Wednesday, 21 June 2017

लेखक हाच खरा सेलिब्रिटी

व्यावसायिक लेखन आणि मराठी या विषयाचा आवाका खूप आहे. पण मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. २००६ पासून जेव्हा मी लेखन करू लागले तेव्हा मला याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे माझी दोन वर्षं चाचपडण्यात गेली. मी ग्रंथालयात जाऊन याविषयावर पुस्तकं शोधायचे. पण मिळालीच नाहीत. शेवटी एक पुस्तक मिळालं, त्याचं नाव होतं शशिकांत कोनकर यांचं खूप लिहा आणि पैसे कमवा या पुस्तकाने लिहिण्याच्या वाटेवर मला धीर दिला. आपण योग्य ठिकाणी आहोत हा विश्वास दिला. कुठल्याही प्रकारच्या लेखनासाठी आधी भाषेवर प्रभुत्व हवं. आपण मराठी आहोत तर आधी आपलं मराठी भाषेवर प्रभुत्व हवं आणि त्याचबरोबर इतर दोन भाषा ज्या की भारतीयांसाठी हिंदी आणि इंग्रजी आहेत, त्याही नीट यायला हव्यात. इंग्रजीतून बोलणं जमलं नाही तरी चालेल पण ती भाषा कळायला हवी. कारण या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य तुम्हाला वाचता येईल आणि तुम्हाला तुमच्या लेखन कक्षा रुंदावता येतील. 


मराठी भाषेतही दर्जेदार साहित्य आहे, जर तुम्हाला मराठीसोबत इतर अधिकची कुठली भाषा येत असेल तर तुम्ही भाषांतर, अनुवादक किंवा त्या एखाद्या मराठी पुस्तकाचे रुपांतर करून रुपांतरकार होऊ शकता. हा व्यावसायिक लेखनाचा चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे लेखनाची वेगळी शैली आहे. तुम्ही तटस्थ राहून व्यक्त होऊ शकलात तर तुमच्या लेखनाला कुणी नावं ठेऊ शकणार नाही. लिहिताना आपलंच लेखन आपणच आधी नीट वाचलं पाहिजे. लिहिल्यानंतर आपणच आपल्या लेखनाच्या प्रेमात पडू नये. तर जे वाचक आहे त्यांना तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी प्रयत्न करा. आपलं लेखन एखाद्या जाणकार संपादकाकडून तपासून घ्या. त्याने काही तुमच्या लेखनात सुधारणा सुचवली तर आवश्यक ते बदल करा. आणि आपलं लेखन १०० टक्के परफेक्ट करा. व्यावसायिक लेखन करण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळेत तुम्ही शिकला असाल तर नक्कीच फरक पडतो. कारण त्यामुळे तुमची भाषिक जाण आणि शब्दसंपत्ती वाढलेली असते. त्याचबरोबर चांगली मराठी भाषेतील पुस्तकंही वाचली पाहिजेत. वाचनामुळे तुमच्या लेखनाची वाक्यरचना सुधारायला मदत होते. नवे शब्द कळतात. 

व्यावसायिक लेखन मराठी भाषेतून करण्यासाठी विविध पर्याय आजच्या नवोदित लेखकांना उपलब्ध झाले आहेत. पण त्याचा वापर योग्य होताना दिसत नाहीय. त्यामुळे बरेचसे चांगले लेखक आणि लेखन दुलर्क्षित राहतात. वृत्तपत्रे, चित्रपट, मालिका, नाटक, जाहिरात, वेब सिरिज, माहितीपट, लघुपट, वृत्तवाहिन्या अशा सर्व ठिकाणी सध्या मराठी भाषेतून लेखनाच्या खूप संधी आहेत.
कारण चांगलं मराठी बोलणारे आणि चांगलं मराठी लिहिणारे यांची संख्या कमी झालीय. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एखादं माध्यम लेखकांना मिळालं पाहिजे. फिल्म रायटर्स असोसिएशन आणि मराठी लेखकांसाठी मानाची नावाची संघटना आहे. तिथे मालिका, चित्रपट आणि नाट्यलेखन शिकवलं जातं. अनेक मान्यवर लेखकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. मराठीतील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये लेखन करण्यासाठी आधी नियमित काही वृत्तपत्रं वाचा. त्यात जी फिचरची पाने (सदर लेखन, प्रासंगिक लेखन) असतात ती वाचा. त्यात दररोज वेगवेगळ्या लेखकांचे लेख छापून येत असतात. ते वाचून तुम्ही कशा प्रकारचं लेखन वृत्तपत्रासाठी करू शकता, ते तुम्हाला कळेल. त्यानुसार वृत्तपत्रांच्या ईमेल आयडीवर किंवा प्रत्यक्ष एखाद्या वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून तुम्हाला एखाद्या विषयावर लेखन करायचे असल्यास तो विषय सांगावा किंवा एखाद्या प्रासंगिक मुद्दयावर लिहायचे असल्यास तसं सांगावं आणि त्यांना लेखन पाठवावं. तुमचं लेखन त्या वृत्तपत्राच्या संपादकांना आवडलं तर ते नक्की छापतील. आणि नाही छापलं तरी निराश होऊ नका.

आधी सर्वप्रथम सगळ्या नवोदित लेखकांनी आपला नियमित एक ब्लॉग सुरू करा. तुमची लेखन शैली नेमकी कशी आहे, ते कळण्यासाठी तुमच्या महिन्याभरातील ब्लॉग पोस्ट पुन्हा बघा. आणि कुठल्या विषयावर तुम्हाला लेखन करायला छान जमतंय, त्या विषयावर लेखन सुरू करा. त्याच विषयात इतके खोल जा की त्याविषयावर तुमच्याशिवाय कुणी चांगलं लिहूच शकत नाही. इतका तो विषय पक्का करा. जाहिरात लेखन करण्यासाठी व्यक्त होताना माध्यमाचं भान हवं आणि स्थल-कालाचं योग्य निरिक्षण हवं. सरावासाठी एखादी अशी जाहिरात बघा ज्या जाहिरातीतून कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त केलाय. त्यानंतर एखादं प्रॉडक्ट घेऊन तुम्हीच ती जाहिरात करताय असं मानून लिहून बघा.
नवोदित लेखकांचं सुरुवातीचं लेखन हे अनुकरणातून लिहिलेलं असतं, पण त्यापुढील लेखन करताना मात्र लेखकांनी त्याच प्रभावात अडकून न राहता स्वतःची वेगळी शैली निर्माण केली पाहिजे.
सर्व स्तरातील लेखकांचा आपापसात संवाद वाढला पाहिजे. प्रत्येकाला व्यक्त व्हायची संधी मिळाली पाहिजे. आणि आजचा लेखक लेखनाच्या माध्यमामुळे स्वयंपूर्ण झाला पाहिजे. त्याचं लेखन हाच त्याचा व्यवसाय झाला पाहिजे. यासाठी लेखकाने लेखनात सातत्य ठेवलं पाहिजे. काळाबरोबर बदललं पाहिजे.

वाचनसंस्कृती अजुनही टिकून आहे. फक्त तिला चांगलं वाचायला मिळायला हवं. आणि ते देणं ही आजच्या लेखकाची जबाबदारी आहे. सध्या विविध माध्यमांमध्ये बदलत्या काळाची गुंतागुंत टिपणारे लेखक हवे आहेत. लेखकांनी खूप फिरलं पाहिजे. नवे नवे अनुभव घेतले पाहिजेत. कुठल्याही झुंडशाहीच्या प्रभावाला बळी पडता कामा नये. मुळात आजच्या लेखकांची चिंतनशीलता कमी पडते म्हणून त्यांचं लिहिलेलं साहित्य हा वरवरचा तवंग वाटतो. अशी अनुभवी लेखक नवोदित लेखकांवर टिका करतात. ही टिका खेळकरपणे घेऊन त्यात सुधारणा केली पाहिजे. सध्या नव्या लेखकांना आजुबाजुच्या कोलाहलात व्यक्त होणं हेच मोठे आव्हान आहे. तुम्हाला कुठल्याही माध्यमासाठी मनापासून लेखन करायचं असल्यास त्यात झोकून द्या. मार्गदर्शनासाठी मी आहेच. तुम्ही माझ्या ट्विटर हॅंडलवर किंवा माझ्या bhaktiparab12@gmail.com  या ईमेल आयडीवर केव्हाही लेखन पाठवा. नाटक, मालिका आणि चित्रपटासाठी लेखन करणार असाल तर आवर्जून तुमचं लेखन पाठवा. कारण या माध्यमात सध्या संहितांची कमतरता आहे. त्यामुळे या माध्यमातील तज्ज्ञ मुंबई-पुणे सोडून इतर भागातील लेखकांच्या शोधात आहेत. तुम्हाला योग्य ती संधी मी मिळवून देईन. पण तुम्ही तुमच्या लेखनाविषयी प्रामाणिक आणि मनापासून लिहिलं पाहिजे. लक्षात असू द्या, लेखक हाच खरा सेलिब्रिटी आहे.
भक्ती परब,
उपसंपादक (फिचर)
सकाळ मुंबई आवृत्ती

मराठी वर्ड या ट्विटर हॅंडलने आयोजित केलेल्या दुसऱ्या ट्विटर संमेलनात मी व्यावसासिक लेखन आणि मराठी या विषयावर केलेल्या व्याख्यानाचा हा संपादित अंश

भावी देवसेनांच्या सहवासात काही क्षण...

