Sunday, 13 December 2015

हळवा कॅनव्हास

निसर्गातील पाना-फुलांचे रंग पाहताना हरवून जाणं...
रात्रीच्या वेळी फांदीआडून दिसणारा चंद्र पाहताना निःस्तब्ध, मूक होणं...
ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील एखादा चित्रपट आठवून तो पाहणं आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीनं अवाक होणं...
गुलजारच्या कवितांमधली वेदना आणि गाण्यांमधल्या हळवेपणानं त्या शब्दांच्या प्रेमात पडणं...

सागराची गाज ऐकता ऐकता त्याच्या निळ्या कॅनव्हासवर हरवून जाणं...
गुरुदत्त ते अलिकडच्या इम्तियाज अलीचे सिनेमे पाहिल्यावर आपलं मत आवर्जून मांडावसं वाटणं
एखाद्या कोरीव शिल्पावरील भाव आणि व्हिन्सीच्या मोनालिसाच्या हास्याने मोहित होणं...
व्हॅनगॉगची नक्षत्र उधळणारी निळीरात्र आणि पिवळा रंग उधणारी सूर्यफुलांची शेतं सारखीच गूढ वाटणं...
कवी ग्रेस आणि आरती प्रभूंच्या कवितेतील पावसाने मनाला न्हाऊ घालणं, अस्वस्थ करणं...

घर शोपीस ने भरून न जाता प्रेम आणि विश्वासाच्या नात्यांनी भरून जाणं...
हुसेनच्या चित्रांतला घोडा, राजा रविवर्माच्या चित्रांमधल्या नऊवारी साडीतल्या अप्रतिम लावण्यामागची प्रेरणा जाणून घेणं...
प्रियकराने दिलेल्या गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि प्रेयसीने दिलेलं मोरपीस वहीत असणं...




कधीतरी एकटे असताना एखादी कविता किंवा गाणं गुणगुणं...
हाती लागलेला एखादा कागद घेऊन त्यावर आपणच आपल्यासाठी चार शब्द लिहिणं...
दिवसभरात एकदातरी बागेतली फुलं आणि बागडणारी मुलं पाहून आपणही मनमोकळं हसणं...
पुन्हा लहान मूल होऊन आईच्या कुशीत शिरणं...

भावनांचा हा निरागस हळवा कॅनव्हास कुठेतरी हरवलाय...
म्हणून त्यावरील चित्रं आता खोटी वाटू लागलीत...

Wednesday, 9 December 2015

QUARREL SCENE

(अपूर्वाने फेसबुक ओपन केलं आहे, ती स्वतःची वॉल बघते आहे, त्यातले स्वतःचे फोटो बघून खूश होते आहे. तितक्यात तिचा फोन वाजतो, म्हणून ती फोन उचलून बाहेर बोलत जाते. तितक्यात विपुल तिथे येतो आणि तिची फेसबुक वॉल बघू लागतो... आणि त्याचा चेहरा गंभीर होतो.)


अपूर्वा – (विपुल तिच्या मागे येऊन उभा राहतो. तिचं लक्ष नाहीय. मग लक्षात येतं) विपुल हे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या नकळत त्याचं फेसबुक अकाऊंट बघणं.
विपुल – कम ऑन अप्पू, मी नवरा आहे तुझा... कुणी परका नाही...
अपूर्वा – पण मी आजवर तुझ्या कुठल्या सोशल गोष्टीत ढवळाढवळ केलीय का?
विपुल – पण इतकी का चिडतेस...आणि मला एक सांग...तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं ना, हे फोटो काढून टाक म्हणून...पण अजूनही तू ते फोटो तसेच ठेवलेस...

अपूर्वा – ते माझे फोटो आहेत...आणि ते माझं अकाऊंट आहे, मी ठरवणार कुठला फोटो ठेवायचा आणि कुठला नाही ते...तू मला धमकी देऊ नकोस...कळलं ना...





