Sunday, 31 January 2016

चला, आंगणेवाडीच्या जत्रेक जावया !!!

२५ फेब्रुवारी २०१६… आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कळली आनी गावच्या आठवनींच्ये घोस वाऱ्यावर झुलाक लागले. गावाक होतय तेवा माझ्या धाकट्या काकां वांगडा आंगणेवाडीच्या जत्रेक आमी सगळे मिळान जाव. ते दिवस आता सरले. कारण शिक्षनासाठी नोकरी-धंद्यासाठी हयसर मुंबै शहरात आमी इलव.

पन ह्यावर्षी ठरवलंय कायपन करून आंगणेवाडीच्या जत्रेक गावाक जावकच व्हया.
माका आजूनव तो दिवस आटावता जेवा आमी धावी पास झाल्यार आमच्या वर्गातले धा-बारा जन मेळान मुंबैक जावक तयार झालव. आमका कोनाकव तेवा गाव सोडून शहरात जावचा नव्हता. तरीपन आमी शिकन्याच्या धडपडीमुळा आनि घराक आधार म्हणून पैसोआडको कमवूक म्हणान गावाभायर पडलंव.
आमचो मुंबैक जावयो दिवस जसजसो जवळ यैत होतो तसतसो आमचो जीव जळत होतो. आमी गावातल्या थोरा-मोठ्यांच्ये आशीर्वाद घेवन भायर पडाक लागलवं तेवा गावातली बरीच मानसा येष्टीच्या थांब्यांपर्यात पोचवक इल्ली.
गावड्यांच्या आजयेन आमका आमच्या वांगडा सात-आठ पावला चलत येवन निरोप दिलो. तेवा ती म्हनाली, पोरांनु तुमी सगळे मुंबैक चल्लास आता माज्या घराच्या पडयेत धिंगानो कोन घालतला आणि दारातल्या आवळनीचे आवळे कोन काडतला असा म्हनान तिना आपलो फाटको पदर तोंडाक लावल्यान. आनी मग आमी सगळेच रडाक लागलवं.
आज शहरात येवन आमी सगळी पोरा चांगले शिकलव-सवरलव. येगयेगळ्या ठिकानी नोकरेक लागलव. अधून-मधून गणपतीक आनि मे म्हयन्यात गावाक येतच ऱ्हवलय, गावाक कदीच इसालव नाय, गावाक काय वायच जरी खूट झाला तरी आमी येकमेकांका सांगून सवरून गावची खबरबात घेतच आसतव.
हयसरल्या कामात स्वतःक बांधून ठेयत आसलव तरी मनात मात्र गावच्या आठवनींचो सोनचापो परमाळता. तो वास आजूनव तसोच आसा. म्हनान आज जेवा आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कळली तेवा पुन्हा येकदा सगळा आठवाक लागला आनि मन गावच्या वाटेक लागला आणि कोकणकन्याच्या रूळावर धावाकय लागला.
माकाच ही पयली बातमी कळली म्हनान मिया अंजू, महेश, संदीप, निर्मला ह्या चौघांका फोन केलंय आनि तुमी आनखीन बाकीच्या ऱ्हवलेल्या वर्गातल्या आपल्या मित्रांका फोन करून कळवा म्हनान सांगलंय.
ह्या वर्षी आपन सगळे मिळान आंगणेवाडीच्या जत्रेक जावया आनि शाळेतल्या दिवसाच्ये, खळ्यातल्या मातीत रंगलेले सगळे दिवस पुन्हा आठवया. पन एक गोष्ट मात्र खटकतली की यावेळेस आमचे काका आमच्या वांगडा नसतले. जे आमका सगळ्या पोरांका एकत्र घेऊन जत्रेक जायचे. त्यांची कमी आता नेमीच ऱ्हवतली तरी पन त्यांच्या बरोबरच्यो आठवणी नेमीच ताज्यो ऱ्हवतल्यो. भराडी देवीचो आशिर्वाद आनी कृपा आपल्या सगळ्यांवर आसाच... 