काही क्षण अनमोलच असतात. ते गोड आठवणींच्या स्वरूपात कायम स्मरणात राहतात. असाच तो क्षण होता, काही खास मुलींसाठी आयोजित केलेला बाहुबली - २ हा चित्रपट पाहण्याचा. रेस्क्‍यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि पनवेल ओरियन माॅलने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने पुनःप्रत्ययाचा आनंदही दिला आणि सोबत नव्या मैत्रिणींची भेट घडवली. त्या क्षणांचे साक्षीदार न होऊ शकलेल्या वाचकांसाठी ही शब्दात बांधलेली त्या क्षणांची मोतीमाळ...
वर कोऱ्या आभाळाची
भट्टी तापली तापली
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली...
कवितेतल्या ओळींनुसार कितीही ऊन, वारा-वादळ झालं तरी सावरायला आपली आई आहे. आपल्या जवळची माणसं आहेत. ती आपल्याला सावरतील आपल्या मायेचा, प्रेमाचा पदर धरतील; पण इथे आलेल्या मुली या मायेच्या पदरालाच पारख्या झालेल्या होत्या. आपुलकीच्या चार शब्दांसाठी आसुसलेल्या होत्या; तरी कुठेही लाचारी दिसत नव्हती. आपली ओळख पुसून टाकण्याची केविलवाणी धडपड नव्हती, तर त्या ओळखीचं मनावर दडपण न घेता पुन्हा नवी ओळख निर्माण करण्याचं साहस त्यांच्यात दिसत होतं. त्यांच्याशी बोलताना ते जाणवत होतं. रेस्क्‍यू फाऊंडेशनच्या रूपात त्या मुलींना मायेचा पदर मिळालाय. त्यामुळे त्यांच्या पंखांना बळ मिळालंय आणि त्या जोरावर त्या नवी स्वप्नं पाहण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
निमित्त होतं रेस्क्‍यु फाऊंडेशनमधील मुलींना बाहुबली सिनेमा दाखवण्याचं. चिमुकल्या पायलने आपल्या अनोख्या शब्दांत तशी गोड ताकीद दिली होती. मला बाहुबली बघायचाय. मग तिची आणि इतर मुलींची बाहुबली पाहण्याची इच्छापूर्ती करण्यासाठी रेस्क्‍यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सारे सहकारी एकवटले.
बाहुबली सिनेमा तर अख्ख्या जगभर गाजतोय. सिनेमा पाहणारे त्याची तारीफ करताना थकत नाहीयेत. मग या मुलींनी तरी या आनंदापासून का वंचित रहावं, म्हणूनच हा बाहुबलीचा खास शो या खास मुलींसाठी आयोजित करण्यात आला होता. आता तुम्ही म्हणाल त्या मुली कोण आहेत? ज्यांच्यासाठी एवढं चाललंय... तर त्या खूप स्पेशल आहेत. त्यांच्या भूतकाळाने त्यांना असंख्य चटके दिले, असह्य वेदना दिल्या तरी न खचलेल्या, डोळ्यातला आशावाद शाबूत ठेवणाऱ्या त्या ४ ते २० वयोगटातल्या मुली.
कुणी नकळत्या वयात वेश्‍या व्यवसायात जबरदस्तीने ओढली गेलेली, कुणी नातेवाईकांकरवी विकली गेलेली, कुणी घरातील पुरुषांच्या वासनेला बळी पडलेली, कुणी लग्न न होता गर्भार राहिली म्हणून घरातून हाकलण्यात आलेली, कुणी पुरुषी अत्याचारांत पोळलेली, कुणी घरात मुलगी नको म्हणून अव्हेरलेली, कुणी कमी वयात मातृत्व स्वीकारावं लागलेली अशा विविध छळांनी आणि अन्यायांनी पीडित मुली या रेस्क्‍यू फाऊंडेशनच्या आसऱ्याने मोकळा श्वास घेत आहेत. प्रत्येकीवर झालेल्या अन्यायाला तर सीमाच नव्हती; पण त्यांना समाजातील काही मोजक्‍या लोकांनी ज्यांना सामाजिक कार्यात पुढे येऊन सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी आधार दिलाय. त्यापैकीच सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सहकारी.
बाहुबली सिनेमाच्या आयोजनाने त्यांना त्या खास मुलींच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हास्य आणि काही क्षण आनंदाचे त्यांच्या आयुष्यात निर्माण करायचे होते आणि यापुढेही त्या अशाच आनंदी राहाव्यात ही आस होती.

सकाळची सव्वादहाची वेळ. पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रेस्क्यू फाऊंडेशनच्या मुली पोहोचल्या होत्या. मॉलमधल्या वातावरणाशी त्या सरावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा सिनेमा बघतानाचा आनंद ओसंडून वाहत होता. त्या तुमच्या - आमच्यासारखेच सहज फिरायला जाते, असे म्हणून बाहेर पडू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास होता. रेस्क्‍यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सहकारी यांच्यातील एक समान दुवा होत्या त्या ४० मुली. आणि त्यांची प्रामाणिक इच्छा होती मुलींच्या निरागस चेहऱ्यावर आनंद बघणं.
सिनेमा सुरू झाला तशी हळूहळू होणारी त्यांच्यातील चुळबूळ, कुजबूज थांबली आणि चेहऱ्यावर आता सिनेमात पुढे काय होणार, याविषयीचं कुतूहल दिसू लागलं. अमरेंद्र बाहुबलीची एंट्री झाली तेव्हा मुली भलत्याच खूष झाल्या आणि सिनेमा पाहण्यात दंग झाल्या. देवसेनेला पडद्यावर तलवारबाजी करताना पाहून त्यांनाही वाटलं असेल, आपणही अशी तळपती तलवार हाती घ्यावी आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांचा समाचार घ्यावा. त्यांच्या मनात काय चालंलं असेल, तर असंख्य विचारांचं वादळ सुरू असेल. आपल्या भविष्याविषयी अजून तशी स्पष्ट कल्पना नाही, दिशा नाही तरी प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी त्या धडपडत असतील, चाचपडत असतील.
एकंदर त्या इतर सिनेरसिकांसारखाच सिनेमा पाहत होत्या; पण त्यातही वेगळेपण जाणवत होतं. कारण सिनेमात महिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्पर्श करणाऱ्या सेतुपतीला पाहून त्या क्षणभर स्तब्ध झाल्या होत्या. त्या वेळी त्यांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची जाणीव झाली असावी. मग त्यांना उत्सुकता लागून राहिली की पुढे काय होणार... मग भर दरबारात अमरेंद्र बाहुबलीने महिलांना त्रास देणाऱ्या त्या सेतुपतीचा तलवारीने गळा कापला तेव्हा मुलींनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. सिमेमागृहातून बाहेर पडताना प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक मस्त कलाकृती पाहिल्याचं समाधान झळकलं होतं. काहींची पहिलीच वेळ होती थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची; तर काहींनी गेल्या काही महिन्यांत एकही सिनेमा पाहिला नव्हता.
 सिनेमा संपल्यावर काही मुलींना बोलतं केलं तेव्हा सगळ्या जणींना त्या सिनेमाविषयी भरभरून बोलायचं होतं. सिनेमातल्या प्रत्येक दृश्‍यावर त्यांच्याकडे काहींना काही सांगण्यासारखं होतं; पण वेळच कमी पडला असता अशी परिस्थिती होती. काहींनी सांगितलं, अमरेंद्र बाहुबलीची एंट्री मस्त वाटली. काही म्हणाल्या, देवसेनाच लय भारी होती. एकीने सांगितलं, की पाठीवर भल्लालदेवाने मारलेला बाण लागला तरी आपल्या नातवाला वाचणारी शिवगामी आणि तिने ज्या प्रकारे त्याला आपल्या हातात वर उचलून धरलं ते आवडलं. मला वाटलं या प्रसंगातून तिला कदाचित वाटलं असेल, आपल्या घरच्यांनी मायेच्या माणसांनीही तिला असंच उचलावं. तिचं रक्षण करावं; पण ते प्रेमळ हात त्यांच्या मस्तकी नव्हते आणि हातात हात घेऊन वचन देणं तर दूरच राहिलं. चिमुकला महेंद्र बाहुबली आई देवसेनेच्या हातावर आपला इवलासा मऊसुत कोमल हात ठेवतो, तेव्हा या मुलींनाही आपल्या प्रियजनांची आठवण आली असेल.
काही जणी भावूक झाल्या होत्या; पण डोळ्यातली चमक त्यांनी हरवू दिली नाही; तर एक मुलगी म्हणाली, बाहुबली मरतानाच्या प्रसंगाने माझे डोळे दिपले, जेव्हा तो म्हणतो, मा का ध्यान रखना... इथली प्रत्येक मुलगी आपल्या घराला पारखी झाली असली तरी त्यांच्या घरच्यांविषयी मनात द्वेष नव्हता, हेच दिसून आलं. काही जणींना फक्त त्यांची नावं विचारली, तू कुठून आलीस असं विचारलं तेव्हा त्यांची नावं ऐकून माझ्याच त्या मैत्रिणी आहेत असं वाटलं. दोघी म्हणाल्या, आम्ही ओडिशातून आलोय. त्यातल्या एकीने तुझं नाव काय, या वाक्‍याचं तिच्या भाषेत चटकन भाषांतरही केलं. ती ओळ मी टिपून घेताना माझ्याकडून चूक झाली, तर लगेच तिने माझ्या डायरीत पाहून ती चूक सुधारली. इतक्‍या हुशार आणि चाणाक्ष मुली होत्या त्या. एक मुलगी संगणक प्रशिक्षण घेत होती. तिला ते आवडतही. काय काय शिकलीस त्यातलं? विचारल्यावर तिने एम एस ऑफीस, पॉवर पॉईंट, एम एस पेंट शिकले. अजून पुढे शिकायचं आहे. म्हणाली...
सगळ्या मुली उत्साहात होत्या. त्यांच्या नजरेत कुतूहल होतं. खूप काही शिकण्याची इच्छा दिसत होती. आपण आपल्या माणसांना गमावल्याचं दुःख तर होतंच. बोलताना भावूक झाल्या होत्या. एकीच्या डोळ्यात आसवं तरळली. ती तर नेपाळहून आली होती. घरच्यांची आठवण येत होतीच; पण त्यासोबत त्यांना त्या बोचऱ्या आठवणीही आठवत असणार... म्हणून अधूनमधून हरवल्यासारख्या दिसत होत्या. काही जणी अगदी बिनधास्त होत्या. हिंदी - मराठीमिश्रित आमचं बोलणं चाललं होतं. नेपाळ, बांगलादेश तसेच महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांतून आलेल्या या मुली गुण्यागोविंदानं एकत्र रेस्क्‍यू फाऊंडेशनच्या शेल्टर होममध्ये राहतायत. मला तर त्या सगळ्या जणी तडफदार, स्वतंत्र, करारी बाण्याच्या भावी देवसेनाच वाटल्या.
बाहुबली-२ सिनेमाच्या पटकथेच्या भाषेत सांगायचं, तर अमरेंद्र बाहुबली जसा देशाटनाला निघतो, तसा प्लॉट पॉईंट वनपर्यंतचा प्रवास या मुलींनी रेस्क्‍यू फाऊंडेशनच्या साथीने इथवर केलाय आणि इथून पुढचा प्रवास म्हणजेच इंटरव्हल, प्लॉट पॉईंट टू, क्‍लायमॅक्‍स आणि रेझोल्युशन सुंदर करणं ही आपली जबाबदारी आहे. कथेप्रमाणे बाहुबली देशाटनाला गेला नसता, तर पुढचा सिनेमा घडला नसता. अगदी तसंच या मुलींना त्यांचं आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी मदतीचा हात तर द्याच; पण त्यापेक्षाही तुम्ही त्यांच्या सोबत आहात, हा विश्‍वास द्या. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्नही कराच...
खूप काही करायचे आहे...
बाळकृष्ण आचार्य यांनी स्थापन केलेल्या रेस्क्‍यू फाऊंडेशनची धुरा आता त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी पत्रकार त्रिवेणी आचार्य सांभाळत आहे. त्यांना साथ लाभलीय रेस्क्‍यू फाऊंडेशनचे प्रोजेक्‍ट डिरेक्‍टर दीपेश टांक यांची. फाऊंडेशनविषयी दीपेश म्हणाले, की आमच्या कांदिवलीच्या मुख्य कार्यालयात जवळपास ५० मुली आहेत आणि त्यांची वेश्‍यावस्तीतून सुखरूप सुटका केल्यावर आम्ही खास काळजी घेतो. त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. आमच्या शेल्टर होममधील काही मुली शाळेत शिकत आहेत. काहींना त्यांच्या पायावर उभं राहता येईल, यासाठी बेसिक कोर्सेस आखले आहेत. नुकत्याच जन्मलेल्या मुली ते २० वर्षे वयोगटापर्यंतच्या मुली येथे आहेत. जिथे भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्ती होतात. तिथे ह्युमन ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणात होतं. कारण अशा आपत्तींमध्ये आई-वडील आपल्या मुलांना वाचवतात. हे दलाल नेमक्‍या याच वेळी मुलींच्या शोधात असतात. मुली दिसल्या की त्यांना तिथून पळवून नेलं जातं. वेश्‍या व्यवसायात कुठलीही मुलगी स्वच्छेने आलेली नसते. तिला जबरदस्तीने अशा ठिकाणी आणल्यावर ती जवळपास आठवडाभर सुटकेसाठी धडपड करते. मग तिच्या सगळ्या आशा संपतात आणि मग ती तिथल्या वातावरणाला सरावते. व्यसनांच्या आहारी जाते. या सगळ्या महिलांसाठी काम करायचं ठरवलं तेव्हाही आणि आताही जिथे कुठे आम्ही धाड टाकून महिलांना ताब्यात घेतो, तेव्हा जी त्यांची अवस्था असते ती पाहवत नाही. माणुसकीचा अंत झाल्याचा प्रत्यय आम्हाला वारंवार येतो. आपल्या इच्छेविरुद्ध वेश्‍या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या मुलींसाठी आम्हाला अजून खूप काही करायचं आहे; पण त्यासाठी सजग आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कणखर हातांची आवश्‍यकता आहे. ते आमच्यासोबत आमच्या कार्याला हातभार लावू शकतील.
Rescue Foundation
Plot No.39, Fatimadevi Road, Behind Our Lady of Remedy School, Poisur, Kandivali (W), Mumbai - 400067, Maharashtra, India. Telephone:- +91-22-28060707 / 28625240
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती

