Wednesday, 7 June 2017

चॅनेल बदला, विचार बदलेल!

काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक मर्यादित भागांच्या मालिका प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्‍यकता आहे... चॅनेल बदला, विचार बदलेल! 



बा र्कचा दर आठवड्याचा टीआरपी आला आणि पुन्हा एकदा सोशल मीडियातून चर्चा झडू लागल्या. अरे, काय हे... या असल्या मालिकांचा आम्हाला कंटाळा आलाय, या बंद कधी होणार याची वाट बघतोय.... पण टीआरपी बघा वाढतच चाललाय. हल्ली सोशल मीडियामुळे नोकरदार स्त्रियांना आणि तरुण-तरुणींना आपलं टीव्हीविषयी वेगळं मत प्रकट करण्याची संधी मिळते. आणि गेले वर्षभर समस्त महिलावर्गाला हाच प्रश्‍न पडलेला आहे की "पुढचं पाऊल', "साथ निभाना साथिया', "ये है मोहब्बते', "ससुराल सिमर का', "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है...' अशा या विविध मनोरंजन वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिका बंद कधी होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. पण हे असं का होतं, याच्यावर उत्तर काय ते आपल्याकडेच आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे गेली 2 वर्षे मालिका पाहणारा सूज्ञ प्रेक्षक मालिका आणि चॅनेलविरोधात आपली मतं आवर्जून आणि तीव्रपणे मांडू लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनेलवर एक ऑनलाईन दबावगट निर्माण झाला आहे. 

"इंडिया'फोरमसारख्या काही ऑनलाईन टीव्ही अपडेट देणाऱ्या वेबसाईट आणि काही वेगवेगळ्या मालिकांविषयीची पेजेस, ट्विटर हॅंडल यांच्या माध्यमातून चॅनेल आणि मालिकांविषयी ऑनलाईन मत प्रदर्शित करून मालिका कुठल्या बघाव्या, कुठल्या चांगल्या, याविषयी बरंच लिहिलं आणि बोललं जातं. इंडिया फोरम बार्कच्या टीआरपीव्यतिरिक्त आपला एक ऑनलाईन टीआरपी देतं. अशी अजूनही काही बेव पेजेस आहेत. त्यावर टॉपला दिसणाऱ्या मालिका बार्कच्या टीआरपीमध्ये पहिल्या दहामध्येही नसतात. अलिकडेच आलेल्या इश्‍कबाज, 24, अम्मा, सिया के राम, कुछ रंग प्यार के ऐसेही, इक दुजे के वास्ते, भागे रे मन अशा कितीतरी वेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. परंतु त्यांना हवा तसा टीआरपी नसल्यामुळे बरेच प्रेक्षक नाराज आहेत.  त्यातल्या काही मालिका बंद झाल्याही. कमी टीआरपीमुळे चांगल्या मालिका बंद होऊ नयेत. असं सूज्ञ प्रेक्षकांना वाटत आहे. त्यापेक्षा साथ निभाना साथिया, पुढचं पाऊल सारख्या मालिका बंद व्हाव्यात. पण वर्षभरातील टीआरपीचे आकडे पाहिले तर "ये है मोहब्बते', "कुमकुमभाग्य', "साथ निभाना साथिया', "स्वरागिनी', "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' आणि आता अलीकडे आलेली "ब्रह्मराक्षस' याच मालिका आलटून-पालटून टॉप ५ येताना दिसतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये काही वाहिन्या आपल्याच ब्रॅंडखाली काही नवी चॅनेल्स आणून त्यावर त्यांच्याच वाहिनीवरच्या जुन्या मालिका त्यावर दाखवत आहेत. त्या जुन्या मालिका दाखवायला सुरुवात झाल्यापासून त्या मालिकांनी सध्याच्या मालिकांना चांगलीच टक्कर दिली आहे. "जोधा अकबर' या मालिकेचं उदाहरण या संदर्भात देता येईल. गावाकडे काही भागात डिजिटलायझेशन आणि केबल सुविधा पोहोचली नसल्यामुळे या वाहिन्यांनी सुरू केलेली नवी चॅनेल्स "फ्री टू एअर' असल्यामुळे जुन्या मालिकांसह गावाकडच्या भागात दिसतात. त्यामुळे जुन्या मालिकांना टीआरपी मिळत आहे. बार्कने आता रुरल आणि अर्बन असा दोन्ही विभागात टीआरपी द्यायला सुरुवात केल्यामुळे हे स्पष्ट झालं आहे. मुळात सर्वसामान्य प्रेक्षकांच्याही आता काही मालिका खरंच डोक्‍यात जायला लागल्यात. पण बंद होण्याचं काही चिन्ह दिसत नाही, म्हणून ते त्याविषयी कधी खिल्ली उडवत; तर कधी गंभीरपणे चर्चा करताना दिसतात. 

एकदा एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्‌टंगडी यांना प्रेक्षकांकडून प्रश्‍न विचारण्यात आला की कंटाळवाण्या मालिका बंद कशा होतील? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, त्या कधीच बंद होणार नाहीत. जोवर तुम्ही रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलत नाही. असाच प्रश्‍न लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना विचारण्यात आला होता, त्या वेळी त्याही असंच म्हणाल्या, चॅनेल बदला, मालिका बंद होतील. 
अलीकडे काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मालिका मर्यादित भागांच्या असणार, असं जाहीर करूनच प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्‍यकता आहे. बऱ्याच घरांमध्ये कुठलंतरी एक चॅनेल लावून घरातली माणसं आपली इतर कामं करण्यात गढून गेलेली असतात. बऱ्याचदा त्यांचं मालिकांमध्ये लक्षही नसतं. परंतु ते चॅनेल संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत न बंद करता लावून ठेवल्यामुळे चॅनेलला मात्र रिच आणि टाईम स्पेंड मिळतो आणि त्यांचा प्रोग्रामिंगचा हेतू साध्य होतो. परवाच ट्रेनमध्ये एक मुलगी सांगत होती, आमच्या शेजारच्या काकूंना कमी ऐकू येतं; त्यामुळे त्या ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही लावतात, त्यामुळे त्या स्लॉटमध्ये लागणाऱ्या सर्व मालिकांमध्ये सध्या काय ट्रॅक चालू आहे, ते आम्हाला टीव्ही न बघता कळतं. कुठली मालिका किती सहन करायची, हे प्रेक्षकांवरच अवलंबून आहे; त्यामुळे आपण नागरिक म्हणून दैनंदिन जीवनातली कित्येक कर्तव्य बजावत असतो, त्यापैकीच नावडती मालिका न पाहता चॅनेल बदलणे हे कर्तव्य समजून रिमोट हाती घ्यायला हवा. नाहीतर रटाळ मालिका सहन करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय उरणार नाही. या वर्षभरातील जे काही बार्कच्या टीआरपीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत, ते पाहता त्याच्याशी ४० टक्के प्रेक्षक असहमत आहेत. हे प्रेक्षक सोशल मीडियातून आपली मते आवर्जून मांडत आहेत; त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये १० टक्के बदल घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या जोडीला घरी बसून टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांनी जर आपला विचार बदलून चॅनेल बदललं तर अजून खूप मोठा फरक पडेल आणि सध्याचं टीव्हीचं चित्रं नक्की बदलेल. हे शक्‍य आहे आणि ते प्रेक्षकांच्याच हातात आहे. इतर मनोरंजन वाहिन्यांच्या रेट्यात एपिक चॅनल आपली एक खास ओळख बनवू पाहत आहे. पण त्यांच्या मालिकांना टीआरपीच्या तुलनेत टिकणे कठीण झाले आहे. एकांत, दरीबा डायरीज, राजा, रसोई और अन्य कहानियाँ, देवलोक अशा काही मालिकांना खास चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण त्यांची मागणी आहे की या मालिका त्यांना यू ट्यूबवर पहायला मिळाव्यात. कारण टीव्हीचा रिमोट डेली सोप पाहणाऱ्या घरातील गृहिणींच्या हातात असतो.