(सिंधुदूर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीत लिहिलेला हा ललितलेख आहे.)

रात्रीच्या वेळी देवळाचा परिसर असा दिसतो.
भाविकांनी फुललेला मंदिर परिसर

Saturday, 30 January 2016

रिमझिम क्षण

आजवर छत्री असूनही अनेकदा पावसात भिजले होते. मनात बरसणाऱ्या या पावसाचा भार कागदाने आणि शब्दांनी कितीदा वहायचा. म्हणून उंबऱ्यावर बसून त्याची वाट पाहत होते. दुपारपासून तो येण्याची चाहूल लागली होती. मागल्या सहवासाच्या आठवणींनी मन भरून गेलं होतं. पण संध्याकाळ होतं आली तर अजून तो आला नव्हता. मन कासावीस झालं. मनात असंख्य प्रश्नांचं वादळ सुरू झालं होतं. तेवढ्यात त्याच क्षणी मंद वाऱ्याची झुळूक आली. पाठोपाठ तोही आला. त्याला पाहताच माझे डोळे तृप्त झाले. मन शहारून गेलं. त्याला भेटण्यासाठी आतुर होऊन मी त्याच्या जवळ गेले. अंगणात हात फैलावून उभी राहिले. त्याच्या स्पर्शाने माझं तन मन मोहरून गेलं. आनंद गगनात मावेना झाला. 

...असा मी पहिल्या पावसाचा तो रिमझिम क्षण अनुभवला...


Sunday, 17 January 2016

असं की तसं (ट्विटर कथा)

आमचा कॉलेजमधला सगळा ग्रुप गिरगाव चौपाटीवर धमाल करण्याच्या हेतूने आला होता. पाहिलं तर सगळीकडे अगदी मरीन लाईन्सच्या टोकापर्यंत कपल्स बसली होती. आमची सगळ्यांची एकसारखी बडबड चालूच होती. इतक्यात रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही पाहिलं तर अगदी सगळ्यात शेवटी टोकाला एक कपल बसलं होतं. ते दोघे कितीतरी दिवसानंतर आज भेटत आहेत असं दिसलं. दोघांचेही डोळे अश्रुंनी भरले होते. हा भेटीचा आनंद होता की दुराव्याचं दुःख काही कळण्याला मार्ग नव्हता. त्यांना त्यांच्या भावना एरवी सगळ्यांसोबत असताना व्यक्त करता येत नसाव्यात असं वाटलं. कदाचित ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नसतील. ऑफीसचं टेन्शन, मुला-नातेवाईकांचा गोतावळा आणि सतत इतरांची किरकिर आणि एकुणच आपल्या आयुष्यावरच ते दोघे वैतागलेले दिसत होते. त्यामुळे त्या दोघांना परस्परांचा सहवास दुर्मिळ होत चालला असेल. 


त्या दिवशी ते दोघे एकमेकांपासून दूर जाताना पुन्हा पुन्हा एकमेकांकडे मागे वळून पाहत होते. त्यांच्याकडे पाहताना असे कितीतरी विचार मनात आले. अरे, चला ना काय हम तुम मधला सीन बघताय का?” आमच्या ग्रुपमधलं कुणीतरी बोललं. सगळे पुढे चालू लागले. त्या दोघांच्या भेटीचं रहस्य काय? का इतर कपल्स सारखे ते ही... काय खोटं, काय खरं काहीच कळलं नाही. ते सारंच समजण्यापलिकडचं होतं. कारण सहवास हा शब्द हल्ली शहरात कितीदा वाईट अर्थानेच घेतला जातो. वेळेच्या आणि जागेच्या अभावी संवाद खुंटतो आहे, हे मात्र खरं...

पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

Friday, 15 January 2016

CHASE OF WORDS

लिहित होते ARTICLE, पण सुचत होती POEM
ARTICLE लिहायला मला WORDS आठवेनात.
POEM मध्ये मात्र WORDS छान गुंफून येत होते. काय करावं ARTICLE WRITING COMPETITION चं?
ARTICLE ऐवजी POEM च लिहावी का?
पण अथक प्रयत्नानंतर POETIC MIND ला थोड्या वेळापुरता आवर घालत एक मोठं पानभर BEAUTIFUL ARTICLE  लिहिलं.  मग ARTICLE च्या शेवटी मात्र POETIC MIND ला वाट करून दिली. ARTICLE  च्या LAST LINE ची काट छाट करून दोन ओळी POEM च्या लिहिल्या.

WHY THIS HAPPENS?
ARTICLE लिहायला घेतलं की POEM का सुचते?
ओळीओळींमधला WORD, तालासुरात का गुंफला जातो?
असं वाटतंय माझं POETIC MIND,
ARTICLE लिहिताना माझा पाठलाग करतंय…




मीलनाचा एकांत (Twitter कथा)

शुभ्र चांदणं पडलं. टप्पोरं फुल गालात हसलं. वाऱ्याच्या साथीने झाडं वेली नाचू लागले. नाजूक हिरव्या पानांवर अलगद दवबिंदू ओघळले. चराचर सृष्टी हा आनंद सोहळा साजरा करतेय. पण ती मात्र दुःखी होती. सारं काही असुनसुध्दा तिचं काहीच नव्हतं. ती हसणं विसरली, बागडणं विसरली. ती गुलाबाच्या कळीसारखी होती पण आता हिरमुसलेली होती. मौनव्रत घेतल्यासारखी गप्प राहू लागली. त्या बिच्चाऱ्या परीचं काहीतरी बिनसलं होतं. तिचं तिलाच समजत नव्हतं. कशातच मन रमत नव्हतं. सारखी कुणाचीतरी चाहूल मनाला लागली होती.


ही तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या येण्याची चाहूल होती. प्रेमाच्या वाटेवर तिने पाऊल टाकलं होतं. पैंजण तिची रुणझुणते, ती गाणं गुणगुणते. आणि ती त्याच्यातच गुंतते. त्याच्याच स्वप्नात आकंठ बुडते. अडखळते. बावरते. लाजेने चिंब होते. ही प्रेमाची दुनिया आहे, हे ती जाणते आहे. पण तो अनोळखी असल्यासारखा वागतोय. थेट बोलण्यापेक्षा ती आणि तो अबोलच राहणं पसंत करत होते. तिच्या जीवाची सारखी घालमेल होतेय. त्यालाही असंच वाटत असेल का? हे कसं कळणार. तिच्या आयुष्यात तो आल्यामुळे तिला सूर नवा गवसलाय. प्रेमाच्या या धुंदीतच आता तिचं जगणं असतं. ती वेडी अभिसारिका आता तिच्या आणि त्याच्या मीलनाचा एकांत शोधण्यासाठी धडपडतेय. 
पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

प्रेमाची कळी (Twitter कथा)

तिला त्याच्याशी बोलायचं होतं. त्यालाही तिच्याशी बोलायचं असेल का? माहीत नाही. कॉलेजमध्ये अकरावी, बारावीत ते दोघेही एकत्र होते. पण कधी एकमेकांशी बोलले नाहीत. ती सोडून त्यांच्या वर्गातल्या इतर मुली त्याच्याशी बोलायच्या. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी विलक्षण होतं. ते तिला भावलं होतं. त्याचं ते देखणं रुप तिच्या डोळ्यात भरायचं. त्याचं ते निरागस हसणं, हास्यभरित बोलणं. रुबाबात चालणं, सारं कसं मोहित करून टाकायचं. एरवी सर्व मुलांपेक्षा तो खूपच वेगळा होता. त्याचे डोळे बोलके होते. कुठुनही तो दिसला तरी तिची नजर आपसूक त्याच्याकडे वळायची. 

