Sunday, 29 July 2018

पिवळा गुलाब


आमच्या गावाकडच्या परसबागेत जास्वंदीपासून ते गुलाब अबोलीपर्यंत वेगवेगळ्या रंगांची, गंधाची फुलं होती. अजूनही आहेत. त्या बागेकडे पाहिलं की प्रसन्न वाटायचं.
एके दिवशी आईने बाजारातून एक पिवळ्या गुलाबाचं रोपं आणलं. या गुलाबाच्या पाकळ्या वरून पिवळ्या गडद रंगाच्या आणि खालून लालूस रंगाच्या होत्या. काय त्याच्या रंगाचा आणि देखणेपणाचा रुबाब विचारू नका.

त्याआधी आम्ही कधी पिवळा गुलाब पाहिलाच नव्हता. त्यामुळे कुतूहल तितकंच अप्रूप की बागेत लावल्यावर याला पहिलं फूल येईल ते पिवळ्या रंगाचंच असेल ना...
पण हळहळू या गुलाबाच्या रोपाने इतर सर्व फुलझाडात आपली जागा वरचढ केली. त्यामुळे बागेत आल्यावर पहिलं लक्ष त्याच्याकडेच जाऊ लागलं. 

एके दिवशी तर या गुलाबाच्या झाडावर २५ फुलं फुलली होती. तो क्षण अजुनही नजरेसमोर ताजा आहे.
त्यावेळी शाळेत, कुठल्या समारंभात किंवा अगदी घरी असल्या तरी बायकांना फुलं केसात माळण्याचा सोस होता. आजंही आहे, पण कमी झालाय. त्यामुळे आईने सांगितलं, की वाडीतल्या बायका त्या गुलाबाच्या फुलांकडे बघून फुलं मागायच्या आत यातली काही फुलं नीट तोड आणि त्यांना नेऊन दे. तसं केलंही. सगळ्या बायका खूश झाल्या.


त्या दिवसांत शाळेत फुलं माळून जायचाही एक वेगळाच स्वॅग होता. कधी अबोलीचा मोठा गजरा तर कधी मोगऱ्याचा, त्यात सुरंगीचा गजरा भाव खावून जायचा. पण आमच्या घरी सगळ्यांना त्या पिवळ्या गुलाबाचंच कौतुक. एके दिवशी आई म्हणाली, तुमच्या शाळेतल्या बाईंनाही नेऊन दे या पिवळ्याचं गुलाबाचं फूल. तेव्हा शाळेत बाईंना फुलं नेऊन देण्यासाठी मुलींमध्ये चढाओढ असायची. आपण दिलेलं फूल किंवा गजरा बाईंनी माळला की मुलींना भारी वाटायचं. एके दिवशी मी बाईंना पिवळा गुलाब नेऊन दिला. बाईंना ते फूल खूप आवडलं. 

मग अधूनमधून अशी पिवळ्या गुलाबाची फूलं मी त्यांना देऊ लागले. मग पावसाळा जवळ आला तसा बाई मला म्हणाल्या, या गुलाबाची एक छोटी फांदी आणून देशील का... मी आईला विचारलं...आईसुद्धा हो म्हणाली. गावाकडे पावसाळी दिवसात फुलझाडांच्या फांद्या लावण्याचा शिरस्ता अजुनही आहे. आईने मग मला एक छोटी फांदी छाटून दिली आणि बाईंना द्यायला सांगितली. बाई खूश झाल्या. पण त्यानंतर आम्ही मात्र नाखूश झालो. कारण आमचं गुलाबाचं झाड हळूहळू सुकू लागलं. आणि एके दिवशी मरून गेलं. 

बाईंना याची फांदी तोडून दिली म्हणूनच आमचं गुलाबाचं झाड आमच्यापासून दूर गेलं. हेच तेव्हा आमच्या बालमनात पक्क बसलं. त्यानंतर शाळेतही फुलं माळून जाणं कमी होत गेलं. बाईंनाही फूल नेऊन देणं बंद झालं. मुंबईत रहायला आल्यानंतर आमच्या शेजारच्या काकू हळदी कूंकू घालतात तेव्हा पांढरी सोनटक्याची फुलं वाटतात. ती फुलं एकदा कॉलेजमध्ये माळून गेल्याचं आठवतंय. आणि अधून-मधून मोगऱ्याचा गजरा किंवा सोनचाफ्याची फुलं बाजारातून आणते. तेवढाच काय तो फुलांचा सहवास.

आज विचार करते तेव्हा वाटतं, बाईंच्या विचारण्याचा आदर करत नीट नाही म्हणून सांगितलं असतं तर पिवळ्या गुलाबाचं झाड वाचलं असतं का....का त्याचं अस्तित्त्व तेवढ्यापुरतंच होतं... पावसाळ्यात गावाकडे दरवर्षी फुलझाडं लावतो. त्यावेळी पिवळ्या गुलाबाची आठवण पुन्हा ताजी होते. शहरात आल्यावर आता कित्येक रंगाची गुलाबाची फुलं मी पाहिली. पण त्या पिवळ्या गुलाबाच्या झाडाची आठवण कळीसारखी टवटवीतच राहतेय. या घटनेमुळे माझा आवडता रंग पिवळा हे एकदम फायनलच झालं. त्यामुळे कपडे खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीसाठी रंगाची निवड करताना पिवळ्या रंगाला झुकतं माप देते.
कसं असतं ना मानवी मन? आपलं हरवलेलं काहीतरी असं आसपासच्या सगळ्यात शोधत राहणारं?

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवर ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८


पण ओढ ही युगांची...

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची

शाळकरी दिवस संपता संपता महाविद्यालयाच्या गुलाबी वळणावर कविता भेटायची. प्रेमाच्या बेधुंद सरी तनमनाला भिजवून जायच्या. ज्येष्ठकवी मंगेश पाडगावकरांच्या या कवितेला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी तितकीच भावोत्कट चाल दिली. आणि त्या वयाच्या कित्येक कुमार-कुमारींच्या मनोवस्थेला सुरेल संगीतात लाजत लाजत हळुवार गुणगुणत वाट मिळाली. कवितांनी उमलत्या वयातील प्रेमाला शब्दबद्ध केल्यामुळे त्यावेळच्या तरुणाईच्या भावनांना व्यक्त होणं सोपं झालं. मग अरूण म्हात्रे यांच्या कवितांतून ते गुलाबी मन थोडं जागं झालं....ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची... असं काहीसं पुढे व्हायला लागलं. एकंदरीतच ते दिवस आता कुठे असंच आता दिसू लागलंय. आणि हे सत्य आहे. 
त्यावेळच्या चित्रपटांनी, संगीताने, साहित्याने खरंच जादू केली होती. कित्येकांच्या डायरीत, पुस्तकात आठवणींची मोरपीसं, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, प्रेमपत्राचा गुलाबी कागद असायचा. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल लिहिलेल्या प्रेमभरल्या उपमांच्या ओळी असायच्या. पहिल्या भेटीची हुरहूर असायची, नात्यांची मजा उलगडण्यात असते हे मानणारी ती हळवी पिढी. पहिल्या प्रेमाला जपायची छोट्या छोट्या गोष्टींतून, आठवणींतून. कधी त्याला व्यक्तता मिळायची, कधी नाही मिळायची. म्हणून पहिल्या प्रेमाच्या आठवणींना कोणी कधी पुसून टाकत नव्हतं, तर त्या जपल्या जात होत्या. आजही आपल्या आजी-आजोबांना विचारलंत तरी ते किती चेहऱ्यावर तजेला आणून त्यांच्या स्वप्नातली ती आणि तो विषयी सांगतील. त्यांच्या बोलण्यातही अगदी उत्साह ओसंडून वाहताना दिसेल. मंदिरात जाण्याचा बहाणा, ग्रंथालयात पुस्तकं चाळण्याचा बहाणा असं बरंच काही. ज्यांना त्यांचं पहिलं प्रेम भेटे (मिळे) त्यांचं ठिक आहे, पण ज्यांना ते फक्त स्वप्नातच मिळे त्यांच्यासाठी समाजाने कांदे-पोह्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम आखून दिला होताच. आता तो चित्रपटात किंवा मालिकेत घर जुन्या विचारांचं आहे हो! हे दाखवण्यासाठी १५ ते २० मिनिटं कांदे-पोह्यांचं दृश्य दाखवलं जातं. पण खरंच वरून ती मुला-मुलींना भेटण्याची समाजमान्य चौकट असली तरी त्यात धोके होतेच. मुलीला कमीपणा मिळायचा. मुलाचं नाक नेहमी वर अशा सोहळ्यात. तिने चहा, कांदे-पोहे स्वतः बनवून पाहुण्यांसाठी घेऊन यायचं नी मग प्रश्नांच्या फैरी सुरू व्हायच्या. मुलीचं नाव नीट माहित असलं तरी पहिला प्रश्न असायचा काय गं पूर्ण नाव सांग तुझं....इथपासून ते स्वयंपाक येतो का, गाता येतं का, शिवणकाम येतं का...चालून दाखव... सुईत दोरा ओवून दाखव इथवर त्या प्रश्नांच्या फैरी पोहोचायच्या मुलीला नकोसं व्हायचं...


