Sunday, 2 November 2014

प्रेमाचा मोर (भाग दोन)

पुस्तकं आणि लायब्रेरी हे माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय. मग त्याच स्वप्नात खोल खोल बुडून गेले. समोर प्रशस्त बाग असलेली एक मनमोहक वास्तू मला दिसली. तिथल्या बागेकडे पाहतच पायऱ्या चढून मी आत गेले, पाहते तर काय! त्या वास्तूत पुस्तकच पुस्तकं होती. तिथलं वातावरण इतकं गुलाबी होतं की जणु काही प्रेमाची जादुई नगरीच इथे वसविल्याचा भास होत होता. तिथेच ती रूबी आजी भेटली. तिथली पुस्तकं, ते वातावरण पाहून मी तर भारावून गेले, फक्त नाचायची बाकी राहिले होते. पण तिथे पुस्तकं आणि रूबी आजीशिवाय कुणीच दिसत नव्हतं. मी त्यांना म्हटलं, अहो काय आहे हे, अतिशय अप्रतिम! म्हणण्याखेरीज काही शब्दच सुचत नाहीयेत. ती म्हणाली, क्षणभर बस इथे. मी तुला सारं काही विस्ताराने सांगते. मी रूबीतू मला रूबी आजी असं म्हणू शकतेस. ही लायब्रेरी माझी आहे. आणि हे गुलाबी वातावरण सगळं अशासाठी कारण या लायब्रेरीत सगळी पुस्तके लव्हस्टोरजची आहेत. अरे वा, किती छान! मला तर फारच गंमत वाटू लागली. फक्त लव्हस्टोरीजची पुस्तकं! मग आता इथून माझा पाय निघणे ठीपुढे काही तिचं बोलणं ऐकता लहान मुलासारखी बागडत बागडत मी ती पुस्तकं पाहू लागले. एकेक पुस्तक हातात घेऊन बघता बघता भारी मौज वाटू लागली. काही क्षण ते गुलाबी पुस्तकमय वातावरण श्वासात भरून घेतलं. मग तिचं बोलणं ऐकण्यासाठी तिच्यासमोर जाऊन बसले. विचारलं तिला काय गं, काय हे इतकी सारी लव्हस्टोरीजची पुस्तकंअशाच पुस्तकांचा संग्रह करण्यामागे काही खास कारणअसं विचारल्याबरोबर तिने गालातल्या गाल्यात स्मित केलं. मग आपलं मन मोकळं करण्यासाठी आपली एखादी जिवाभावाची सखीच आली आहे, असे समजून ती माझ्यासमोर आपलं मन मोकळं करू लागली… 

