Saturday, 23 April 2016

Words and Visuals Happily Married

तो आरशासमोर उभा राहिला, त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याने केसांतून हात फिरवला... विचार करू लागला...
“लेखनातून स्वतःला व्यक्त करताना आतापर्यंत कितीतरी शब्द लिहायचे राहून गेले, कितीतरी गोष्टी लिहायच्या राहून गेल्या... कितीतरी शब्द वर्ड फाईलमध्ये टाईप करताना मीच घाबरलो होतो. कसलीशी भीती जाणवत रहायची, काही चुकणार तर नाही ना माझं? पण यापुढे असं नाही करणार... लेखक असो, चित्रकार असो किंवा कॅमेरामन असो. प्रत्येक कलावंत हा कलेच्या बाबतीत शेवटपर्यंत अतृप्तच असतो... आणि ही अप्तृप्ताच त्याला अधिकाधिक सुंदर एकापेक्षा एक सरस अशी कलाकृती जन्माला घालण्यासाठी प्रेरित करत असते... मी लेखक आहे. मी अनुभवलेलं, माझ्या आसपास घडणारं आणि माझ्या कल्पनेतील चित्रसृष्टी माझ्या गोष्टीत उतरते. मी लेखनातून नवं जग निर्माण करू शकतो.” त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. तितक्यात त्याला आईची हाक ऐकू येते आणि त्याची तंद्री भंग पावते. तो पुन्हा हसतो आणि घरातून निघून जातो...
…आता तो आणि ती हँगिंग गार्डन या त्यांच्या लहानपणापासूनच्या आवडत्या ठिकाणी बसले आहेत. याच जागी त्यांची मैत्री शब्दांच्या पलिकडे जाऊन त्यात प्रेमाचा अँगल दिसू लागला होता. विश्वासानं एकमेकांना खूप गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांचं प्रेम तिथेच फुललं होतं.
तो तिला कसलेही आढेवेढे न घेता म्हणाला, “I love you!!! Will you marry me?
ती म्हणाली, का?
तर तो म्हणाला, “मी लेखक आहे.”
“बरं मग?” तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हटलं.
मग तो तिचा हात हातात घेऊन खट्याळपणे म्हणाला, “माझ्याशी लग्न केलंस तर मी एकटाच तुझ्यावर प्रेम करणार नाही तर हजारो शब्द, हजारो पानं जी मी आजवर लिहिली आहेत, ती सगळी तुझ्यावरच प्रेम करतील...[त्याने स्पष्ट केलं...”]
तिनेही खट्याळपणाने त्याच्या या स्पष्टीकरणाला नापंसती दर्शवली आणि म्हणाली, “प्रत्येक लेखक असंच म्हणतो, त्यात काय वेगळं?”
मग तो गंभीर होत म्हणाला, “आपण फक्त बिछान्यापुरते एकमेकांचे जोडीदार नसणार तर आपलं सहजीवन दोघांनीही समसमान पातळीवर राहून फुलवायचं आहे. Married Life मध्ये येणारे बरे-वाईट घटना-प्रसंग आपण एखाद्या फिल्मसारखे जगुया. ज्याचा शेवट नेहमी गोड आणि आपल्याला माणूस म्हणून समृध्द करणारा असेल...
मग ती म्हणाली, “आणि मी हे आपलं समृध्द सहजीवन माझ्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवेन. आपल्या Married Life ची कॅमेरामन मीच असणार म्हटल्यावर... Angle, Expressions, Light, Composition, Settings, Lens हे सगळं कसं नीट जुळून यायला हवं ना...!!!”
तिचं हे वाक्य ऐकताच त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, Words आणि Visuals एकमेकांच्या प्रेमात असतात, नेहमीच सोबत राहतात तसेच आपणही...तिने त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं...दोघांच्याही डोळ्यात त्यांच्या सहजीवनाचं स्वप्न आकार घेत होतं...
त्या दिवसापासून दोघांचंही WhatsApp Status आहे… “Words and Visuals Happily Married” 