युथ चॅनल्स आपल्या टार्गेट ऑडियन्सला खिळवून ठेवण्यात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे अलिकडेच चॅनल व्ही नावाच्या वाहिनीला आपला जॉनर बदलून म्युझिकल व्हावं लागलं. कारण मुळात तरूणाई टीव्ही पाहण्यासाठी काय करावं याचच उत्तर त्यांना मिळालेलं नाही.
प्रेक्षकांना एखाद्या मालिकेचं किंवा संपूर्ण वाहिनीवरील कार्यक्रमांचं हॅबिट फॉर्मेशन होणं ही चॅनेलच्या प्रोग्रामिंग टीमच्या यशाची खूण आहे; परंतु प्रेक्षकांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. आपल्याला एखादी मालिका बघायची सवय लागली की ती सहसा सुटत नाही आणि तिथेच सारं घोडं अडतं. सध्या प्रत्येक वाहिनीवर काही नव्या मालिकांचे प्रोमो झळकतायत. त्यांच्याकडे आता काही प्रेक्षक लक्ष देऊन आहेत आणि सोशल मीडियावरचा प्रत्येक प्रेक्षक "इश्‍कबाज' या मालिकेच्या प्रचंड प्रेमात पडलाय. त्या सर्वांना इच्छा आहे की ही मालिका नंबर वन मालिका व्हावी. त्यासाठी ते रोज काही ना काही कृती करताना दिसतायत. आपलं "शिविका' प्रेम दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. अरे हो, शिविका कोण ते सांगायचं राहिलंच की! शिवाय सिंग ओबेरॉय आणि अनिका ही जोडी सध्या प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय झाली आहे. यांचंच ते कपल नेम आहे शिविका. पण ही मालिकाही १.९ आणि १.५ अशा टीआरपीमुळे बंद होईल की काय, अशी भीती ऑनलाईन प्रेक्षकांना वाटू लागलीय. "इश्‍कबाज' नामकरण, कुछ रंग प्यार के ऐसेही आणि अशा काही चांगल्या मालिकांची संख्या फार कमी आहे, त्या मालिकांना प्रेक्षकांच्या विचारबदलाची आणि चॅनेलबदलाची अपेक्षा आहे. नाही तर "भागे रे मन' या अतिशय लाडक्‍या मालिकेला जसं प्रेक्षकांना मुकावं लागलं, तसंच इतर मालिकांचं होईल, म्हणूनच विचार बदलाचॅनेल बदलेल आणि चॅनेलला बदलावंच लागेल... 

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती १८ नोव्हेंबर २०१६



वेशीवरचे हुंदके

सध्या गालावर खळी पाडत गोड हसत ‘चालतंय की’ असं म्हणणारा राणा चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याच्या संगट त्याचं शेत आणि लाल मातीतली कुस्तीबी याड लावतिया. पण प्रश्न हा आहे की असं किती मुलींना वाटतंय की मला शेतकरी नवरा हवा. किंवा किती मुलांना असं वाटतंय की आपण गावी जाऊन शेती करावी...तर अशी मुलं-मुली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच एखाद्या गावात सापडतील. कारण गावातली युवा पिढी गावातच रुळण्याऐवजी शहराची वाट चालू लागली आहेत. हे वर्षानुवर्ष होत आलंय. आणि आता हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे गावच्या वेशीवर राहिलेत फक्त हुंदके आणि डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या ज्येष्ठांच्या केविलवाण्या नजरा. 

शहरातला मुलगा गावात येतो, गाव बदलतो आणि तो गावाचा सर्वेसर्वा बनतो. अशा गोष्टी आता फक्त सिनेमातच दिसतात आणि घडू शकतात. प्रत्यक्षात ते शक्य नाही. स्वदेस मधला मोहन आठवतोय. शाहरूख खानने खूप छान भूमिका वठवली होती. हा मोहन शेवटी निघतो, कावेरी अम्माला आणि प्रेयसी गिताला वेशीपाशी रडवेल्या स्थितीत सोडून...मग तो लगेचच परततो आणि त्या दोघींचं वाट पाहणं संपतं. पण आज गावेगावी पाहिलं तर अशा कितीतरी कावेरी अम्मा आणि गिता आपल्या माणसाची वाट पाहत हुंदके देतातय. 

घरटी गडी, तरूण मुलं-मुली गावची वेस ओलांडून शहरात जाऊ लागली. याची कारणं पाहिली तर खूप आहेत. पहिलं कारण शिक्षणाचं. उदाहरणच द्यायचं झालं तर कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हा सर्वात साक्षर जिल्हा म्हणून नावाजला जातो. पण याच जिल्ह्यातील अंदाजे ७० टक्के तरूणाई मुंबई आणि आसपासच्या शहरात प्रथम शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी गेली. या ७० टक्के तरूणाई पैकी जवळपास ५० टक्के तरूणाईचा शहरातच संसार थाटून राहण्याकडे कल दिसतो. सणासुदीला घरच्यांना भेटवस्तू घेऊन गावी जायचं आणि पुन्हा यायचं. अशी गावात सतत ये-जा करणाऱ्या तरुणाईचंही एक टोक आहे. ही मुलं-मुली आपला शहरी थाट गावी गेल्यावर पुरेपूर मिरवून घेतात. आमचा मुलगा मोठ्या कंपनीत कामाला आहे. असं त्यांचे पालक गावात सांगून आपला मान वाढवून घेतात. यातंच त्यांना धन्यता वाटते. पण प्रत्यक्षात तो मुलगा कुठेतरी मॉलमध्ये किंवा तुटपंजी नोकरी करत असतो. (असो, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे.) मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणाच्या पट्ट्यात कामानिमीत्त ये-जा करणाऱ्या तरूणाईचं एक वेगळच कल्चर आहे. दुसरं कारण गावाकडे रोजगार मिळत नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे होणारं स्थलांतर. यालाच जोडून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात जाणारी तरूणाई हा मुद्दा घेऊ शकतो. त्याचबरोबर काही पालक आपल्या मुलांना शहरात जाऊनच नोकरी कर, अशी जबरदस्ती करतात. या अशा कारणामुळे शहरात आलेल्या तरूण मनांची व्दिधा मनस्थिती असते. तर काही तरूण शहर की गाव, की दोन्ही असे अधांतरी लटकतात. पण या सगळ्यात घरातील ज्येष्ठ व्यक्ती मात्र एकटे पडतात. 