बारावीचं वर्ष संपत आलं. काही कळलंच नाही. आता पूर्वपरीक्षा जवळ आल्यात. तरी त्या दोघांचं अजून हेच चाललं आहे. बोलायचं होतं तिलाही काही त्याच्याशी, माहीत नाही त्यालापण तिच्याशी. आता बारावीचं वर्ष पण संपेल. आणि तो जाईल त्याच्या मार्गाने आणि ती जाईल तिच्या मार्गाने. तरीपण तिला त्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होतं. पण आता ते शक्य नाही. फार उशीर झाला.


या घटनेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आज कॉलेजमध्ये पुन्हा तो ओळखीचा चेहरा तिने पाहिला. आता त्यांच्यात गप्पा सुरु झाल्यात. परस्परांच्या शुध्द मैत्रीतून ओठांची मोहोर उघडली गेली. मैत्री या गोंडस शब्दाआड तिच्या प्रेमाची कळी न फुलताच कोमेजून गेली. प्रेम म्हणजे काय?  या प्रश्नाचं गूढ तिच्या लेखी वाढत गेलं.

  

पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

लेखकास पत्र (Letter to Writer)

प्रिय लेखक मित्रा,
लेखक आणि क्रिएटिव्हिटी
हे एक विविधरंगी भावभावनांचं 'पॅकेज' आहे.
ते कोणीही बनवू शकत नाही.
ते कोणीही नष्ट करू शकत नाही.
ते कोणीही एक्सप्लेन करू शकत नाही.

फक्त तू आणि मीच ते समजू शकतो.


मला असं वाटतं आणि माझा विश्वास आहे की,
लेखक आपल्या लेखणीने,
त्याचं स्वतःचं आभाळ  निर्माण करतो
तो अशी एक क्रिएटिव्ह व्यक्ती असतो
ज्याचं ह्रदय सोन्याचं असतं.

लेखक आयुष्याला नवा अर्थ देतात,
तो जगण्यावर प्रेम करायला सांगतो...
पण त्याची गोष्ट मात्र शब्दात कधीच सांगता येत नाही,
लेखक हा हजारात एक असतो !
त्यातला एक तू आहेस !
धगधगत्या निखाऱ्यासारखं त्याचं आयुष्य असलं तरी
त्याच्या लेखणीतून हिरवा निसर्ग फुलतो
म्हणून मग त्याने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं चांदणं होऊन
वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनाचं आभाळ हसतं.
हीच लेखकाच्या लेखणीची किमया

अॅड, टीव्ही, फिल्मस्... साऱ्या मीडिया वर्ल्डचा तू कणा आहेस
मला तुझा अभिमान वाटतो "तू लेखक आहेस"
असाच लिहित रहा
तुला लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !

रायच्या भरडावर... (मालवणी बोली)