विपुल – पण एवढी काय मिरवायची हौस आहे तुला...फोटोच्या खाली कमेंट्स बघ...
अपूर्वा – हे बघ...तुला शेवटचं सांगतेय...तू यात अजिबात पडू नकोस...मला एक गोष्ट कळत नाही, तुला का इतका राग येतोय. मला कोणी छान कॉम्प्लीमेंट्स दिल्या तर तुला वाईट का वाटतंय.... आणि एक मिनिट, त्या दिवशी तू माझा फोनही चेक करत होतास...मी पाहिलं तुला...पण तेव्हा काही बोलले नाही... तुझा माझ्यावर विश्वास नाही. तुला इतकं कमकुवत वाटतं आपलं नातं...
विपुल – मी फक्त बघत होतो, फोन ब्लिंक होत होता म्हणून..
अपूर्वा – आणि फोनवर आलेला मॅसेजही तू वाचलास, पाहिलं मी ते... पण मी म्हणते का...गरजच काय त्याची...

विपुल – का म्हणजे...तू माझी बायको आहेस...तुला कोणी (त्याचं वाक्य पुरं करू देत नाही)
अपूर्वा - मग तुझा विश्वास का नाही माझ्यावर, त्या दिवशी माझ्यासाठी एक ऑफिशियल लेटर आलं तेही तू उघडून पाहिलंस...बस, आता मी हे सहन करू शकत नाही...तू तुझ्या बालमैत्रिणीला कॉफी शॉपमध्ये भेटतोस. आणि मला सांगतोस… ऑफिसची मिटिंग होती म्हणून...तुला काय वाटतं...मला हे कळणार नाही...
विपुल – अगं तू समजतेस तसं काही नाही...तिला काही गोष्टी माझ्याशी मित्र म्हणून शेअर करायच्या होत्या, म्हणून आम्ही दोनदा भेटलो... बस एवढंच...तू त्याचा इतका इश्यू का करतेस...
अपूर्वा – नाही, मला कसलाही इश्यू करायचा नाही. पण तुझ्या खोट्या वागण्याचा मला कंटाळा आलाय...
(ती आपलं सामान पॅक करू लागते.)

विपुल- अगं अप्पू ऐक माझं...तुझं तिच्याशी पटत नाही, म्हणून नाही सांगितलं की मी तिला भेटायला गेलो होतो...
अपूर्वा - पण का...लपवलंस माझ्यापासून...
विपुल – कारण मला भीती वाटली...
अपूर्वा – कसली भीती...
विपुल – तू मला सोडून जाशील म्हणून...
अपूर्वा – मला आता तुझ्यासोबत रहायचंच नाही...(अपूर्वा बॅग भरते. लॅपटॉप बंद करते. आणि निघू लागते.)
विपुल - ए ऐक ना माझं...चुकलो मी ...आय अम सॉरी...
अपूर्वा – (त्याचं काहीही ऐकत नाही. निघून जाते.)






पहिली भेट

ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली असते. विपुल ट्रेनमध्ये त्याच्या जागेवर जाऊन बसतो. समोरच्या सीटवर अजून कुणी न आलेलं पाहून त्या सीटवर पाय सोडून मस्त स्टाईलमध्ये बसतो. आणि नंतर स्मार्टली कॅमेरा घेऊन खिडकीतून लोकांची चाललेली धावपळ कॅप्चर करू पाहतो. आज तो खूपच रिलॅक्स मूडमध्ये आहे. त्यातच तो रमून गेला आहे. तेवढ्यात अपूर्वा येते.

अपूर्वा - अहो...शुक शुक, पाय बाजूला करा....ही माझी सीट आहे. (खिडकीतून बाहेर बघत असलेला विपुल मागे वळतो. अपूर्वाला बघतो आणि पाहतच राहतो. जणू काही तिच्यासारखी सुंदर मुलगी कधी पाहिलीच नाही. तो पाहतच राहतो. तिच्यावर असलेली त्याची नजर हटत नाहीय. त्याचं लक्ष नाहीय. हे पाहून अपूर्वा आवाज चढवून म्हणते..... ) अहो ऐकू येतंय ना तुम्हाला....पाय खाली घ्या...
विपुल भानावर येत पाय खाली घेतो.
अपूर्वा पुटपुटते, मान हलवते (काय मुलगा आहे हा, हिरोगीरी करायला आलाय वाटतं या अर्थी)
विपुल – तुम्ही मला काही बोललात का?
अपूर्वा – नाही नाही, या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याशी बोलतेय...
विपुल – नुसताच हसतो...

