारण आमच्या मालिकेतला तो संवाद तुम्हाला माहीत असेलच, फौजी हा लाखात एक असतो, आणि त्याची बायको दहा लाखात एक असते!

शिवानी बावकर
(शीतल पवार)

(शब्दांकन ः भक्ती परब)


1 comment:

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...