Tuesday, 13 June 2017

स्त्री सक्षमीकरणाचा राष्ट्रीय आवाज!

नीरजा, पिंक आणि रुस्तम या बॉलिवूडच्या सिनेमांना आणि सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यानिमित्ताने या सिनेमातल्या साम्यस्थळांविषयी...


नीरजा, पिंक आणि रुस्तम हे तिन्ही सिनेमे 2016 मध्ये प्रेक्षकांना विशेष भावले होते. याच सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीचा तो सन्मान आहे, असं म्हणावं लागेल; पण या तिन्ही सिनेमांमध्ये एक साम्य आहे. सारं जग महिला सक्षमीकरण या विषयावर बोलत असताना या सिनेमांतूनही याच विषयाचे पैलू उलगडले आहेत. 



सोनम कपूरच्या संयम आणि नैसर्गिक अभिनयाच्या "नीरजा'ने तिची दखल समीक्षकांना घ्यायला लावली. राम मधवानी यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा नीरजा भानोत या अवघ्या 22 वर्षीय हवाईसुंदरीच्या आयुष्यात घडलेल्या प्लेन हायजॅक प्रकरणाचा आणि तिनं प्रसंगावधान राखून धीरानं त्यावर मात केलेल्या घटनेची गोष्ट सांगतो. या सिमेनाची कथा कित्येकांना प्रेरणा देणारी ठरली. नव्यानं एअर होस्टेस म्हणून रुजू झालेल्या नीरजाचं प्लेन हायजॅक होतं. ती त्या प्रसंगाला किती सक्षमपणे तोंड देते, हे हा चित्रपट उत्कृष्टपणे मांडतो. या सिनेमातील संवाद आणि मांडणी अतिशय उत्कृष्ट होती. यातली "जिते है चल, आँखे मिलाएंगे डर से' ही गाणी (गीतकार-प्रसून जोशी) आजही प्रेक्षकांना प्रेरणा देतात.



पिंक सिनेमात तीन मुलींची गोष्ट एका घटनेतून रंगवण्यात आली आहे. एखादी मुलगी जेव्हा नाही म्हणते, तेव्हा तिचा हा नकारच समजावा, या आशयाचा अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला संवाद आपल्याला हिंमत देतो. एखादी मुलगी रात्रीची पार्टीला जाते. ड्रिंक करते म्हणजे ती वाईट चालीची, स्वतंत्र विचारांची म्हणून तिच्यासोबत कसाही अपमानास्पद व्यवहार केला तर काही हरकत नाही अशा पुरुषी मानसिकतेवर या सिनेमातून भाष्य करण्यात आलंय. यात तापसी पन्नूने साकारलेल्या मीनल नावाच्या व्यक्तिरेखेमुळे तिचं खूप कौतुक झालं. शहरात एकट्या राहणाऱ्या तीन मुली, त्यांना त्रास देणारा मुलांचा ग्रुप आणि मुलींच्या बाजूनं उभा राहिलेला एक वकिल यांच्यातील त्या घटनेच्या अनुषंगानं घडणारी या सिनेमाची कथा खुलवताना कुठंही उपदेशाचं डोस पाजत नाही; पण मीनलच्या बाबतीत घडलेली घटना कुठल्याही मुलीच्या बाबतीत घडू शकते. त्या वेळी घाबरून न जाता अशा प्रसंगाचा आपण सामना केला पाहिजे. मुलींनी पुढे येऊन बोललं पाहिजे. हे सिनेमातून मांडण्यात आलंय. 


मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या अत्याचारांसाठी कित्येकदा मुलीलाच जबाबदार धरलं जातं. कधी कधी त्या अत्याचाराने महिला इतक्‍या कोलमडून जातात की, त्या पोलिसांसमोर जाऊन गुन्हा नोंदवतही नाहीत. कोर्टात केस उभी राहिल्यानंतर कोर्टात अत्याचाराचे वर्णन करताना, चर्चा करताना त्या तिघींची ढासळणारी मानसिकता आणि अमिताभचे वकील म्हणून धीर देणारे संवाद या सिनेमाचा गाभा आहेत. यातून बरंच काही नकळत सांगण्यात आलंय. आपण एक माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. मग ती स्त्री असो की पुरुष. एखाद्याला न जाणताच त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हा गंभीर गुन्हा आहे. हे आपण समाज म्हणून कधी शिकणार? ...एखादी मुलगी घरी उशिरा आली तरीही तिच्याकडे संशयास्पद नजरेने बघणाराही समाज आहे. या अशा सर्वांगीण समस्येवर एका घटनेतून प्रकाश टाकणारा पिंक सिनेमा खूप काही सांगून गेला.


रुस्तम पावरीच्या आयुष्यातील एका सत्यघटनेवर आधारित रुस्तम सिनेमा. वरवर पाहताना एका रुस्तम पावरीचा चरित्रपट आहे; पण खरंतर हा सिनेमा जितका रुस्तमचा आहे तितकाच त्याची पत्नी सिंथिया पावरी हिचा आहे. नौदल अधिकारी असलेला रुस्तम सुट्टीत घरी येतो, तेव्हा त्याला पत्नीचे विवाहबाह्य संबंध कळतात. त्यानंतर विक्रम मखिजाचा खून होतो आणि रुस्तम तुरुंगात जातो. विक्रमच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या रुस्तमच्या "मतलब बाजी जितनेसे है, फिर चाहे प्यादा कुर्बान हो या फिर रानी'. या संवादामुळे सिनेमातील हत्येचं रहस्य आणखी गडद होतं. तुरुंगात भेटायला आलेल्या आपल्या पत्नीला रुस्तम सांगतो की, तुला विक्रमने फसवून तुझ्याकरवी मला मात देण्याचं त्याचं कारस्थान होतं. हे सांगताना तो कुठलेही आरोप तिच्यावर न करता तूच हिंमत दाखवलीस तर आपली या रहस्यमय खून खटल्यातून सहज सुटका होईल. तूच साहस दाखवून त्याचा तुला त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी का चालवलाय? ते शोधून काढ. अशा प्रकारे रुस्तम तिला धीर देतो. मी नसताना तुझं दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडणं साहजिक आहे. हेही तो कबूल करतो. पती-पत्नीच्या नात्याचा एक वेगळा पैलू उलगडणारी ही गोष्ट प्रेम आणि विश्‍वासाने फुलते.

एकूणच पिंक, नीरजा आणि रुस्तम या सिनेमांमध्ये नकळपणे आजच्या स्त्रीचीच वेगवेगळी रूपं दाखवण्यात आली आहेत. हे सिनेमे राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झाल्यामुळे त्यात मांडल्या गेलेल्या विषय आणि आशयाने ते प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहतील. 