Tuesday, 1 March 2016

ओझरती पहिली भेट

अवनी त्या दिवशी आपल्या गावाला कायमचा निरोप देऊन आपल्या आईवडलांसोबत मुंबईला निघाली होती. कणकवली रेल्वे स्टेशनवर येणारी मांडवी एक्सप्रेस पाहताना तिला ती स्वप्ननगरीत नेणारी परीराणीच वाटली... स्टेशनवर गाडी थांबली... अवनी तिच्या आईबाबांबरोबर गाडीमधे आपल्या सिटवर बसायला गेली...तर त्यांच्या सिटवर आधीच चार-पाच तरुण मुलांचा दंगा चालला होता...
ही तिघंजण तिथे जाताच ती गोव्याकडून रिलॅस मूडमध्ये अख्खा गाडीचा डबा डोक्यावर घेणारी मुलं उठली आणि आपापल्या जागेवर बसली... सुहास तुला आधीच सांगितलं होतं... कणकवलीत गाडी पॅक होणार. आपापल्या जागेवर बसा, शिवम म्हणाला... त्याचा आवाज इतका गोड होता की क्षणभर अवनीला तो मुलगा कोण? याची उत्सुकता लागली...
तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं देखील...पण हा कुणाचा आवाज... इतक्या मुलांच्यात त्याचा आवाज कसा ओळखणार होती ती...

गाडीत खूपच गर्दी होती, अवनीच्या सिटवर बसून दंगा करणारी ती मुलं मागच्या बर्थवर बसायला गेली. तिथे बसल्यावरही त्या तरुणांचा कल्ला पुन्हा सुरु झाला... तरी त्यातही शिवम कोऱ्या कागदांवर स्केच काढण्यात मग्न होता...
तितक्यात वाऱ्याची मस्त झुळूक आली...
शिवम उठला आणि दरवाजात उभं राहण्यासाठी गेला... जाताना त्याने एका सिटवर पाहिलं...
एक मुलगी पूर्णपणे सीटवर न झोपता संकोचाने पाय जवळ घेऊन सीटला टेकूनच झोपी गेली होती. अंगावरून तिने शाल लपेटून घेतली होती... तिचा निरागस गोड चेहरा त्या अंधुकशा प्रकाशातही उठून दिसत होता... शिवम तिच्याकडे पाहतच राहिला...
तितक्यात गाडीने वेग घेतल्यामुळे जोराचा धक्का बसल्याने अवनी जागी झाली, तिने पाहिलं तर तिच्याकडे एक मुलगा पाहतोय...

ती लगेच सावरून बसली... तिच्या हालचालीमुळे शिवमही दचकला आणि दरवाजाकडे निघून गेला...
गाडीमध्ये अधूनमधून शिवम आणि अवनीची नजरानजर होत होती.... अवनीला संकोचल्या सारखं झालं होतं... कोण हा तरुण.... असं का पाहतोय माझ्या कडे...
तिला रागच आला होता...पण उठून त्याला जाब विचारावा इतकी धीट, ती नव्हती.

दादरला गाडी थांबली... अवनी आपल्या आई बाबांबरोबर उतरली... शिवमला सिएसटीला उतरायचं होतं म्हणून तो रिलॅक्स झाला होता, त्यातच थोडीशी त्याने डुलकी काढली. मग सुहासने उठवल्यावर उतरायच्या आधी अवनी बसली होती त्या सिटजवळ शिवम गेला... पण तिथं कुणीच नव्हतं... ती उतरून गेली असावी... शिवम वळणार तोच त्याला तिथे सिटवर काहीतरी चमकताना दिसलं. त्याने पाहिलं तर ती तिची एक पैंजण होती. त्याने ती पैंजण उचलली आणि आपल्या खिशात ठेऊन दिली... त्याच्या आणि तिच्या ओझरत्या पहिल्या भेटीची ती निशाणी होती...

मुंबईसारख्या एवढ्या मोठया महानगरात कुठे शोधणार तिला... शिवम विचारात पडला...
त्या दिवसापासून शिवम तिला शोधतोय... शिवमकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून ती त्याच्या कॅनव्हासवर हुबेहुब उतरली आहे. पण ती खरीखुरी प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात अजून यायची आहे...
to be continued...