या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांचंही रुपडं समाजातील स्तरानुसार बदलत गेलं. ते अगदी अलिकडे आलिशान हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये भेटणं, कॅफेमध्ये भेटणं असं सुरू झालं. मुलाकडच्या, मुलीकडच्या सगळ्यांनी एकमेकांना अशाप्रकारे भेटताना वरून म्हणायचं भेटताना की हे साधं भेटणं आहे हो, यात औपचारिकता कशासाठी? पण पुढे जाऊन या पद्धतीलाही कांदे-पोह्याचंच रुप आलं. पण तेही आधुनिक म्हणून मुला-मुलींना मान्य झालं. पण आता मुलं-मुली दोघेही खूप शिकतात. त्यांचे करिअर, नोकरी आणि व्यवसाय विषयक अनेक प्रश्न असतात. आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा आता स्वप्नाळू राहिल्या नाहीत. त्या व्यावहारिक झाल्या आहेत. घरं सांभाळायचं म्हटल्यावर कित्येक मुली धसका घेतात, इथे रोज ऑफिस गाठायची घाई आणि सासरच्या घरात इतकी माणसं सगळं भयंकर वाटू लागतं तिला... शिक्षणाच्या जोरावर पुढे आलेल्या मुली आधुनिक विचार कर्त्या झाल्या तरी मुलं मात्र अजून पारंपरिक आणि आधुनिकतेच्या हिंदोळ्यावर अधांतरी झोके घेतायत.
पूर्वी घरातल्या वडीलधाऱ्यांना इतकंच कशाला आजुबाजुला राहणाऱ्या मंडळींना, नातेवाईकांना मुला-मुलींच्या अपेक्षा माहित असायच्या. त्यामुळे ओळखीतून अनेक लग्नगाठी जुळायच्या. मुला-मुलींविषयी त्यांच्या घरची मोठी माणसं खात्रीने काही गोष्टी सांगायची. त्यामुळे परस्परांना निवड करणं सोपं व्हायचं, विश्वास वाटायचा. पण आता नात्यात आणि पिढ्यांमध्ये बदलत्या काळानुसार अंतर वाढतंय त्यामुळे माझा लाडका मुलगा किंवा मुलगी असली तरी तिच्या आवडीनिवडीविषयी काही ठामपणे घरच्यांना ते सांगता येत नाही. तरुणाई शिक्षणाच्या स्पर्धेत अडकली, मग शिक्षण घेतल्यावर योग्य नोकरी किंवा व्यवसायात टिकून राहण्यासाठी जीवाचं रान करू लागली. त्या नादात त्यांचा आपुलकीच्या नात्यांशी बंध कमजोर होऊ लागला. तो नात्यातल्या ओलावा, ती माया, तो आपलेपणा राहिला नाही. त्यामुळे मनमोकळं बोलायचं, पण ते बोलायचं तरी कोणाशी अशी कित्येकांची अवस्था होते.
आजच्या पिढीलाही आपल्या व्यग्र दिनक्रमातून पावसात भिजावसं वाटतं, तिची किंवा त्याची सोबत असावी असं वाटतं, जशी कवितांमध्ये वर्णन केलेली असते ना अगदी तशी. पण वेळ नसतो. बाहेर मस्त पाऊस पडत असतो आणि ज्या डोळ्यांनी स्वप्नं पहायला हवीत ते डोळे संगणक, लॅपटॉप, आय पॅड अशा कुठल्यातरी स्क्रिनवर खिळलेले असतात, कॉफीचा मग ही वाफाळत थंड होऊन जातो, त्याचंही भान राहत नाही. मग चिडचिड...ताण...कटकट... कधीतरीच निवांत चार क्षण आजच्या पिढीला अनुभवायला मिळतात तेव्हाही घरच्यांपेक्षा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांसोबत फिरायला प्राधान्य दिलं जातं. कारण घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त वेळ जातो ना... तर महत्त्वाचा आहे वेळ...
आजच्या तरुण पिढीलाही डोळे मिटून घेता, दिसतेस तू समोरफुलवून पंख स्वप्नी, अन् नाचतात मोर, झाली फुले सुगंधी, माझ्या ही भावनांची...  पाडगावकरांच्या या ओळींतली भावना अनुभवायची आहेच. पण ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्यासाठी त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी घरच्यांनीही मागे लागायची आवश्यकता आहेच. पण ते आधुनिक झाले तशी जोडीदार शोधण्याची पद्धतही आधुनिक व्हायला हवी, असायला हवी. म्हणजे जिथे शिक्षण, नोकरी-व्यवसाय, त्यांची पॅशन, आवड-निवड, स्पर्धेतही टिकून राहून सकारात्मकतेने पुढे जाऊ, एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांचे आधार न होता सोबती होऊ म्हणणारा जोडीदार सापडेल अशी काहीतरी व्यवस्था हवी. जसं की लग्न जमवणारी संकेतस्थळं आणि त्यांची apps. लग्नाळू तरुण-तरुणींसाठी अगदी योग्य. त्यांना हवं तसंच. आजच्या पिढीसाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे. तो वेळ १०-१२ वेळा कांदे-पोह्यांच्या कार्यक्रमात घालवायचा नाहीय. कित्येक मुला-मुलींना नुसतं भेटून त्यांना होकार-नकाराच्या झुल्यावर झुलवायचं नाहीय. म्हणून थेट आणि स्पष्ट विचार करणाऱ्या आजच्या पिढीसाठी एबीपी वेडींगसारखं संकेतस्थळ हवंय. जिथे अनेक शक्यतांना पडताळून पाहता येईल, तेही विश्वासार्ह पद्धतीने.
पण हे कांदे-पोह्यांचे कार्यक्रम मागे पडून लग्नसंस्थेत ही आधुनिकता का आली? त्याच्या मागेही काही कारणं आहेत. लग्न करण्याचा पारंपरिक आता हेतू बदललाय. आधी लग्न हा एक विवाह संस्कार होता. एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं जाणं होतं. आता नात्यातली शारिरिक आणि भावनिक गरज याला महत्त्व आलंय. त्यामुळे लग्नाचं वय बदलत आहे. लग्न करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. लग्न विधींनाही आता तेवढं महत्त्व उरलेलं नाही. पण तरीही लग्न संस्था ही समाजाचा आजही महत्त्वाचा पाया आहे. पण मनासारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात वगैरे अशा विधानांचा आजच्या पिढीवर प्रभाव नाही. आहे हे, असं आहे ते स्वीकारून पुढे जाण्यावर भर देणारी ही पिढी आहे. मनासारखा जोडीदार मिळावा म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी यायला हव्यात हे आजची पिढी स्वतः ठरवते आहे. घर, नोकरी-व्यवसाय, कामाची पद्धत, पत, स्वभाव, कुटुंबाविषयी जाणून घेणं, मुला-मुलींचा मित्रपरीवार कसा आहे, दोघांपैकी एकाला कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागला तर कुणी नमतं घ्यायचं? या सगळ्याचा सारासार विचार करून आजची पिढी जोडीदाराची निवड करू लागली आहे.
त्यामुळे तीला तो भेटणार आणि त्याला ती भेटणार पण वेगळ्या पद्धतीने. असं म्हणूया हवंतर. पण ओढ ही युगांची हे मात्र सत्य आहे ते असंच चिरंतन राहणार आहे. कारण नाती बदलली, काही कारणांमुळे नात्यात दुरावा आला तरी नाती जपायला हवीत, तुटता कामा नयेत याची काळजीही आजच्या पिढीला आहे. फक्त कधी कधी त्यांचा गोंधळ उडतो, तेव्हा मोठ्यांनी त्यांना समजून घ्यायला हवं. कारण प्रत्येकाला वाटत असतं अख्या जगाने नाकारलं तरी कुणीतरी आपल्याला पूर्णपणे स्वीकारायला हवं, आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा, जिवापाड प्रेम करायला हवं, आपल्याला त्याने सुख-दुखात पूर्णपणे पाठिंबा द्यायला हवा. तेव्हाच आपण आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतो. अशी व्यक्ती म्हणजे मुलामुलींसाठी पहिल्यांदा त्यांचे आई-वडील असतात. मग ती जागा जोडीदाराने घ्यायला हवी अशी गोड अव्यक्त भावना असते. म्हणूनच पण ओढ ही युगांची या चार शब्दांचं महत्त्व आजची पिढीही जाणून आहे.
पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता मुंबई वृत्तांत २१ जुलै २०१८

ग्रंथालयातली दिवाळी


काय... दिवाळी...दिवाळी तर कधीच संपलीय आणि यावर्षीच्या दिवाळीला अजून अवकाश आहे. तर असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण मी ते बोलतेय ग्रंथालयातल्या दिवाळी विषयी. कारण ग्रंथालयात काम करणं हा माझ्यासाठी एक भन्नाट अनुभव होता. मुझको जहाँ मिल गया, असंच वाटतं नेहमी. कारण आमच्या ग्रंथालयात हे दोन शब्द दिवसभरात दोनदा तरी तोंडी येतातच.
गेल्याच आठवड्यात ग्रंथालयात गेले तेव्हा दिवाळी अंकांचं कमी दरात वाटप सुरू होतं. आणि मग ते सगळे जुने दिवस आठवले. 

दिवाळी सुरू व्हायच्या आधी महिनाभर ग्रंथालयाची दिवाळी सुरू व्हायची. बाजारात वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले, मुखपृष्ठांनी आकर्षित करणारे दिवाळी अंक दाखल व्हायचे. त्याआधी ललित मासिकातून त्यांच्या ट्रेलरसारख्या जाहिराती वाचलेल्या असायच्या. त्यामुळे खूप उत्सुकता असायची की यावर्षी कुठले नविन विषय, लेखक वाचायला मिळणार.
आम्ही ग्रंथालयाच्या सभासद संख्येला, त्यांच्या आवडीला नजरेसमोर ठेऊन दिवाळी अंक खरेदी करायचो. दिवाळी अंक घेऊन ग्रंथालयात आल्यापासून आमची दिवाळी सुरू व्हायची. त्यांना कव्हर घालणं, त्यांची पानं मोजणं, दोऱ्याने शिवणं, त्यांच्यावर नंबर घालणं, शिक्का मारणं हे सगळे ग्रंथालयीन सोपस्कार कशासाठी तर तो अंक वाचकाकडे जाऊन सुखरुप ग्रंथालयात परत यावा यासाठी. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या आधीचा दिवस ग्रंथालयात दिवाळी अंक देण्याचा दिवस म्हणून उजाडायचा. सक्काळीच दादरच्या फुलमार्केटमध्ये जाऊन सजावटीसाठी घासाघीस करून फुलं आणायचो.

सगळ्या दिवाळी अंकांना त्यांच्यासाठी खास सजवलेल्या टेबलावर छान मांडून ठेवायचो. ग्रंथालयात त्याच दिवशी रांगोळी काढायचो. त्यावेळी टेबलावर, काही रॅकवर नटून-थटून दिवाळी अंकांच्या रुपात बसलेलं ते अक्षर साहित्य बघून खूप आनंद व्हायचा. पण दिवाळी अंकाचं वाटप सुरू झाल्यावर तर अजूनच मजा यायची. वाचकांची आपला आवडता दिवाळी अंक पहिल्याच दिवशी घेण्यासाठी झुंबड उडायची. काही वाचक सांगायचे, अगं आमच्यासाठी हा दिवाळी अंक ठेव, तो दिवाळी अंक ठेव. मग आम्ही ग्रंथालयातले सगळे एकमेकांकडे बघून डोळे मिचकावायचो. कारण आमच्यासाठी सगळे वाचक समानच होते. कोणी लाडका नाही- कोणी दोडका नाही. काही वाचक तर दिवाळीचा फराळ, मिठाई वगैरे देऊन आम्हाला मस्का मारायचे. त्यावेळी आम्ही खूप श्रीमंत असल्याचं फिलींग यायचं.

