काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक मर्यादित भागांच्या मालिका प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे... चॅनेल बदला, विचार बदलेल!
बा र्कचा दर आठवड्याचा टीआरपी आला आणि पुन्हा एकदा सोशल मीडियातून चर्चा झडू लागल्या. अरे, काय हे... या असल्या मालिकांचा आम्हाला कंटाळा आलाय, या बंद कधी होणार याची वाट बघतोय.... पण टीआरपी बघा वाढतच चाललाय. हल्ली सोशल मीडियामुळे नोकरदार स्त्रियांना आणि तरुण-तरुणींना आपलं टीव्हीविषयी वेगळं मत प्रकट करण्याची संधी मिळते. आणि गेले वर्षभर समस्त महिलावर्गाला हाच प्रश्न पडलेला आहे की "पुढचं पाऊल', "साथ निभाना साथिया', "ये है मोहब्बते', "ससुराल सिमर का', "ये रिश्ता क्या कहलाता है...' अशा या विविध मनोरंजन वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिका बंद कधी होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. पण हे असं का होतं, याच्यावर उत्तर काय ते आपल्याकडेच आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे गेली 2 वर्षे मालिका पाहणारा सूज्ञ प्रेक्षक मालिका आणि चॅनेलविरोधात आपली मतं आवर्जून आणि तीव्रपणे मांडू लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनेलवर एक ऑनलाईन दबावगट निर्माण झाला आहे.
"इंडिया'फोरमसारख्या काही ऑनलाईन टीव्ही अपडेट देणाऱ्या वेबसाईट आणि काही वेगवेगळ्या मालिकांविषयीची पेजेस, ट्विटर हॅंडल यांच्या माध्यमातून चॅनेल आणि मालिकांविषयी ऑनलाईन मत प्रदर्शित करून मालिका कुठल्या बघाव्या, कुठल्या चांगल्या, याविषयी बरंच लिहिलं आणि बोललं जातं. इंडिया फोरम बार्कच्या टीआरपीव्यतिरिक्त आपला एक ऑनलाईन टीआरपी देतं. अशी अजूनही काही बेव पेजेस आहेत. त्यावर टॉपला दिसणाऱ्या मालिका बार्कच्या टीआरपीमध्ये पहिल्या दहामध्येही नसतात. अलिकडेच आलेल्या इश्कबाज, 24, अम्मा, सिया के राम, कुछ रंग प्यार के ऐसेही, इक दुजे के वास्ते, भागे रे मन अशा कितीतरी वेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. परंतु त्यांना हवा तसा टीआरपी नसल्यामुळे बरेच प्रेक्षक नाराज आहेत. त्यातल्या काही मालिका बंद झाल्याही. कमी टीआरपीमुळे चांगल्या मालिका बंद होऊ नयेत. असं सूज्ञ प्रेक्षकांना वाटत आहे. त्यापेक्षा साथ निभाना साथिया, पुढचं पाऊल सारख्या मालिका बंद व्हाव्यात. पण वर्षभरातील टीआरपीचे आकडे पाहिले तर "ये है मोहब्बते', "कुमकुमभाग्य', "साथ निभाना साथिया', "स्वरागिनी', "ये रिश्ता क्या कहलाता है' आणि आता अलीकडे आलेली "ब्रह्मराक्षस' याच मालिका आलटून-पालटून टॉप ५ येताना दिसतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये काही वाहिन्या आपल्याच ब्रॅंडखाली काही नवी चॅनेल्स आणून त्यावर त्यांच्याच वाहिनीवरच्या जुन्या मालिका त्यावर दाखवत आहेत. त्या जुन्या मालिका दाखवायला सुरुवात झाल्यापासून त्या मालिकांनी सध्याच्या मालिकांना चांगलीच टक्कर दिली आहे. "जोधा अकबर' या मालिकेचं उदाहरण या संदर्भात देता येईल. गावाकडे काही भागात डिजिटलायझेशन आणि केबल सुविधा पोहोचली नसल्यामुळे या वाहिन्यांनी सुरू केलेली नवी चॅनेल्स "फ्री टू एअर' असल्यामुळे जुन्या मालिकांसह गावाकडच्या भागात दिसतात. त्यामुळे जुन्या मालिकांना टीआरपी मिळत आहे. बार्कने आता रुरल आणि अर्बन असा दोन्ही विभागात टीआरपी द्यायला सुरुवात केल्यामुळे हे स्पष्ट झालं आहे. मुळात सर्वसामान्य प्रेक्षकांच्याही आता काही मालिका खरंच डोक्यात जायला लागल्यात. पण बंद होण्याचं काही चिन्ह दिसत नाही, म्हणून ते त्याविषयी कधी खिल्ली उडवत; तर कधी गंभीरपणे चर्चा करताना दिसतात.
एकदा एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांकडून प्रश्न विचारण्यात आला की कंटाळवाण्या मालिका बंद कशा होतील? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, त्या कधीच बंद होणार नाहीत. जोवर तुम्ही रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलत नाही. असाच प्रश्न लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना विचारण्यात आला होता, त्या वेळी त्याही असंच म्हणाल्या, चॅनेल बदला, मालिका बंद होतील.