Sunday, 28 February 2016

Opaning scene of the story

सकाळची वेळ आहे, आपण पाहतोय की कुलकर्णी फॅमिली पिकनिकला जाण्याची तयारी करत आहेत. गडबडीत आहेत.
अपूर्वाचे आई-बाबा बॅगा भरणं. नाश्ता, गाडीत खाण्यासाठी डबा भरणं यात बिझी आहेत. अपूर्वाची आई स्वयंपाकाच्या खोलीत काम करता करता अपूर्वाला हाक मारतेय.

त्यांच्या स्वयंपाक घराच्या पुढे असलेल्या भागात बाल्कनी आहे. तिथे काही फुलझाडांच्या कुंड्या आहेत. त्यात प्रामुख्याने सदाफुलीची व्हाईट आणि पर्पल रंगाची रोपटी आहेत. अजून इतर दोन तीन प्रकारची फुलझाडेही असू शकतात. किंवा सगळी सदाफुलीची असली तरी चालेल. अपूर्वा त्या फुलांच्या रोपट्यांना पाणी घालतेय. ती स्वतः कपडे घालून तयार झालीय. पण तितक्यात तिला झाडांना पाणी घालायची आठवण होते. म्हणून तसेच चांगले कपडे घातलेले असतानाही ती तिथे झाडांना पाणी घालायला येते. आधी बाल्कनीत आपल्याला दिसतं की कुणीतरी झाडांना झारीनं पाणी घालतंय. हळुहळु तिचे हात दिसतात. मग एकदा ती लांबून आपल्याला पाठमोरी दिसते. तितक्यात अपूर्वाची आई तिला तिकडून हाक मारतेय... अप्पू... अपूर्वा अपूर्वा...

अपूर्वा म्हणते... हो गं मम्मे...आले आले...
मग आपल्याला अपूर्वाचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाच दिसतो.
अपूर्वाचं तोपर्यंत पाणी घालणं पूर्ण झालेलं असतं. ती स्वयंपाक घरात येते.
काय गं किती उशीर...चल नाश्ता करून घे. आपल्याला निघायचय ना...
हो गं मम्मे....अगं मी उशीरा उठले. त्याची सजा बिचाऱ्या माझ्या झाडांना का...पाणी घालायला नको का...आता आपण बाहेर चाललोय ना...मग त्यांना पाणी कोण घालणार...
आई म्हणते...बरं बरं चल बस पटकन... बाजूच्या काकूंना सांगूया आपण...

त्यानंतर मग ते नाश्ता करतात. सगळी आवराआवर करून घरातून रेल्वेस्टेशनला येण्यासाठी निघतात...


Thursday, 18 February 2016

Twist in serial - 5

कल्याणी आज बऱ्याच दिवसांनी एवढा आवाज चढवून बोलली होती. कारणही तसंच होतं. तिने केलेल्या निखळ प्रेमावर, तिच्या चारित्र्यर संशय घेण्यात आला होता. रुपालीला आपण मामाची मुलगी असूनसुद्धा सख्खी बहिण मानलं, समीरवर मनापासून प्रेम केलं. पण यांनी तर माझ्यावर नाही नाही ते आरोप केले. अक्कासाहेब माझ्यासोबत होत्या म्हणून... नाही तर काय केलं असतं मी... कल्याणीला तो प्रसंग आठवून सारखं रडूच येत होतं. नाही आता हे बस झालं... मला आता कठोर व्हायला हवं. कुणीही उठावं... माझ्याकडे बोट दाखवावं... हे मी आता सहन नाही करणार... विचारांच्या धुंदीत असतानाच तिला झोप लागली. समीर रात्रभर खोलीत आलाच नाही... 