मुलगा शहरात गेला चांगलं कमाऊ लागला. नंतर तिथेच जम बसवण्याचा विचार करू लागला तर आपल्या आई-वडलांना तिकडे बोलावून घेतो. आणि आजी-आजोबांना शेजाऱ्यांच्या भरवशावर गावातच सोडलं जातं. भारतातील गावोगावी हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने पहायला मिळते. आजच्या काळात एकत्र कुटुंबपध्दतीही टिकण्याचं प्रमाण कमी होऊ लागलंय. तिथे घरातील आजी-आजोबांना कोण विचारणार...अशा स्थितीत आपल्याला काय दिसतं तर उंबरठ्यावर, पारावर बसून वेशीकडे डोळे लावून बसलेल्या ज्येष्ठ व्यक्ती. जुन्या काळात पिढीतलं अंतर वयाने वाढलं तरी मनाने खूप जवळ असायचे. पण आता मनाने आणि वयाने दोन पिढीतलं अंतर वाढतंच आहे. आणि अलिकडे तर आजी-आजोबांना मोठ्ठा टिव्ही घेऊन किंवा अगदी लेटेस्ट फॅशनचा स्मार्ट फोन घेऊन दिला की नातवंडांचं कर्तव्य संपतं. आपले आजी-आजोबा व्हॉट्सअपवर आले हे कौतुकाने मित्रांना दाखवणारी तरुणाई हे विसरते की ते तुमच्याशी दिवसभरातून एकदा तरी संवाद व्हावा यासाठी आलेत व्हॉट्सअपवर. इथेही त्यांची खिल्लीच उडवली जाणार असेल तर तरूणाईशी संवाद साधण्यासाठी आसुलेल्या त्यांनी काय करावं? मग त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्यायच उरत नाही.


आता कामासाठी शहरात जाणं किंवा काहीतरी अनवट वाट शोधावी किंवा फॅशन आणि अडव्हेंच्यर म्हणून गावी सेटल होणं महत्त्वाचं नसून आपली प्रगती कशात आहे शोधणं... जी प्रगती आपल्यातलं माणूसपण हिरावून घेते तिला प्रगती म्हणावं का? हा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीय, अजून किती वर्षे आपण आजी-आजोबांना वेशीवर असे तिष्ठत ठेवणार आहोत...
मला आठवतंय मी शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याबरोबर आमच्या दहावीच्या अर्धा वर्ग मुंबईला निघाला होता. त्यातले काहीजण फक्त शिक्षणासाठी आणि काहीजण नोकरीसाठी असं चित्र होतं. तेव्हा आमच्यासमोर पर्याय नव्हता. पण आता गावाकडे तशी परिस्थिती राहिली नाही. शिक्षणसुविधा मिळू लागली आहे. तेव्हा आमच्या गावात फक्त सकाळच्या वेळात एक एसटी जायची. त्यानंतर ये-जा करण्यासाठी काही साधन नसायचं. पण आता दळणवळणाच्या सुविधाही सुधारल्या आहेत. हे जरी असलं तरी गावात आता एक वेगळाच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे शहरात राहून शिकलं, नोकरी किंवा व्यवसाय केला तर तो ग्रेट. मात्र गावात राहून कुणी हीच गोष्ट करून दाखवली तर त्याला ग्रेट मानलं जात नाही. यामुळे तरूणाईच्या डोक्यात गोंधळ उडालाय. पण यामध्ये कुचंबणा होतेय ती घरातल्या आजी-आजोबांची. नातवंडांना चार शब्द समजावून सांगावेत तर त्यांचं ते ऐकणार नाहीत. कारण मुलांना शेवटी आपल्या आईवडलांनी सांगितल्याप्रमाणे शहरात जा, स्वतःची वेगळी वाट शोध याच गोष्टीत थ्रील वाटतं.


तसं बघायला गेलं तर या प्रश्नावर थेट असं काही उत्तर नाहीय. पण जरा वेगळा विचार केला तर लक्षात येईल की शिक्षणाने अंगी सुसंस्कृतपणा येतो मग ते शिक्षण गावचे असो की शहरातले. माणूस म्हणून तुम्ही किती आणि कसे आत्मसात करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मानण्यावरच सगळं आहे. तुम्ही गावचे म्हणून स्वतःला कमी लेखत राहिलात तर हातचं कमावलेलं सार निसटून जाईल. सध्या समाजाला गरज आहे ती सुदृढ, कणखर युवापिढीची आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठीशी असणाऱ्या ज्येष्ठांची. पण तरूणाईच जर गाव की शहर या विचाराने गोंधळेली असेल आणि ज्येष्ठ मंडळी तुमच्यासोबत नसतील तर निकोप समाजनिर्मीतीचं भवितव्य धोक्यात येईल.


एक छोटीशी गोष्ट इथे आवर्जून सांगाविशी वाटते ती अशी की एका शहरातले आई-बाबा आपल्या मुलाच्या सदा न कदा सोशल मीडियावर असण्यामुळे प्रचंड वैतागलेले होते. त्या मुलाला फोटोग्राफीची आवड होती. तो रोज काहीतरी इनोवेटिव्ह फोटो काढून पोस्ट करत रहायचा. त्याच्यावर आलेल्या कमेंट्स वाचायचा त्यानुसार पुन्हा विचार करायचा असं त्याचं दिवसभर सुरू असायचं. अभ्यासात तो फार काही हुशार नव्हता. एकदा त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं. तुला २४ तास वाय फाय देतो. तीन महिने तुला तुझ्याच खोलीत कोंडून ठेवतो. फक्त जेवणाच्या वेळेला जेवण खोलीत येईल. बाकी तू मात्र अजिबात बाहेर जाऊ शकणार नाहीस. आणि या तीन महिन्यात तू तुझी काहीतरी प्रोग्रेस करून दाखवायचीस. तीही या चार भिंतीच्या आत. मुलाने आव्हान स्वीकारलं. पण त्याला दोन-तीन दिवस कळतंच नव्हतं काय करायचं. सोशल मीडियावर ऑनलाईन राहून थकला. मग एके दिवशी खिडकीच्या बाजूला निवांत पडून राहिला. नुकतीच किरणं खिडकीपाशी रेंगाळत होती. साडे-नऊची वेळ असेल. त्या मुलाच्या खोलीसमोर खिडकीत त्याला एक आजी दिसली, ती मस्त खुशीत गात स्वयंपाकाला सुरूवात करत होती. तो तिच्याकडेच बघू लागला. त्या आजीने गुणगुणत सगळा स्वयंपाक केला...आणि शेवटी एका रेसिपीची वाटीत घेऊन चव घेतली आणि खुशीत अहाहा असं म्हणत निघून गेली. त्या मुलाने चार दिवस बारकाईने निरिक्षण केलं आजी गाणं म्हणत स्वयंपाक करायची आणि निघून जायची. त्याला यावर एक कल्पना सुचली. त्याच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, त्याने तो आजीच्या खोलीच्या दिशेने वळवला. त्यावर तो रोज आजीचा स्वयंपाक शूट करू लागला, तिच्याही नकळत. मग शूट केलेला व्हीडीयो तो ‘ग्रॅनीज सिंगिंग किचन’ या त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू लागला. त्याला खूप हिट्स आणि शेअर मिळू लागले. तीन महिन्यांनी तो खोलीतून बाहेर पडला तेव्हा तो आणि ती समोरच्या खिडकीतली आजी दोघेही स्टार झाले होते...आणि त्या मुलाच्या पालकांना त्याचं खूप कौतुक वाटू लागलं. त्यांनी आपल्या मुलाची जाहीर माफी मागितली. त्याचवेळी त्यांच्या घरात मुलाच्या आग्रहाखातर ती आजी त्यांच्या घराची एक सदस्य बनली.