काही क्षण कुणीच बोलत नाही...
आता दोघेही अधून मधून एकमेकांकडे पाहतायत....विपुल किंचित हसतोय. अपूर्वा त्याच्याकडे पाहून नाकाचा शेंडा उडवते. पण तितक्यात अपूर्वाचं त्याच्या कॅमेराकडे लक्ष जातं. ती म्हणते...
अपूर्वा - तुम्ही फोटोग्राफर आहात?
विपुल – (चेहऱ्यावर किंचित हसू आणत म्हणतो...) नाही, फोटोग्राफी करायला आवडतं इतकंच....
आपण कोण आहात...
अपूर्वा – (पटकन म्हणते....) मी एक राजकुमारी आहे.....राजकुमारी. मालेगावात आमचा राजवाडा आहे...
विपुल इम्तीयाज अलीच्या तमाशा मुव्हीचा इफेक्ट वाटतं,  आर यू जोकींग... आय नो यु आर ए ब्युटिफूल प्रिसेन्स... पण
(पुढे काही बोलणार तोच अपूर्वा त्याच्याकडे लक्ष न दिल्यासारखं करत आपल्या पर्समधून स्मार्ट फोन काढते. शो ऑफ करण्यासाठी. विपुलही बोलणं थांबवतो. हात उंचावून मोकळे करून घेतो. आणि खिशातून आयफोन 6 काढतो. अपूर्वा त्याच्याकडे बघतच राहते. तो आपल्या मित्राला फोन लावतो. बेल वाजते. मित्र फोन उचलतो.)

विपुल – हॅलो, हॅलो (ट्रेनचा आवाज) हाय आशू झोपलायस का?....बरंय तुमचं... व्हॉट्स अपवर मॅसेज वाचले सगळ्यांचे, तुम्ही सगळे येणार म्हणून मी तुमच्याबरोबर ट्रेनने यायला तयार झालो. आणि तुम्हीच ऐनवेळी नाही म्हणून सांगितलं. मी जाम चिडलोय तुमच्यावर....आपण नवीन प्रोजेक्टच्या वेळी भेटू ना... तेव्हा बघतो एकेकाला...पण इट्स ओके तसंही ट्रेनने आलो ते बरंच झालं म्हणायचं (अपूर्वाकडे स्माईल करत बघतो, अपूर्वाही फोनवर बोलणाऱ्या विपुलकडे पाहतेय. नजरानजर होते... त्याने फोन ठेवल्यावर मात्र आपण काही तुझ्याकडे पाहत नव्हतो अशा अविर्भावात खिडकीबाहेर पाहू लागते. खिडकीतून छान हिरवागार निसर्ग दिसत असतो.)
अपूर्वा – wow beautiful…
(विपुलची बाहेर काय दिसतंय ते पाहण्याची उत्सुकता वाढते. तोही खिडकीतून पाहू लागतो. दोघांची डोकी परस्परांना लागतात. ते पहिल्यांदाच एकमेकांच्या इतक्या जवळ येतात. अपूर्वा पटकन सावरते. मागे सरकून बसते. मग विपुलही मागे सरकून बसतो.)

विपुल – (अपूर्वाकडे पाहून म्हणतो....) त्याचं काय आहे ना की...कॅमेरा हातात असला की असं वाटतं कुठलंही Visual  नजरेतून सुटू नये... (असं म्हणत विपुल खिडकीतील हिरवागार निसर्ग बॅग्राऊंडला ठेवत अपूर्वाचा फोटो काढतो... Scene Cut


FUNNY SCENE

(अपूर्वा बागेत बसली आहे. तिथे विपुल येतो. तिच्या बाजूला येऊन बसतो. अपूर्वा खूश होते. पण त्याचं हे अचानक येणं असतं. त्यामुळे अप्पूला आश्चर्य वाटतं.)


अपूर्वा – हाय विपुल.
विपुल – हाय अप्पू...तू इथे कशी काय...
अपूर्वा – मी इथे रोज येते, फेऱ्या मारायला. मला हे गार्डनही खूप आवडतं.
विपुल- ओ, फाईन...
अप्पू - पण तू इथे कसा काय...
विपुल - मी माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला आलोय. (त्याच्या हातात मोठा येलो फ्लावर्सचा बुके असतो.)
अप्पू- (निराश होते.) ओह... (उठून जायला निघते...)
विपुल – (तिला हाताला धरून बसवतो.) पण तू बस ना...काहीच हरकत नाही. तिला राग नाही येणार...
(ती नाईलाजाने बसते. तिच्या मनात हलचल चालू आहे. विपुल तिची फिरकी घेतोय हे कळत नाही.)
अप्पू मला काही टिप्स दे ना...