सकाळ झाली तेव्हा कल्याणीला खूप खूप मोकळं मोकळं वाटत होतं.  मुलांची शाळेला जायची तयारी करून त्यांना शाळेत सोडून पुन्हा तिने आपल्या रूममध्ये बिछान्याला पाठ टेकली. आणि ती चक्क गाणं गुणगुणू लागली. पुढच्याच क्षणी ती उठून ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागली. तिच्या हाताला स्केचपॅड लागले. तिला आनंद झाला. तिथेच पेन्सिलही सापडली. ती पुन्हा बिछान्यावर बसली. उशीवर रेलून गाणं गुणगुणत ती स्केचेस काढू लागली. कित्येक वर्षांनी तिने आपल्याकडे असलेल्या या कलेसाठी वेळ काढला होता. तिला फॅशन डिझायनिंगची आवड होती. पण या क्षेत्रातील ग्लॅमरला ती घाबरली होती. आणि ही कला स्केचपॅडपुरतीच तिने राहू दिली होती. तिने कधी हिंमतच केली नव्हती. स्वतःची अशी वेगळी ओळख घडवण्याची... पण कधी मनापासून एखादं डिझाईन काढावसं वाटलं तेव्हा तिने स्वतःला कधी रोखलं नाही. तिची ही ओळख तिच्यापुरतीच होती. कुणालाच माहीत नव्हती. कल्याणी स्केच काढण्यात दंग झाली होती... 

बराच वेळ कल्याणी कुठे बाहेर दिसली नाही म्हणून अक्कासाहेब तिच्या रुममध्ये बघायला आल्या आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं. कल्याणीला स्केच काढताना पाहून… कल्याणीने स्वतःपुरती ठेवलेली ही कला आज तिच्या लाडक्या अक्कासाहेबांना कळली होती. त्यांनीही कुतूहलाने सर्व डिझाईन्स पाहिल्या. त्यांना आनंद झाला. पण विश्वासच बसत नव्हता की हे कल्याणीने डिझाईन्स काढले आहेत. त्यांनी तिला शब्द देऊन टाकला... मस्त एखादी थिम घेऊन डिझाईन्स काढ. आपण तुझ्या डिझाईन्सचं एक्झिबिशन भरवुया...
हे काय अक्कासाहेब का थट्टा करताय माझी... कल्याणी बोलली.
अगं थट्टा नाही करत... खरंच सांगतेय मी. तुला तर माहीतच आहे. एकदा मी शब्द दिला म्हणजे दिला… कळलं

कल्याणीला इतक्या वर्षांनी नवं काहीतरी करण्याचा हुरूप आला. तिने खूप मन लावून डिझाईन्स केल्या.
रुपाली सोडून घरातील सगळ्यांनी तिला मदत केली. रूपाली एका वेगळ्याच प्लॅनमध्ये गुंतली होती.

अक्कासाहेबांनी कोल्हापूरात कल्याणीसाठी एक मस्त शोरूम उभं केलं. जणु काही आपल्या सुनेला एक खुलं आभाळच दिलं. मनसोक्त बागडण्यासाठी.
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - 4

एखादी गोष्ट सांगताना सगळंच गोड गोड असून चालत नाही. तसं रूपालीचं वागणं हे तिखटाप्रमाणे आहे. अक्कासाहेबांची तर तिने माफी मागितली आहे. पण ती तिचा मूळ स्वभाव सोडत नाही. तर तिने आता तिचा मोर्चा कल्याणीकडे वळवला आहे. अक्कासाहेबांशी नीट वागून कल्याणीला त्रास देण्यासाठी ती प्लॅन्स आखू लागली आहे.

तिला माहीत आहे की समीर आणि कल्याणीच्या नात्यामध्ये काही प्रमाणात का होईना दुरावा आहे. समीरला या गोष्टीचं वाईट वाटतं की आपलं आणि कल्याणीचं बाळ असूच शकणार नाही. कारण कल्याणीला प्रेग्नसीमध्ये कॉप्लिकेशन्स आल्यामुळे आता यापुढे ती कधीच आई होऊ शकणार नाही. समीरला याचं दुःख आहे. त्यामुळे कल्याणी आणि समीरच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे.  तो वरवर निवळल्यासारखा वाटतो पण तसे नाही. आपल्या आई-वडलांपासून दुरावलेला समीर सरदेशमुख कुटुंबात परत येतो. तोपर्यंत याआधी तो सगळ्या नात्यांना पारखा झालेला असतो. आपलं कुणीच नाही. आपण एकटे आहोत. या फेजमधून तो गेला असल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे. त्याचं कल्याणीवर खूप प्रेम आहे. पण त्याला वाटतं की आपलं जेवढं कल्याणीवर प्रेम आहे. तेवढं तिचं आपल्यावर नाही. सोहमचं मूल हेच तिचं सर्वस्व आहे. त्यामुळे या गोष्टीची समीरला चीड आहे.  याचाच फायदा उठवत  रूपाली त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती समीरला सांगते तुझ्यावर कल्याणीचं प्रेमच नाही.  त्यामुळे समीर आणि कल्याणीच्या नात्यात तेढ निर्माण होते...

