कल्याणी आज बऱ्याच दिवसांनी
एवढा आवाज चढवून बोलली होती. कारणही तसंच होतं. तिने केलेल्या निखळ प्रेमावर,
तिच्या चारित्र्यर संशय घेण्यात आला होता. रुपालीला आपण मामाची मुलगी असूनसुद्धा
सख्खी बहिण मानलं, समीरवर मनापासून प्रेम केलं. पण यांनी तर माझ्यावर नाही नाही ते
आरोप केले. अक्कासाहेब माझ्यासोबत होत्या म्हणून... नाही तर काय केलं असतं मी...
कल्याणीला तो प्रसंग आठवून सारखं रडूच येत होतं. नाही आता हे बस झालं... मला आता
कठोर व्हायला हवं. कुणीही उठावं... माझ्याकडे बोट दाखवावं... हे मी आता सहन नाही
करणार... विचारांच्या धुंदीत असतानाच तिला झोप लागली. समीर रात्रभर खोलीत आलाच
नाही...
सकाळ झाली तेव्हा कल्याणीला खूप खूप मोकळं मोकळं वाटत होतं. मुलांची शाळेला जायची तयारी करून त्यांना शाळेत सोडून
पुन्हा तिने आपल्या रूममध्ये बिछान्याला पाठ टेकली. आणि ती चक्क गाणं गुणगुणू
लागली. पुढच्याच क्षणी ती उठून ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागली. तिच्या हाताला
स्केचपॅड लागले. तिला आनंद झाला. तिथेच पेन्सिलही सापडली. ती पुन्हा बिछान्यावर
बसली. उशीवर रेलून गाणं गुणगुणत ती स्केचेस काढू लागली. कित्येक वर्षांनी तिने
आपल्याकडे असलेल्या या कलेसाठी वेळ काढला होता. तिला फॅशन डिझायनिंगची आवड होती.
पण या क्षेत्रातील ग्लॅमरला ती घाबरली होती. आणि ही कला स्केचपॅडपुरतीच तिने राहू
दिली होती. तिने कधी हिंमतच केली नव्हती. स्वतःची अशी वेगळी ओळख घडवण्याची... पण कधी मनापासून
एखादं डिझाईन काढावसं वाटलं तेव्हा तिने स्वतःला कधी रोखलं नाही. तिची ही ओळख
तिच्यापुरतीच होती. कुणालाच माहीत नव्हती. कल्याणी स्केच काढण्यात दंग झाली होती...
बराच वेळ कल्याणी कुठे बाहेर दिसली नाही म्हणून अक्कासाहेब तिच्या रुममध्ये बघायला
आल्या आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं. कल्याणीला स्केच काढताना पाहून… कल्याणीने
स्वतःपुरती ठेवलेली ही कला आज तिच्या लाडक्या अक्कासाहेबांना कळली होती. त्यांनीही
कुतूहलाने सर्व डिझाईन्स पाहिल्या. त्यांना आनंद झाला. पण विश्वासच बसत नव्हता की
हे कल्याणीने डिझाईन्स काढले आहेत. त्यांनी तिला शब्द देऊन टाकला... मस्त एखादी
थिम घेऊन डिझाईन्स काढ. आपण तुझ्या डिझाईन्सचं एक्झिबिशन भरवुया...
हे काय अक्कासाहेब का थट्टा
करताय माझी... कल्याणी बोलली.
अगं थट्टा नाही करत... खरंच
सांगतेय मी. तुला तर माहीतच आहे. एकदा मी शब्द दिला म्हणजे दिला… कळलं
कल्याणीला इतक्या वर्षांनी
नवं काहीतरी करण्याचा हुरूप आला. तिने खूप मन लावून डिझाईन्स केल्या.
रुपाली सोडून घरातील
सगळ्यांनी तिला मदत केली. रूपाली एका वेगळ्याच प्लॅनमध्ये गुंतली होती.
अक्कासाहेबांनी कोल्हापूरात
कल्याणीसाठी एक मस्त शोरूम उभं केलं. जणु काही आपल्या सुनेला एक खुलं आभाळच दिलं.
मनसोक्त बागडण्यासाठी.
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)
No comments:
Post a Comment