एके दिवशी मी लायब्रेरीत पुस्तक आणायला गेले होते. तिथे माझ्या आधी एक मुलगा नव्या पुस्तकांच्या स्डँडजवळ उभा राहून पुस्तकं न्याहाळत होता. माझं लक्ष सहज त्याच्याकडे गेलं. मग त्या मुलाने लायब्रेरीत काम करणाऱ्या मुलीकडे एरिक सेगलचं लव्हस्टोरी नावाचं पुस्तक मागितलं. त्या मुलीने त्याला ते पुस्तक आणून दिले. तेव्हा मला काय झाले कुणास ठाऊक, मी नकळतपणे त्याला विचारलं, तू लेखक आहेस का? तर तो म्हणाला, हो! त्या पुस्तकाचा आणि तो लेखक असण्याचा काहीच संबंध नव्हता तरीहीझालं! एवढंच निमित्त झालं, त्याच्या बोलण्याचं. तोपर्यंत माझं चंचल मन त्याला माझ्या आयुष्याचा जोडीदार ठरवून मोकळं झालं होतं. मला पुढे आणखी काय बोलावं ते कळेना. बस तो एकच जादुई क्षणत्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झालीच नाही. माझ्या मनाने तर पुरती मी त्याचीच होऊन गेले होते. तो एक प्रसिद्ध लेखक होता. वृत्तपत्रातून, चॅनल्समधून त्याच्या लेखनाविषयी मी कौतुक ऐकत होते. नाटक, मालिका, चित्रपट त्याच्या लेखनाची घोडदौड सुरुच होती. पुन्हा त्याच्यासमोर जाण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. त्याच्यावर मी केलेलं जीवापाड प्रेम मनातच राहू दिलं सोनचाफ्याच्या फुलासारखंत्याच्या सुगंधाने मी माझं आयुष्य दरवळत ठेवलं. प्रेमातील असफलतेमुळे मी निराश झाले नाही. कारण प्रेम हे कसंही असलं तरी ते प्रेम आहे. माझ्या मनात माझ्या प्रिय व्यक्तीविषयी प्रचंड आदर आहे. त्याला निराशेच्या काळ्या डोहात बुडू द्यायचं नाहीहे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. मग मी लव्हस्टोरीजची पुस्तकं वाचू लागले आणि त्यातच रमू लागले. त्यानंतर एके दिवशी ठरवलं. आपण या लव्हस्टोरीजच्या पुस्तकांचा संग्रह केला तरमी खूप दूरवर वेगवेगळ्या दुकानात जाऊन ही लव्हस्टोरीजची पुस्तकं गोळा करू लागले. त्यातूनच ही छोटेखानी वास्तू उभारली. आणि नवविवाहिता जशी आपल्या नव्या संसाराला सजवत असते, त्याप्रमाणे मी या वास्तूला सजवू लागले. सुरुवातीला इथल्या आसपासच्या मुलांना ही लायब्रेरी बघण्यासाठी बोलावून आणावे लागे. आता मात्र ही मुलं आनंदाने इथे येतात. तासन् तास इथली पुस्तकं न्याहाळतात. वाचत बसतात. इथल्या प्रियकर, प्रेयसींसाठी हे त्यांच्या हक्काचं ठिकाण झालंय. यातच मला आनंद वाटतोय. मी माझं सारं दुःख यांच्या फुलणाऱ्या प्रेमाकडे पाहून विसरून गेले. त्यातूनच पुढे जाऊन मी इथंच काऊन्सेलिंग सेंटर सुरू करायचं ठरवलं. मानसशास्त्राचा माझा अभ्यास होताच, त्यामुळे काही अडचणी आल्या नाहीत. माझ्यासारखे काही अव्यक्त राहिलेले, काही प्रेमाच्या वाटेवर अडखळलेले, काही फसलेले, काही फसवले गेलेले, काही असफल प्रेमामुळे निराशेच्या गर्तेत खोल गेलेले अशांना मानसिक आणि भावनिक आधार देण्यासाठी त्यांना सावरण्यासाठी, नवी उभारी देण्यासाठी मी आता सज्ज झाले आहे. मला आता कुणीही माझ्यासमोर दुःखी, कष्टी झालेलं आवडत नाही. माझी लायब्रेरी सर्वांसाठी खुली आहे. ज्यांना आपल्या आयुष्यात प्रेमाचा झरा सापडला त्यांनीही इथं यावं आणि ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची उणीव आहे, त्यांनीही इथं यावं. मला हे जग प्रेमाने भारून टाकायचं आहे. आता इथे प्रेमाचीच गाणी ऐकायला मिळतील. निराशेच्या सुरांना इथे अजिबात स्थान नाही.

खरंच! रूबी आजीचा प्रेमाचा विचार किती व्यापक आहे. नाहीतर आपण! सदैव आपल्या सुखाचाच विचार करत राहतो. रूबी आजी अगदी सावित्री या पुस्तकातील सावित्रीसारखीच मला वाटलीआनंदभाविनी. सावित्रीसारखी तिनेही आपल्या प्रियकराला मोराची भूमिका दिली. तो तिच्या आयुष्यात आला तरी ती खूश होणार आणि नाही आला तरी ती खूशच राहणार आहे. मला वाटतं, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीही कमी अधिक प्रमाणात रूबी आजीसारख्याच असतात. आपल्या कुटुंबातील प्रेमाचा झरा टिकवून ठेवण्यासाठी जीवाचं रान करतात. त्यांनाही वाटत असतं, आपल्या नातवंडांच्या अंगणात प्रेमाचा, आनंदाचा मोर यावा आणि त्यांच आयुष्य बहरून जावं…  