Wednesday, 7 June 2017

चॅनेल बदला, विचार बदलेल!

काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक मर्यादित भागांच्या मालिका प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्‍यकता आहे... चॅनेल बदला, विचार बदलेल! 



बा र्कचा दर आठवड्याचा टीआरपी आला आणि पुन्हा एकदा सोशल मीडियातून चर्चा झडू लागल्या. अरे, काय हे... या असल्या मालिकांचा आम्हाला कंटाळा आलाय, या बंद कधी होणार याची वाट बघतोय.... पण टीआरपी बघा वाढतच चाललाय. हल्ली सोशल मीडियामुळे नोकरदार स्त्रियांना आणि तरुण-तरुणींना आपलं टीव्हीविषयी वेगळं मत प्रकट करण्याची संधी मिळते. आणि गेले वर्षभर समस्त महिलावर्गाला हाच प्रश्‍न पडलेला आहे की "पुढचं पाऊल', "साथ निभाना साथिया', "ये है मोहब्बते', "ससुराल सिमर का', "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है...' अशा या विविध मनोरंजन वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिका बंद कधी होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. पण हे असं का होतं, याच्यावर उत्तर काय ते आपल्याकडेच आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे गेली 2 वर्षे मालिका पाहणारा सूज्ञ प्रेक्षक मालिका आणि चॅनेलविरोधात आपली मतं आवर्जून आणि तीव्रपणे मांडू लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनेलवर एक ऑनलाईन दबावगट निर्माण झाला आहे. 

"इंडिया'फोरमसारख्या काही ऑनलाईन टीव्ही अपडेट देणाऱ्या वेबसाईट आणि काही वेगवेगळ्या मालिकांविषयीची पेजेस, ट्विटर हॅंडल यांच्या माध्यमातून चॅनेल आणि मालिकांविषयी ऑनलाईन मत प्रदर्शित करून मालिका कुठल्या बघाव्या, कुठल्या चांगल्या, याविषयी बरंच लिहिलं आणि बोललं जातं. इंडिया फोरम बार्कच्या टीआरपीव्यतिरिक्त आपला एक ऑनलाईन टीआरपी देतं. अशी अजूनही काही बेव पेजेस आहेत. त्यावर टॉपला दिसणाऱ्या मालिका बार्कच्या टीआरपीमध्ये पहिल्या दहामध्येही नसतात. अलिकडेच आलेल्या इश्‍कबाज, 24, अम्मा, सिया के राम, कुछ रंग प्यार के ऐसेही, इक दुजे के वास्ते, भागे रे मन अशा कितीतरी वेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. परंतु त्यांना हवा तसा टीआरपी नसल्यामुळे बरेच प्रेक्षक नाराज आहेत.  त्यातल्या काही मालिका बंद झाल्याही. कमी टीआरपीमुळे चांगल्या मालिका बंद होऊ नयेत. असं सूज्ञ प्रेक्षकांना वाटत आहे. त्यापेक्षा साथ निभाना साथिया, पुढचं पाऊल सारख्या मालिका बंद व्हाव्यात. पण वर्षभरातील टीआरपीचे आकडे पाहिले तर "ये है मोहब्बते', "कुमकुमभाग्य', "साथ निभाना साथिया', "स्वरागिनी', "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' आणि आता अलीकडे आलेली "ब्रह्मराक्षस' याच मालिका आलटून-पालटून टॉप ५ येताना दिसतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये काही वाहिन्या आपल्याच ब्रॅंडखाली काही नवी चॅनेल्स आणून त्यावर त्यांच्याच वाहिनीवरच्या जुन्या मालिका त्यावर दाखवत आहेत. त्या जुन्या मालिका दाखवायला सुरुवात झाल्यापासून त्या मालिकांनी सध्याच्या मालिकांना चांगलीच टक्कर दिली आहे. "जोधा अकबर' या मालिकेचं उदाहरण या संदर्भात देता येईल. गावाकडे काही भागात डिजिटलायझेशन आणि केबल सुविधा पोहोचली नसल्यामुळे या वाहिन्यांनी सुरू केलेली नवी चॅनेल्स "फ्री टू एअर' असल्यामुळे जुन्या मालिकांसह गावाकडच्या भागात दिसतात. त्यामुळे जुन्या मालिकांना टीआरपी मिळत आहे. बार्कने आता रुरल आणि अर्बन असा दोन्ही विभागात टीआरपी द्यायला सुरुवात केल्यामुळे हे स्पष्ट झालं आहे. मुळात सर्वसामान्य प्रेक्षकांच्याही आता काही मालिका खरंच डोक्‍यात जायला लागल्यात. पण बंद होण्याचं काही चिन्ह दिसत नाही, म्हणून ते त्याविषयी कधी खिल्ली उडवत; तर कधी गंभीरपणे चर्चा करताना दिसतात. 

एकदा एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्‌टंगडी यांना प्रेक्षकांकडून प्रश्‍न विचारण्यात आला की कंटाळवाण्या मालिका बंद कशा होतील? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, त्या कधीच बंद होणार नाहीत. जोवर तुम्ही रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलत नाही. असाच प्रश्‍न लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना विचारण्यात आला होता, त्या वेळी त्याही असंच म्हणाल्या, चॅनेल बदला, मालिका बंद होतील. 
अलीकडे काही वाहिन्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मालिका मर्यादित भागांच्या असणार, असं जाहीर करूनच प्रसारित करायला सुरुवात केली आहे. चॅनेलचा रिच आणि टाईमस्पेंड वाढवण्यासाठी, नवे नवे विषय, नव्या पद्धतीने प्रोमोतून मांडण्याचा अविरत प्रयत्न प्रत्येक चॅनेलची प्रोग्रामिंग टीम करत असते. पण काही मालिकांच्या बाबतीत आखलेली गणितं फसतात आणि मालिका भरकटतात. याचा कुणालाही दोष देण्यापेक्षा आणि प्रेक्षकांनी बोलून बोलून किंवा मालिका बघून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा आपल्या हातातला रिमोट घेऊन चॅनेल त्वरित बदलण्याची आवश्‍यकता आहे. बऱ्याच घरांमध्ये कुठलंतरी एक चॅनेल लावून घरातली माणसं आपली इतर कामं करण्यात गढून गेलेली असतात. बऱ्याचदा त्यांचं मालिकांमध्ये लक्षही नसतं. परंतु ते चॅनेल संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत न बंद करता लावून ठेवल्यामुळे चॅनेलला मात्र रिच आणि टाईम स्पेंड मिळतो आणि त्यांचा प्रोग्रामिंगचा हेतू साध्य होतो. परवाच ट्रेनमध्ये एक मुलगी सांगत होती, आमच्या शेजारच्या काकूंना कमी ऐकू येतं; त्यामुळे त्या ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मोठ्या आवाजात टीव्ही लावतात, त्यामुळे त्या स्लॉटमध्ये लागणाऱ्या सर्व मालिकांमध्ये सध्या काय ट्रॅक चालू आहे, ते आम्हाला टीव्ही न बघता कळतं. कुठली मालिका किती सहन करायची, हे प्रेक्षकांवरच अवलंबून आहे; त्यामुळे आपण नागरिक म्हणून दैनंदिन जीवनातली कित्येक कर्तव्य बजावत असतो, त्यापैकीच नावडती मालिका न पाहता चॅनेल बदलणे हे कर्तव्य समजून रिमोट हाती घ्यायला हवा. नाहीतर रटाळ मालिका सहन करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय उरणार नाही. या वर्षभरातील जे काही बार्कच्या टीआरपीचे आकडे आपल्यासमोर आले आहेत, ते पाहता त्याच्याशी ४० टक्के प्रेक्षक असहमत आहेत. हे प्रेक्षक सोशल मीडियातून आपली मते आवर्जून मांडत आहेत; त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये १० टक्के बदल घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या जोडीला घरी बसून टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांनी जर आपला विचार बदलून चॅनेल बदललं तर अजून खूप मोठा फरक पडेल आणि सध्याचं टीव्हीचं चित्रं नक्की बदलेल. हे शक्‍य आहे आणि ते प्रेक्षकांच्याच हातात आहे. इतर मनोरंजन वाहिन्यांच्या रेट्यात एपिक चॅनल आपली एक खास ओळख बनवू पाहत आहे. पण त्यांच्या मालिकांना टीआरपीच्या तुलनेत टिकणे कठीण झाले आहे. एकांत, दरीबा डायरीज, राजा, रसोई और अन्य कहानियाँ, देवलोक अशा काही मालिकांना खास चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण त्यांची मागणी आहे की या मालिका त्यांना यू ट्यूबवर पहायला मिळाव्यात. कारण टीव्हीचा रिमोट डेली सोप पाहणाऱ्या घरातील गृहिणींच्या हातात असतो.

युथ चॅनल्स आपल्या टार्गेट ऑडियन्सला खिळवून ठेवण्यात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे अलिकडेच चॅनल व्ही नावाच्या वाहिनीला आपला जॉनर बदलून म्युझिकल व्हावं लागलं. कारण मुळात तरूणाई टीव्ही पाहण्यासाठी काय करावं याचच उत्तर त्यांना मिळालेलं नाही.
प्रेक्षकांना एखाद्या मालिकेचं किंवा संपूर्ण वाहिनीवरील कार्यक्रमांचं हॅबिट फॉर्मेशन होणं ही चॅनेलच्या प्रोग्रामिंग टीमच्या यशाची खूण आहे; परंतु प्रेक्षकांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. आपल्याला एखादी मालिका बघायची सवय लागली की ती सहसा सुटत नाही आणि तिथेच सारं घोडं अडतं. सध्या प्रत्येक वाहिनीवर काही नव्या मालिकांचे प्रोमो झळकतायत. त्यांच्याकडे आता काही प्रेक्षक लक्ष देऊन आहेत आणि सोशल मीडियावरचा प्रत्येक प्रेक्षक "इश्‍कबाज' या मालिकेच्या प्रचंड प्रेमात पडलाय. त्या सर्वांना इच्छा आहे की ही मालिका नंबर वन मालिका व्हावी. त्यासाठी ते रोज काही ना काही कृती करताना दिसतायत. आपलं "शिविका' प्रेम दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. अरे हो, शिविका कोण ते सांगायचं राहिलंच की! शिवाय सिंग ओबेरॉय आणि अनिका ही जोडी सध्या प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय झाली आहे. यांचंच ते कपल नेम आहे शिविका. पण ही मालिकाही १.९ आणि १.५ अशा टीआरपीमुळे बंद होईल की काय, अशी भीती ऑनलाईन प्रेक्षकांना वाटू लागलीय. "इश्‍कबाज' नामकरण, कुछ रंग प्यार के ऐसेही आणि अशा काही चांगल्या मालिकांची संख्या फार कमी आहे, त्या मालिकांना प्रेक्षकांच्या विचारबदलाची आणि चॅनेलबदलाची अपेक्षा आहे. नाही तर "भागे रे मन' या अतिशय लाडक्‍या मालिकेला जसं प्रेक्षकांना मुकावं लागलं, तसंच इतर मालिकांचं होईल, म्हणूनच विचार बदलाचॅनेल बदलेल आणि चॅनेलला बदलावंच लागेल... 