सांगायचा मुद्दा हाच की आपली प्रगती साधायची असेल तर कुठुनही साधली जाऊ शकते. त्यासाठी शहर की गाव निवडायची आवश्यकता नाही. आणि आपल्या माघारी ज्येष्ठांना उंबरठ्यावर, वेशीपाशी रडवेल्या अवस्थेत सोडून जाण्याचा विचारसुध्दा मनात आणू नका...कारण फिल्मी मोहन पुन्हा घरी येऊ शकतो. पण तुम्ही एकदा शहरात जायचा विचार केलात की कावेरी अम्मा आणि गिताचे हुंदके तुम्ही कसे थांबवणार...’गाव ओस पडतंय, वेशीपाशी आता निशब्द हुंदके’ असं बातम्यामध्ये सांगितलं गेलं तर ती ह्युमन इंटरेस्ट स्टोरी होते. आणि या स्टोरीचा हॅपी एंड तुमच्याच हाती आहे... 



पूर्वप्रसिद्धी ज्येष्ठपर्व त्रैमासिक २०१७

इश्‍कबाजां'चा दुसरा अध्याय

"एक दुसरे के जरुरी हिस्से हैं, ये एक कहानी के तीन किस्से हैं' असं म्हणत इश्‍कबाज या मालिकेत दाखवलेली तीन भावांची गोष्ट इतकी हीट ठरली, की खास "लोकाग्रहास्तव' त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना घेऊन तिची जत्रेत हरवलेली बहीण शोभावी अशी "दिल बोले ओबेरॉय' ही मालिका येतेय. भारतीय टेलिव्हिजनवरील या वेगळ्या प्रयोगाविषयी... 

गेल्या वर्षी 27 जुलैला इश्‍कबाज ही मालिका सुरू झाली. ओबेरॉय खानदानाची ही गोष्ट होती तीन भावांची. हे तीन भाऊ आणि त्यांचं बॉंडिंग पब्लिकला इतकं अपील झालं, की ती सोशल मीडियावर रॉकिंग ठरली. ट्विटर, फेसबुक, यू-ट्युबवर त्यावर इतक्‍या कमेंट पडताहेत, की... 
या तीन भावासांठी तीन वेगवेगळी लव्हसॉंग आहेत, त्यांचे वेगवेगळे व्हिडीयोही आहेत. ज्याचे रिंगटोन त्यांच्या अनेक फॅनच्या फोनवर वाजताहेत. या तिघांची एण्ट्री जेव्हा होते तेव्हा त्यांचे स्वतःचे असे म्युझिक वाजते. तेही लोकप्रिय आहे. थोडक्‍यात, सब कमाल का चल रहा था, और कॉम्पिटिशन शुरू हो गई. तीही याच मालिकेच्या एक्‍स्टेन्शन असलेल्या मालिकेकडून... 
या नव्या मालिकेचं नाव आहे "दिल बोले ओबेरॉय'. इश्‍कबाज जे पाहतात, त्यांना यामागचा संदर्भ कळेलच. 
ही मालिका सुरू होतेय स्टार प्लसवरच, पण खरं सांगायचं तर ही मालिका जास्त पाहिली जाते हॉट स्टार या ऍपवरच. 
व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून ही स्टारवर आणि हॉट स्टारवर दिसू लागेल. 
भारतीय टेलिव्हिजनवर हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असावा. अमेरिकेत फ्रेंड्‌स या सिरीजचे 10 सीझन झाले आहेत. त्यातील कलाकार आणि पात्रं खूप आवडल्याने त्यांचा एक वेगळा प्रवास दाखवण्यासाठी एक नवी मालिका आखण्यात आली होती, पण ती होती वेबसाईटपुरती मर्यादित. "दिल बोले ओबेरॉय' ही मालिकासुद्धा सुरुवातीला स्टारच्या हॉट स्टार ऍपवरच दाखवावी असं ठरत होतं, पण त्यानंतर वाहिनी आणि प्रॉडक्‍शन हाऊस यांनी मिळून ठरवलं, की ती एक वेगळी मालिकाच असावी आणि ती इश्‍कबाजनंतरच्या स्लॉटलाच अर्धा तास ठेवावी असं ठरलं. 
मालिकेचे प्रोमो वाहिनीवर झळकू लागल्यानंतर इश्‍कबाज मालिकेचा ऑनलाईन प्रेक्षकवर्ग प्रचंड खूश झालाय, की त्यांचे थॅंक्‍यू मेसेज, ट्विटस्‌ अजूनही सुरू आहेत. गुल खान आणि करिश्‍मा जैन यांच्या फोर लायन्स फिल्म या प्रॉडक्‍शन हाऊसने इश्‍कबाज सीरियलची कल्पना स्टार वाहिनीवर मांडली होती. ही मालिका सुरू झाली तेव्हा तीन भावांची गोष्ट असलेली ही मालिका प्रेक्षकांना कितपत रुचेल असं वाटलं होतं, पण शिवाय, ओमकारा आणि रुद्र या तीन ओबेरॉय ब्रदर्सनी या मालिकेतून अशी काही जादू केली, की प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या नायिकांना विसरले. एखादी नायिका मध्यवर्ती असलेली मालिकाच हीट होते हा समज या मालिकेने खोटा ठरवला. 
एकाच मालिकेचं हे एक्‍स्टेन्शन मांडण्याचं पाऊल पहिलं असलं, तरी मागोमाग इतर अनेकही त्यांच्यामागोमाग येऊ शकतील. आपली "कॉपीबाज' मनोवृत्ती लक्षात घेता ते नाकारता येत नाहीच... 
कोण आहेत इश्‍कबाज? 
इश्‍कबाज ही मालिका म्हणजे तीन चुलतभावांची गोष्ट. त्यांचं ओबेरॉय कुटुंब एक प्रतिष्ठित गडगंज श्रीमंती अनुभवत आहे. आजी, काका, काकी, आई, बाबा, बहीण हे तिघे भाऊ आणि मोठा भाऊ शिवायची बायको असं हे यांचं ओबेरॉय खानदान. या खानदानाचा रुबाब तुम्हाला प्रत्यक्ष मालिका पाहताना कळेलच, कारण यातला शिवाय राग आला की एक दिवसाआड आपला किमती फोन फेकून देतो. या कुटुंबाला त्यांच्या दादीने मायेने एकत्र बांधून ठेवलंय. तिचा मान राखत या कुटुंबाला असंच एकसंध ठेवायची जबाबदारी या तीन ओबेरॉय ब्रदर्सवर आहे आणि ते तिघेही ही जबाबदारी मस्त पार पाडतायत. बिझनेसमन शिवायला फक्त खानदान महत्त्वाचं वाटतं. ओमकारा हा शिल्पकलेत पारंगत आहे; तर रुद्र हा कॉलेजला जाणारा फ्लर्टी मुलगा आहे. हे तिघे भाऊ अर्धा तास प्रेक्षकांना बांधून ठेवतात. 
शिवाय आहे नकुल मेहता, ओमकारा आहे कुणाल जयसिंग आणि रुद्र आहे लिनेश माट्टू. 
ऑनलाईन चस्का... 
इश्‍कबाजांना (त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना) घेऊन दुसरी मालिका आणण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यामागे या मालिकेच्या ऑनलाईन प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. कारण ही मालिका ऑनलाईन बघणारा प्रेक्षकवर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. इंडिया फोरमकडून दर आठवड्याला डेली सोपचा "चस्का मीटर' लावला जातो. इथे आपल्या आवडत्या मालिकांना ऑनलाईन मतदान करायचं असतं. त्या मतदानावर त्या आठवड्यातील मालिकांची रॅकिंग ठरते. या रॅकिंगमध्ये नेहमी "इश्‍कबाज' आणि "कुछ रंग प्यार के ऐसे ही' या दोन मालिका आलटूनपालटून नंबर वनला असतात. 
सध्या मालिकेत मोठ्या भावाची म्हणजे "द शिवाय सिंग ओबोरॉय'ची लवस्टोरी दाखवली जातेय. त्यात नकुलबरोबर सुरभी चांदना ही अभिनेत्री त्याच्या पत्नीची भूमिका करतेय. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. अगदी इतकं, की ऑनलाईन प्रेक्षक शिवाय आणि अनिकाचा असा असा सीन घ्या असं चक्क ट्विट करून सांगतात. हिंदी मालिकांमधील आघाडीची लेखिका हरनीत सिंग यांनी मा मालिकेची कथा, पटकथा लिहिलीय आणि प्रसिद्ध संवादलेखक जोडी दिव्य शर्मा आणि अपराजिता शर्मा यांनी या मालिकेचे संवाद लिहिले आहेत. हे तीन भाऊ आणि अनिका या पात्राच्या तोंडचे संवाद ऐकताना इतकं मनोरंजन होतं, की दिन बन जाता है. 
या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे ओब्रो मोमेंट. या मोमेंटमध्ये इतर कुणाला एण्ट्री नसते. घरात स्वयंपाक करणारे शेफ असले तरी या तीन भावांना आपल्या हाताने स्वयंपाक करायला खूप आवडतो. खास करून शिवायचा बिझनेसबरोबरच स्वयंपाक करण्यातही हातखंडा आहे. त्याला कॉण्टिनेंटल रेसिपी खूप छान जमतात आणि अधूनमधून तो पंजाबी डीश करून आपल्या कुटुंबाला खूश करतो. आपल्या बायकोलाही तो आपल्या हातची पण तिची आवडती पुरी-भाजी खायला घालतो. तीही तुपात तळलेली. हे तीन भाऊ ज्या ज्या सीनमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांची एक पंचलाईन ठरलेली असते. दिल बोले ओबेरॉय...
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती  ११ फेब्रुवारी २०१७