सरदेशमुख कुटुंबात आल्यामुळे समीरला एका कर्त्या मुलाचे सर्व अधिकार मिळाले आहेत. यामुळे तो सुखावला आहे. वैवाहिक आयुष्यात फारसा समाधानी नसलेला समीर बिझनेस फिल्डमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे रोहित आणि त्याच्यात स्पर्धाच सुरू झाली आहे. पण रूपालीने त्याच्या मनात कल्याणीविषयी संशय निर्माण केल्यामुळे समीरचं ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाहीय. त्याच्याकडून चूका होतात.  त्या निस्तरण्यासाठी रोहित पुढे येतो. रूपालीला अजून बळ मिळतं. तिला वाटतं, समीर असाच दुखावलेला राहिला तर रोहितकडे बिझनेसची मोठी जबाबदारी येईल. रूपाली आनंदून जाते. कल्याणीही घरात सर्वांशी तुटकपणे वागू लागते. तिचं कशात मन लागत नाही. अक्कासाहेबांना लक्षात येतं की कल्याणीचं काहीतरी बिनसलं आहे. त्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतात. परंतु वेगळ्या प्रकारे... अक्कासाहेब रूपालीने आखलेल्या प्लॅन्सना उधळून लावत नाहीत. त्यांना पहायचं असतं की आपल्या संसारावर आलेलं संकट कल्याणी धाडसाने परतून लावू शकते की नाही. त्यांना कल्याणीला सरदेशमुख घराण्याच्या एक सक्षम सूनबाईच्या रूपात पहायचे असते. त्यामुळे रूपालीच्या कल्याणीवरील कारवायांवर त्या लांबून लक्ष ठेऊन असतात.


रूपालीची इतपर्यंत मजल जाते, की कल्याणी मुलांना शाळेत सोडायला जाते तेव्हा ती रोज एका मुलाला भेटते. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. असं ती समीरला सांगते. तिच्याकडे कल्याणी आणि त्या मुलाचे काही फेक फोटो असतात. ती ते समीरला दाखवते. समीरचा राग अनावर होतो. तो कल्याणीला घराबाहेर काढायला निघतो. कल्याणी त्याची मनोमन विनवणी करते. पण समीर ऐकत नाही. शेवटी कल्याणीच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती पेटून उठते. ती म्हणते, देवा ब्राम्हणांच्या साक्षीने सात फेरे घेऊन आपलं लग्न झालंय. अक्कासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आपलं लग्न लावलं आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणीच नाही. मी घराबाहेर जाणार नाही. मी या सर्व प्रकरणाचा छडा लावेन. आजपर्यंत मी गप्प राहून सारं सहन केलं. पण आता नाही, हद्द झाली. चूक माझी नाही. समीर तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझं पाऊल मी कधीच वाकडं पडू दिलं नाही. मी शोधून काढेन याच्या मुळाशी कोण आहे ते....कल्याणीच्या अशा कॉन्फिडन्ट बोलण्यामुळे अक्कासाहेबांचा हेतू साध्य होतो. त्या रूपालीनेच हे सर्व कारस्थान घडवून आणलं आहे, असं समीरला पुराव्यानिशी सांगतात...