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती १८ नोव्हेंबर २०१६



वेशीवरचे हुंदके

सध्या गालावर खळी पाडत गोड हसत ‘चालतंय की’ असं म्हणणारा राणा चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याच्या संगट त्याचं शेत आणि लाल मातीतली कुस्तीबी याड लावतिया. पण प्रश्न हा आहे की असं किती मुलींना वाटतंय की मला शेतकरी नवरा हवा. किंवा किती मुलांना असं वाटतंय की आपण गावी जाऊन शेती करावी...तर अशी मुलं-मुली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच एखाद्या गावात सापडतील. कारण गावातली युवा पिढी गावातच रुळण्याऐवजी शहराची वाट चालू लागली आहेत. हे वर्षानुवर्ष होत आलंय. आणि आता हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे गावच्या वेशीवर राहिलेत फक्त हुंदके आणि डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या ज्येष्ठांच्या केविलवाण्या नजरा. 

शहरातला मुलगा गावात येतो, गाव बदलतो आणि तो गावाचा सर्वेसर्वा बनतो. अशा गोष्टी आता फक्त सिनेमातच दिसतात आणि घडू शकतात. प्रत्यक्षात ते शक्य नाही. स्वदेस मधला मोहन आठवतोय. शाहरूख खानने खूप छान भूमिका वठवली होती. हा मोहन शेवटी निघतो, कावेरी अम्माला आणि प्रेयसी गिताला वेशीपाशी रडवेल्या स्थितीत सोडून...मग तो लगेचच परततो आणि त्या दोघींचं वाट पाहणं संपतं. पण आज गावेगावी पाहिलं तर अशा कितीतरी कावेरी अम्मा आणि गिता आपल्या माणसाची वाट पाहत हुंदके देतातय. 

घरटी गडी, तरूण मुलं-मुली गावची वेस ओलांडून शहरात जाऊ लागली. याची कारणं पाहिली तर खूप आहेत. पहिलं कारण शिक्षणाचं. उदाहरणच द्यायचं झालं तर कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हा सर्वात साक्षर जिल्हा म्हणून नावाजला जातो. पण याच जिल्ह्यातील अंदाजे ७० टक्के तरूणाई मुंबई आणि आसपासच्या शहरात प्रथम शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी गेली. या ७० टक्के तरूणाई पैकी जवळपास ५० टक्के तरूणाईचा शहरातच संसार थाटून राहण्याकडे कल दिसतो. सणासुदीला घरच्यांना भेटवस्तू घेऊन गावी जायचं आणि पुन्हा यायचं. अशी गावात सतत ये-जा करणाऱ्या तरुणाईचंही एक टोक आहे. ही मुलं-मुली आपला शहरी थाट गावी गेल्यावर पुरेपूर मिरवून घेतात. आमचा मुलगा मोठ्या कंपनीत कामाला आहे. असं त्यांचे पालक गावात सांगून आपला मान वाढवून घेतात. यातंच त्यांना धन्यता वाटते. पण प्रत्यक्षात तो मुलगा कुठेतरी मॉलमध्ये किंवा तुटपंजी नोकरी करत असतो. (असो, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे.) मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणाच्या पट्ट्यात कामानिमीत्त ये-जा करणाऱ्या तरूणाईचं एक वेगळच कल्चर आहे. दुसरं कारण गावाकडे रोजगार मिळत नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे होणारं स्थलांतर. यालाच जोडून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात जाणारी तरूणाई हा मुद्दा घेऊ शकतो. त्याचबरोबर काही पालक आपल्या मुलांना शहरात जाऊनच नोकरी कर, अशी जबरदस्ती करतात. या अशा कारणामुळे शहरात आलेल्या तरूण मनांची व्दिधा मनस्थिती असते. तर काही तरूण शहर की गाव, की दोन्ही असे अधांतरी लटकतात. पण या सगळ्यात घरातील ज्येष्ठ व्यक्ती मात्र एकटे पडतात. 

मुलगा शहरात गेला चांगलं कमाऊ लागला. नंतर तिथेच जम बसवण्याचा विचार करू लागला तर आपल्या आई-वडलांना तिकडे बोलावून घेतो. आणि आजी-आजोबांना शेजाऱ्यांच्या भरवशावर गावातच सोडलं जातं. भारतातील गावोगावी हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने पहायला मिळते. आजच्या काळात एकत्र कुटुंबपध्दतीही टिकण्याचं प्रमाण कमी होऊ लागलंय. तिथे घरातील आजी-आजोबांना कोण विचारणार...अशा स्थितीत आपल्याला काय दिसतं तर उंबरठ्यावर, पारावर बसून वेशीकडे डोळे लावून बसलेल्या ज्येष्ठ व्यक्ती. जुन्या काळात पिढीतलं अंतर वयाने वाढलं तरी मनाने खूप जवळ असायचे. पण आता मनाने आणि वयाने दोन पिढीतलं अंतर वाढतंच आहे. आणि अलिकडे तर आजी-आजोबांना मोठ्ठा टिव्ही घेऊन किंवा अगदी लेटेस्ट फॅशनचा स्मार्ट फोन घेऊन दिला की नातवंडांचं कर्तव्य संपतं. आपले आजी-आजोबा व्हॉट्सअपवर आले हे कौतुकाने मित्रांना दाखवणारी तरुणाई हे विसरते की ते तुमच्याशी दिवसभरातून एकदा तरी संवाद व्हावा यासाठी आलेत व्हॉट्सअपवर. इथेही त्यांची खिल्लीच उडवली जाणार असेल तर तरूणाईशी संवाद साधण्यासाठी आसुलेल्या त्यांनी काय करावं? मग त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्यायच उरत नाही.


आता कामासाठी शहरात जाणं किंवा काहीतरी अनवट वाट शोधावी किंवा फॅशन आणि अडव्हेंच्यर म्हणून गावी सेटल होणं महत्त्वाचं नसून आपली प्रगती कशात आहे शोधणं... जी प्रगती आपल्यातलं माणूसपण हिरावून घेते तिला प्रगती म्हणावं का? हा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीय, अजून किती वर्षे आपण आजी-आजोबांना वेशीवर असे तिष्ठत ठेवणार आहोत...
मला आठवतंय मी शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याबरोबर आमच्या दहावीच्या अर्धा वर्ग मुंबईला निघाला होता. त्यातले काहीजण फक्त शिक्षणासाठी आणि काहीजण नोकरीसाठी असं चित्र होतं. तेव्हा आमच्यासमोर पर्याय नव्हता. पण आता गावाकडे तशी परिस्थिती राहिली नाही. शिक्षणसुविधा मिळू लागली आहे. तेव्हा आमच्या गावात फक्त सकाळच्या वेळात एक एसटी जायची. त्यानंतर ये-जा करण्यासाठी काही साधन नसायचं. पण आता दळणवळणाच्या सुविधाही सुधारल्या आहेत. हे जरी असलं तरी गावात आता एक वेगळाच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे शहरात राहून शिकलं, नोकरी किंवा व्यवसाय केला तर तो ग्रेट. मात्र गावात राहून कुणी हीच गोष्ट करून दाखवली तर त्याला ग्रेट मानलं जात नाही. यामुळे तरूणाईच्या डोक्यात गोंधळ उडालाय. पण यामध्ये कुचंबणा होतेय ती घरातल्या आजी-आजोबांची. नातवंडांना चार शब्द समजावून सांगावेत तर त्यांचं ते ऐकणार नाहीत. कारण मुलांना शेवटी आपल्या आईवडलांनी सांगितल्याप्रमाणे शहरात जा, स्वतःची वेगळी वाट शोध याच गोष्टीत थ्रील वाटतं.


तसं बघायला गेलं तर या प्रश्नावर थेट असं काही उत्तर नाहीय. पण जरा वेगळा विचार केला तर लक्षात येईल की शिक्षणाने अंगी सुसंस्कृतपणा येतो मग ते शिक्षण गावचे असो की शहरातले. माणूस म्हणून तुम्ही किती आणि कसे आत्मसात करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मानण्यावरच सगळं आहे. तुम्ही गावचे म्हणून स्वतःला कमी लेखत राहिलात तर हातचं कमावलेलं सार निसटून जाईल. सध्या समाजाला गरज आहे ती सुदृढ, कणखर युवापिढीची आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठीशी असणाऱ्या ज्येष्ठांची. पण तरूणाईच जर गाव की शहर या विचाराने गोंधळेली असेल आणि ज्येष्ठ मंडळी तुमच्यासोबत नसतील तर निकोप समाजनिर्मीतीचं भवितव्य धोक्यात येईल.


