आमचा कॉलेजमधला सगळा ग्रुप
गिरगाव चौपाटीवर धमाल करण्याच्या हेतूने आला होता. पाहिलं तर सगळीकडे अगदी मरीन
लाईन्सच्या टोकापर्यंत कपल्स बसली होती. आमची सगळ्यांची एकसारखी बडबड चालूच होती.
इतक्यात रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही पाहिलं तर अगदी सगळ्यात शेवटी टोकाला एक कपल
बसलं होतं. ते दोघे कितीतरी दिवसानंतर आज भेटत आहेत असं दिसलं. दोघांचेही डोळे
अश्रुंनी भरले होते. हा भेटीचा आनंद होता की दुराव्याचं दुःख काही कळण्याला मार्ग
नव्हता. त्यांना त्यांच्या भावना एरवी सगळ्यांसोबत असताना व्यक्त करता येत
नसाव्यात असं वाटलं. कदाचित ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नसतील. ऑफीसचं
टेन्शन, मुला-नातेवाईकांचा गोतावळा आणि सतत इतरांची किरकिर आणि एकुणच आपल्या
आयुष्यावरच ते दोघे वैतागलेले दिसत होते. त्यामुळे त्या दोघांना परस्परांचा सहवास
दुर्मिळ होत चालला असेल.
त्या दिवशी ते दोघे
एकमेकांपासून दूर जाताना पुन्हा पुन्हा एकमेकांकडे मागे वळून पाहत होते.
त्यांच्याकडे पाहताना असे कितीतरी विचार मनात आले. “अरे, चला ना काय हम तुम मधला सीन बघताय का?” आमच्या ग्रुपमधलं कुणीतरी
बोललं. सगळे पुढे चालू लागले. त्या दोघांच्या भेटीचं रहस्य काय? का इतर कपल्स सारखे ते
ही... काय खोटं, काय खरं काहीच कळलं नाही. ते सारंच समजण्यापलिकडचं होतं. कारण “सहवास” हा शब्द हल्ली शहरात
कितीदा वाईट अर्थानेच घेतला जातो. वेळेच्या आणि जागेच्या अभावी संवाद खुंटतो आहे,
हे मात्र खरं...
पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६
No comments:
Post a Comment