याहीवर्षी ग्रंथालयात गेले होते, यावेळी ग्रंथालयातील वाचक म्हणून गेले होते. तर दरवर्षीप्रमाणे दाराशी रांगोळी दिसली, फुलांच्या माळांनी सजवलेलं टेबल दिसलं. टेबलावर काहीच म्हणजे अगदी ५-६ चं दिवाळी अंक दिसले. आणि मनातून अतिशय आनंद झाला. चेहऱ्यावरही हसू उमटलं. माझ्याबरोबरची मैत्रीण मला म्हणाली, अगं टेबलावर ५-६ च दिवाळी अंक आहेत. आणि तू हसतेस काय... पण मी तिला कसं सांगू शकणार होते की दिवाळी अंकाचा किंवा रोज वाचायला जाणाऱ्या पुस्तकांचा रॅक रिकामा दिसला की किती आनंद होतो ते... नाहीतर अलिकडे पुस्तकांना रॅकवरच धूळ खात पडावं लागतंय अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो.

ग्रंथालयातल्या बाई वाचकांच्या आवडीनिवडीविषयी सांगत होत्या. खरंतर तिथे गेल्या गेल्या दिवाळी अंकांचे फोटो काढण्याच्या विचारात होते. पण टेबल बरचसं रिकामी दिसल्यावर खात्री पटली. वाचक दुरावला नाहीय. दिवाळी अंकांची आमची परंपरा आपण आजही अभिमानाने मिरतोय. ग्रंथालयातली ही अक्षर साहित्याची दिवाळी दरवर्षी ४ महिने सुरू असते. मग पुढच्या दोन महिन्यात ते दिवाळी अंक वाचकांकडून गोळा केले जातात. अशा पद्धतीने सगळे दिवाळी अंक परत आले की हे दिवाळी अंक त्या त्या दिवाळी अंकाच्या किंमतीप्रमाणे पाव टक्क्याने विकायला काढले जातात. ज्यांना दिवाळी अंक खास संग्रही ठेवायचे असतात त्यांच्यासाठी अशी खरेदी म्हणजे पर्वणीच असते. माझ्याही हाती दरवर्षीच्या नियमाप्रमाणे असेच विकत घेतलेले काही दिवाळी अंक होते. आणि वाचनसंस्कृती टिकून असल्याचा मनात न मावणारा आनंद.

पूर्वप्रसिद्धी - मुंबई आकाशवाणीवरील ऐसी अक्षरे १३,१४,१५ एप्रिल २०१८



Thursday, 19 April 2018

अबोल प्रेमाचा प्राजक्त


प्राजक्ताचं बहरणं, पाहिलं नाही कधी, गोष्ट तशी साधी-सुदी... होय, अगदी छोटीशीच गोष्ट आहे ऑक्टोबर या सिनेमाची. पण थोडं लक्ष दिलं तर खूप मोठं काहीतरी सांगू पाहणारी. तसं तर मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावणारे आपण छोट्या छोट्या गोष्टी नजरेला दिसत असल्या तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा आपलं लक्ष जात नाही. कसली असते ही घाई, जरा थांबा क्षणभर...
प्राजक्ताचं लाजणं, भुईवर गळून पडल्यावरही पावसाचे थेंब पडल्यावर खुदकन हसणं, क्षणाचं आयुष्य असलं तरी भरभरून सुगंध उधळणं... खूप काही सांगू पाहतंय इवलसं ते प्राजक्ताचं फूल. या फुलांचा प्रवास फुलण्यापर्यंत ते सुगंध उधळीत जमिनीवर मूकपणे गळून पडण्यापर्यंतचा...त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिकांचा, गाण्यांचा, साहित्य-संस्कृतीतील संदर्भाचा ऑक्टोबर सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार आणि लेखिका जुही चतुर्वेदी यांनी अगदी समरसून अभ्यास केलाय. हे सिनेमाभर जाणवत राहतं. कारण प्राजक्ताचं रुपक वापरून या सिनेमाची पटकथा अप्रतिम बांधली गेलीय.  




आपण आपल्या माझं माझं जगण्याच्या नादात इतके दंग होऊन जातो की क्षणाक्षणातून मिळणाऱ्या अगणित प्राजक्त फुलांसारख्या आनंदाला मुकत असतो. प्राजक्त फुलांचं आयुष्य किती क्षणिक, आपलं त्यांच्याकडे लक्ष जाईपर्यंत ते फूल जमिनीवर गळून पडलेलं असतं.
काही ठिकाणी याला दुःखाचं फूल असं म्हणतात, ते एका आख्यायिकेमुळे. पण खरंतर हे प्राजक्ताचं फूल आपल्याला खूप काही सांगू पाहतं. आयुष्यातील बऱ्या वाईट घटना प्रसंगांना सामोरं जाताना कसलाही हिशेब मांडू नये आणि उद्या काय होणार याचा विचार न करता ही प्राजक्त फुलं आजचा आनंद, सुख आपल्याला कसं वाटायचं ते शिकवतात. तसंच आपणही आनंद, सुख अगदी मनापासून इतरांना द्यावं.
ऑक्टोबर सिनेमाही आपल्याला हेच सांगतो. ही कथा आहे डॅन म्हणजेच दानिश वालिया आणि शिवुलीची. बंगाली भाषेत प्राजक्ताला शिवुली म्हणतात. प्राजक्ताचा रंग बघा... पांढऱ्या पाकळ्या आणि देठ केशरी (भगवा) रंगाचा तसे हे दोघे... ती शांत, संयत, प्राजक्ताची फुलं अलगद वेचून त्याचा सुवास घेणारी, मी कशी वेगळी आहे हे जाणवून देण्याचा कसलाही आटापिटा नाही. तो मात्र देठासारखा. केशरी रंगासारखा... बंडखोर, काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेला, नियमांना तोडणारा, बंधनं झुगारून देणारा, स्टार्टअप स्वरुपात स्वतःच्या रेस्टॉरेंटचं स्वप्न पाहणारा, त्याचं हे वेगळेपण सिनेमात छान विनोद निर्मितीही करतं. तसंच त्याचं अधूमधून प्रश्न विचारणं आपल्यातल्या माणूसपणाला भानावर आणतं...
दोघेही हॉटेल मॅनेजमेंट शिकल्यावर दिल्लीतील एका पंचतारांकित नावाजलेल्या हॉटेलमध्ये ट्रेनीचं काम करत असतात.
हे दोघेही प्राजक्ताच्या फुलांचं प्रतिनिधीत्व करतायत...

पण मुद्दा हा आहे की प्राजक्ताच्या फुलांकडे जसं लक्ष जात नाही. तसं या दोघांचंही भिन्न स्वभावाचं वागणं कुणाच्याही लक्षात येत नाही, अगदी त्यांनाही नाही. जोपर्यंत त्यांचं आयुष्य कमालीचं बदलून टाकणारी ती गंभीर घटना घडत नाही. ती घटना घडल्यानंतर मात्र प्रेक्षक म्हणून आपलंही आणि सिनेमातील इतर व्यक्तिरेखांचंही त्यांच्याकडे लक्ष जातं. हॉटेलमधल्या पार्टीत ती घटना घडण्याआधी शिवुली आपल्यासोबतच्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारते, व्हेअर इज डॅन...आणि त्यानंतर मनाला सुन्न करणारी ती घटना. प्राजक्ताच्या फुलांबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की एका राजकुमारीनं सुर्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता. आणि तिच्या वडलांनी, तिने विनंती केल्यावर सूर्यही तिच्याशी लग्न करायला होकार देतो. ती राजकन्या नववधूच्या वेशात तयार होऊन सूर्याची वाट बघत असते, पण सूर्य येत नाही. त्यावेळी ती, कुठे आहेस तू? हा प्रश्न मनोमन विचारत असते, जसं शिवुली विचारते, व्हेअर इज डॅन... सूर्य न आल्यामुळे चिडून ती राजकन्या लग्नमंडपातल्या होमकुंडातील अग्नीत जीव देते. त्यामुळे असं म्हटलं जातं प्राजक्ताची फुलं सूर्यावरील रागाने रात्री फुलतात आणि सूर्योदय व्हायच्या आत ती जमिनिवर गळून पडतात. बंगाली साहित्यात रविंद्रनाथांची शिवुली फूल नावाची एक कविताही आहे. तर हे प्राजक्ताचं फूल मूक आक्रोश करत जमिनीवर पडतं तशीच शिवुलीच्या बाबतीत घडणारी ती घटना.
त्यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखांचं वेगवेगळ्या पद्धतीने वागणं, एकाच परीस्थितीत माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो, वागतो हे सिनेमा पाहताना लक्षात येतं. डॅनने शिवुलीसाठी दिवस - रात्र एक करणं, शिवुलीच्या आईने शिवुली, आपली दोन लहान मुलं, तिचा दीर, आपल्यातलं शिक्षकीपण हे सगळं सांभाळत वागणं, शिवुलीच्या मित्रांचं वागणं असं सगळया व्यक्तिरेखांचे विविध पैलू शिवुलीच्या बाबतीत घडलेल्या त्या एका गंभीर घटनेने प्रेक्षक म्हणून लक्षात घेता घेता त्या कथेत आपण रंगून जातो. कथनाची ही शैली फार विलक्षण आहे. यात डॅन आणि शिवुलीचं त्या घटनेनंतरचं वागणं, त्यांचं नातं कसं आहे, ते कसं यापुढे उलगडणार यात आपण सिनेमा पाहताना गुंतून जातो. दिग्दर्शन आणि लेखनाचा इथेच विजय होतो.

सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपल्याला यावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी ते कळत नाही. हेच या सिनेमाचं यश आहे. कुठला विषय मांडायचाय असा आरडाओरडा नाही, संवादाचा मारा नाही, काहीतरी संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न नाही. सिनेमाचा शेवट झाल्यावर वाटत राहतं काहीतरी मिसिंग आहे, आणि हे जे मिसिंग आहे तेच तर आपल्याला शोधत शोधत परीपूर्ण व्हायचंय.
मित्र-मैत्रिणीतलं नातं, प्रेम असो किंवा आपुलकीचं कुठलंही नातं असो.... हे प्रेम असं का...काय आहे हे नातं... कुठलं नातं आहे हे आणि हे असं का आहे... असे हजारो प्रश्न जसे डॅनला तो शिवुलीसाठी काही करू पाहतो तेव्हा विचारले जातात, तसे प्रश्न विचारण्यापेक्षा तो क्षण काय सांगतोय तसं वागलं तरच त्या क्षणाला महत्त्व आहे. आणि अशा क्षणाक्षणात भरभरून जगण्यानेच तर नाती समृद्ध होतात, अधिक घट्ट होतात. एकमेकांना माणूस म्हणून आपण समजून घेऊ लागतो. डॅनने प्राजक्ताची फुलं शिवुलीजवळ ठेवणं, आपला फोटो तिच्या बेडजवळ दिसेल असा लावणं, तिच्या आयब्रोज करण्यासाठी ब्युटीशियनला आणणं, तिच्या घरच्यांना धीर देणं अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी यात कुठेही हिरोगिरी येऊ न देता दिग्दर्शकाने सुंदर मांडल्या आहेत.

पाहिलं तर प्राजक्ताचं ते इवलंसं फूल. पण त्या फुलाने डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्यामध्ये जिवंतपणा आणला. असा जिवंतपणा अलिकडे नात्यांमध्ये फार अभावानेच आढळतो. तर अशांसाठी हा सिनेमा प्राजक्ताचा सडा बनून आलाय. अबोल प्रेमाचे असे काही क्षण एखादी कलाकृती आपल्याला शिकवणीचे रुप धारण न करताही देते तेव्हा अशा कलाकृतीविषयी बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही असतं.
मुळात प्रेमासाठी किंवा एखादी भावना व्यक्त करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो खरंतर, फक्त आपलं मन त्या क्षणी तिथे असलं पाहिजे. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या, भूमिका बदलणाऱ्या या माणसांच्या जगात प्राजक्त फुलांसारख्या माणसांचं असणं अधोरेखित करणाऱ्या शूजित सरकार, जुही चतुर्वेदी, वरुण धवन, बनिता संधू यांचं मानपासून कौतुक. सिनेमॅटोग्राफर अविक मुखोपाध्यायचंही विशेष कौतुक.
प्राजक्ताचं फूल जेव्हा गळून पडतं, तो आक्रोश आपण समजू शकत नाही, पण एखादं नातं तुटतं, कायमचं पारखं होतं तेव्हा मात्र मनाचा आकांत, आक्रोश, असंख्य, असह्य वेदना होतात. पण हा सिनेमा पाहताना तो ज्या प्रकारे चित्रित झालाय त्यात कुठेही बटबटीतपणा नाही, भावनांचा कल्लोळ नाही. एकेक फ्रेम कौशल्याने अगदी प्राजक्त फुलांसारखी हळुवार उलगडत गेलीय.
हा सिनेमा डॅन आणि शिवुलीच्या अबोल नात्याचा आहे, तेवढाच तो शिवुली आणि तिच्या आईचा (गितांजली राव) आहे. आई-मुलीचं एक वेगळंच परीमाण लाभलेलं नातं या सिनेमात आहे. प्राजक्ताची उपमा इथे आईसाठी पण आहे. कारण आईचं आपल्या कुटुंबासाठीचं असलेलं समर्पण. बंगाली संस्कृतीत नववधूची सासरी रहायला आल्यावर पहिल्या दिवशी प्राजक्ताच्या फुलांनी ओटी भरण्याची एक रीत आहे. त्यामुळेच की काय तिथल्या स्त्रियांमध्ये आपसूकच हे प्राजक्तगुण येत असावेत. हा संदर्भ शिवुलीच्या आईमध्ये दिग्दर्शकाने थेट नाही पण खुबीने दाखवलाय. शिवुलीची आई विद्या अय्यर ही आयआयटीत प्रोफेसर आहे. ती विद्यार्थ्यांना तन्मयतेने शिकवते, आपल्या दोन लहान मुलांना हॉस्पीटलच्या आवारातही शांत जागा शोधते, तिचं त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष आहे. आपल्या दीरालाही ती समजावतेय, त्याचा शिवुलीवरील उपचार बंद करण्याचा विरोध मोडून काढतेय, शिवुलीची खूप काळजी वाटतेय, पैशांची जुळवाजुळव करतेय. नवरा नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्यावर आहे इतक्या सगळ्या गोष्टी ती करतेय...पण कुठेही दुःखानं कोसळणं नाही, ओक्साबोक्शी रडणं नाही... आईपणाची एक निराळीच संयमी व्याख्या म्हणून या व्यक्तिरेखेकडे पाहता येईल. परिस्थितीला शरण जात नाही, झुकत नाही, कंटाळत नाही... ती त्याचा सामना करते. तुम्ही आई असाल तर हा सिनेअनुभव तुम्हाला उभारी देईन, नसाल तर मार्गदर्शक बनेल. आईपण हे सुखावणारं, तितकंच भावनेनं ओथंबलेलं प्राजक्त फुलासारखंच तर आहे...

प्राजक्त फूल हे सगळ्या फुलात वेगळं आहे, क्षणिक आयुष्य असलं तरी स्वतःचं वेगळेपण त्यानं अबाधित ठेवलंय. तसा हा सिनेमा आहे. प्राजक्त फुलांकडे समर्पित वृत्ती आहे. कारण समर्पणात निरपेक्ष त्यागाची भावना असते. प्रेमाने दुसऱ्याला आपलंसं करण्याची इच्छा असते. कलाकृतीही अशीच असते. नाहीतर कोण कुठला तो डॅन आणि ती शिवुली त्यांच्यातील अबोल प्रेमाचा प्राजक्त फुलला तरी असता का... प्राजक्ताच्या फुलासारखी शिवुली जाता जाता डॅनचं आयुष्य बदलून जाते. त्याला जगण्याचं नवं भान देते. सिनेमात शेवटच्या प्रसंगात घर सोडताना प्राजक्ताच्या झाडाची काळजी करणाऱ्या आईला डॅन म्हणतो, मी घेऊन जातो ते झाड... त्याचं ते झाड घेऊन जाणं म्हणजे त्याला त्याच्या शिवुलीच्या अबोल नात्यातुनही क्षणभर का होईना मिळालेला आनंद, भावनांची समज... तो जणुकाही त्याच्याकडचं सुखंच वाटायला निघालाय...
खरंच, गावाकडच्या अंगणातल्या, कौलारू शाळेच्या आवारातल्या किंवा अगदी एखाद्या बागेत लावलेल्या प्राजक्ताची पखरण यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की अनुभवा. पण त्याआधी ऑक्टोबर हा सिनेमा पाहून मनात साठवायला हवा.  

Friday, 16 March 2018

स्मार्ट वे ऑफ वुमनहुड


काल रात्री मी ११:५१ ट्रेन पकडली बेलापूर सीबीडीहून... ऑफीसमधून स्टेशनपर्यंतच्या प्रवासात काहीशी भीती वाटत होती... अपराधी सुद्धा वाटत होतं. मग दुसऱ्याच क्षणी विचार आला का असं वाटतंय...मी काही ऑफीसमध्ये टाईमपास नव्हते करत, ज्यामुळे उशीर झाला म्हणून अपराधी वाटावं. वुमन्स डे स्पेशल फिचर करायचं होतं. डेडलाईन्स होत्या. आणि भीती याची वाटत होती, की काही अनुचित प्रकार घडला तर...मग नेहमी करते तसं केलं, वर आभाळाकडे पाहिलं चंद्राला सांगितलं माझ्यासोबत रहा, जेव्हा तो नसतो तेव्हा आभाळालाच सांगते की माझ्यावर लक्ष ठेव जरा...तर असा सकारात्मक विचार करून ट्रेनमध्ये चढले. सगळी भीती झटकून दिली. अपराधी वाटणंही मग कमी झालं.

खरंतर काय झालंय ना हल्ली आपण खूप टोकाचे विचार करत राहतो आणि आलेल्या क्षणांची मजा घालवतो. म्हणूनच आजच्या महिला दिनी तुम्हाला एक वेगळा दृष्टीकोन माझ्या रोजच्या जगण्यातून, अनुभवातून देता आला तर तो देण्याचा प्रयत्न या लेखातून करतेय.
ताडदेव ते बेलापूरच्या प्रवासात रोज जाता येताना तीन तास माझं निरिक्षण सुरू असतं. ग्रंथालयात होते तेव्हा रोज कित्येक अनोळखी व्यक्तींशी संवाद साधायचे. आता पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळेही अनोळखी माणसं भेटतात. या प्रवासात विविध वयोगटातल्या स्त्रियांच्या संपर्कात मी आले. यातून मला काही गोष्टी कळल्यात. काही मुद्दे लक्षात आले. स्त्रियांच्या समस्या काय आहेत हे कळायला लागलं...

त्यात दोन गट असे प्रकर्षाने दिसले ते असे की एक गट पुरुषांचा कमालीचा रागराग करणारा. तर दुसरा गट पुरुषांना घाबरून किंवा असं म्हणूया की ते सांगतील तसं वागणारा आणि स्वतःच स्वतःला बंधनात अडकवून घेणारा...
मैत्रिणींनो, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की यातला मध्यम मार्ग शोधा. आता ती समज, ती जागरुकता आलेली आहे की आपली स्पर्धा इतर कोणाशी नसून आपली आपल्याशीच आहे. आणि कित्येकींना हे माहितही आहे. पण त्या दिशेने पावलं अजून वळली नाहीयेत म्हणावी तेवढी. आपण पाहतो त्या मालिका, वाचलेली पुस्तके, सिनेमे इतर मनोरंजनाची साधनं यातून स्त्रियांना तेवढं प्रगल्भ दाखवलं जात नाही. अशी एक ओरड असते. आणि दुसरीकडे आधुनिक स्त्री म्हणजे रात्र रात्र घराबाहेर असणारी, ड्रींक करणारी, पार्टीजना जाणारी, मॉडर्न कपडे घालणारी असं दाखवलं जातं तेही पटत नाही. कारण सगळ्याच आधुनिक विचारांच्या स्त्रिया असं काही करत नाहीत. पण ललित साहित्यात, मालिकांमध्ये, सिनेमात जी स्त्री पात्रं दाखवतात. त्यांना त्या पात्राला उठून दिसण्यासाठी ते तसं दोन टोकाचं दाखवलं जातं. म्हणून आपण ते तसं बघून त्यांचं अनुकरण करू नये. किंवा त्याला नावं ठेवू नये. व्यक्तिरेखांना उठावदार करण्यासाठी वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा ७५ टक्के अधिक वरचढ दाखवावी लागते. तेव्हाच ती त्या त्या रसिकांच्या आकलनानुसार त्यांना कळते. हा एक लेखनाचा नियम आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य स्त्रियांनी यात स्वतःला अडकून घेऊ नये. माणसाचं मन नेहमी बदलांना घाबरतं. इथेच आपलं चुकतं.
तर माझा सांगायचा मुद्दा हा आहे की...
स्मार्ट वे ऑफ वुमनहुड काय असला पाहिजे...