एक छोटीशी गोष्ट इथे आवर्जून सांगाविशी वाटते ती अशी की एका शहरातले आई-बाबा आपल्या मुलाच्या सदा न कदा सोशल मीडियावर असण्यामुळे प्रचंड वैतागलेले होते. त्या मुलाला फोटोग्राफीची आवड होती. तो रोज काहीतरी इनोवेटिव्ह फोटो काढून पोस्ट करत रहायचा. त्याच्यावर आलेल्या कमेंट्स वाचायचा त्यानुसार पुन्हा विचार करायचा असं त्याचं दिवसभर सुरू असायचं. अभ्यासात तो फार काही हुशार नव्हता. एकदा त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं. तुला २४ तास वाय फाय देतो. तीन महिने तुला तुझ्याच खोलीत कोंडून ठेवतो. फक्त जेवणाच्या वेळेला जेवण खोलीत येईल. बाकी तू मात्र अजिबात बाहेर जाऊ शकणार नाहीस. आणि या तीन महिन्यात तू तुझी काहीतरी प्रोग्रेस करून दाखवायचीस. तीही या चार भिंतीच्या आत. मुलाने आव्हान स्वीकारलं. पण त्याला दोन-तीन दिवस कळतंच नव्हतं काय करायचं. सोशल मीडियावर ऑनलाईन राहून थकला. मग एके दिवशी खिडकीच्या बाजूला निवांत पडून राहिला. नुकतीच किरणं खिडकीपाशी रेंगाळत होती. साडे-नऊची वेळ असेल. त्या मुलाच्या खोलीसमोर खिडकीत त्याला एक आजी दिसली, ती मस्त खुशीत गात स्वयंपाकाला सुरूवात करत होती. तो तिच्याकडेच बघू लागला. त्या आजीने गुणगुणत सगळा स्वयंपाक केला...आणि शेवटी एका रेसिपीची वाटीत घेऊन चव घेतली आणि खुशीत अहाहा असं म्हणत निघून गेली. त्या मुलाने चार दिवस बारकाईने निरिक्षण केलं आजी गाणं म्हणत स्वयंपाक करायची आणि निघून जायची. त्याला यावर एक कल्पना सुचली. त्याच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, त्याने तो आजीच्या खोलीच्या दिशेने वळवला. त्यावर तो रोज आजीचा स्वयंपाक शूट करू लागला, तिच्याही नकळत. मग शूट केलेला व्हीडीयो तो ‘ग्रॅनीज सिंगिंग किचन’ या त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू लागला. त्याला खूप हिट्स आणि शेअर मिळू लागले. तीन महिन्यांनी तो खोलीतून बाहेर पडला तेव्हा तो आणि ती समोरच्या खिडकीतली आजी दोघेही स्टार झाले होते...आणि त्या मुलाच्या पालकांना त्याचं खूप कौतुक वाटू लागलं. त्यांनी आपल्या मुलाची जाहीर माफी मागितली. त्याचवेळी त्यांच्या घरात मुलाच्या आग्रहाखातर ती आजी त्यांच्या घराची एक सदस्य बनली.


सांगायचा मुद्दा हाच की आपली प्रगती साधायची असेल तर कुठुनही साधली जाऊ शकते. त्यासाठी शहर की गाव निवडायची आवश्यकता नाही. आणि आपल्या माघारी ज्येष्ठांना उंबरठ्यावर, वेशीपाशी रडवेल्या अवस्थेत सोडून जाण्याचा विचारसुध्दा मनात आणू नका...कारण फिल्मी मोहन पुन्हा घरी येऊ शकतो. पण तुम्ही एकदा शहरात जायचा विचार केलात की कावेरी अम्मा आणि गिताचे हुंदके तुम्ही कसे थांबवणार...’गाव ओस पडतंय, वेशीपाशी आता निशब्द हुंदके’ असं बातम्यामध्ये सांगितलं गेलं तर ती ह्युमन इंटरेस्ट स्टोरी होते. आणि या स्टोरीचा हॅपी एंड तुमच्याच हाती आहे... 



पूर्वप्रसिद्धी ज्येष्ठपर्व त्रैमासिक २०१७

इश्‍कबाजां'चा दुसरा अध्याय

"एक दुसरे के जरुरी हिस्से हैं, ये एक कहानी के तीन किस्से हैं' असं म्हणत इश्‍कबाज या मालिकेत दाखवलेली तीन भावांची गोष्ट इतकी हीट ठरली, की खास "लोकाग्रहास्तव' त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना घेऊन तिची जत्रेत हरवलेली बहीण शोभावी अशी "दिल बोले ओबेरॉय' ही मालिका येतेय. भारतीय टेलिव्हिजनवरील या वेगळ्या प्रयोगाविषयी... 

गेल्या वर्षी 27 जुलैला इश्‍कबाज ही मालिका सुरू झाली. ओबेरॉय खानदानाची ही गोष्ट होती तीन भावांची. हे तीन भाऊ आणि त्यांचं बॉंडिंग पब्लिकला इतकं अपील झालं, की ती सोशल मीडियावर रॉकिंग ठरली. ट्विटर, फेसबुक, यू-ट्युबवर त्यावर इतक्‍या कमेंट पडताहेत, की... 
या तीन भावासांठी तीन वेगवेगळी लव्हसॉंग आहेत, त्यांचे वेगवेगळे व्हिडीयोही आहेत. ज्याचे रिंगटोन त्यांच्या अनेक फॅनच्या फोनवर वाजताहेत. या तिघांची एण्ट्री जेव्हा होते तेव्हा त्यांचे स्वतःचे असे म्युझिक वाजते. तेही लोकप्रिय आहे. थोडक्‍यात, सब कमाल का चल रहा था, और कॉम्पिटिशन शुरू हो गई. तीही याच मालिकेच्या एक्‍स्टेन्शन असलेल्या मालिकेकडून... 
या नव्या मालिकेचं नाव आहे "दिल बोले ओबेरॉय'. इश्‍कबाज जे पाहतात, त्यांना यामागचा संदर्भ कळेलच. 
ही मालिका सुरू होतेय स्टार प्लसवरच, पण खरं सांगायचं तर ही मालिका जास्त पाहिली जाते हॉट स्टार या ऍपवरच. 
व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच 13 फेब्रुवारीपासून ही स्टारवर आणि हॉट स्टारवर दिसू लागेल. 
भारतीय टेलिव्हिजनवर हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असावा. अमेरिकेत फ्रेंड्‌स या सिरीजचे 10 सीझन झाले आहेत. त्यातील कलाकार आणि पात्रं खूप आवडल्याने त्यांचा एक वेगळा प्रवास दाखवण्यासाठी एक नवी मालिका आखण्यात आली होती, पण ती होती वेबसाईटपुरती मर्यादित. "दिल बोले ओबेरॉय' ही मालिकासुद्धा सुरुवातीला स्टारच्या हॉट स्टार ऍपवरच दाखवावी असं ठरत होतं, पण त्यानंतर वाहिनी आणि प्रॉडक्‍शन हाऊस यांनी मिळून ठरवलं, की ती एक वेगळी मालिकाच असावी आणि ती इश्‍कबाजनंतरच्या स्लॉटलाच अर्धा तास ठेवावी असं ठरलं. 
मालिकेचे प्रोमो वाहिनीवर झळकू लागल्यानंतर इश्‍कबाज मालिकेचा ऑनलाईन प्रेक्षकवर्ग प्रचंड खूश झालाय, की त्यांचे थॅंक्‍यू मेसेज, ट्विटस्‌ अजूनही सुरू आहेत. गुल खान आणि करिश्‍मा जैन यांच्या फोर लायन्स फिल्म या प्रॉडक्‍शन हाऊसने इश्‍कबाज सीरियलची कल्पना स्टार वाहिनीवर मांडली होती. ही मालिका सुरू झाली तेव्हा तीन भावांची गोष्ट असलेली ही मालिका प्रेक्षकांना कितपत रुचेल असं वाटलं होतं, पण शिवाय, ओमकारा आणि रुद्र या तीन ओबेरॉय ब्रदर्सनी या मालिकेतून अशी काही जादू केली, की प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या नायिकांना विसरले. एखादी नायिका मध्यवर्ती असलेली मालिकाच हीट होते हा समज या मालिकेने खोटा ठरवला. 
एकाच मालिकेचं हे एक्‍स्टेन्शन मांडण्याचं पाऊल पहिलं असलं, तरी मागोमाग इतर अनेकही त्यांच्यामागोमाग येऊ शकतील. आपली "कॉपीबाज' मनोवृत्ती लक्षात घेता ते नाकारता येत नाहीच... 
कोण आहेत इश्‍कबाज? 
इश्‍कबाज ही मालिका म्हणजे तीन चुलतभावांची गोष्ट. त्यांचं ओबेरॉय कुटुंब एक प्रतिष्ठित गडगंज श्रीमंती अनुभवत आहे. आजी, काका, काकी, आई, बाबा, बहीण हे तिघे भाऊ आणि मोठा भाऊ शिवायची बायको असं हे यांचं ओबेरॉय खानदान. या खानदानाचा रुबाब तुम्हाला प्रत्यक्ष मालिका पाहताना कळेलच, कारण यातला शिवाय राग आला की एक दिवसाआड आपला किमती फोन फेकून देतो. या कुटुंबाला त्यांच्या दादीने मायेने एकत्र बांधून ठेवलंय. तिचा मान राखत या कुटुंबाला असंच एकसंध ठेवायची जबाबदारी या तीन ओबेरॉय ब्रदर्सवर आहे आणि ते तिघेही ही जबाबदारी मस्त पार पाडतायत. बिझनेसमन शिवायला फक्त खानदान महत्त्वाचं वाटतं. ओमकारा हा शिल्पकलेत पारंगत आहे; तर रुद्र हा कॉलेजला जाणारा फ्लर्टी मुलगा आहे. हे तिघे भाऊ अर्धा तास प्रेक्षकांना बांधून ठेवतात. 
शिवाय आहे नकुल मेहता, ओमकारा आहे कुणाल जयसिंग आणि रुद्र आहे लिनेश माट्टू. 
ऑनलाईन चस्का... 
इश्‍कबाजांना (त्याच पात्रांना, त्याच कलाकारांना) घेऊन दुसरी मालिका आणण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यामागे या मालिकेच्या ऑनलाईन प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. कारण ही मालिका ऑनलाईन बघणारा प्रेक्षकवर्ग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. इंडिया फोरमकडून दर आठवड्याला डेली सोपचा "चस्का मीटर' लावला जातो. इथे आपल्या आवडत्या मालिकांना ऑनलाईन मतदान करायचं असतं. त्या मतदानावर त्या आठवड्यातील मालिकांची रॅकिंग ठरते. या रॅकिंगमध्ये नेहमी "इश्‍कबाज' आणि "कुछ रंग प्यार के ऐसे ही' या दोन मालिका आलटूनपालटून नंबर वनला असतात. 
सध्या मालिकेत मोठ्या भावाची म्हणजे "द शिवाय सिंग ओबोरॉय'ची लवस्टोरी दाखवली जातेय. त्यात नकुलबरोबर सुरभी चांदना ही अभिनेत्री त्याच्या पत्नीची भूमिका करतेय. या दोघांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. अगदी इतकं, की ऑनलाईन प्रेक्षक शिवाय आणि अनिकाचा असा असा सीन घ्या असं चक्क ट्विट करून सांगतात. हिंदी मालिकांमधील आघाडीची लेखिका हरनीत सिंग यांनी मा मालिकेची कथा, पटकथा लिहिलीय आणि प्रसिद्ध संवादलेखक जोडी दिव्य शर्मा आणि अपराजिता शर्मा यांनी या मालिकेचे संवाद लिहिले आहेत. हे तीन भाऊ आणि अनिका या पात्राच्या तोंडचे संवाद ऐकताना इतकं मनोरंजन होतं, की दिन बन जाता है. 
या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे ओब्रो मोमेंट. या मोमेंटमध्ये इतर कुणाला एण्ट्री नसते. घरात स्वयंपाक करणारे शेफ असले तरी या तीन भावांना आपल्या हाताने स्वयंपाक करायला खूप आवडतो. खास करून शिवायचा बिझनेसबरोबरच स्वयंपाक करण्यातही हातखंडा आहे. त्याला कॉण्टिनेंटल रेसिपी खूप छान जमतात आणि अधूनमधून तो पंजाबी डीश करून आपल्या कुटुंबाला खूश करतो. आपल्या बायकोलाही तो आपल्या हातची पण तिची आवडती पुरी-भाजी खायला घालतो. तीही तुपात तळलेली. हे तीन भाऊ ज्या ज्या सीनमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांची एक पंचलाईन ठरलेली असते. दिल बोले ओबेरॉय...
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती  ११ फेब्रुवारी २०१७