पूर्व प्रसिद्धी, ज्येष्ठपर्व त्रैमासिक दीपावली विशेषांक, २०१४

प्रेमाचा मोर (भाग एक)

मला लव्हस्टोरीज वाचायला खूप आवडतं. चित्रपट आणि मालिकांमध्येही वेगवेगळ्या 
लव्हस्टोरीज बघायला आवडतं. या लवस्टोरीजमधून खूप काही शिकायला मिळतं. आयुष्य समरसून जगण्यासाठीची प्रेरणा प्रेमातूनच मिळते. हे प्रेम अथांग सागरासारखं आहे. प्रेम या सर्वांगसुंदर भावनेला शब्दांतून मांडताना नेहमी काही ना राहूनच जातं. मग हुरहुर लागून राहते. मला असं नाही, असं म्हणायचं होतंअशी अवस्था होते तेव्हा समजून जावं की ही भावना आपल्याला शब्दात मांडताच येत नाहीय. मग काय करावंमग बोलूच नये, आपल्याला 
ज्या व्यक्तीसमोर शब्दातून व्यक्त व्हायचं आहेतिच्या समोर उभं रहावं आणि नजरेतून (डोळ्यांच्या भाषेतून) सारं काही सांगावं. समोरची व्यक्ती आपल्या भावना नक्की समजून 
घेईल. पण कित्येकांना आपल्या भावना व्यक्तच करता येत नाहीत. मग आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहत बसण्याशिवाय आणि त्यालाच सांगता कळलं तर उत्तम, अशी वेडी आशा 
बाळगण्यात त्यांचं अख्खं आयुष्य निघून जातं. आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमाला 
आपण पारखे होतो
मग कळतच नाहीआपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाशिवाय आयुष्य कसं जगावं... निराशा येते, संपूर्ण जगच आपल्या विरोधात उभं ठाकलंय असं वाटू लागतं. पुढे मग काहीच करू 
नये, त्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी काढत झुरत रहावं लागतं. बऱ्या लव्हस्टोरीजमध्ये अशी सिच्युएशन दिसून येते.
पण मला वाटतं प्रेम ही आनंदी, सुखदायी भावना आहे. तिचा आदर केलाच पाहिजे. व्यक्त 
होता आले नाही म्हणून उभं आयुष्य तोंड पाडून बसण्याला काहीच अर्थ उरत नाही
अर्थहीन आयुष्याचं ओझं वाहण्यापेक्षा आपल्याकडील प्रेमाने इतरांच्या आयुष्यात प्रेमाचे चार 
क्षण निमार्ण करा. आपल्याला आपलं प्रेम मिळालं नाही तर इतरांना त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा मदतीचा हात द्या.
आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभला नाही, तरी इतरांना त्यांच्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभावा यासाठी त्यांना भेटण्यासाठी पुष्पवाटीकेसारखं एखादं सुंदर ठिकाण निर्माण करा. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की तुम्ही रूबी आजीसारखं प्रेममयी व्हा. प्रेमाची 
नितळ, निरागस, निर्मळ व्याख्या सर्वांपर्यंत पोहोचवा. मला तर तिचं नाव आठवलं तरी हिरव्या पानाआड टपोरा मोगरा फुलल्याचा भास होतोय.
त्या दिवशी पु.शि.रेगेंचं सावित्री हे पुस्तक वाचता वाचता मी हरवून गेले. माझं मलाच समजलं नाही. ते स्वप्न की सत्य! पण रूबी आजीची गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत 
नाहीयतिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. पांढरे, भुरभुरीत केस, चेहऱ्यावर 
स्मित, बोलके डोळे, पायघोळ गुलाबी रंगाचा ड्रेसमला आवडतं त्याप्रमाणे लव्हस्टोरीजच्या 
पुस्तकांविषयी भरभरून बोलणारी. त्या दिवशी स्वप्नात मी तिची सुंदर आणि अनोख्या विचाराला वाहिलेली लायब्रेरी पाहिली.