मे म्हयनो म्हंजे कामव आसता आनि चाकरमान्यांच्या येन्यामुळा मौजपन आसता. मे म्हयन्याच्ये दिवस कश्ये सरतत काय कळना नाय. गेल्या आयतवारी येक क्रिकेट मॅच खेळवची असा सगळ्या तरुन झिलग्यांका वाटला. ही मॅच चाकरमानी पोरगे इरुद्ध गावातले पोरगे अशी खेळाची ठरली. सुटीत लय चाकरमानी इल्लले. त्येंकाव मजा वाटली. आदल्या दिवसा गावकारांच्या पडयेत सगळे जमान ह्याबद्दल बोलाक लागले. गाववाले म्हनाक लागले आमी चाकरमान्यांका हरवतलव. मगेन चाकरमानीव रंगात इले आमीपन तुमका हरवतलव म्हनाक लागले. ते खेळाचा नयीन सामानसुमान, पिवळे-निळे टीशर्ट घालून तयारव झाले.
गावात रामेसराच्या देवळाच्या बाजूक रायचा मोठा भराड आसा. थय ही पेशल मॅच खेळवली जानार होती. गावातल्या पोरांकडे कायच खेळाचा सामान नाय होता. हा, पन खास अशी पिड्याची बॅट होती. ह्या पिड्याच्या बॅटीफुडे यमआरयफची बॅटसुदा झक मारता. गावातले पोरगे वायच घाबारलले, हे चाकरमानी पोरगे जिंकले तर गावच्या पोरींसमोर आपल्याक त्वांड दाकूक नको. आता करायचा काय? समरो, पवलो, निलगो, पकलो जमले इच्यार करुक लागले. ह्या चाकरमान्यांका कायतरी ‘मालवणी भॅट’ देवक होयी. आनि ही मॅच फिक्स करुक होयी. पन त्येनी आपल्यावांगडासुदा असा काय केल्यानी तर? दोनव टीमच्ये पोरगे गावड्यांच्या मांगरात जमले. चाकरमानी पोरगे म्हनाक लागले आमी तुमका एमआरएफच्यो बॅटी देतव तुमी हरा. गावच्ये पोरगे म्हनाक लागले. आमी तुमका आंब्याच्यो पेटयो आनि काजूगराची पाकिटा देतव तुमी हरा. अशी हेनी सामनी सामनी बसानच मॅच फिक्स केल्यानी.
चाकरमानी पागाळले त्येनी हराचा ठरवल्यानी. झाला, मगेन रायच्या भरडावर ही पेशल मॅच झाली. चाकरमानी हरले आनि गाववाले जिंकले. गावात सगळी मंडळी मॅच बघूक जमलली. त्येंका कायतरी खटाकला मगेन ह्याची इचारपूस झाली तेवा मांजरेकरांचो दिपलो पचाकलो, सरपंचाका म्हनालो ही मॅच आधीच फिक्स केल्लली होती. सरपंचासकट सगळ्यांका लय मोठो धक्को बसलो. सरपंचानी दिपल्याक सांगल्यानी जा खेळनाऱ्या सगळ्यांका बोलावन घेवन ये. दिपलो पाटकन गेलो नी सगळ्यांका घेवनच इलो. सगळे मान खाली घालून उबे ऱ्हवले. सरपंचानी त्येंका सनसनीत मालवनीत सुनवल्यानी. मग सगळे पोरगे त्वांड उगडून बोलाक लागले. आमचा चुकला आमी परत असा करूचव नाय. असा चाकरमान्यांनी म्हटल्यानी मात्र, सगळे गाववाले ह्यांचा बोलना आयकाक खळ्यात आनि पेळेवर उबे ऱ्हवलले ते  पोरांच्या पाटी लागले. पॉर फुडे हे पाटसून चाकरमान्यांका कनकवलेक पोचवल्यावरच ते गप ऱ्हवले. मग इली गावच्या पोरांची पाळी. गावल्यांनी त्येंकाव सोडल्यानी नाय. थोड्यांका पाठवल्यानी कवळफोड करुक पातेत, थोड्यांका पिटाळल्यानी शेतीच्या कामाक. पावसाच्ये दिसव जवळ इले हत. हे झिलगे चांगलेच तावडीत गावले.
त्या दिवसा ती पेशल मॅच बघुक गाववाले जमले, कित्याक तर ह्या मॅचीमुळे सगळो गाव येकठय इलोहा. पन ह्या पोरांनी सगळ्या मजेवर पानी वतल्यानी. रायचा भराड म्हंजे आमच्या गावचा ‘वानखेडे स्टेडियम’. यवडा मोठा मैदान चाकरमान्यांनीसुदा पैल्यांदाच बगलल्यानी. गावच्या धयकल्याच्या टायमाक ह्या सगळा रायचा भराड पावन्यापैकानी फुल्लला आसता. मॅचीच्या दिवशीसुदा असाच फुल्लला. पन तेंका काय ठावक मॅच आदीच फिक्स झालीहा म्हनान. आता ह्या रायच्या भरडावर कोनसुदा दिसना नाय. ढोरा नाय आनि ढोराचो राकनोसुदा नाय. जे कदीमदी रायच्या भरडार गमायच्ये. चाकरमानी गेले मुंबैक, गावच्या पोरंग्याका जुंपल्यानी शेतीक. आनि पिड्याच्यो बॅटी गेल्यो चुलीत…


आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...