साहित्य सरोवरातले राजहंस

ज्येष्ठ लेखक, कथाकार वामन होवाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कथेनं आणि त्यांच्या कथाकथन शैलीने अनेकांना साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबण्याची पर्वणी दिली. आपणच लिहिलेलं लेखन अनोख्या शैलीत सादर करण्याची हातोटी मोजक्‍याच साहित्यिकांपाशी असते. होवाळ त्यापैकी एक. त्यांच्याविषयीच्या आठवणी अनेक आहेत; पण ही एक खास आठवण कॉलेजमधील त्यांच्या कथाकथनाची...



आठवणींच्या पाकळ्या गळून पडत नाहीत, तर त्या आठवणींच्या कळ्या होऊन मनात फुलत राहतात. कारण आठवणींना अंत नसतोच. तशीच ही आठवण लेखक वामन होवाळांविषयीची. 
मराठीच्या पाठ्यपुस्तकातून अनेक लेखक भेटायचे. काही लेखकांशी लगेच गट्टी व्हायची. काही लेखक समजून घेण्यासाठी मराठी शिकवणाऱ्या बाईंची मदत घ्यावी लागायची. नुकतीच वाचनाची आवड लागली होती, तेव्हा पुस्तकांची कमतरता भासायची. मग इतर इयत्तेतल्या मुलांची मराठी भाषेची पुस्तकं घेऊन वेगळं काही वाचल्याचा आनंद त्या वेळी मिळायचा. मग हळूहळू ग्रंथालयात गेल्यावर लेखकांशी आणि त्यांच्या पुस्तकांशी रोजच भेटी होऊ लागल्या. अशाच वाचनातून लेखक वामन होवाळ यांच्या काही कथा वाचनात आल्या. 
कॉलेजमध्ये गेल्यावर मराठी वाङमय मंडळाच्या विविध उपक्रमात भाग घेऊ लागले आणि मंडळासाठी कार्यक्रम आखण्याच्या गटात सामील झाले. एके दिवशी आमच्या विल्सन कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख तारकरबाई म्हणाल्या, आपल्या वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात वामन होवाळ येणार आहेत. ते आपल्या काही निवडक कथा सादर करतील. याआधी आम्ही कधीही त्यांना कथा सादर करताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे शंका की कॉलेजमधली मुलं सरांचा कार्यक्रम होईपर्यंत एकाजागी नीट बसतील ना? की चुळबुळ करतील किंवा त्यांच्या लेक्‍चरची वेळ झाली म्हणून निघून जातील? त्यातून कार्यक्रम सादर करायला आम्हाला कॉलेज हॉलच मिळाला होता. एरव्ही आम्ही मराठीचे प्रोग्राम्स एखाद्या छोट्याशा बंदीस्त वर्गातच करत असू. कारण मुलं कमी यायची. ठरल्या वेळेप्रमाणे वामन होवाळ कॉलेज गेटपाशी आले. आमच्या कॉलेजच्या मुलांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना चहापानासाठी एका खोलीत नेलं. तेव्हा आमच्या मराठीच्या बाई होवाळांना म्हणाल्या, कार्यक्रमाला मुलं कमी असली तरी सांभाळून घ्या. दुसऱ्या लेक्‍चरसाठी मध्येच मुलं उठून जाऊ लागली, तर दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. होवाळांना बाईंची चिंता कळली. ते म्हणाले, ठीक आहे काहीच हरकत नाही, ती कॉलेजमधली मुलं आहेत. त्यांना त्यांच्या आवडीनं सवडीनं कथा ऐकू द्या. ती मुलं आहेत, कंटाळा करणार, मधेच उठणार, हे चालायचच. चला आपण हॉलमध्ये जाऊ.
वामन होवाळ हॉलमध्ये आले, तेव्हा अर्धाच हॉल भरला होता. कार्यक्रमाच्या निवेदिकेने त्यांची ओळख करून दिली. मग होवाळांनी गमती जमती करत कथाकथनाला सुरुवात केली. बघता बघता अर्धा असलेला हॉल तुडुंब भरला आणि मागच्या रांगेत काही मुलं उभी राहून कथा ऐकू लागली. या वेळी त्यांनी बेनवाड, येळकोट, वारसदार आणि वाटा आडवाटा या संग्रहातील एकेक कथा सादर केली.
आमच्यासारख्या शहरी मुलांना त्यांच्या कथेतला गावरान गोडवा अतिशय भावला. त्या कार्यक्रमापुरतं आमच्या कॉलेजचं नेहमी इंग्रजाळलेलं वातावरण बदललं होतं. कॉलेजमधले यंग ड्यूड, गाईज आणि फॅशनेबल मुली शेताच्या बांदावर एखादं कणिस हाती घेऊन हुंदडणारे पोरगा-पोरगी झाले होते. वामन होवाळांच्या कथनशैलीने सगळेच गावच्या विश्वात पोहोचले होते. मुलांना कथाकथनात दंग बघून आमच्या मराठीच्या बाईंनाही खूप आनंद झाला. मराठी वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमाला तेही कथाकथनाच्या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आपल्यातलं गावचं गावपण टिकवूनही मनानं मोठ्ठ व्हायचं, हे त्यांच्या कथनातून आम्हाला समजलं. गावंढळपणातही एक वेगळा स्मार्टनेस दडला आहे, हेही समजलं. कार्यक्रमाच्या शेवटी मराठीच्या बाईंनी खास बीएच्या विद्यार्थ्यांशी बोलायला होवाळांना सांगितलं, तेव्हा आम्हीही दरवाज्यातून डोकावत होतोच. तेव्हा त्यांची दोन वाक्‍यं कानावर पडली. ‘तुम्हाला मी अधिक काय सांगू? तुम्ही साहित्याचे विद्यार्थी. फक्त एक करा की, या साहित्य सरोवरावरून उडणारे बगळे होऊ नका. तर या साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबा... स्वतः आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.’
कॉलेजच्या आमच्या मंडळात मग खूप साहित्यिक कार्यक्रम होत राहिले. अजूनही होतात. बाई आम्हाला माजी विद्यार्थी म्हणून बोलावतात आणि त्यानिमित्ताने अशा वामन होवाळांसारख्या साहित्यातील राजहंसाना भेटल्याचं समाधान आम्हाला मिळतं. मग त्यांच्या आठवणींच्या कळ्या होऊन त्याचा सुगंध मनात भरून राहतो.
 पूर्वप्रसिध्दी सकाळ मुंबई आवृत्ती डिसेंबर २०१६