समीरला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो. तो कल्याणीची माफी मागतो. पण कल्याणी त्याला सांगते. तुला सहजासहजी माफ करणं मला शक्य होणार नाही. माझं मन तू खूप दुखावलं आहेस. मला थोडा वेळ हवाय.... अक्कासाहेब समीरला सांगतात की तू थोडा वेळ तिला दे. तिच्या मनाचा विचार कर. कल्याणीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अक्कासाहेब एक नवा प्लॅन करतात. समीरच्या वागण्याने दुखावलेल्या कल्याणीला आता एक वेगळं क्षितीज खुणावतं आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिला अक्कासाहेबांची साथ लाभणार हे वेगळं सांगावयास नको. पाहूया कल्याणीला आता कुठलं वेगळं क्षितिज खुणावतं आहे ते...
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - 3

अक्कासाहेबांचं वय ५० ते ५५ च्या आसपास आहे. अक्कासाहेबांचं जयवंत सरदेशमुख यांच्याशी तडकाफडकीतच लग्न होतं. जयवंताची पहिली बायको मेल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न अक्कासाहेबांशी होतं. तरुण वयात त्यांनीही काही स्वप्नं पाहिली असतील. पण सरदेशमुखांच्या घरात लग्न होऊन आल्यामुळे काही अधिक उण्या वेगळ्या जबाबदाऱ्या अक्कासाहेबांना पेलाव्या लागतात. त्यातुनच त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी घडत जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये लिडरशीप क्वालिटी येते. डिसीजन मेकिंग पावर येते. आतापर्यंत अक्कासाहेबांनी घरातील सर्वांना एकत्र कुटुंबात मायेने बांधुन ठेवलं. 

रूपाली, तिची आई, चिंत्या मामा आणि स्वप्नाली यांनी घरावर आणलेल्या संकटांशी अक्कासाहेब एकहाती लढल्या. त्यांचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत आपल्या घरासाठीच सर्व काही करत आल्या. आता त्या समीर, रोहित, कल्याणी, स्वप्नाली यांच्या रूपाने आपलं तरुणपण पुन्हा अनुभवू लागल्या आहेत. त्यामुळे आधी त्यांनी आपला मोर्चा त्यांच्या लाडक्या कल्याणीकडे वळवला आहे. त्यांना माहीत आहे. कल्याणीचा सोशिक स्वभाव आहे. पण तिच्यावर अशी एखादी वेळ आलीच तर ती कठोर आणि धैर्याने वागू शकते. असा विश्वास अक्कासाहेबांना आहे. त्यामुळे कल्याणीला ग्रूम करण्यासाठी पुन्हा एकदा अक्कासाहेबांनी कंबर कसली आहे.

कल्याणीला एका जाहिरात एजन्सीकडून जाहिरातीमध्ये काम करण्याची ऑफर येते. (कल्याणीला ऑफर येण्याचा प्लॅनही अक्कासाहेबांनीच आखलेला असतो. ते नंतर ओपन होतं. तोपर्यंत कल्याणीचं रूपांतर एका कॉन्फिडन्ट तरुणीत झालेलं असतं.) त्यासाठी तिला मुंबईला जावं लागणार असतं. कल्याणी पहिल्यांदा साहजिकच नकार देते. अक्कासाहेब तिची समजूत काढतात. कल्याणी आणि समीरला त्या मुंबईला पाठवतात. त्यांना परतायला निदान आठवडा तरी लागणार असतो. त्यामुळे लहानग्या करणला असं सोडून मुंबईला कसं जायचं, असा प्रश्न कल्याणीला पडतो. पण अक्कासाहेब तिला सांगतात. आठवडाभराचाच तर प्रश्न आहे. मी सांभाळेन त्याला...कल्याणी आणि समीर मुंबईला जायला निघतात. बऱ्याच दिवसांनी कल्याणी आणि समीरच्या नात्याला एक वळण यानिमित्ताने मिळतं. कल्याणी, समीर आणि आपल्यामधील रिलेशनशिप स्ट्राँग करण्याचा यशस्वी प्रयत्न करते. ती समीरला सांगते की लग्न म्हणजे मूल जन्माला घालणं, एवढंच नाही तर त्या पलिकडेही आपल्या नात्यांना अधिक दृढ करणं हे आहे. संसारात राहून एकमेकांना त्यांची हवी असलेली स्पेस देणं म्हणजे सहजीवनातील खरा आनंद मिळतो.  आपण जर आपल्या इच्छा जोडीदारावर लादल्या तर आपलं सहजीवन सुखाचं होणार नाही. तू मला समजून घेतलंस याचा मला खूप आनंद झाला आहे.