अपूर्वा – कसल्या टिप्स...
विपुल – हेच की तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं...
अपूर्वा – आता ते मी कसं सांगू...तुमचं दोघांचं प्रेमाचं नातं आहे.
विपुल – पण तू दे मला टिप्स, ऐकेन मी तुझं...
अपूर्वा – नाही, नाही मला नाही देता येत कसल्या टिप्स-बिप्स... मी जाते...तु तूझ्या गर्लफ्रेन्डला भेट, तिला बुके दे... माझी लुडबुड मध्ये कशासाठी...
विपुल – अगं ए थांब... (विपुलच्या चेहऱ्यावर खोडकर स्माईल)
अपूर्वा- नाही, मला आता आठवलं मला घरी खूप काम आहे. मी जाते..
विपुल – तू गेलीस तर माझी गर्लफ्रेंड मला कशी भेटणार... (अजूनही अप्पूला कळत नाहीय. विपुल तिची गंमत करतोय ते)

अपूर्वा – म्हणजे... माझ्या जाण्याचं आणि तुझ्या गर्लफ्रेंडच्या येण्याचं काय कनेक्शन...
विपुल – कनेक्शन आहे...मॅडम...(असं बोलून तो तिचा हात धरतो. आणि तिच्या हातात तो बुके देतो.)
अपूर्वा – विपुल यू कार्टून... (आत्ता तिला कळतं, अप्पू खूश होते, आणि ती त्या फुलांच्या बुकेनेच त्याला मारू लागते. तोही हसतो आणि तिचा मार चुकवू लागतो.)
विपुल – हूँ...हूँ..कसं फसवलं, एका क्यूट मुलीला...

अपूर्वा – (विपुलकडे पाहते, आणि लाजते. पुढे बोलते) पण अश्शी सोडणार नाही तुला...(त्याच्या कानाला त्या बुकेतलं एक फुल लावते.) चल उठबश्या काढ, थट्टा केलीस ना माझी...
विपुल- बरं बाबा...काढतो..(तो उठबश्या काढू लागतो. मग तिच त्याला थांबवते)...बस पुरे आता निघूया...(विपुल तिच्या पुढे दोन हात करतो, म्हणतो उठायला मदत कर, ती त्याला हात द्यायला जाते, तेव्हा तो तिला ओढतो. आणि दोघेही बागेतल्या हिरवळीवर पडतात. मग बराच वेळ हिरवळीवर झोपून आकाशाकडे पाहत राहतात....


Scene Cut

SAD SCENE

(विपुल आणि अपूर्वा खोलीत आहेत, अपूर्वा विपुलची बॅग भरते आहे.)

अपूर्वा – तुला दिल्लीला जावंच लागणार आहे का, नाही गेलास तर नाही का चालणार... कितीतरी दिवसांनी आज वेळ मिळाला होता...आज कुठेच जायचं नाही, फक्त तुझ्याच अवती भोवती राहून तुझ्याशी बोलत रहायचं ठरवलं होतं मी...आणि आता एक फोन आला काय...आणि तू निघालास काय... मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. सांग तुझ्या साहेबांना मला माझ्या अप्पूसोबत रहायचं आहे...मी नाही येणार दिल्लीला...तिला सोडून कुठेच जाणार नाही. (ती त्याच्या हाताला घट्ट पकडून रडवेल्या स्वरात बोलते)
विपुल - अगं ए, वेडी आहेस का तू? 
फक्त चार दिवसांचा तर प्रश्न आहे, मी हा गेलो आणि हा आलो !
अपूर्वा – नको ना जाऊस, मला सोडून...(थोडं थांबून) ए मी येऊ का तुझ्यासोबत तिकडे?
विपुल – अगं पण तू तिकडे येऊन काय करणार, बोअर होशील.
अपूर्वा  - मी दारात उभी राहून तुला जाताना मनापासून बायसुध्दा करू शकणार नाही... (रडते आहे आणि ती त्याला मिठी मारते.)