तर त्यासाठी आपल्याला हे करायला हवं...
१.पुरुषांचा रागराग करणं, त्यांच्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्त्रीवाद नव्हे. तुम्ही स्वतःलाच रोज एक आव्हान द्या. आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.

२.आधुनिक विचारांच्या नादात कुटुंबाला अंतर देऊ नका. माणसं जोडा. दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःवर सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊ नका. आपल्या घरातील माणसांशी नीट बोलून घरातील सर्व कामांची जबाबदारी वाटून घ्या. स्मार्ट वुमन म्हणजे प्रत्येक गोष्ट तिला आलीच पाहिजे  (परफेक्ट असली पाहिजे.) असं नव्हे. कधी कधी तुमच्याकडूनही चुका होणं स्वाभाविक आहे. स्वयंपाक शिकणं ही गोष्ट मनापासून करा तिला बायकांनीच का करायचा स्वयंपाक असं डोक्यात घेऊ नका. घरातील लहान मुली-मुलांना तुम्ही समान वागणूक द्या. कधी वेळ काढून ज्येष्ठ व्यक्तींशी बोला. घरातील सासूबाईंना व्हिलन न समजता त्यांच्यासोबत योग्य तो संवाद साधत त्यांना आपलंसं करण्याची क्षमता अंगी आणा.

३.स्वावलंबन हे स्वतःपासून इतरांना दाखवून द्या. कारण काळाची गरज ही आहे कुणी कुणावर अवलंबून नव्हे तर सोबत असणं महत्त्वाचं आहे.

४.कपडे, आपलं दिसणं या गोष्टी आपल्या व्यक्तीमत्त्वाला खुलवण्यासाठी आणि आपल्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आहेत, यावर लक्ष द्यावं. आपण नीट कॅरी करू शकू अशी वेशभुषा आपण केली पाहिजे. रोज १५ मिनिटं तरी व्यायामासाठी दिली पाहिजेत. निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करा. डायटिंगचं खुळ डोक्यातून काढून टाका.

५.तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते. त्या गोष्टी लिहून काढा. त्यावर मात करण्यासाठी कुठल्या क्षमता अंगी बाणवल्या पाहिजेत त्याचा विचार करा. वेळ पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला कुणाकडून, कुणामुळे त्रास होत असेल, तर मोकळेपणाने बोला. तुमच्याकडे माध्यमं आहेत. पोलिसयंत्रणा आहे. पत्रकार मंडळी आहेत. तुम्ही बोलल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही.

६.तुम्ही शिक्षित आहात, तुमचं करिअर, नोकरी, व्यवसाय करत असाल तरीही एखादी वेगळी कला जोपासा. किंवा शिका. कारण पैश्याने माणूस जगतो. पण कला माणसाला जगण्यातला आनंद मिळवून देते. जिथे अजूनही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय. असा परीसर तुम्हीच शोधून काढा आणि त्यांनाही शिक्षणाचा हक्क तुम्ही मिळवून देण्याचा व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करा.

७.आठवडाभरातून स्वतःसाठी काही वेळ काढा. यावेळी इतर कुठलाही विचार मनात आणू नका. यू हॅव टू बी युवरसेल्फ. स्वातंत्र्य हवं म्हणजे नेमकं काय हे आधी नीट समजून घ्या. तुम्हाला व्यक्ती म्हणून जगताना, समाजात वावरताना जी बंधनं येतात, अडथळे येतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीला खीळ बसत असेल, घुसमट होत असेल तर त्या विरोधात तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे. यासाठी अखिल पुरुषजातीचा राग राग करु नये. एकीला एक अनुभव आला म्हणून दुसरीनेही राग राग करणं चुकीचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे पुरुष ज्या ज्या गोष्टी करतात ते आपल्याला करायला मिळाल्या पाहिजेत. हा समज चुकीचा आहे. आपणच आपल्याला प्रत्येक दिवशी नवं काही शिकण्याची सवय लावा.

८.आपण जिथे राहतो तो परीसर, आपलं ऑफीस किंवा आपला नेहमी संपर्क येतो अशी ठिकाणं...यामध्ये काही चांगलं काही घडावं असं तुम्हाला वाटतंय तर त्याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. आपला सन्मान आपणच आधी करायला शिका. तुम्ही आधी एक स्त्री म्हणून स्त्रिला सन्मान द्या.

९.स्वतःचा आनंद कशात आहे, हे शोधा. आपल्या स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक माध्यम निवडा म्हणजे ते लेखन, चित्रकला, नृत्य असं काहीही असू शकतं. तुम्हाला वाटतं ना मालिका, सिनेमात आपल्यासारखी स्त्री अजून का नाही दाखवत तर स्वतः आधी काळाप्रमाणे बदल स्वीकारा. मग त्याचंही प्रतिबिंब तुम्हाला मनोरंजनात नक्की दिसेल. पण त्याआधी मनमोकळं जगा. आणि असं जगताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी स्वतः मार्ग शोधा. यासाठी आपल्या पुरुष सहकाऱ्यांची, आपल्या जोडीदाराची, ज्येष्ठांची मदत घेण्यात कमीपणा मानू नका. कारण प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतंच असं नाही. स्त्रियांमध्ये प्रचंड क्षमता आहे...या क्षमतांचा विकास करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करुया. पुरुष हे तुमचे शत्रू नाहीयेत. खरंतर आपले शत्रू आपणच असतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे समजू, ओळखू तेव्हाच आपण सक्षम होऊन इतरांना, समाजाला नवी दिशा दाखवू शकू...त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना एकच सांगणं, स्वतःला ओळखा, खोटं वागू नका...खरं खरं सांगा आणि खरं खरं जगा... आणि मनापासून जे करावंसं वाटतंय ते करण्याचा निर्धार करा... महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा...

Friday, 23 February 2018

आनंदाची त्रिसूत्री

आनंदाच्या गावा जावे, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाची धडपड तर त्यासाठीच असते. प्रत्येक जण आनंदाच्याच शोधात असतो. पण आनंद ही अशी गोष्ट आहे की ती शोधून सापडत नाही. तर आनंद मिळवण्याच्या तुमच्या प्रामाणिक प्रवासात तुम्हाला ती थोडी थोडी मिळत जाते. पण त्यावेळी जर प्रवास करून नेमकं कुठे पोहोचायचंय या विचारात राहिलात तर मात्र थोडा थोडा मिळणारा तो आनंदही गमावून बसाल.
म्हणूनच आनंद मिळवण्यासाठी नाही तर आनंदी राहण्यासाठी काय करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. आपला आनंद कुठल्या गोष्टीत आहे हे अगदी ठामपणे नाही ठरवता आलं तरी अंदाजे काही गोष्टी ठरवा. आनंदी राहण्यासाठी काय करावं, कुठला असा निश्चित मार्ग आहे का...तर हो निश्चितच आहे.
मला मानसशास्त्र या विषयाची प्रचंड आवड होती. याच विषयात करिअर करायची जबरदस्त इच्छा होती. पण काही कारणामुळे ते नाही जमलं. पण मी त्या इच्छेला मूर्त रुप देण्याचं ठरवलं आणि मानसशास्त्र या विषयावर जे जे मला वाचायला मिळालं ते वाचत गेले. मानसशास्त्र विषयावरील काही पुस्तकांचा स्वयंअध्ययन हा प्रकार अवलंबून अभ्यास केला. आणि मानसशास्त्राची मी एक वेगळी मला समजलेली विचारधारा माझ्या मनात निश्चित केली. त्या विचारधारेने मला आजुबाजुला कितीही नकारात्मक, मला व्यक्ती म्हणून हादरवून टाकणाऱ्या घटना घडत असल्या तरी सकारात्मक विचारांचा माझ्या मनातील मोगरा कधीही कोमेजू दिला नाही. आणि आता तर माझ्या मनातील या सकारात्मक विचारांच्या मोगऱ्याला कुणी झाकायचा प्रयत्न केला तरी त्याचा सुगंध लपणार नाही. म्हणूनच मानसशास्त्राच्या माझ्या अभ्यासातून मला सापडलेला आनंदाचा मार्ग तुमच्यासोबत शेअर करतेय...