Thursday, 9 October 2014

सुबल्याचा लगीन (भाग दोन)

अखेर सुबोध गावात आला त्याचे लग्न ठरले. मुंबईहून आणि शेजारच्या गावातून सुबोधची पाहुणेमंडळी आली. लग्न गावडेवाडीतच होणार होतं. पण सावंतवाडीहून येणाऱ्या वधुपक्षाच्या वऱ्हाडाला एका रात्रीसाठी कोणाच्या घरी उतरवायचं हा प्रश्न होता. गावाकडे ही एक पद्धत आहे.
ती पद्धत अशी की वधुपक्ष लांबच्या गावचा असल्यास त्याला गावात लग्नाच्या आदल्या दिवशी बोलवायचे. आणि वराचे घर ज्या वाडीत आहे, त्या वाडीतच वराचे घर आणि चार घरे सोडून पाचव्या घरात वास्तव्य करायचे. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्र घालवण्यासाठी आणि लग्न लागेपर्यंत तिथे रहायचे. तर गंमत अशी की वराचे घर व चार घरे सोडून वैशाली काकूचे घर पाचवे होते. वाडीतल्यांना वाटले वैशाली काकू परवानगी देईल की नाही. पण वैशाली काकूने परवानगी दिली आणि काकूचे घर लग्नासाठी सजवायला वाडीतली मंडळी आली. काकूंच्या खळ्यात मांडव घातला गेला. खळे शेणाने सारवण्यात आले. वाडीतल्या लोकांना काही वेळ खात्रीच पटत नव्हती की काकूने परवानगी दिली आहे. मग न राहवून तावडे काकूंनी त्यांना विचारले, 'काय गो वैशाली सुबल्याच्या पावन्यांका ऱ्हवाक जागा कशी दिलस'
तशी काकू म्हणाली, 'ह्या बगा झाला गेला इसरान जावया आपन. सुबल्याक माफ केलय मिया. चला जावा तयारी करूक लागा. होकलकारांचो टरक यैतच इतक्यात.'

मांडवाची, वैशाली काकूच्या घराची सगळी सजावट करून झाली. संध्याकाळी सहाच्या सुमारास वधुपक्षाडील मंडळी चौक्यातील गावडेवाडीत येऊन दाखल झाली. गावडेवाडकरांनी त्यांचे स्वागत केले. वैशाली काकूच्या घरातील एक खोली त्यांना त्यांचे सामानसुमान ठेवायला दिली. वाडीतल्या सगळ्यांना नवरी पाहण्याची घाई झाली होती. ती दिसायला सुंदर होती. साटम काकू म्हणाल्या, 'होकाल दिसाक बरी आसा...तर तिचे वाक्य तोडत तावडे आजी बोलली, 'बरी आसा पन वायच चकणी आसा.'
कातरवेळ झाली, दिवेलागण सुरू झाली. वैशाली काकूचे घर चहूबाजूच्या उजेडाने न्हाऊन गेले. थोड्या वेळाने नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हळदीच्या कार्यक्रमात होवये (गाणी) म्हणणाऱ्या आंगणे काकूही आल्या. नवरी मुलगी पाटावर बसली, तिच्या बाजूच्या पाटावर धेडी (पाठराखीण) बसली. पहिला विधी हळद कांडण्याचा होता. मुसळाने हळद कांडण्यात आली. त्या मुसळाच्या वरच्या टोकावर नवरीच्या बहिणीने तळी (आरतीचे ताट) धरली. मग हळदीच्या गाण्याला सुरुवात झाली. वाडीतले श्रोते गाणी ऐकू लागले.