विपुल - (तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलतो.) मी दिल्लीहून आलो ना की आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊया...दोघंच...प्रॉमिस...तू पण ना...तिचे डोळे पुसतो. पहिल्यांदाच तुझं इतकं हळवं रूप पाहतोय मी. पण माझी अप्पू अशी नाही... ती खूप स्ट्राँग गर्ल आहे...राईट...हे घे. काळजी करू नकोस. मी माझं काम संपलं की एक क्षणही तिथे थांबणार नाही. (तो तिला एक छोटंसं क्यूट टेडिबियर देतो.) तुला माझी खूप आठवण आली ना की याच्याशी बोल, तुला खूप छान वाटेल...आणि कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना... तुझं सगळं टेन्शन मला दे...आणि तू हस पाहू...तुझी क्यूट स्माईल बघितल्याशिवाय माझाही पाय निघणार नाही घरातून...(अप्पू चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करते, पुन्हा रडवेल्या डोळ्यांनी त्या टेडिबियर कडे पाहते. तो हातात घेऊन पुढे चालू लागते.) (तिला पाठमोरी जड पावलांनी पुढे जाताना पाहून म्हणतो.) अजिबात नाही ऐकणार ही मुलगी...जिद्दी आहे...
पहिल्यांदा हिला भेटलो, तेव्हा वाटलं नव्हतं...या मुलीच्या मी कधी प्रेमात तरी पडेन का, सारखे भांडायचो...आणि आता हिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच मी करू शकत नाही. आय मिस यू टू अप्पू...

(आणि स्वतःच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसतो.  त्याच्यासाठीही तिला सोडून जाणं, जिवावर आलं आहे. असे विपुलच्या चेहऱ्यावर भाव… बॅग उचलून जायला निघतो...Scene cut)


ROMANTIC SCENE


(समोर सनसेट होतो आहे, मस्त माहोल आहे, विपुल आणि अपूर्वा सुर्यास्त पाहत बसले आहेत. समोर पाहत आहेत आणि पुन्हा एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांकडे पाहताना गढून गेले आहेत, आसपासचा विसर पडला आहे, हळुहळु दोघांचे हातात हात गुंफले जातात, विपुल तिचा हात आपल्या ह्रदयावर ठेवतो. तिच्या हाताला किस करतो, अपूर्वा लाजतेय... ती त्याचा हात पटकन सोडवून घेते.)

अपूर्वा - किती मस्त वाटतंय, असं वाटतंय इथेच बसून रहावं तासनतास..
विपुल - हो का (लाडाने)
अपूर्वा - हो... मला तुला काही सांगायचंय...
विपुल – पण मला माहितेय, तुला काय सांगायचंय (तो तिच्या डोळ्यात पाहतो आणि तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतो.)
अपूर्वा – तू माझ्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा मुलगा आहेस... तुझ्याशिवाय इतर कुणावरही मी इतकं प्रेम केलं नाही, आणि तुझ्यानंतर मी कुणावरही इतकं प्रेम करू शकणार नाही. (तिच्या डोळ्यातून अश्रू येतात.)

विपुल - (तिच्याकडे पाहत आहे, तिचं बोलून झाल्यावर दोन सेकंद थांबून बोलतो.) मला माहितेय. (आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. ती त्याच्या छातीवर डोकं टेकते. तो एकदा तिच्याकडे पाहत मग पुढे सुर्यास्ताकडे पाहतो. आणि पुढचं वाक्य बोलतो.) आजपासून पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करूया. इथून पुढे, आपण कधीही एकमेकांशी भांडायचं नाही, एकमेकांवर रागवायचं नाही. जे राग, लोभ, रुसवे फुगवे असतील ते दोघांनी मिळून सोडवायचे. आता आपल्या दोघांमध्ये कुणा तिसऱ्याला जागा नाही.
अपूर्वा – तुला माहितेय...माझी आई नेहमी म्हणायची, काळजी करू नकोस, अखेर तुझं विपुलशीच जमणार आहे. तेव्हा मी आईला आपले भांडणाचे किस्से सांगायचे. आणि तुझ्यावरचा राग घरातल्यांवर निघायचा. तेव्हा आई जवळ घेत म्हणायची, अप्पू तुझ्या बोलण्यात हजारदा विपुलचं नाव येतं. आणि विपुल किती चांगला मुलगा आहे. तुम्ही दोघांनी मिळून प्रॉब्लेम्स सोडवत का नाही. असं एकट्यानं झुरत बसण्याला काय अर्थ आहे?