साहित्य सरोवरातले राजहंस

ज्येष्ठ लेखक, कथाकार वामन होवाळ यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कथेनं आणि त्यांच्या कथाकथन शैलीने अनेकांना साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबण्याची पर्वणी दिली. आपणच लिहिलेलं लेखन अनोख्या शैलीत सादर करण्याची हातोटी मोजक्‍याच साहित्यिकांपाशी असते. होवाळ त्यापैकी एक. त्यांच्याविषयीच्या आठवणी अनेक आहेत; पण ही एक खास आठवण कॉलेजमधील त्यांच्या कथाकथनाची...



आठवणींच्या पाकळ्या गळून पडत नाहीत, तर त्या आठवणींच्या कळ्या होऊन मनात फुलत राहतात. कारण आठवणींना अंत नसतोच. तशीच ही आठवण लेखक वामन होवाळांविषयीची. 
मराठीच्या पाठ्यपुस्तकातून अनेक लेखक भेटायचे. काही लेखकांशी लगेच गट्टी व्हायची. काही लेखक समजून घेण्यासाठी मराठी शिकवणाऱ्या बाईंची मदत घ्यावी लागायची. नुकतीच वाचनाची आवड लागली होती, तेव्हा पुस्तकांची कमतरता भासायची. मग इतर इयत्तेतल्या मुलांची मराठी भाषेची पुस्तकं घेऊन वेगळं काही वाचल्याचा आनंद त्या वेळी मिळायचा. मग हळूहळू ग्रंथालयात गेल्यावर लेखकांशी आणि त्यांच्या पुस्तकांशी रोजच भेटी होऊ लागल्या. अशाच वाचनातून लेखक वामन होवाळ यांच्या काही कथा वाचनात आल्या. 
कॉलेजमध्ये गेल्यावर मराठी वाङमय मंडळाच्या विविध उपक्रमात भाग घेऊ लागले आणि मंडळासाठी कार्यक्रम आखण्याच्या गटात सामील झाले. एके दिवशी आमच्या विल्सन कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख तारकरबाई म्हणाल्या, आपल्या वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात वामन होवाळ येणार आहेत. ते आपल्या काही निवडक कथा सादर करतील. याआधी आम्ही कधीही त्यांना कथा सादर करताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे शंका की कॉलेजमधली मुलं सरांचा कार्यक्रम होईपर्यंत एकाजागी नीट बसतील ना? की चुळबुळ करतील किंवा त्यांच्या लेक्‍चरची वेळ झाली म्हणून निघून जातील? त्यातून कार्यक्रम सादर करायला आम्हाला कॉलेज हॉलच मिळाला होता. एरव्ही आम्ही मराठीचे प्रोग्राम्स एखाद्या छोट्याशा बंदीस्त वर्गातच करत असू. कारण मुलं कमी यायची. ठरल्या वेळेप्रमाणे वामन होवाळ कॉलेज गेटपाशी आले. आमच्या कॉलेजच्या मुलांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना चहापानासाठी एका खोलीत नेलं. तेव्हा आमच्या मराठीच्या बाई होवाळांना म्हणाल्या, कार्यक्रमाला मुलं कमी असली तरी सांभाळून घ्या. दुसऱ्या लेक्‍चरसाठी मध्येच मुलं उठून जाऊ लागली, तर दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. होवाळांना बाईंची चिंता कळली. ते म्हणाले, ठीक आहे काहीच हरकत नाही, ती कॉलेजमधली मुलं आहेत. त्यांना त्यांच्या आवडीनं सवडीनं कथा ऐकू द्या. ती मुलं आहेत, कंटाळा करणार, मधेच उठणार, हे चालायचच. चला आपण हॉलमध्ये जाऊ.
वामन होवाळ हॉलमध्ये आले, तेव्हा अर्धाच हॉल भरला होता. कार्यक्रमाच्या निवेदिकेने त्यांची ओळख करून दिली. मग होवाळांनी गमती जमती करत कथाकथनाला सुरुवात केली. बघता बघता अर्धा असलेला हॉल तुडुंब भरला आणि मागच्या रांगेत काही मुलं उभी राहून कथा ऐकू लागली. या वेळी त्यांनी बेनवाड, येळकोट, वारसदार आणि वाटा आडवाटा या संग्रहातील एकेक कथा सादर केली.
आमच्यासारख्या शहरी मुलांना त्यांच्या कथेतला गावरान गोडवा अतिशय भावला. त्या कार्यक्रमापुरतं आमच्या कॉलेजचं नेहमी इंग्रजाळलेलं वातावरण बदललं होतं. कॉलेजमधले यंग ड्यूड, गाईज आणि फॅशनेबल मुली शेताच्या बांदावर एखादं कणिस हाती घेऊन हुंदडणारे पोरगा-पोरगी झाले होते. वामन होवाळांच्या कथनशैलीने सगळेच गावच्या विश्वात पोहोचले होते. मुलांना कथाकथनात दंग बघून आमच्या मराठीच्या बाईंनाही खूप आनंद झाला. मराठी वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमाला तेही कथाकथनाच्या पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आपल्यातलं गावचं गावपण टिकवूनही मनानं मोठ्ठ व्हायचं, हे त्यांच्या कथनातून आम्हाला समजलं. गावंढळपणातही एक वेगळा स्मार्टनेस दडला आहे, हेही समजलं. कार्यक्रमाच्या शेवटी मराठीच्या बाईंनी खास बीएच्या विद्यार्थ्यांशी बोलायला होवाळांना सांगितलं, तेव्हा आम्हीही दरवाज्यातून डोकावत होतोच. तेव्हा त्यांची दोन वाक्‍यं कानावर पडली. ‘तुम्हाला मी अधिक काय सांगू? तुम्ही साहित्याचे विद्यार्थी. फक्त एक करा की, या साहित्य सरोवरावरून उडणारे बगळे होऊ नका. तर या साहित्य सरोवरात मनसोक्त डुंबा... स्वतः आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.’
कॉलेजच्या आमच्या मंडळात मग खूप साहित्यिक कार्यक्रम होत राहिले. अजूनही होतात. बाई आम्हाला माजी विद्यार्थी म्हणून बोलावतात आणि त्यानिमित्ताने अशा वामन होवाळांसारख्या साहित्यातील राजहंसाना भेटल्याचं समाधान आम्हाला मिळतं. मग त्यांच्या आठवणींच्या कळ्या होऊन त्याचा सुगंध मनात भरून राहतो.
 पूर्वप्रसिध्दी सकाळ मुंबई आवृत्ती डिसेंबर २०१६