ताश्या ढोलाची काठी, मदी काय हळदीची वाटी
नवरीला हळद चढवीती, नवरी तुझी ग आई

हळद चढवून झाल्यावर दुसरं गाणं सुरू झालं.

नागचाफा, सोनचाफा
मदी काय हळदीचा लेपा
नवरीला हळद चढविली...

हळदीचा कार्यक्रम होवयांमुळे (गाण्यांमुळे) रंगात आला. रात्र झाली. लग्नसोहळ्याच्या लगबगीने थकलेले सर्वजण झोपी गेले. नवरी मुलीला व तिच्या काही खास पाहुण्यांना वैशाली काकूने घरात झोपायला सांगितले. पुरुषमंडळी घरासमोरच्या खळ्यात झोपली होती. जरा कुठे सर्वांना झोप लागत होती, तितक्यात खळ्यात ओरड ऐकू आली. वैशाली काकूंच्या घरातले सर्वजण जागे झाले, पाहतात तर काय, खळ्यात वाघमुंगळ्यांनी पुरुषमंडळी झोपली होती, त्या जागेला वेढा घातला होता. काही मुंग्या झोपलेल्या मंडळींना चावल्या होत्या. वैशाली काकू त्यांना म्हणाली, 'आज तिनसानाच खळा शेनान सारवलला होता, म्हनून ते मुंगळे इले असतील, तुमी वरच्या पडयेत येवन निजा.' काकूने सांगितल्यावर सर्व पुरुषमंडळी वरच्या पडवीत जाऊन झोपली. लग्नाचा दिवस उजाडला. रात्री वधुपक्षाकडील मंडळींना वाघमुंगळ्या चावल्या ही बातमी गावडेवाडीत सगळ्यांना समजली होती. खळे (अंगण) ओले असल्यामुळे मुंग्या आल्या होत्या. पण वैशाली काकूची सासू काही वेगळेच कारण सांगत होती. तिचे म्हणणे असे होते की, 'गावकारांच्या घरात कोन दारू पिवन इला काय, त्येंका असोच तरास होता. घरात भष्टकार झालो.'



वाडीतल्यांच्या हे लक्षात आले होते की वधुपक्षाकडील पुरुषमंडळी आली तेव्हा फुल टाईट होती. नवरीचा बापही झिंगत होता. बाकी सुबोधने आपल्याला शोभेल अशीच सासुरवाडी निवडली होती.
लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सर्वांची धांदल उडाली. लग्न वैशाली काकूच्याच घरी लागणार होते. मुहूर्त जवळ आला. नवरा मांडवात आला. सनई-चौघडा वाजला. मंगलाष्टके सुरू झाली. भटजींनी अंर्तपाट धरला. नवरी आली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. होमाभोवती सात फेऱ्या झाल्या. जेवणाच्या पंगती उठल्या. पाहुण्यांनी नवरा-नवरीला आहेर दिला. सर्व मान-पान झाले.
थोड्याच वेळात वैशाली काकूच्या घराकडून सुबोधच्या घरापर्यंत वरात निघणार होती. इतक्यात नवरीचा बाप चक्कर येऊन पडला. वरात खोळंबली. सगळेजण नवरीच्या बापाविषयी चिंता करू लागले. पण नवरीची आई मात्र आपल्या सौभाग्याकडे पाहून काय समजायचे ते ती समजली. आणि वरातीतल्या मंडळींना उद्देशून म्हणाली, 'ह्या बगा उगाच काळजी करूचा काय कारण नाय. तेंका कालपासून दारू पिवक गावली नाय म्हनून ते अश्ये करतत. हेंच्यामुळे तुमी नको थांबू. तेंका हयसरच पडान ऱ्हवांदे. मिया येतय वराती वांगडा.' मग वरात निघाली. नवरदेवाच्या घरी पोहोचली.