समीर कल्याणीच्या अशा बोलण्याने भारावून गेला आहे. त्याला असं वाटतं की ही ती रडूबाई कल्याणी नाहीच. किती धिटाईने ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलते आहे... समीरला असं आपल्याकडे एकटक पाहताना कल्याणी लाजते.... (बॅग्राऊंडला एक रोमँटिक गाणं लागतं.)

एका जाहिरातीत काम करण्यामुळे का होईना पण कल्याणीमध्ये आता काही नवीन गोष्टी करून पाहण्याची जिद्द निर्माण झाली आहे. तिचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आता मुळुमुळु रडणारी कल्याणी राहिलेली नाही. कल्याणी आणि समीर मुंबईला गेल्यामुळे इकडे अक्कासाहेबांना आपल्या नातवंडात रमण्याची संधी मिळते. त्यामुळे आपल्या घरातील या नव्या पिढीच्या अधिक जवळ जातात.  
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - business minded अक्कासाहेब

सरदेशमुखांचा बिझनेस यशवंत सांभाळत असतो. त्याच्याबरोबरीने समीर आणि रोहित बिझनेसमध्ये जबाबदारी सांभाळत असतात. पण अक्कासाहेब फर्मान काढतात की बिझनेसची धुरा नव्या पिढीच्या हाती द्यालला हवी. देवकी नाराज होते तिला वाटतं अक्कासाहेब समीरच्या हाती सर्व सोपवतील. पण अक्कासाहेब एक वेगळाच निर्णय घेतात. त्या घरातल्या सर्वांसमोर समीर आणि रोहितला सांगतात की मी तुम्हाला चॅलेन्ज देणार आहे. ते तुम्हा दोघांपैकी जो कोणी पूर्ण करेल त्याला बिझनेसमधील महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. अक्कासाहेब दोघांना एक टार्गेट अचिव्ह करण्यासाठी देतात. ते टार्गेट असं असतं की समीर आणि रोहितने कोल्हापुरातील प्रत्येकी दहा तरुणांना बिझनेस फिल्डमध्ये येण्यासाठी तयार करायचे. त्यांचे मन वळवायचे. 

रोहित आणि समीर ते टार्गेट अचीव्ह करायला सज्ज होतात. घरातील कुणाचीही मदत घेऊ नये, असं अक्कासाहेब त्यांना बजावतात. त्याचबरोबर त्या दहा तरुणांना तुम्हाला हे टार्गेट देण्यात आलं आहे, हे कळू देऊ नका. असं अक्कासाहेब त्यांना सांगतात.  रूपाली इथेही प्लॅन आखते. ती चिंत्यामामाला समीरच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगते. तरीही या सगळ्यातून पार होत शेवटी समीर १० तरुणांना बिझनेस फिल्डमध्ये येण्यासाठी तयार करण्यात यशस्वी होतो. तो त्यांना घेऊन अक्कासाहेबांना भेटायला घरी येतो. रोहित ९ तरुणांना घेऊन येतो. अक्कासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समीर टार्गेट पूर्ण करतो. रूपालीनेही रोहितचं टार्गेट पूर्ण व्हावं यासाठी मेहनत घेतलेली असते. त्यासाठी तिने काही प्लॅन्सही आखलेले असतात. पण फेल होतात.  समीरच्या हातात बिझनेसमधील महत्त्वाची सूत्रं येतात.


घरातील सगळ्यांना अक्कासाहेबांचा हा डिसिजन योग्य वाटतो. रूपाली आणि रोहित मात्र नाखूश असतात. पुढे अक्कासाहेब रोहित आणि समीरने बिझनेससाठी मन वळवलेल्या १९ तरूणांपैकी काही तरुणांची सरदेशमुखांच्या कंपनीत काम करण्यासाठी निवड करतात. इतरांना त्यांच्या पुढील करिअरसाठी मदत करण्याचं आश्वासन अक्कासाहेब देतात. कोल्हापूरमधील तरुणांनी बिझनेसकडे वळावं म्हणूनच समीर आणि रोहितला तसं टार्गेट त्यांनी दिलेलं असतं. अक्कासाहेबांनी तरुणांसाठी केलेल्या या कामगिरीची दखल घेतली जाते. त्यांना कोल्हापूरच्या युथ आयकॉन म्हणून गौरवण्यात येतं. 
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...