विपुल - हो, इतके दिवस तू माझ्याशी बोलली नाहीस...तर मलाही चैन पडत नव्हतं. सारखा तुझ्या फोनची वाट पाहत होतो. वाटायचं...आत्ता तू फोन करशील आणि विचारशील...कधी भेटतोस मला...तुझ्याशी खूप बोलायचंय...
अपूर्वा – होतं असं कधी कधी की आपण काही वेळा आपल्या खूप जवळच्या माणसाला समजूनच घेऊ शकत नाही. तेव्हा डोक्यात राग असतो. त्यापुढे आपुलकीचे चार शब्दही खोटे वाटू लागतात. त्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं हेच चांगलं...

विपुल - त्या दिवशीचे आपण हे आपण नव्हतोच दुसरेच कुणीतरी होतो. पण मला आज तुझ्याकडून एक वचन हवंय अप्पू, लग्नानंतर आपण एकमेकांचे बोअरींग लाईफ पार्टनर व्हायचं नाही...आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स व्हायचं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा. तू देशील मला साथ...
अपूर्वा- (मानेनेच "हो" म्हणते.)


 (आता आपल्याला ते दोघे एकमेकांना बिलगून बसलेले पाठमोरे दिसतात आणि SCENE CUT)

एका ‘मनस्विनी’ चा Selfie माझ्या नजरेतून

अत्यंत सोशिक, कष्टाळू, मृदू, मनमिळाऊ, चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सर्वांना सांभाळून घेणारी, एखाद्या वेळी मनाला न पटलेली गोष्ट होत असल्यास दुर्गेचं रुप धारण करणारी, शिस्तप्रिय, प्रेमळ, देवावर श्रध्दा असलेली, परंपरा आणि संस्कृतीला जपणारी...आपल्या कुटुंबासाठी झटणारी अशी ही मनस्विनी...

एका अवखळ मुलीचं रुपातंर परिपूर्ण वात्सल्याने ओतप्रोत अशा माऊलीत झालं. त्यानंतर तिचा आता सद्सद्विवेकबुध्दीशी सुरू असलेला झगडा...सारंच विलक्षण आणि थक्क करणारं आहे. मनस्विनीच्या या व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ती जाणून घेण्यासाठी तिच्या बालपणापासूनच सुरुवात करायला हवी... नाही का?
व्यक्तिचं घडणं, वाढणं आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर समृध्द होत जाणं... याची बिजं बालपणात दडलेली असतात.

गिता मनोहर धुरी मनस्विनीचं माहेरचं पूर्ण नाव. कृष्णाने अजूर्नाला गिता सांगितली आणि कर्माचं महत्त्व पटवून दिलं. अगदी तसंच गिताच्या लहानपणापासून तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत काम करत राहण्याची शिकवण तिला तिच्या आईकडून मिळाली. तिची आईसुध्दा कर्म करत रहा या विचारांची. एका जागी बसणं, त्या माऊलीच्या गावीही नव्हतं.
आपल्या आईकडून गिताला संस्काराचं बाळकडू मिळालं. बाकी कुणीही आदर्श नव्हते तिच्यासमोर...
आई-बाबा आणि ती मिळून चार भावंडं, असं तिचं मातीच्या घरात राहणारं गरीब कुटुंब. कोकणातील निसर्गसमृध्दीने नटलेल्या गावात कौलं आणि गवताच्या पेंढ्यांनी शाकारलेल्या टुमदार मातीच्या घरात राहणारी ही मुलगी... घराच्या चार भिंती, समोरचं मोठं अंगण आणि घराला लागूनच नजरेत मावणारी शेती या ठिकाणी हुंदडत, आला दिवस हसून साजरा करत गिताचं बालपण सरलं. फार लहान वयातच ती आपल्या कुटुंबासाठी कर्ती स्त्री झाली. घरच्या गरिबीमुळे नातेवाईक फारसे फिरकायचे नाहीत.
सकाळी लवकर उठायचं, घरचं आवरायचं, शाळेत जायचं... शाळेतून घरी आल्यावर शेतातल्या कामांना जायचं, रात्रीचा एक तास तिला अभ्यासाला मिळायचा... आणि दिवसभर कष्ट केलेल्या गिताला शांत झोप यायची.