आनंदी राहण्यासाठी काय करायचं यासाठी मी ३ मुद्दे निवडले. म्हणजे हेच तीन मुद्दे माझ्यासाठी आनंदाची त्रिसूत्री आहेत. इतरांसाठी ते वेगळेही असू शकतात. ते जर तुम्हाला पटले तर त्याचा अवलंब करा आणि नाही पटले तर ही कोण लागून गेली सांगणारी... असा विचार करून ते धुडकावून न लावता तुम्ही तुमचीही अशा प्रकारे आनंदाची त्रिसूत्री तुमच्या पद्धतीने शोधू शकता.
तर पहिलं सूत्र – सोबतीला हवं एक पुस्तक. आपण डिजीटल युगात आहोत. पण कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला चालना देण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोशल मीडिया आणि इतर मनोरंजनाच्या साधनांवर काट मारून फक्त पुस्तक आपलंसं करा. इतर मनोरंजनाची तुमच्या विरंगुळ्याची साधनं तुमच्यासोबत राहू द्या. पण पुस्तकालाही तुमच्यासोबत राहू द्या. पुस्तक इतरांच्या आवडीचं किंवा कुणी सांगितलं म्हणून नको तर तुम्हाला आवडलंय म्हणून निवडा. आणि असं पुस्तक निवडा ज्यात विविध पात्रं, वेगवेगळी माणसं असतील. आणि मग ती पुस्तकं वाचताना तसं इमॅजिन करा. वेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी पुस्तकांविषयी गप्पा मारा, बोला, वृत्तपत्रं वाचून तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक ठरवा किंवा तुम्हीच ग्रंथालयं, पुस्तकांची दुकानं, विविध साहित्य संमेलनं, दुर्मिळ पुस्तकं जिथे मिळतात अशा ठिकाणी जा आणि एक असं भन्नाट पुस्तक शोधा जे तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील एखाद्या मनाला वेदना देणाऱ्या घटनेवर उत्तर देऊ शकेल. आणि ते पुस्तक सतत तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर तशा आशयाची आणि वेळोवेळी तुमच्या आवडीची पुस्तकं वाचा. पण कुठलं तरी भन्नाट वर सांगितल्याप्रमाणे एक पुस्तक निवडा जे सतत तुमच्यासोबत ठेवा. मी पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक निवडलं आणि ते सतत माझ्यासोबत ठेवते. तुम्हीही हेच ठेवा म्हणणार नाही. पण अशा पद्धतीने एक पुस्तक निवडा. हे आनंदाचं पहिलं सूत्र झालं. कसं तर जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, नकारात्मक विचार येतील तेव्हा हे पुस्तक हातात घेतलं तरी तुम्हाला आधार वाटेल इतकं त्या पुस्तकाला आपलंसं करा.
आनंदाचं दुसरं सूत्र एखादी नविन भाषा आणि नवी पाककृती शिका –
एखादी नविन भाषा आणि नवी पाककृती शिकण्याच्या या प्रोसेसमध्ये मेंदू ताजातवाना होतो. तो सकारात्मक विचार करू लागतो. अगदी तरतरीत होऊन जातो. त्यामुळे नकारात्मक विचारांचं मळभ निघून जातं. मी स्वतः मालवणी त्यामुळे आधी मराठी, हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला. आता इंग्रजी भाषेत लिहायला आणि बोलायला शिकतेय. त्यासोबत महाराष्ट्रातील प्रादेशिक भाषा, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, दाक्षिणात्य या भाषाही वेळोवेळी समजून घेत असते. त्यामुळे नेहमी कुतूहल जागृत होतं. आणि एकदा का कुतूहल जागृत झालं की तुम्ही दुःखी होणारच नाही. कधी कधी काही प्रसंगात रडायला येईल, पण त्यावेळेला मोकळे व्हा. अश्रूंना अडवू नका. नविन भाषेसोबतच नवी पाककृती शिकणं आणि करून बघणं यातूनही भरपूर आनंद मिळतो. आणि मेंदूलाही फ्रेश फिल होतं. आपल्या भारतात एवढ्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत, परदेशी खाद्यसंस्कृती आहेत यातलं थोडं थोडं शिकायचं म्हटलं तरी बघा किती आनंदी राहू शकताय तुम्ही. बाकी कसला विचार करायचा नाही. फक्त आपल्या ऑफिसच्या वेळातून काही वेळ नवीन भाषा, नवी पाककृती शिकण्यासाठी राखून ठेवा. तिसरं सूत्रं आहे नव्या माणसांना भेटा.
त्याआधी आपल्या घरातील सगळ्यांशी वेगवेगळ्या भूमिकेत राहून मैत्री करा. रोज वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींशी बोला, त्यांचं म्हणणं ऐका, त्यांना एखादी अडचण असेल, काही मदत हवी असेल तर ती करा. वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेल्या माणसांना लक्षात ठेवा. त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना एखादी छोटीशी घटना किंवा एखादं भन्नाट वाक्य सांगा तुमच्या आवडीचं. पदर खोचून सो कोल्ड समाजसेवा करण्यापेक्षा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालात की समाजासाठी काही वेगळं करू शकता का... याचा विचार करा, आणि ते कृतीत आणा. तुमच्या आसपासच्या माणसांना किंवा तुमच्या वेळोवेळी संपर्कात येणाऱ्या माणसांशी सकारात्मक बोला, या देशाचं काही होऊ शकत नाही, मराठी भाषेचे चांगले दिवस गेले. असं नकारात्मक न बोलता आपल्या आजुबाजुला काय चांगलं घडतंय यावर बोला. मराठी भाषेसाठी मोर्चा, बैठका घेऊ नका, तर आधी मनाशी हे ठरवा की मला मनापासून व्यक्त व्हायचं असेल तर ती कुठली भाषा आहे, ती ठरवून त्यात मनसोक्त व्यक्त व्हा. माझं मराठी भाषेवर प्रेम आहे वगैरे अशी वाक्य फेकत बसण्याची काही गरज नाही. मी तर म्हणते कुणीच मराठीसाठी काहीच करू नका. तुमच्या आवडीच्या भाषेत नीट बोलायला, लिहायला शिका. त्या भाषेत पारंगत व्हा. त्या भाषेत नवं काही निर्माण करा.
आणि भाषाशास्त्राच्या नियमाप्रमाणे ज्या भाषेत जास्तीत जास्त निर्मिती होतेती भाषा नेहमी टिकतेच. मी सांगितलेल्या तिसऱ्या सूत्राप्रमाणे माणसांना भेटताना कुठल्यातरी एका योग्य भाषेत संवाद साधा. तुम्ही समृद्ध व्हा आणि इतरांनाही समृद्ध करा. कारण आनंद देत असता आनंद घेत जावे हे आपल्याच मराठी भाषेतील कविवर्य विंदानीच सांगितलंय.
ही तीन सूत्रं लक्षात ठेवा...
१.      सोबतीला एक भारी पुस्तक
२.      नवीन भाषा आणि नवी पाककृती शिकणं
३.      माणसांना भेटा, संवाद साधा.
या त्रिसूत्रीचा अवलंब तुम्ही केलाततर तुमच्या आयुष्यातील आनंद कुणीसुद्धा हिरावून घेणार नाही.


यावर्षीच्या ट्विटरसंमेलनात आनंदाची त्रिसूत्री या विषयावर मी हे ट्विटव्याख्यान दिले होते.

आपल्या मातीतलं...

मॉल्स आणि सुपर मार्केटच्या या जमान्यात जगभरातील अन्नधान्य, खाद्यपदार्थ, फळं-भाजीपाला आपल्याला सहज मिळू शकतो. पण आपण ज्या मातीत वाढलो, त्याच मातीत पिकणारं अन्न आपल्यासाठी अधिक पोषक नाही का ठरणार? त्याची चवही काही औरच असते खरं तर. पण आपण जे आपलं आहे, ते विसरून जे परकं आहे, ते आपलं मानू पाहतोय का? आपल्या मातीतल्या गोष्टी ‘लो स्टॅण्डर्ड’ वाटतायत का आपल्याला? तसं असेल तर आपल्या मातीशी पुन्हा नव्याने नाळ जोडायला हवीय...


अगं थांब, मस्त सॅंडविच करते आपल्यासाठी’, असं म्हणत नेहाने आम्हा दोघींसाठी सॅंडविच करायला घेतलं, ब्रोकोली, लेट्युस, बेबी कॉर्न, मेयोनीज असं एकेक नाव घेत तिचं सॅंडविच करणं सुरू होतं. वर म्हणते, जेवणही हल्ली ऑलिव्ह ऑईलमध्येच करते गं मी. हेल्दी असतं ना, यू नो...’
गेल्याच आठवड्यात आमच्या सोसायटीत ‘कुकिंग कॉम्पिटीशन’ झाली. (हो कॉम्पिटीशनच... पाककला स्पर्धा नाही काही!) ओट्‌स स्पेशल रेसिपीज करायच्या होत्या. का तर म्हणे, ते खूप फायबर रिच असतात म्हणे. मग आपली नाचणी काय असते? तिथे नाचणीचा विषय निघाल्यावर सगळे गप्प. पण ‘नाचणी? सो डाऊनमार्केट’ असं त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं सहजच वाचता येत होतं. कारण ‘डाएट कॉन्शिअस’ आणि ‘हेल्दी’ खाण्याची आवड असणारे हल्ली ‘ऑरगॅनिक व्हेजिटेबल्स’च मागवतात. 

पण खरंच त्याची गरज आहे? आठवते का ती गावाकडच्या शेवग्याची शेंगांची केळीच्या सालीच्या दोराने बांधलेली जुडी. झाडावर लटकलेली हिरवीकंच कैरी, वेलाला लगडलेली काकडी, काजूच्या झाडाचा मोहोर, झुडुपात पानाआड दडलेली करवंदं असं बरंच काही. ते सगळं असतं आपल्या मातीतलं... आपल्याला बेतीव पोषणमूल्य न देता खास मिट्टी की खुशबू का एहसास देणारं.... अशा आठवणी निघाल्या नि मनाचा एक कोपरा कोकणात गावाकडे झटक्‍यात रवाना झालाय. आंबे, काजू, फणस, करवंदं सगळंच असं चित्र नजरेसमोर उभं राहिलंय. कोकणातल्या घरांना कधीच बाजारातील भाज्या आणि कडधान्यांची गरज पडली नाही. सारं काही निसर्गाने ताटात वाढूनच दिलंय. तेही अगदी हेल्दी हेल्दी आणि टेस्टी टेस्टी. 

खरं तर इथेही ते मिळू शकतं. फक्त नजर आणि नजरिया बदलण्याची गरज आहे. पण बदल होतोय हं, नाही कशाला म्हणायचं. आधी उकडे तांदूळ शिजवताना खूप गॅस वाया जातो, असं म्हणणारी सूनबाई आता ब्राऊन राईसचं महागडं प्रकरण कशाला, म्हणून उकडे तांदूळ गावाहूनच मागवून घेते, हेही नसे थोडके. आता लोकल फूडची ग्लोबल किंमत हळूहळू का होईना; सगळ्यांनाच पटू लागलीय. 