अभिनेत्या लेखकाची गोष्ट

‘एव्हरीबडी वॉन्ट्‌स स्टोरीज फ्रॉम रायटर; बट नो बडी वॉन्ट्‌स रायटरर्स स्टोरी’ असं कुठेतरी वाचलं होतं. पण स्वतःमधल्या अभिनेत्याला शोधता शोधता लेखनाची समृद्ध वाट चोखाळणाऱ्या अभिजित गुरू नावाच्या लेखकाची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. 
तो मूळचा नागपूरचा. कॉलेजच्या ग्रुपमध्येच त्याला स्वतःमधील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक सापडला. ‘एक होता राजा’ ही त्याने लिहिलेली पहिली एकांकिका. या एकांकिकेला सर्वोकृष्ट एकांकिकेसह, अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाचा पुरस्कार मिळाला. मग पुढे राज्य नाट्य-स्पर्धेत खूप बक्षिसे त्याने पटकावली. तेव्हा सगळे जण म्हणायचे, ‘अरे, तू खूप छान लिहितोस.’ पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. नागपूरमध्ये बऱ्यापैकी एकांकिका वगैरे लिहून, अभिनय, दिग्दर्शन करून स्वतःला अजमावण्यासाठी त्याने मुंबई गाठली. त्याला अभिनय करायचा होता. 
मुंबईत आल्यावर तो बऱ्याच ठिकाणी कामासाठी जात होता आणि नकार पचवून घरी परतायचा. पुन्हा नव्या जिद्दीने प्रयत्न करायचा. आपण इलेक्‍ट्रॉनिक मीडिया समजून घेतला पाहिजे, या इच्छेने त्याला स्वस्थ बसू दिलं नाही. मीडिया शिकायचा असेल तर सहायक म्हणून काम करायला हवं. मग तो ‘बंधन’ मालिकेसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. आधी मालिकेची स्टोरीलाईन लिहिली जाते. मग कथा लिहिली जाते.
कथाविस्तार होतो आणि पटकथा संवाद लिहिले जातात. त्याला हा माध्यमातला फरक कळू लागला. मालिका लेखन करताना बोलीभाषा, साधी सोपी भाषा लिहावी लागते. भाषा पुस्तकी असू नये. एकच माणूस खूप वेळ बोलतोय, असं होता कामा नये किंवा एकच दृश्‍य फार काळ लांबलंय असं होऊ नये, हे समजू लागलं. पण तरीही त्याला आत्मविश्‍वास वाटत नव्हता. 
मग तो काही दिवसांसाठी पुन्हा नागपूरला गेला. तिथे सगळी माणसं त्याच्या लेखनाची दिवाणी होती. ती त्याला विचारू लागली. ‘अरे, तू छान लिहायचास ना! काय झालं, लेखन का करत नाहीयेस?’ तिथून परतल्यावर त्याने मनाशी निश्‍चय केला की येस्स! लेखन ही गोष्ट आपल्याला छान जमतेय. मग यातच पुढे जायचं आणि लेखनासाठी त्याने स्वतःला झोकून दिलं. ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे १०० एपिसोड अभिजीतने लिहिले. तिथे त्याचं नाव लेखक म्हणून छोट्या पडद्यावर पहिल्यांदा झळकलं. मग तो लेखनाच्याच संधी शोधू लागला. एकदा त्याने नंबर मिळवून चिन्मय मांडलेकर यांना फोन केला. मांडलेकर तेव्हा चार मालिका लिहित होते. त्यांनी अभिजितला विचारलं, ‘तू संवादलेखन करशील का?’ आणि त्यांनी त्याला एक सीन लिहायला सांगितला. त्याने १५ मिनिटात तो सिन लिहून दाखवला आणि त्याच क्षणी त्याची ‘अवघाची संसार’ या मालिकेसाठी संवादलेखक म्हणून निवड झाली. त्यानंतर अभिजितच्या लेखणीला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. 
त्याने ‘अवघाची संसार’ मालिकेची नंतर पटकथा-लेखक आणि संवादलेखक अशी दुहेरी जबाबदारी समर्थपणे पेलली. त्याने आतापर्यंत १५-२० मालिका लिहिल्या आहेत. त्यानंतर त्याने तीन व्यावसायिक नाटकं लिहिली. तो सलग आठ वर्षे मालिका लेखन करतोय आणि तेही तेवढ्याच उत्साहाने. त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सुरू झाल्यापासून टॉप ५ मालिकांच्या यादीत आहे आणि गेले चार आठवडे ती नंबर एकची मालिका ठरली आहे. राधिकाच्या पात्राला त्याने दिलेला नागपुरी ठसका प्रेक्षकांना आवडतोय.  
अभिजितला मराठीत इंग्रजी मालिकांसारख्या वेगळ्या वाटेवरच्या मालिका लिहिण्याची जबरदस्त इच्छा आहे. सध्या तो मालिकालेखन एन्जॉय करतोच आहे. त्यासोबत चित्रपटलेखन आणि नाट्य-लेखनालाही वेळ देतोय. त्याचं ‘तीन पायांची शर्यत’ हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. इथेही त्याचं कौतुक होतंय. असा हा अभिनेता लेखक अधूनमधून अभिनेता होण्याची हौसही पुरवत असतो आणि लेखन क्षेत्रातली त्याची यशस्वी भरारी तर आपल्यासमोर आहेच. अशी ही एका यशस्वी, मनस्वी आणि प्रयोगशील अभिनेत्या लेखकाची गोष्ट. पण त्याला वाटतंय, हा तर त्याच्या यशाचा पहिला एपिसोड आहे. अजून त्याला खूप लिहायचं आहे...
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती १७ जानेवारी २०१७

गावचं घर

गावचं घर सोडून चाकरमानी मुंबईत येणारे चाकरमानी शहरात राहत असले तरी त्यांच्या मनात वसत असतं ते त्यांचं गावचं घर. ही एक अशी समृद्ध परंपरा आहे; जी कोकणातल्या माणसाने जीवापाड जपलीय. सेकंड होम, वीकेंड होम, फार्म हाऊसपेक्षा भावणारं हे आपलं हक्काचं गावचं घर...