एके दिवशी गावात धरण बांधलं जाणार असल्याची बातमी पसरली. तेव्हा गिता ७ वर्षांची होती. गावात धरण बांधण्याची सरकारी योजना मंजूर झाली आणि लागलीच या प्रकल्पाचं काम सुरू झालं. गावातल्या खूप लोकांना रोजगार मिळाला. गिताही आपली शाळा सांभाळून धरण बांधण्याच्या कामाला जाऊ लागली. तिला अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. पण तिची बुध्दी अतिशय तल्लख होती. वर्गात शिकवलेलं तिच्या नीट लक्षात रहात असे. म्हणून काम सांभाळून शाळेला जाण्याची तिची धडपड सत्कारणी लागत होती.
बाई मी धरण,
धरण बांधिते गं...
माझं मरण,
मरण कांडते गं...

बहिणाबाईंना स्वतःच्या अनुभवाचा काव्यातून झालेला हा साक्षात्कार गिता प्रत्यक्षात जगत होती. तिच्या आजूबाजूच्या वास्तवाने तिचं बालपण होरपळत होतं. पण तिने मानाच्या एका कोपऱ्यात आपल्याला बालपणाला प्राजक्त फुलासारखं जपलं होतं.
म्हणून तर कामाचा कितीही डोंगर उपसला तरी गिताचा चेहरा हसतमुख असायचा...
मिल बंद पडल्यानंतर पुन्हा आपल्या गावी आलेला दारूडा बाप, नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर असलेल्या तिच्या मोठया भावालाही त्याची नोकरी गमवावी लागली. आणि त्यानेही बाटली जवळ केली.
घराची पूर्ण जबाबदारी गिताच्या आईने आपल्या डोक्यावर घेतली आणि गिताला त्यासाठी तिच्या आईचा भक्कम आधार व्हावं लागलं. कारण तिची आई नवऱ्याच्या आणि मुलाच्या प्रतापामुळे पिचलेलीच होती. फक्त तिच्याकडे असलेल्या जिद्दीच्या बळावर तिने संसार सावरायचा विडा उचलला होता. गिता आपल्या माऊलीचं दुःखं जाणून होती. म्हणून आईच्या नेहमी सोबती असायची. आईचं सारं काही ऐकायची.

शाळेचं नववीचं वर्ष होतं. तिला खूप मन लावून शिकायची इच्छा होती. पण कामाचा रगाडा, मानसिक कोंडमारा यामुळे आपल्या पुढील शिक्षणाचं कसं होणार असं भलंमोठं प्रश्नचिन्ह गितासमोर होतं. तरीही तिने जिद्दीने नववीची परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तिच्या जिवाची घालमेल होत होती. परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले, तर हेच शाळेचं शेवटचं वर्ष ठरेल... पण निकाल हाती येताच गिता आनंदून गेली. तिला खूप चांगले गुण मिळाले होते. आणि ती वर्गात ५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तिला इतका आनंद झाला होता की साऱ्या गावाला ओरडून सांगावं... ती खुशीत धावतच घरी गेली. आपला आनंद घरातल्यांसोबत व्दिगुणित करण्यासाठी... पण इकडे घरात तिच्यासाठी एक मोठा अनपेक्षित धक्का तिची वाट पाहत होता. एका चुलत काकीने तिच्यासाठी दूरच्या गावचं स्थळ आणलं होतं. गिताचा सारा उत्साह क्षणार्धात मावळला.

बापाला मुलीच्या भविष्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. पण आई काय म्हणते, याकडे गिताचे डोळे लागले होते... तिला आईकडून आशा होती, पण ती माऊली तरी काय करणार होती. तिच्या आईनेही गिताच्या लग्नाला होकार कळवून टाकला.
तिच्या आईने तिचं लग्न ठरवताना हा विचार केला की जर तिचं लग्न झालं तर ती तिच्या घरी सुखात राहील. इथे घरी राहून तरी काय करणार... तिच्या पुढील शिक्षणासाठी सुध्दा तिची आई काही करू शकत नव्हती. गिताला सगळ्या कामांचा उरक होता. घरातली सगळी कामं करताना गिताचा हात भार लागत होता... हे तिच्या आईला ठाऊक होतं.