कोकणी मेव्याच्या दिवसात तसं बाजारातून जेवणासाठी काही खास आणावं लागत नाही. (फक्त माशांसाठी जाणं सोडल्यास!) आंबा, काजू, फणस, करवंदं, जांभळं, बोरं हे सगळं आहारात हवंच आणि योग्य त्या दिवसात. कोकणात उन्हाळ्याच्या चार-पाच महिन्यांत हा मेवा अगदी मनसोक्त अनुभवता येतो. यातला काही कोकणी मेवा पावसाळ्यासाठी निगुतीने साठवण करून ठेवला जातो.
हा सगळा कोकणी मेवा अगदी सुपर फूडच्या यादीत पहिला नंबर मिळवणारा. पण आणखी एक नाव हवं ते रातांब्याचं. आधी हिरवं आणि पिकल्यानंतर लाल-गुलाबीसर दिसणारं हे फळ कोकणचा डॉक्‍टरच आहे जणू. मासेखाऊ मंडळींसाठी कोकमं लागतातच. पण ती तयार करताना खूप कसरत करावी लागते. कोकमं तयार झाल्यावर आगळ बाजूला ठेवला जातो किंवा खास कोकम सरबतासाठी वेगळी साठवणूक केली जाते. कोकम सरबत आणि सोलकढी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे वेगळं सांगायला नको. अतिशय गुणकारी. पण रातांब्याच्या बियाही तेवढ्याच उपयोगी बरं का. त्या बिया सुकवून त्यांची सालं काढून हल्ली त्याचं मशीनमध्ये (आधी पारंपरिक पद्धतीने व्हायचं) तेल काढून मुटयाल करतात. हा प्रकार खूप कौशल्याचा आहे. हे मुटयाल म्हणजे कोकणात चीज, बटर आणि काही प्रमाणात खाण्याच्या तेलासाठी पर्याय ठरू शकतं. याचे खूप उपयोग आहेत, पायांना भेगा पडल्या, ओठांना मऊ मुलायम करण्यापासून ते अगदी भाजी-आमटीच्या फोडणीसाठी या मुटयालचा वापर करू शकतो. गावाकडे गेलात तर आजीच्या गप्पांना बसा... ती सांगेल, गरमागरम तांदळाच्या किंवा नाचणीच्या भाकरीवर हे मुटयाल लावून कसं खायचं ते? 

कोकणात परसबागेची जागा फारच सुंदर. अगदी सुपर मार्केटपेक्षा लय भारी. शेवगा, कढीपत्ता, लिंबू, पपनस, अळू, विलायती आवळा, नारळ, केळी, चिकू, पेरू असं सारं काही त्यातच. चुन चुनके लेंगें असं म्हटलंत तरी खूप विविधता सापडेल. थंडीच्या दिवसात खूप ठिकाणी पालेभाज्यांच्या बिया पेरल्या जातात; तर मिरची, वांगी, टोमॅटो यांची छोटी रोपं (आवान) लावली जातात. त्यामुळे या दिवसात परसात भाज्याच भाज्या असतात. (काही जणं या काळातही भातशेती करतात. त्याला वायंगाण म्हणतात. अर्थात त्यासाठी पाण्याचे समर्थ स्रोत लागतात.) पालेभाज्यांमध्ये लाल माठ, मोहरी, मुळा, अलकुल, चवळी या प्रमुख भाज्या. त्यांच्या पाककृतींचे प्रकारही भन्नाट. भाकरीच्या तुकड्यावर पालेभाजी चमचाभर घेऊन खाण्यातली मजा काही औरच. ज्यांना हिरव्यागार पालेभाज्या, पांढरं शुभ्र ओलं खोबरं घालूनही आवडत नसेल त्यांच्यासाठी मिक्‍स किंवा एखादी पालेभाजी आणि त्यात चणे किंवा चण्याची डाळ घालून तेही खोबऱ्याच्या वाटणासहित रस्साभाजी केली जाते. हेही एक भन्नाट प्रकरण. थंडीच्या दिवसातील भाज्यांच्या जोडीला रानमेवाही असतो. करवंदाची चटणी किंवा लोणचं, कुड्याच्या शेंगा, कणग्या, चिनं असं सगळं. त्यामुळे मोजूनमापून खाणं हा प्रकार बाजूला पडतो. पण आहार मात्र पुरेपूर पोषणमूल्यांनी परिपूर्ण होतो.
पण अजून खरी मजा तर पावसाळ्यात असते. कोकणी मेवा पावसाळ्याच्या दिवसासाठी साठवलेला असतोच आणि त्यात पावसाळी भाज्यांची भर पडते. तोही एक उत्सवच असतो. अळू, हळदीच्या मुंडल्या राखून ठेवल्या जातात. काकडी, दोडकं, पडवळ, कारलं, भोपळा, भेंडे अशा सगळ्या पावसाळी भाज्या कुठल्या घ्यायच्या याचं लिस्टिंग वर्षभर केलेलं असतं. त्यासाठी बियाही साठवल्या जातात. काकडी, भोपळ्याच्या बिया एखाद्या जुन्या कोकणी घरात गेलात तर गिलाव्याच्या भिंतीवर मारलेल्या दिसतील. पहिल्या नजरेत तुम्हाला वाटेल की ती नक्षी वगैरे आहे का... पण तसं नसतं. ‘ते बिये हत गो चेडवा...! हेही तिथली आजी हसून सांगेल. पहिल्या पावसाची एक सर पडून गेली की पावसातल्या मेजवानीसाठी परसबागेत काय काय कुठल्या ठिकाणी लावायचं याची जागा ठरवली जाते. मातीचं अळं केलं जातं. बिया घातल्या जातात. रोपं वर आली नि वेल फुटु लागले की त्याला मांडव घातला जातो. मग तीन महिने भाज्या कुठल्या करायच्या हा विचारच नाही करायचा. फक्त परसात जायचं काकडी, पडवळ, दोडकं, कारलं, भोपळा सगळे मांडवावर लटकत असतात. ते काढतानाच तुमच्या डोक्‍यात रेसिपी पिंगा घालू लागते. 
तरं असं हे आपल्या मातीतलं फूड. तुम्ही अतिशय फूडी असाल तरी तुम्हाला खूश करेल आणि डाएट कॉन्शिअस असाल तरीही तुम्हाला खूश करेल. अरे हो. कुळीथ या कडधान्याला विसरायचं नाही. कोकणात पिठी हा प्रकार सांगण्यापेक्षा अनुभवण्याचा. अगदी जेवणात शॉर्टकट मारायचा असेल तेव्हा आणि इतर भाज्या ताटात नसतील तेव्हा पिठीच जवळची वाटते. हे करिना कपूरने अलीकडे डाएटमध्ये कुळीथाची पिठी आणि भाकरी खायला सुरुवात केलीय म्हणून नाही सांगत; तर कुळीथ खरंच एक दुर्लक्षित असलेलं सुपर फूड आहे. तशी आठवड्यातून एकदा तरी कोकणी मंडळीच्या ताटात पिठी किंवा कुळथाचा झुणका असतोच. पण ते हेल्दीसुद्धा आहे. हे विसरू नका. आयुर्वेदात त्याला अतिशय महत्त्वाचं मानलं गेलंय. पिठी आवडत नसेल तर कुळीथाला मोड काढून केलेलं सांबारही प्रकृतीस उत्तमच. हो, तरी त्याच्या बाजूला सुक्‍या माशाचा तुकडा हवाच नाही का...
खरं तर आमच्या गावाकडे कित्येक आजी अशा होत्या, ज्यांच्याकडे स्वतःची कूकबुक्‍स होती. लिहिलेली नाही, डोक्‍यात फिट्ट आणि मनात जतन केलेली. गावात आमच्या घराच्या शेजारी एक आजी होती, तिला सगळे घरणआजी म्हणायचे. घरण म्हणजे गृहिणी, अन्नपूर्णा या अर्थाने. खरंच तिच्याकडे १२ महिने परसातल्या सुपर फूड्‌सना वापरून कसा परिपूर्ण स्वयंपाक करायचं हे कौशल्य होतं. तसं ते आजही कोकणातल्या थोड्या प्रमाणात का होईना; काही गृहिणींकडे आणि पुरुष शेफकडे आहे. हे भारी वाटतं. कोकणात सार्वजनिक समारंभात पुरुष स्वयंपाक करतात. याची आठवण सांगायची तर कोकणात गवळदेव नावाचा एक प्रकार असतो. रानातल्या निसर्गाला नैवेद्य दाखवण्याचा छोटेखानी सोहळा. याचा स्वयंपाक पुरुष करतात. त्या जेवणाची चव अजूनही जिभेवर आहे. तसंच आमच्या शाळेत वनभोजन वर्षातून एकदा व्हायचं तेव्हाही स्वयंपाक आमचे शाळेतले गुरुजीच करत. तेही खूप छान वाटायचं. एकूणच सांगायचा मुद्दा हा की, निसर्गाने भरभरून आपल्याला दिलंय. कोकणात तर १२ महिने अगदी विविध सुपर फूडची अगदी रेलचेल असते. आईने स्वयंपाक करूदे किंवा बाबांनी किंवा दुधाच्या साईसारख्या आजीने; त्याला मायेचा, आपुलकीचा सुगंध सुटल्याखेरीज राहणार नाही. आणि ते आपल्या मातीतलं असणार, त्यामुळे खाने का मजा भी दुगना हो जाएगा... खरं की नाही....
तेव्हा ओट्‌स, ब्रोकोली... व्हा बाजूला. शेवगा, भोपळा आणि जिभेला वळवळ करायला लावणारी चिंच, आवळा येऊ द्या...!

(सकाळ मुंबई आवृत्तीच्या 47 व्या वर्धापनदिनानिमित्त लाईफस्टाईल या विशेष पुरवणीसाठी मी लिहिलेला लेख...27 Jan 2018)

Wednesday, 3 January 2018

भावस्पर्शी इंदिराबाई

ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा ४ जानेवारी हा जन्मदिन. त्यांची कविता आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे नेहमीच वेगळी ठरली. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कवितांविषयी हे थोडं काही...




लाजरी ही माझी प्रीत
लाजाळूच्या रोपाहुन;
नको पाहू वाट तिची
तूच घेई ओळखून...