अलीकडे काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मालिका मर्यादित भागांच्या असणार, असं जाहीर करूनच प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच घरांमध्ये कुठलंतरी एक चॅनेल लावून घरातली माणसं आपली इतर कामं करण्यात गढून गेलेली असतात. बऱ्याचदा त्यांचं मालिकांमध्ये लक्षही नसतं. परंतु ते चॅनेल संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत न बंद करता लावून ठेवल्यामुळे चॅनेलला मात्र रिच आणि टाईम स्पेंड मिळतो आणि त्यांचा प्रोग्रामिंगचा हेतू साध्य होतो. परवाच ट्रेनमध्ये एक मुलगी सांगत होती, आमच्या शेजारच्या काकूंना कमी ऐकू येतं; त्यामुळे त्या ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही लावतात, त्यामुळे त्या स्लॉटमध्ये लागणाऱ्या सर्व मालिकांमध्ये सध्या काय ट्रॅक चालू आहे, ते आम्हाला टीव्ही न बघता कळतं. कुठली मालिका किती सहन करायची, हे प्रेक्षकांवरच अवलंबून आहे; त्यामुळे आपण नागरिक म्हणून दैनंदिन जीवनातली कित्येक कर्तव्य बजावत असतो, त्यापैकीच नावडती मालिका न पाहता चॅनेल बदलणे हे कर्तव्य समजून रिमोट हाती घ्यायला हवा. नाहीतर रटाळ मालिका सहन करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय उरणार नाही. या वर्षभरातील जे काही बार्कच्या टीआरपीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत, ते पाहता त्याच्याशी ४० टक्के प्रेक्षक असहमत आहेत. हे प्रेक्षक सोशल मीडियातून आपली मते आवर्जून मांडत आहेत; त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये १० टक्के बदल घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या जोडीला घरी बसून टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांनी जर आपला विचार बदलून चॅनेल बदललं तर अजून खूप मोठा फरक पडेल आणि सध्याचं टीव्हीचं चित्रं नक्की बदलेल. हे शक्य आहे आणि ते प्रेक्षकांच्याच हातात आहे. इतर मनोरंजन वाहिन्यांच्या रेट्यात एपिक चॅनल आपली एक खास ओळख बनवू पाहत आहे. पण त्यांच्या मालिकांना टीआरपीच्या तुलनेत टिकणे कठीण झाले आहे. एकांत, दरीबा डायरीज, राजा, रसोई और अन्य कहानियाँ, देवलोक अशा काही मालिकांना खास चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण त्यांची मागणी आहे की या मालिका त्यांना यू ट्यूबवर पहायला मिळाव्यात. कारण टीव्हीचा रिमोट डेली सोप पाहणाऱ्या घरातील गृहिणींच्या हातात असतो.
युथ चॅनल्स आपल्या टार्गेट ऑडियन्सला खिळवून ठेवण्यात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे अलिकडेच चॅनल व्ही नावाच्या वाहिनीला आपला जॉनर बदलून म्युझिकल व्हावं लागलं. कारण मुळात तरूणाई टीव्ही पाहण्यासाठी काय करावं याचच उत्तर त्यांना मिळालेलं नाही.
प्रेक्षकांना एखाद्या मालिकेचं किंवा संपूर्ण वाहिनीवरील कार्यक्रमांचं हॅबिट फॉर्मेशन होणं ही चॅनेलच्या प्रोग्रामिंग टीमच्या यशाची खूण आहे; परंतु प्रेक्षकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला एखादी मालिका बघायची सवय लागली की ती सहसा सुटत नाही आणि तिथेच सारं घोडं अडतं. सध्या प्रत्येक वाहिनीवर काही नव्या मालिकांचे प्रोमो झळकतायत. त्यांच्याकडे आता काही प्रेक्षक लक्ष देऊन आहेत आणि सोशल मीडियावरचा प्रत्येक प्रेक्षक "इश्कबाज' या मालिकेच्या प्रचंड प्रेमात पडलाय. त्या सर्वांना इच्छा आहे की ही मालिका नंबर वन मालिका व्हावी. त्यासाठी ते रोज काही ना काही कृती करताना दिसतायत. आपलं "शिविका' प्रेम दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. अरे हो, शिविका कोण ते सांगायचं राहिलंच की! शिवाय सिंग ओबेरॉय आणि अनिका ही जोडी सध्या प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय झाली आहे. यांचंच ते कपल नेम आहे शिविका. पण ही मालिकाही १.९ आणि १.५ अशा टीआरपीमुळे बंद होईल की काय, अशी भीती ऑनलाईन प्रेक्षकांना वाटू लागलीय. "इश्कबाज' नामकरण, कुछ रंग प्यार के ऐसेही आणि अशा काही चांगल्या मालिकांची संख्या फार कमी आहे, त्या मालिकांना प्रेक्षकांच्या विचारबदलाची आणि चॅनेलबदलाची अपेक्षा आहे. नाही तर "भागे रे मन' या अतिशय लाडक्या मालिकेला जसं प्रेक्षकांना मुकावं लागलं, तसंच इतर मालिकांचं होईल, म्हणूनच विचार बदला, चॅनेल बदलेल आणि चॅनेलला बदलावंच लागेल...
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती १८ नोव्हेंबर २०१६
No comments:
Post a Comment