सनई-चौघडा वाजे सप्त सुरात
सुबोधरावांचे नाव घेते, सासरच्या घरात

असा खणखणीत उखाणा घेऊन सुबोधच्या बायकोने उंबरठ्यावरचे माप ओलांडले. अशा प्रकारे सुबोधचे लग्न थाटामाटात पार पडले. पण थोड्याच दिवसात सुबोध भयंकर दारू पितो, हे त्याच्या बायकोला समजले. लग्नाची बोलणी करताना सुबोधने खोटे सांगितले होते की त्याचे कणकवलीला भाजीपाल्याचे मोठे दुकान आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. सुबोधने आपल्याला फसवले हे तिच्या लक्षात आले. ती तडक माहेरी सावंतवाडीला निघून गेली. गावडेवाडीत सगळ्यांना सुबोधचा संसार मोडल्याचे वाईट वाटत होते. बायकोच्या घर सोडून जाण्यामुळे सुबोधला अतिव दुःख झाले. इतके दिवस सुरू असलेल्या त्याच्या मस्तवाल आयुष्यात बायकोच्या जाण्यामुळे जोराचा झटका बसल्यासारखे झाले. तो भानावर आला. त्या झटक्यामुळे त्याने दारू कायमची सोडली. आणि वाडीतल्या लोकांना  तो
गयावया करून सांगू लागला...''मिया दारूडो आसलय तरी, माज्या बायकोवर माजा लय प्रेम आसा. तिका माज्या संसारात परत हाडूसाठी मिया कायव करूक तयार आसय. माका मदत करा. मिया आता कदीच दारू पिवचय नाय. माका तुमका वाटात ती शिक्षा करा. पन तिका घेवन येवक माजी मदत करा.''

वाडीतल्या लोकांना सुबोधची दया आली. मग वैशाली काकूनेच पुढाकार घेऊन ती सुबोधबरोबर सावंतवाडीला गेली. सुबोधच्या बायकोची समजूत काढून तिला गावडेवाडीत घेऊनच आली.
वाडीतल्या लोकांमुळे, खास करून वैशाली काकूंमुळे आणि सुबोधच्या बायकोच्या समजशक्तीमुळे सुबोधचा संसार मोडता मोडता सावरला... 





सुबल्याचा लगीन (भाग एक)

कौलारू घरे दाटीवाटीने वसलेल्या चौके गावातल्या गावडेवाडीत सुबोध गावडेचे छोटेसे, टुमदार घर होते. तिथे सुबोध आपल्या आई आणि भाऊ सुधाकर समवेत राहत होता. त्याचा मोठा भाऊ व त्याचे कुटुंब मुंबईत राहत होते. सुबोध आणि त्याचा धाकटा भाऊ सुधाकर हे कायमस्वरूपी गावीच रहात होते. दोघेही चौके आणि आजूबाजूच्या गावात छोटे-मोठे काम करून आपली उपजीविका करत. या दोघांना दारूचे भयंकर व्यसन होते. मध्यंतरीच्या काळात सुधाकर विरण गावात एका हॉटेलात कामाला लागला. गावातल्या लोकांना वाटले आता तरी सुधारेल, दारू सोडेल...पण काही बदल नाही. पगार झाल्यावर दारू ढोसून हा चौक्यात हजर!

पण काहीही म्हणा, दारू प्यायल्यावर त्याचा स्वभाव प्रेमळ आणि देवाणघेवाण करणारा होई. येताना गावडेवाडीतल्या बच्चेकंपनीसाठी आणि म्हाताऱ्या मंडळींना कधी बिस्किटचे पुडे, लाडू, शेव तर कधी फरसाण घेऊन येत असे. शेतावर गेलेले आई-बाप थकून-भागून घरी याचचे आणि मुलांच्या हातात खाऊचे पुडे, फरसाण बघून विचारणा करीत...'काय रे पोरग्यांनो सुधगो इलो की काय?'
सुधाकरची दारू पिण्याची सवय सुटली नाही तरी त्याचे ठिक चालले असताना, इकडे सुबोधची परिस्थिती जरा बिकटच होती. तो चौके गावात मासे, भाजीपाला, फळे विकण्याचा धंदा करत होता. सक्काळीच दारूचं टॉनिक पिऊन डोक्यावर मोठी टोपली घेऊन धडपडत, तोल सावरत कसाबसा गावात फिरे. कधी त्याच्या टोपलीत फळे तर कधी भाजीपाला आणि बुधवार, रविवारचे मासे असत. हे विकून थोडेफार पैसे मिळाले की पुन्हा संध्याकाळी दारू पिऊन तो गावडेवाडीतल्या घरी यायचा. शेजारच्या लोकांना शिवीगाळ करायचा, म्हाताऱ्या आईला त्रास द्यायचा...हे त्याचे वागणे नेहमीच चालायचे. 