कॉलेजच्या एकदम भारी गुलाबी वळणावर इंदिरा संतांची कविता भेटली. या कवितेने कित्येकांच्या अव्यक्त भावनांना मोकळी वाट करून दिली. त्याही बेळगावला शिक्षिका, प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना त्यामागे असलेली प्रेमळ, जिज्ञासू आणि प्रेरणादायी गुरुवाणी जाणवत जाते. मनाला वेगवेगळ्या मूडमध्ये भिडणारी त्यांची कविता भावस्पर्शीपणे भेटत जाते.
एकदा ग्रंथालयात काव्यसंग्रहांच्या विभागात इंदिराबाईंचा "गर्भरेशीम' हा काव्यसंग्रह हाती लागला. या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा आणि अनंत काणेकर स्मृती पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांच्या "शेला' आणि "घुंगुरवाळा' या काव्यसंग्रहांना प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. "गर्भरेशीम' वाचतेय असं आमच्या मराठीच्या बाईंना सांगितलं, तेव्हा त्या भरभरून इंदिराबाईंविषयी सांगू लागल्या. मग हळूहळू इंदिराबाईंच्या कविता जशा भावल्या तसं त्यांचं व्यक्तिमत्त्वही भावलं. त्यांच्या कवितेशी तर गट्‌टीच जमली...

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे...
किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाला उतावीळ...


अशा इंदिराबाईंच्या काही कवितांनी आईच्या मायेची ऊब दिली; तर कधी समजुतीचा, आपुलकीचा धीर दिला. इंदिराबाईंची कविता जेवढी लाडाने, मायेने बाळाला न्हाऊ माखू घालते, तशीच ती काही वेळा कठोरही होते. सौंदर्याचं भरजरी लेणं त्यांच्या कवितेनं अविरत ल्यायलं, पण इंदिराबाई कधी शब्दांशी भांडतात, रुसतातसुद्धा!

कधी कुठे ना भेटणार,
कधी कुठे ना बोलणार,
कधी कधी ना अक्षरात
मन माझे ओवणार  


असं त्यामुळे त्या लिहून जातात, पण ते तात्पुरतं. मग पुन्हा त्यांची शब्दांशी गट्‌टी होते. आजवर कित्येक कवींनी पावसाच्या रोमॅंटिक, प्रेमात न्हाऊन निघालेल्या काव्याची उधळण मराठी मनावर केली; पण इंदिराबाईंसारखी एखादीच कवयित्री जी पावसाला बजावून सांगते, त्यालाही त्यांच्या शिक्षकी पेशाची किनार आहे.
त्या पावसाला म्हणतात...

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली; 



इंदिराबाई एक तरल, हळूवार तितक्‍याच ठामपणे विषयाला हात घालणाऱ्या कवयित्री आणि कथालेखिका होत्या.  इंदिराबाईंनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला सुरुवात केली. पती ना. मा. संत यांच्यासोबत त्यांचा एकत्रित 'सहवास' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून स्त्रीची विविधं रुपं त्यांनी आपल्या कवितांमधून मांडली. त्यांची कविता नेहमीच समीक्षक, तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता "मृण्मयी' नावाने संपादित करून प्रसिद्ध केल्या. तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. प्रभाकर घोडके यांनी त्यांच्यावरील 'इंदिरा संत यांचे काव्यसौंदर्य' हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात ते म्हणतात, "मराठी काव्यलेखनाच्या परिघामध्ये काव्यलेखनाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री म्हणून इंदिरा संतांचे नाव सुपरिचित आहे. त्यांच्या काव्यलेखनाला प्रेम, विरह, निसर्ग, सामाजिकता, वात्सल्य अशा भावभावनांची जोड मिळालीय. लहानपणापासून निसर्गाशी दृढ नातं सांगणाऱ्या इंदिराबाईंवर पाश्‍चात्त्य सौंदर्यवादी लेखक शेले, बायरन यांचा प्रभाव होता.'
हे सगळं त्यांची कविता समजून घेण्यासाठी किंवा अभ्यास म्हणून लक्षात ठेवता येईल, पण एखाद्या कवितेतील किंवा गाण्यातील शब्द आपल्याला आपल्या त्या त्या वेळच्या मूडनुसार भिडतात. तेव्हा सौंदर्यवादी समीक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्या राहाव्यात. कारण कुठलंही काव्य नियमात बंदिस्त करून त्याचा आस्वाद घ्यायचा नसतो. त्याचा मुक्तपणे आनंद घ्यायचा असतो. इंदिराबाईंची कविता ही अशीच मुक्तपणे उंच उडणाऱ्या स्वच्छंद पक्ष्यासारखी आहे.

'इंदिरा संत यांच्या समग्र कविता' (पॉप्युलर प्रकाशन) या अलीकडील पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे. यात सहवास, शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंशकुसुम, निराकार या काव्यसंग्रहातील त्यांच्या निवडक कवितांचा समावेश आहे. त्यांच्याविषयी लिहिताना प्रस्तावनेत अरुणा ढेरे यांनी 'जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता' असं म्हटलंय.
"शेला' हा पहिला काव्यसंग्रह म्हणजे इंदिराबाईंच्या कवितेची स्वतंत्र खूण. त्यातल्या अप्रतिम सुंदर काव्यरचनांनी इंदिराबाईंना ओळख मिळवून दिली. 'इतकं सोपं, पण गहिरं काव्य मराठीत कोणीही लिहिलं नाही', असं "शेला'तल्या कवितांबद्दल अनेक वर्षांनी श्रीनिवास कुलकर्णींनी लिहिलं होतं.
इंदिराबाईंनी वयाच्या 17 व्या वर्षापासून लेखनाला सुरुवात केली. त्यांची बाळ उतरे अंगणी, उंच उंच माझा झोका, दारा बांधता तोरण, पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस (या कवितेमुळेच पुस्तकात मोरपीस ठेवणं भारी वाटू लागलं.) अशा काही कविता गाण्यांच्या स्वरूपात ध्वनिमुद्रित झालेल्या आपण सर्वांनी ऐकल्या आहेतच. इंदिराबाईचं काव्य समजून घेण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. त्यांचे कथासंग्रह "कदली', "चैतू' आणि "श्‍यामली', ललितलेख संग्रह "मृद्‌गंध' आणि "फुलवेल' हे लेखनही तितकंच तरल आणि भावविभोर. इंदिराबाईंच्या कवितांइतकंच त्यांचं ललितगद्यही वाचकप्रिय ठरलं.

"अक्‍कांच्या आठवणी' हा इंदिराबाईंच्या नातसून आसावरी संत यांनी लिहिलेला लेख वाचनात आला. त्यात त्यांनी इंदिराबाईंच्या आठवणी जागवल्या होत्या, त्या अशा की...

'घरी आलेल्या पाहुण्यांसाठी, लहानथोरांसाठी अगदी आगळ्यावेगळ्या भेटवस्तू आक्कांकडे नेमक्‍या असत. पैसे, साडी, पुस्तकं, नाहीतर सत्कारात मिळालेली शाल त्या दिवशी भेटणाऱ्या व्यक्तीला त्या अतिशय प्रेमानं देत असत. फुलं घरातील बायकांच्या केसात मायेनं माळत असत. अगदी जिव्हाळ्याची एखादी पाहुणी येणार असेल तर लगेच बाजारातून उंची साडी आणायला कोणाला तरी पाठवलं जाई. इतर वेळेला साध्या पोस्टाच्या तिकिटांचा किंवा कार्डांचा हिशोब ठेवणाऱ्या आक्का भेटी मात्र कितीही किमतीच्या देत असत. आवडत्या लोकांना अथवा संस्थांना कधी बजेटचं बंधन नसे. भेट किंवा देणगी दिली तर परत त्याचा साधा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात नसायचा. कुठलाही कृत्रिमपणा त्या देण्यात नव्हता. कोणी भेटायला आलं तर लगेच स्वतःचं लिखाण बाजूला ठेवून त्याचं स्वागत करत असत. आक्कांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणाशीही संवाद साधू शकत होत्या. साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक, पत्रकार यांच्यापासून ते इतर सर्वसामान्य माणसांशी गप्पा मारायला त्यांच्याकडे रंजक विषय असत. कुटुंबीयांवर आणि घरातील सर्व घडामोडींवर त्यांचं लक्ष असे. रोज घडणाऱ्या सांसारिक गोष्टींमध्ये अगदी शेवटपर्यंत त्यांना रस होता...' 

त्यामुळेच विशुद्ध भावकाव्य लिहिणारी कवयित्री अशी इंदिरा संतांची ओळख निर्माण झाली. इंदिराबाईंनी निसर्गावर मनापासून प्रेम केलं आणि हे प्रेम त्यांच्या कवितांमध्ये उतरलं...
रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा. 

 
अशा कितीतरी कविता आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची निखळ दृष्टी देतात. "शेला' काव्यसंग्रहानंतर 'मेंदी', "मृगजळ', "रंगबावरी', "चित्कळा', "बाहुल्या', "वंशकुसुम', "गर्भरेशमी', "निराकार' असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. या काव्यसंग्रहांमध्ये प्रवाही नदीसारखं चैतन्य वाटणाऱ्या कवितांमधून इंदिराबाईंनी चकित करणारं लेखनसामर्थ्य दाखवलं. या कवितांमध्ये दिसलेलं सौंदर्य, एकाकीपण, अपुरेपण यापूर्वी इतक्‍या तरलतेनं क्वचितच कोणी मांडलं होतं. त्यांच्या कवितांमधून नेमक्‍या शब्दांत व्यक्त होणारं भावनांचं प्रकटीकरण वाचकांसाठी नवं होतं. अतिशय अस्वस्थ करणारी आर्तता इंदिराबाईंच्या कवितांचा स्थायीभाव होती, आणि ही आर्तता व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या अनोख्या निसर्गप्रतिमांमुळे त्यांच्या अंतरीचा भाव वाचकांपर्यंत सहज पोहोचला.

इंदिराबाईंनी निसर्गाची अनेकविध रूपं रेखाटली. हा निसर्ग अनेकदा एकट्या, स्वतंत्र, उरात कायम दु:ख बाळगून असलेल्या स्त्रीची प्रतिमा बनूनही आला; पण इंदिराबाईंप्रमाणेच त्यांच्या लेखांमधली, कवितांमधली स्त्री ताठ कण्याची होती. आपलं स्वत्व राखणारी होती. "खरं स्त्रीत्व हे इंदिराबाईंच्या कवितांमध्ये सापडतं', असं दुर्गाबाई भागवतांनी "कालनिर्णय'च्या एका दिवाळी अंकातल्या लेखात लिहिलं होतं.
एकूणच इंदिराबाईंच्या कविता वाचताना जाणवलं ते त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व आणि त्यामुळेच त्यांची कविता भावस्पर्शी होऊन मनात राहिली अगदी कायमची... 

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती ४ जानेवारी २०१८

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...