Thursday, 18 February 2016

Twist in serial - 4

एखादी गोष्ट सांगताना सगळंच गोड गोड असून चालत नाही. तसं रूपालीचं वागणं हे तिखटाप्रमाणे आहे. अक्कासाहेबांची तर तिने माफी मागितली आहे. पण ती तिचा मूळ स्वभाव सोडत नाही. तर तिने आता तिचा मोर्चा कल्याणीकडे वळवला आहे. अक्कासाहेबांशी नीट वागून कल्याणीला त्रास देण्यासाठी ती प्लॅन्स आखू लागली आहे.

तिला माहीत आहे की समीर आणि कल्याणीच्या नात्यामध्ये काही प्रमाणात का होईना दुरावा आहे. समीरला या गोष्टीचं वाईट वाटतं की आपलं आणि कल्याणीचं बाळ असूच शकणार नाही. कारण कल्याणीला प्रेग्नसीमध्ये कॉप्लिकेशन्स आल्यामुळे आता यापुढे ती कधीच आई होऊ शकणार नाही. समीरला याचं दुःख आहे. त्यामुळे कल्याणी आणि समीरच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे.  तो वरवर निवळल्यासारखा वाटतो पण तसे नाही. आपल्या आई-वडलांपासून दुरावलेला समीर सरदेशमुख कुटुंबात परत येतो. तोपर्यंत याआधी तो सगळ्या नात्यांना पारखा झालेला असतो. आपलं कुणीच नाही. आपण एकटे आहोत. या फेजमधून तो गेला असल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे. त्याचं कल्याणीवर खूप प्रेम आहे. पण त्याला वाटतं की आपलं जेवढं कल्याणीवर प्रेम आहे. तेवढं तिचं आपल्यावर नाही. सोहमचं मूल हेच तिचं सर्वस्व आहे. त्यामुळे या गोष्टीची समीरला चीड आहे.  याचाच फायदा उठवत  रूपाली त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती समीरला सांगते तुझ्यावर कल्याणीचं प्रेमच नाही.  त्यामुळे समीर आणि कल्याणीच्या नात्यात तेढ निर्माण होते...

सरदेशमुख कुटुंबात आल्यामुळे समीरला एका कर्त्या मुलाचे सर्व अधिकार मिळाले आहेत. यामुळे तो सुखावला आहे. वैवाहिक आयुष्यात फारसा समाधानी नसलेला समीर बिझनेस फिल्डमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे रोहित आणि त्याच्यात स्पर्धाच सुरू झाली आहे. पण रूपालीने त्याच्या मनात कल्याणीविषयी संशय निर्माण केल्यामुळे समीरचं ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाहीय. त्याच्याकडून चूका होतात.  त्या निस्तरण्यासाठी रोहित पुढे येतो. रूपालीला अजून बळ मिळतं. तिला वाटतं, समीर असाच दुखावलेला राहिला तर रोहितकडे बिझनेसची मोठी जबाबदारी येईल. रूपाली आनंदून जाते. कल्याणीही घरात सर्वांशी तुटकपणे वागू लागते. तिचं कशात मन लागत नाही. अक्कासाहेबांना लक्षात येतं की कल्याणीचं काहीतरी बिनसलं आहे. त्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतात. परंतु वेगळ्या प्रकारे... अक्कासाहेब रूपालीने आखलेल्या प्लॅन्सना उधळून लावत नाहीत. त्यांना पहायचं असतं की आपल्या संसारावर आलेलं संकट कल्याणी धाडसाने परतून लावू शकते की नाही. त्यांना कल्याणीला सरदेशमुख घराण्याच्या एक सक्षम सूनबाईच्या रूपात पहायचे असते. त्यामुळे रूपालीच्या कल्याणीवरील कारवायांवर त्या लांबून लक्ष ठेऊन असतात.


रूपालीची इतपर्यंत मजल जाते, की कल्याणी मुलांना शाळेत सोडायला जाते तेव्हा ती रोज एका मुलाला भेटते. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. असं ती समीरला सांगते. तिच्याकडे कल्याणी आणि त्या मुलाचे काही फेक फोटो असतात. ती ते समीरला दाखवते. समीरचा राग अनावर होतो. तो कल्याणीला घराबाहेर काढायला निघतो. कल्याणी त्याची मनोमन विनवणी करते. पण समीर ऐकत नाही. शेवटी कल्याणीच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती पेटून उठते. ती म्हणते, देवा ब्राम्हणांच्या साक्षीने सात फेरे घेऊन आपलं लग्न झालंय. अक्कासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आपलं लग्न लावलं आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणीच नाही. मी घराबाहेर जाणार नाही. मी या सर्व प्रकरणाचा छडा लावेन. आजपर्यंत मी गप्प राहून सारं सहन केलं. पण आता नाही, हद्द झाली. चूक माझी नाही. समीर तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझं पाऊल मी कधीच वाकडं पडू दिलं नाही. मी शोधून काढेन याच्या मुळाशी कोण आहे ते....कल्याणीच्या अशा कॉन्फिडन्ट बोलण्यामुळे अक्कासाहेबांचा हेतू साध्य होतो. त्या रूपालीनेच हे सर्व कारस्थान घडवून आणलं आहे, असं समीरला पुराव्यानिशी सांगतात...

समीरला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो. तो कल्याणीची माफी मागतो. पण कल्याणी त्याला सांगते. तुला सहजासहजी माफ करणं मला शक्य होणार नाही. माझं मन तू खूप दुखावलं आहेस. मला थोडा वेळ हवाय.... अक्कासाहेब समीरला सांगतात की तू थोडा वेळ तिला दे. तिच्या मनाचा विचार कर. कल्याणीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अक्कासाहेब एक नवा प्लॅन करतात. समीरच्या वागण्याने दुखावलेल्या कल्याणीला आता एक वेगळं क्षितीज खुणावतं आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिला अक्कासाहेबांची साथ लाभणार हे वेगळं सांगावयास नको. पाहूया कल्याणीला आता कुठलं वेगळं क्षितिज खुणावतं आहे ते...
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...