पलीकडे ओढ्यावर, माझं गाव ते सुंदर
झाडाझुडपात आहे, लपलेलं माझं घर


बालभारतीच्या पुस्तकातली ही कविता शहरी फ्लॅटमध्ये खिडकीपाशी कॉफी पिताना अधूनमधून आठवत राहते आणि चेहऱ्यावर गोड स्माईल येतं. मग गावाकडचे दिवस आठवतात. लगेचच भावंडांना, मित्रांना मॅसेज, फोनाफोनी होते. या वर्षी मे महिन्यात गावी जायचा प्लॅन आखूया का? अशी विचारणा होते. मग भरभर सारी चक्रं फिरू लागतात. ऑफिसमध्ये काय सांगायचं किंवा एखाद्या वीकेन्डलाच जाऊया का, की एक-दोन दिवसाची सरप्राईज व्हिजीट द्यायची? आजी-आजोबा खूप खूश होतील. असं सगळं एकामागून एक आठवणींची पूर्तता करणं सुरू होतं. 
"गावी जाऊया' हे दोन शब्द कोकणातल्या माणसांना फारच जिव्हाळ्याचे आहेत. गावी जायच्या ओढीने कोकणी माणूस काहीही कारणं सांगेल आणि दोन दिवसांसाठी का होईना; गावी जाऊन येईल. फार्म हाऊस, सेकंड होम, वीकेन्ड होम अशा घराच्या सगळ्या संकल्पना सोडून कोकणातल्या माणसांनी एक वेगळीच संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे, ती म्हणजे शहरात राहूनही गावचं घर जपायचं.
पण गाव भी और शहर भी... असं दोन्ही सांभाळणं सोप्पं नाहीय बरं का! ही तारेवरची कसरत 
फक्त कोकणातल्या माणसांनाच जमते. काही जण अतिशय जीवापाड जपतात ही परंपरा. आता तुम्ही म्हणाल, ही कसली परंपरा?
हो, ही परंपराच आहे. आजवर या परंपरेविषयी कुठेच काही लिहिलं गेलं नाहीय. किंवा कुठले नियमही नाहीत. तरीही ही परंपरा वर्षानुवर्षं सुरू आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात कोकणातील माणसं शहरात गेली. तिथे राहिली; पण गावाला विसरली नाहीत. मे महिना, जत्रा, शिमगा, गणेशोत्सव असे वेगवेगळे सण-उत्सव, सुट्यांचे दिवस सारं काही नीट मॅनेज करून कोकणातली माणसं गावची वाट धरतात आणि त्यांची कोकण रेल्वे त्यांच्यासोबत आहेच. गावची तरुण पिढी शहरात राहत असली तरी हमखास वर्षातून दोनदा तरी गावी चक्कर मारून जातातच. असं हे कोकणी माणसाने मनात आणि प्रत्यक्षात जपलेलं गाव. आता त्याला एक वेगळंच स्वरूप येतंय. शहरात स्थिरस्थावर झाल्यावर गावी येऊन आपलं जुनं झालेलं घर डागडुजी करून किंवा पुन्हा बांधण्याचा ट्रेंड सध्या कोकणात सुरू आहे. जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांना किंवा नात्यातल्याच माणसांना 'ट्रॉल' करणारा आणि होणारा कोकणी माणूस गावच्या घराच्या विषयाने हळवा होतो. 
फॅशन आपले सगळीकडे पाय पसरत असताना यापासून गावचं घर अलिप्त कसं राहील? कोकणातील काही श्रीमंत माणसं गावच्या जमिनीत दोन-तीन मजली बंगला बांधताना दिसतात. ही एक फॅशनच झालीय अलीकडे. बंगला बांधायचा आणि आजूबाजूला नारळ-काजू-पोफळी-केळींची बाग करायची. मग त्याची देखरेख करण्यासाठी एक-दोन केअर-टेकर ठेवायचे; तर काही जणांचा कोकणातील वातावरणाला साजेसं कौलारू घर बांधण्याकडे कल आहे. घर, समोर अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनाशेजारीच फुलांची बाग, घराच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला परसबाग, तिथेच विहीर, पुढे भातशेती असं सगळं पद्धतशीर आणि सुखसोईंनी युक्त गावचं घर बनतं. काही घरांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळीच दिसतात. पण सणासुदीला आणि मे महिन्याच्या म्हणजे कोकणी मेव्याच्या दिवसात अख्खं गाव फुलून जातं.
एखाद्या घरात दोन भाऊ किंवा तीन भाऊ असतील, तर ते आलटून-पालटून शहरातील आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून गावचं घर राखतात. तर काही ठिकाणी एकुलता एक मुलगा असेल तर त्याची मात्र तारेवरची कसरत सुरू होते. काहींनी तर एकुलता एक असूनही लग्न झाल्यावर मुलगा शहरात आणि त्याची बायको गावी राहणार, असं ठरवून गावचं घर सांभाळलं आहे. अशी काही जोडपी तुम्हाला कोकणातल्या गावी सापडतीलच. काही मुलांची लग्न होतानाच वधूसाठी अट घातली जाते. ती अशी, की मुलीला गावचं सगळं सांभाळता आलं पाहिजे. तिला गावची सगळी माहिती हवी. मगच ती सोयरीक जुळते. गावच्या घराचं दार बंद राहणं, या गोष्टीची कोकणी माणसाला फार भीती वाटते. त्यामुळे घराचं दार बंद राहू नये याची खबरदारी कोकणी माणूस घेतो. म्हणूनच गावचं घर ही परंपरा कोकणातून वर्षानुवर्ष जोपासली जातेय. 
"पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेऊ सोने वाटे वाहुनिया दूर...' यातली गंमत अनुभवायची असेल तर गावचं घर याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही...
चला तर मग निघूया..


पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती एप्रिल २०१७

Monday, 5 June 2017

'अॅप'ली मालिका... कधीही, कोठेही!

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपापले अॅप आणले आहेत. मालिकांचे दिवाणे असलेल्या प्रेक्षकांना त्यामुळे त्यांच्या आवडीच्या मालिका कधीही, कुठेही पहाता येतात; पण त्यामुळे आता चर्चा सुरू झालीय. हा केबलला पर्याय ठरू शकतो, की हे अॅप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे? त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...



स्मार्टफोन येता घरी, केबलवाला जाईल माघारी... हे शक्‍य आहे? हो अगदी अवश्‍य. दर महिन्याला केबल पॅकेजचे 400 रुपये वसूल करत फिरणाऱ्या केबलवाल्याला आता तुम्ही हमखास बायबाय करू शकता. कारण तुमच्याकडे आहे स्मार्ट फोन. मग हवाय कशाला केबलवाला? तुमच्या स्मार्ट फोनमध्ये तुम्ही स्टार, झी आणि कलर्स समूहाच्या वाहिन्यांची ऍप डाऊनलोड केलीत की झालं... 

