तिला त्याच्याशी बोलायचं
होतं. त्यालाही तिच्याशी बोलायचं असेल का? माहीत नाही. कॉलेजमध्ये अकरावी, बारावीत
ते दोघेही एकत्र होते. पण कधी एकमेकांशी बोलले नाहीत. ती सोडून त्यांच्या
वर्गातल्या इतर मुली त्याच्याशी बोलायच्या. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी
विलक्षण होतं. ते तिला भावलं होतं. त्याचं ते देखणं रुप तिच्या डोळ्यात भरायचं.
त्याचं ते निरागस हसणं, हास्यभरित बोलणं. रुबाबात चालणं, सारं कसं मोहित करून
टाकायचं. एरवी सर्व मुलांपेक्षा तो खूपच वेगळा होता. त्याचे डोळे बोलके होते. कुठुनही
तो दिसला तरी तिची नजर आपसूक त्याच्याकडे वळायची.
बारावीचं वर्ष संपत आलं. काही
कळलंच नाही. आता पूर्वपरीक्षा जवळ आल्यात. तरी त्या दोघांचं अजून हेच चाललं आहे.
बोलायचं होतं तिलाही काही त्याच्याशी, माहीत नाही त्यालापण तिच्याशी. आता बारावीचं
वर्ष पण संपेल. आणि तो जाईल त्याच्या मार्गाने आणि ती जाईल तिच्या मार्गाने. तरीपण
तिला त्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होतं.
पण आता ते शक्य नाही. फार उशीर झाला.
या घटनेला सहा महिने पूर्ण
झाल्यानंतर आज कॉलेजमध्ये पुन्हा तो ओळखीचा चेहरा तिने पाहिला. आता त्यांच्यात
गप्पा सुरु झाल्यात. परस्परांच्या शुध्द मैत्रीतून ओठांची मोहोर उघडली गेली.
मैत्री या गोंडस शब्दाआड तिच्या प्रेमाची कळी न फुलताच कोमेजून गेली. प्रेम म्हणजे
काय? या प्रश्नाचं गूढ तिच्या लेखी वाढत
गेलं.
पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६
No comments:
Post a Comment