एके दिवशी गावचे लोक त्याच्या या वागण्याला खूप कंटाळले...'आपण सुबल्याक कायतरी समज देवया'...या उद्देशाने त्यांनी आपला निर्णय गावडेवाडीचे प्रमुख रमाकांत काका यांना सांगितला. त्यानुसार वाडीतल्या लोकांची सभा भरली. तेव्हा सर्वांनी...'सुबल्याक समज देवा, तुमचा तो आयकात'... असे रमाकांत काकांना सांगितले. पण रमाकांत काकांनी मात्र वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी सभेत उपस्थित असलेल्या महिला वर्गाला सांगितले...'आजपासून गावडेवाडीत कोणीही दारू पिऊन धिंगानो घालूक लागलो तर त्येका चपलाचो मार देवा'...सभा संपली. त्यानंतर चार – पाच दिवस झाले आणि वाडीतल्या बायकांच्या तावडीत सुबलो गावलो. बायकांनी रमाकांत काकांनी सांगितलेली सूचना लगेच अंमलात आणली. सुबोधला बायकांच्या हातून चपलाचा चांगला चोप मार मिळाला. बायकांच्या या चोप मार देण्याच्या कार्यक्रमाला वैशाली काकूंनी प्रमुख पुढाकार घेतला. त्याला कारणही तसंच होतं.

त्या दिवशी संध्याकाळी सुबोध दारू पिऊन पानंदीतून शिवीगाळ करत चालला होता. पानंद तर वैशाली काकूंच्या घराला लागूनच होती. त्यामुळे सुबोधचा आवाज वैशाली काकूने पहिल्यांदा ऐकला आणि चप्पल घेऊनच बाहेर येत शेजारच्या घरातल्या चार बायकांनाही हाक मारली. अशा प्रकारे ही दारूड्याला चपलाने मारण्याची वाडीतल्या बायकांची मोहीम यशस्वीरित्या पार पडली. आणि याचा परिणामही लगेच दिसून आला. सुबोधचा दोन-तीन दिवस अजिबात आवाज येत नव्हता. साटम काकांनी वाडीतल्या सर्वांना सुबोधने दारू सोडल्याची बातमी दिली. मग नंतर थोड्याच दिवसात सुबोध गाव सोडून निघून गेला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की, 'ह्यो सुबलो गेलो तरी खय?'
रमाकांत काकांनी वाडीतल्या सर्वांना एकत्रित बोलावून सांगितले...'तो सुबलो खय गेलो, त्येका जावदेत, त्याच्या म्हाताऱ्या आवशीची काळजी घेवा. त्या सुधग्याचो पन खय पत्तो नाय'

त्यानंतर थोड्याच दिवसात सुबोधचा मोठा भाऊ आला आणि आईला घेऊन मुंबईला गेला. सुबोधला चौके गाव सोडून दोन वर्षे झाली होती की अचानक एक बातमी गावडेवाडीत पसरली. सुबोध सावंतवाडीला कामाला आहे आणि आता तिथल्याच एका मुलीशी तो लग्न करणार आहे. ती मुलगी नर्सरीत कामाला आहे. वाडीतल्या लोकांना आश्चर्याचा पुन्हा एकदा धक्का बसला. सर्वांना हेच वाटत होते की, 'ह्या सुबल्यात काय बगल्यान त्या सावंतवाडीच्या चेडवानं.'






आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...