खरंतर वाहिन्यांची ऍप येऊन तशी 4 वर्षं होत आलीत; पण आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीपासूनच ऍप प्रत्यक्ष डाऊनलोड करून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. यामध्ये स्टार प्लस, झी टीव्ही आणि कलर्स वाहिनीवरील मालिका ऍपवर पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खच्चून भरलेल्या लोकलमध्ये, प्लॅटफॉर्मवरच्या वाय-फाय झोनमध्ये किंवा खास उपलब्ध करून दिलेल्या वाय-फाय झोनमध्ये जाऊन मालिका पाहणारे अनेक आहेत. हॉटस्टारसारख्या ऍपमध्ये वाय-फाय झोनमध्ये गेल्यावर मालिकांच्या एपिसोडचे व्हिडीयो डाऊनलोड करून मग ते ऑफलाईन बघता येतात. (युट्यूबवरही ही सोय आधीपासून आहेच) मग हे ऑफलाईन व्हिडीयो आपल्याला 24 तासासाठी सेव्ह करता येतात, हवे तेव्हा पाहता येतात. 

टीव्हीच्या तुलनेत ऍपवर जाहिरातीही कमी असतात. सुरुवातीला तर एखादीच असायची; पण गेल्या वर्षभरात ऑनलाईन प्रेक्षकसंख्या वाढल्यामुळे जाहिरातींचे प्रमाण तीन ते चार झाले आहे. स्टार प्लस आणि कलर्स वाहिनीवर मालिका संध्याकाळी प्राईम टाईम स्लॉटमध्ये प्रसारित झाल्यावर त्या मालिकांचे 2-3 मिनिटांचे टीझर यूट्यूबर टाकण्यात येतात. तिथेच मालिकेचा पूर्ण एपिसोड पाहण्याची लिंक देण्यात येते. झी टीव्ही आणि झी मराठीवरील मालिकांचे मात्र 8 ते 10 मिनिटांच्या एपिसोडचे मिनी रूप यूट्यूबवर टाकण्यात येते. त्याचबरोबर मालिकेतील एखादा बेस्ट सीन 4-5 मिनिटांचा यूट्यूबर टाकण्यात येतो. आणि मग सविस्तर भाग पाहण्यासाठी ऍपची लिंक देण्यात येते. हॉटस्टार, वूट आणि ओझी या तिन्ही ऍपवर हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांतील सिनेमे पाहण्याची सुविधा आहे. हे सिनेमे आधी वाहिनीवर प्रसारित करून मग ते काही दिवसानंतर किंवा महिन्यांनंतर ऍपवर दाखवण्यात येतात. त्याचबरोबर काही लोकप्रिय सिनेमा ठराविक रक्कम आकारून तेही या ऍपवर दाखवले जातात. त्यामुळे तीन किंवा दोन तासांचा सिनेमा तुम्ही अधेमध्ये ब्रेक घेत पाहू शकता. 

या सर्व ऍप्समध्ये प्रेक्षकांना आपल्याकडेच खेचण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे काही ऍप्स खास ऍप्सच्या प्रेक्षकांसाठी वेबसिरिज बनवून प्रेक्षकांना आपलेसे करताना दिसतायत. यासाठी विविध वाहिन्यांनी खास ऑनलाईन कॉन्टेन्ट निर्माण करण्यासाठी टीमही बनवली आहे. 
हॉटस्टार ऍपवर मालिका दुसऱ्या दिवशी पाहता येतात; तर ओ झी ऍपवर त्याच दिवशी रात्री तुम्हाला त्या दिवशी प्रसारित झालेल्या मालिका पाहायला मिळतात. हे वेगळेपण म्हणता येईल किंवा याच मुद्दावरून या दोन ऍपमध्ये स्पर्धा होऊ शकते. 
थोडक्‍यात टीआरपीचे वॉर आता छोट्या पडद्यावरून अति छोट्या पडद्यावर आलेय तर! 
ऍपची गर्दीच गर्दी 
स्टार ग्रुपचे हॉटस्टार ऍप, झी ग्रुपचे ओ झी ऍप, कलर्स ग्रुपचे वूट ऍप, सोनी एन्टरटेनमेंटचं सोनी लिव या वाहिन्यांच्या लोकप्रिय ऍपची स्पर्धा टीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या यूट्यूब चॅनेलच्या ऍपशी आहे. आता तर काही गाजलेली यू'ट्यूबर चॅनेल्स ऍपच्या स्वरूपात दाखल होऊ लागली आहेत; पण टीव्हीएफने त्यांना कडी टक्कर दिली आहे. त्याचबरोबर स्कूपवूप, शुद्ध देसी गाने, बीईंग इंडियनसारखी वेबसाईट बेस मंडळीही एखाद्या गाजलेल्या मुद्द्यावर छोटे छोटे विनोदी, तर कधी गंभीर आशय मांडणारे, तर कधी भारतीय मनाला साद घाललणारे व्हिडीयो बनवून ऑनलाईनविश्‍वात मनोरंजन धमाका करतात. आता तर मालिकाविश्‍वातील राणी एकता कपूर तिचं "अल्ट बालाजी' हे ऍप घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. यावर बालाजीने निर्मिती केलेले सिनेमे आणि खास वेबसिरिज इथे पाहता येतील. त्यामुळे ही स्पर्धा आता अधिक तीव्र होईल. 

फायदा कोणाचा? 
वाहिन्यांची ही ऍप्स हा केबलला पर्याय ठरू शकतो का? की ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे, हा मुद्दाच नाही. त्यांचा प्रेक्षक त्यांच्याकडे राहणारच आहे. टीव्हीवर की स्मार्ट फोनवर हाच मुद्दा आहे! वेगवेगळ्या माध्यमाला वेगवेगळी प्रेक्षक संख्या लाभलीय हा मुद्दा त्यातून अधोरेखित होतोय. यामध्ये फायदा आहे तो वाहिनी आणि प्रेक्षक अशा दोघांचाही! 
काय बरं, काय उत्तम? 
स्टार ग्रुपने पहिल्यांदा ऍपविश्‍वात पाऊल टाकून हॉटस्टार हे ऍप लॉन्च केलं. हे ऍप सगळ्या ऍपमध्ये वरचढ ठरलं आहे. या ऍपवर व्हिडीयो पाहताना बफर होत नाही; पण ओ झी ऍपवर व्हिडीयो सुरू झाल्यावर सुरुवातीला एक मिनीटभर व्हिडीयो नीट दिसत नाही. ब्लरसारखं दिसतं आणि मध्येच एखादी जाहिरात आल्यावर पुन्हा व्हिडीयो सुरू होताना ब्लर दिसतं आणि मग नीट दिसू लागतं. त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांना ओ झी ऍप तितकंसं पसंत नाही. याविषयी ते व्हिडीओखाली कमेंटही वारंवार करत असतात. वूट ऍप ठीकठाक आहे; पण आपल्या आवडत्या मालिकेचे व्हिडीयो पाहणं तसं त्रासदायकच आहे. या ऍपवर सर्च करणं जरा कंटाळवाणं वाटतं. हॉटस्टारचं दिसणं आणि त्यांनी दिलेल्या सुविधा पाहता त्यांचे ऍप या साऱ्यांच्या तुलनेत सध्या तरी उजवे वाटतेय.  


पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती 
८ एप्रिल २०१७

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...