गिताचं लग्न झालं...
हसण्या खिदळण्याच्या, हौसे-मौजेच्या आनंदाने बहरण्याच्या वयात पुन्हा ती चार भिंतीच्या आत कोंडली गेली. फक्त यावेळेस ठिकाण बदललं होतं. पण यातना त्याच होत्या... गिताने आपल्या भळभळत्या जखमेवर स्वतःहुन फुंकर घातली. आणि नव्या अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली...
कणखर बनली. धाडसी बनली.
लग्न लागलं तेव्हा नवऱ्याला नोकरी नव्हती. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने त्यानंतर खूप ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती. म्हणून सासूने असा विचार केला की आपल्या मोठया मुलाला आणि सुनेला गावीच ठेवलं तर गावचं घर बंद राहणार नाही. घराची सगळी जबाबदारी गिता सांभाळेल. कारण ती गावातच लहानाची मोठी झालेली आहे. गिताला एव्हाना सारं काही समजलं होतं, आपल्याला कुठल्या खडतर मार्गावरून जावं लागणार याची तिला कल्पना आली. तिने एके दिवशी विचारपूर्वक नवऱ्याला सांगितलं की, मी इथे गावी राहून शेती करेन. तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी करा. तुमचा जन्म मुंबईतला, तुम्हाला शेतीच्या कामांची गती नाही, त्यापेक्षा तुम्ही मुंबईला जाऊन प्रयत्न करून नोकरी मिळवली तर आपल्या मुलांचं भविष्य सुकर होईल. नवऱ्याने गिताचं ऐकलं.

नवरा मुंबईला गेला, त्याला नोकरी मिळाली पण हा आनंद गिता फार काळ अनुभवू शकली नाही. कारण गिता गावी रहायची आणि नवरा मुंबईला. गिताने गावात आपल्या कष्टाने नवं विश्व उभं केलं, पण शहरात गेलेवा नवरा मात्र दारू पिऊ लागला... ज्या गिताने लहानपणी आपल्या वडलांना आणि भावाला दारू पिताना पाहिलं. नंतर त्या दोघांवर ओढवलेला मृत्यू पाहिला होता. त्यामुळे नवऱ्याच्या काळजीने ती दिवसेंदिवस चिंतेत राहू लागली. नवरा अधूनमधून गावी येई...

आपल्या दोन मुलांना घेऊन गिता एकटी गावच्या घरात राहत होती. शेतीची सारी कामे करत होती. प्रत्येक गोष्टीत कष्ट उपसण्याची तिची तयारी होती. आपलं प्राक्तन गितानं मोठ्या मनानं स्वीकारलं. कारण आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यात तिच बदल घडवून आणू शकेल, असा विश्वास गिताला होता. याच विश्वासानं घरच नाही तर अख्खं गावं आपलंसं केलं. तिने स्वतःचा संसार सावरला.
सोबत कित्येकींना जगण्याचं बळ दिलं. गावगुंडाशी खंबीरपणे लढली. तिच्या विवेकबुद्धीने ती त्यांनाही पुरून उरली. काही क्षण कोमेजली, अडखळली
काही क्षण निमूट बसली, शांत राहिलीकाही क्षण तिने असंबद्ध टाहो फोडला
तरीही पुन्हा स्वतःला आणि संसाराला सावरलं. तिच्या चेहेऱ्यावरील कधीही न मावळणारं हास्य, हीच तिच्या विरोधकांची हार... अशी ही कणखर स्त्री. मला विविध रूपात भेटणारी... मनस्विनी ही माझ्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे.
सध्या लोक तिला मानसिक रुग्ण म्हणतात, पण मला वाटतं ती मानसिक रुग्ण नाहीय. कारण विवेकाने वागणाऱ्या प्रत्येकाला हल्ली वेडा म्हणण्याची फॅशन झालीय...
क्रमशः


(मनस्विनीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध टप्पे विस्तृतपणे पुढील लेखात येतील लवकरच)



आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...