Wednesday, 7 June 2017

साहित्य सरोवरातले राजहंस

ज्येष्ठ लेखक, कथाकार वामन होवाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कथेनं आणि त्यांच्या कथाकथन शैलीने अनेकांना साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबण्याची पर्वणी दिली. आपणच लिहिलेलं लेखन अनोख्या शैलीत सादर करण्याची हातोटी मोजक्‍याच साहित्यिकांपाशी असते. होवाळ त्यापैकी एक. त्यांच्याविषयीच्या आठवणी अनेक आहेत; पण ही एक खास आठवण कॉलेजमधील त्यांच्या कथाकथनाची...



आठवणींच्या पाकळ्या गळून पडत नाहीत, तर त्या आठवणींच्या कळ्या होऊन मनात फुलत राहतात. कारण आठवणींना अंत नसतोच. तशीच ही आठवण लेखक वामन होवाळांविषयीची. 
मराठीच्या पाठ्यपुस्तकातून अनेक लेखक भेटायचे. काही लेखकांशी लगेच गट्टी व्हायची. काही लेखक समजून घेण्यासाठी मराठी शिकवणाऱ्या बाईंची मदत घ्यावी लागायची. नुकतीच वाचनाची आवड लागली होती, तेव्हा पुस्तकांची कमतरता भासायची. मग इतर इयत्तेतल्या मुलांची मराठी भाषेची पुस्तकं घेऊन वेगळं काही वाचल्याचा आनंद त्या वेळी मिळायचा. मग हळूहळू ग्रंथालयात गेल्यावर लेखकांशी आणि त्यांच्या पुस्तकांशी रोजच भेटी होऊ लागल्या. अशाच वाचनातून लेखक वामन होवाळ यांच्या काही कथा वाचनात आल्या. 
कॉलेजमध्ये गेल्यावर मराठी वाङमय मंडळाच्या विविध उपक्रमात भाग घेऊ लागले आणि मंडळासाठी कार्यक्रम आखण्याच्या गटात सामील झाले. एके दिवशी आमच्या विल्सन कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख तारकरबाई म्हणाल्या, आपल्या वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात वामन होवाळ येणार आहेत. ते आपल्या काही निवडक कथा सादर करतील. याआधी आम्ही कधीही त्यांना कथा सादर करताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे शंका की कॉलेजमधली मुलं सरांचा कार्यक्रम होईपर्यंत एकाजागी नीट बसतील ना? की चुळबुळ करतील किंवा त्यांच्या लेक्‍चरची वेळ झाली म्हणून निघून जातील? त्यातून कार्यक्रम सादर करायला आम्हाला कॉलेज हॉलच मिळाला होता. एरव्ही आम्ही मराठीचे प्रोग्राम्स एखाद्या छोट्याशा बंदीस्त वर्गातच करत असू. कारण मुलं कमी यायची. ठरल्या वेळेप्रमाणे वामन होवाळ कॉलेज गेटपाशी आले. आमच्या कॉलेजच्या मुलांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना चहापानासाठी एका खोलीत नेलं. तेव्हा आमच्या मराठीच्या बाई होवाळांना म्हणाल्या, कार्यक्रमाला मुलं कमी असली तरी सांभाळून घ्या. दुसऱ्या लेक्‍चरसाठी मध्येच मुलं उठून जाऊ लागली, तर दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. होवाळांना बाईंची चिंता कळली. ते म्हणाले, ठीक आहे काहीच हरकत नाही, ती कॉलेजमधली मुलं आहेत. त्यांना त्यांच्या आवडीनं सवडीनं कथा ऐकू द्या. ती मुलं आहेत, कंटाळा करणार, मधेच उठणार, हे चालायचच. चला आपण हॉलमध्ये जाऊ.
वामन होवाळ हॉलमध्ये आले, तेव्हा अर्धाच हॉल भरला होता. कार्यक्रमाच्या निवेदिकेने त्यांची ओळख करून दिली. मग होवाळांनी गमती जमती करत कथाकथनाला सुरुवात केली. बघता बघता अर्धा असलेला हॉल तुडुंब भरला आणि मागच्या रांगेत काही मुलं उभी राहून कथा ऐकू लागली. या वेळी त्यांनी बेनवाड, येळकोट, वारसदार आणि वाटा आडवाटा या संग्रहातील एकेक कथा सादर केली.
आमच्यासारख्या शहरी मुलांना त्यांच्या कथेतला गावरान गोडवा अतिशय भावला. त्या कार्यक्रमापुरतं आमच्या कॉलेजचं नेहमी इंग्रजाळलेलं वातावरण बदललं होतं. कॉलेजमधले यंग ड्यूड, गाईज आणि फॅशनेबल मुली शेताच्या बांदावर एखादं कणिस हाती घेऊन हुंदडणारे पोरगा-पोरगी झाले होते. वामन होवाळांच्या कथनशैलीने सगळेच गावच्या विश्वात पोहोचले होते. मुलांना कथाकथनात दंग बघून आमच्या मराठीच्या बाईंनाही खूप आनंद झाला. मराठी वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमाला तेही कथाकथनाच्या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आपल्यातलं गावचं गावपण टिकवूनही मनानं मोठ्ठ व्हायचं, हे त्यांच्या कथनातून आम्हाला समजलं. गावंढळपणातही एक वेगळा स्मार्टनेस दडला आहे, हेही समजलं. कार्यक्रमाच्या शेवटी मराठीच्या बाईंनी खास बीएच्या विद्यार्थ्यांशी बोलायला होवाळांना सांगितलं, तेव्हा आम्हीही दरवाज्यातून डोकावत होतोच. तेव्हा त्यांची दोन वाक्‍यं कानावर पडली. ‘तुम्हाला मी अधिक काय सांगू? तुम्ही साहित्याचे विद्यार्थी. फक्त एक करा की, या साहित्य सरोवरावरून उडणारे बगळे होऊ नका. तर या साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबा... स्वतः आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.’
कॉलेजच्या आमच्या मंडळात मग खूप साहित्यिक कार्यक्रम होत राहिले. अजूनही होतात. बाई आम्हाला माजी विद्यार्थी म्हणून बोलावतात आणि त्यानिमित्ताने अशा वामन होवाळांसारख्या साहित्यातील राजहंसाना भेटल्याचं समाधान आम्हाला मिळतं. मग त्यांच्या आठवणींच्या कळ्या होऊन त्याचा सुगंध मनात भरून राहतो.
 पूर्वप्रसिध्दी सकाळ मुंबई आवृत्ती डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...