अभिनेत्या लेखकाची गोष्ट

‘एव्हरीबडी वॉन्ट्‌स स्टोरीज फ्रॉम रायटर; बट नो बडी वॉन्ट्‌स रायटरर्स स्टोरी’ असं कुठेतरी वाचलं होतं. पण स्वतःमधल्या अभिनेत्याला शोधता शोधता लेखनाची समृद्ध वाट चोखाळणाऱ्या अभिजित गुरू नावाच्या लेखकाची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. 
तो मूळचा नागपूरचा. कॉलेजच्या ग्रुपमध्येच त्याला स्वतःमधील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक सापडला. ‘एक होता राजा’ ही त्याने लिहिलेली पहिली एकांकिका. या एकांकिकेला सर्वोकृष्ट एकांकिकेसह, अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाचा पुरस्कार मिळाला. मग पुढे राज्य नाट्य-स्पर्धेत खूप बक्षिसे त्याने पटकावली. तेव्हा सगळे जण म्हणायचे, ‘अरे, तू खूप छान लिहितोस.’ पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. नागपूरमध्ये बऱ्यापैकी एकांकिका वगैरे लिहून, अभिनय, दिग्दर्शन करून स्वतःला अजमावण्यासाठी त्याने मुंबई गाठली. त्याला अभिनय करायचा होता. 
मुंबईत आल्यावर तो बऱ्याच ठिकाणी कामासाठी जात होता आणि नकार पचवून घरी परतायचा. पुन्हा नव्या जिद्दीने प्रयत्न करायचा. आपण इलेक्‍ट्रॉनिक मीडिया समजून घेतला पाहिजे, या इच्छेने त्याला स्वस्थ बसू दिलं नाही. मीडिया शिकायचा असेल तर सहायक म्हणून काम करायला हवं. मग तो ‘बंधन’ मालिकेसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. आधी मालिकेची स्टोरीलाईन लिहिली जाते. मग कथा लिहिली जाते.
कथाविस्तार होतो आणि पटकथा संवाद लिहिले जातात. त्याला हा माध्यमातला फरक कळू लागला. मालिका लेखन करताना बोलीभाषा, साधी सोपी भाषा लिहावी लागते. भाषा पुस्तकी असू नये. एकच माणूस खूप वेळ बोलतोय, असं होता कामा नये किंवा एकच दृश्‍य फार काळ लांबलंय असं होऊ नये, हे समजू लागलं. पण तरीही त्याला आत्मविश्‍वास वाटत नव्हता. 
मग तो काही दिवसांसाठी पुन्हा नागपूरला गेला. तिथे सगळी माणसं त्याच्या लेखनाची दिवाणी होती. ती त्याला विचारू लागली. ‘अरे, तू छान लिहायचास ना! काय झालं, लेखन का करत नाहीयेस?’ तिथून परतल्यावर त्याने मनाशी निश्‍चय केला की येस्स! लेखन ही गोष्ट आपल्याला छान जमतेय. मग यातच पुढे जायचं आणि लेखनासाठी त्याने स्वतःला झोकून दिलं. ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे १०० एपिसोड अभिजीतने लिहिले. तिथे त्याचं नाव लेखक म्हणून छोट्या पडद्यावर पहिल्यांदा झळकलं. मग तो लेखनाच्याच संधी शोधू लागला. एकदा त्याने नंबर मिळवून चिन्मय मांडलेकर यांना फोन केला. मांडलेकर तेव्हा चार मालिका लिहित होते. त्यांनी अभिजितला विचारलं, ‘तू संवादलेखन करशील का?’ आणि त्यांनी त्याला एक सीन लिहायला सांगितला. त्याने १५ मिनिटात तो सिन लिहून दाखवला आणि त्याच क्षणी त्याची ‘अवघाची संसार’ या मालिकेसाठी संवादलेखक म्हणून निवड झाली. त्यानंतर अभिजितच्या लेखणीला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. 
त्याने ‘अवघाची संसार’ मालिकेची नंतर पटकथा-लेखक आणि संवादलेखक अशी दुहेरी जबाबदारी समर्थपणे पेलली. त्याने आतापर्यंत १५-२० मालिका लिहिल्या आहेत. त्यानंतर त्याने तीन व्यावसायिक नाटकं लिहिली. तो सलग आठ वर्षे मालिका लेखन करतोय आणि तेही तेवढ्याच उत्साहाने. त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सुरू झाल्यापासून टॉप ५ मालिकांच्या यादीत आहे आणि गेले चार आठवडे ती नंबर एकची मालिका ठरली आहे. राधिकाच्या पात्राला त्याने दिलेला नागपुरी ठसका प्रेक्षकांना आवडतोय.  
अभिजितला मराठीत इंग्रजी मालिकांसारख्या वेगळ्या वाटेवरच्या मालिका लिहिण्याची जबरदस्त इच्छा आहे. सध्या तो मालिकालेखन एन्जॉय करतोच आहे. त्यासोबत चित्रपटलेखन आणि नाट्य-लेखनालाही वेळ देतोय. त्याचं ‘तीन पायांची शर्यत’ हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. इथेही त्याचं कौतुक होतंय. असा हा अभिनेता लेखक अधूनमधून अभिनेता होण्याची हौसही पुरवत असतो आणि लेखन क्षेत्रातली त्याची यशस्वी भरारी तर आपल्यासमोर आहेच. अशी ही एका यशस्वी, मनस्वी आणि प्रयोगशील अभिनेत्या लेखकाची गोष्ट. पण त्याला वाटतंय, हा तर त्याच्या यशाचा पहिला एपिसोड आहे. अजून त्याला खूप लिहायचं आहे...
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती १७ जानेवारी २०१७

गावचं घर

गावचं घर सोडून चाकरमानी मुंबईत येणारे चाकरमानी शहरात राहत असले तरी त्यांच्या मनात वसत असतं ते त्यांचं गावचं घर. ही एक अशी समृद्ध परंपरा आहे; जी कोकणातल्या माणसाने जीवापाड जपलीय. सेकंड होम, वीकेंड होम, फार्म हाऊसपेक्षा भावणारं हे आपलं हक्काचं गावचं घर...


पलीकडे ओढ्यावर, माझं गाव ते सुंदर
झाडाझुडपात आहे, लपलेलं माझं घर


बालभारतीच्या पुस्तकातली ही कविता शहरी फ्लॅटमध्ये खिडकीपाशी कॉफी पिताना अधूनमधून आठवत राहते आणि चेहऱ्यावर गोड स्माईल येतं. मग गावाकडचे दिवस आठवतात. लगेचच भावंडांना, मित्रांना मॅसेज, फोनाफोनी होते. या वर्षी मे महिन्यात गावी जायचा प्लॅन आखूया का? अशी विचारणा होते. मग भरभर सारी चक्रं फिरू लागतात. ऑफिसमध्ये काय सांगायचं किंवा एखाद्या वीकेन्डलाच जाऊया का, की एक-दोन दिवसाची सरप्राईज व्हिजीट द्यायची? आजी-आजोबा खूप खूश होतील. असं सगळं एकामागून एक आठवणींची पूर्तता करणं सुरू होतं. 
"गावी जाऊया' हे दोन शब्द कोकणातल्या माणसांना फारच जिव्हाळ्याचे आहेत. गावी जायच्या ओढीने कोकणी माणूस काहीही कारणं सांगेल आणि दोन दिवसांसाठी का होईना; गावी जाऊन येईल. फार्म हाऊस, सेकंड होम, वीकेन्ड होम अशा घराच्या सगळ्या संकल्पना सोडून कोकणातल्या माणसांनी एक वेगळीच संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे, ती म्हणजे शहरात राहूनही गावचं घर जपायचं.
पण गाव भी और शहर भी... असं दोन्ही सांभाळणं सोप्पं नाहीय बरं का! ही तारेवरची कसरत 
फक्त कोकणातल्या माणसांनाच जमते. काही जण अतिशय जीवापाड जपतात ही परंपरा. आता तुम्ही म्हणाल, ही कसली परंपरा?
हो, ही परंपराच आहे. आजवर या परंपरेविषयी कुठेच काही लिहिलं गेलं नाहीय. किंवा कुठले नियमही नाहीत. तरीही ही परंपरा वर्षानुवर्षं सुरू आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात कोकणातील माणसं शहरात गेली. तिथे राहिली; पण गावाला विसरली नाहीत. मे महिना, जत्रा, शिमगा, गणेशोत्सव असे वेगवेगळे सण-उत्सव, सुट्यांचे दिवस सारं काही नीट मॅनेज करून कोकणातली माणसं गावची वाट धरतात आणि त्यांची कोकण रेल्वे त्यांच्यासोबत आहेच. गावची तरुण पिढी शहरात राहत असली तरी हमखास वर्षातून दोनदा तरी गावी चक्कर मारून जातातच. असं हे कोकणी माणसाने मनात आणि प्रत्यक्षात जपलेलं गाव. आता त्याला एक वेगळंच स्वरूप येतंय. शहरात स्थिरस्थावर झाल्यावर गावी येऊन आपलं जुनं झालेलं घर डागडुजी करून किंवा पुन्हा बांधण्याचा ट्रेंड सध्या कोकणात सुरू आहे. जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांना किंवा नात्यातल्याच माणसांना 'ट्रॉल' करणारा आणि होणारा कोकणी माणूस गावच्या घराच्या विषयाने हळवा होतो. 
फॅशन आपले सगळीकडे पाय पसरत असताना यापासून गावचं घर अलिप्त कसं राहील? कोकणातील काही श्रीमंत माणसं गावच्या जमिनीत दोन-तीन मजली बंगला बांधताना दिसतात. ही एक फॅशनच झालीय अलीकडे. बंगला बांधायचा आणि आजूबाजूला नारळ-काजू-पोफळी-केळींची बाग करायची. मग त्याची देखरेख करण्यासाठी एक-दोन केअर-टेकर ठेवायचे; तर काही जणांचा कोकणातील वातावरणाला साजेसं कौलारू घर बांधण्याकडे कल आहे. घर, समोर अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनाशेजारीच फुलांची बाग, घराच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला परसबाग, तिथेच विहीर, पुढे भातशेती असं सगळं पद्धतशीर आणि सुखसोईंनी युक्त गावचं घर बनतं. काही घरांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळीच दिसतात. पण सणासुदीला आणि मे महिन्याच्या म्हणजे कोकणी मेव्याच्या दिवसात अख्खं गाव फुलून जातं.
एखाद्या घरात दोन भाऊ किंवा तीन भाऊ असतील, तर ते आलटून-पालटून शहरातील आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून गावचं घर राखतात. तर काही ठिकाणी एकुलता एक मुलगा असेल तर त्याची मात्र तारेवरची कसरत सुरू होते. काहींनी तर एकुलता एक असूनही लग्न झाल्यावर मुलगा शहरात आणि त्याची बायको गावी राहणार, असं ठरवून गावचं घर सांभाळलं आहे. अशी काही जोडपी तुम्हाला कोकणातल्या गावी सापडतीलच. काही मुलांची लग्न होतानाच वधूसाठी अट घातली जाते. ती अशी, की मुलीला गावचं सगळं सांभाळता आलं पाहिजे. तिला गावची सगळी माहिती हवी. मगच ती सोयरीक जुळते. गावच्या घराचं दार बंद राहणं, या गोष्टीची कोकणी माणसाला फार भीती वाटते. त्यामुळे घराचं दार बंद राहू नये याची खबरदारी कोकणी माणूस घेतो. म्हणूनच गावचं घर ही परंपरा कोकणातून वर्षानुवर्ष जोपासली जातेय. 
"पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेऊ सोने वाटे वाहुनिया दूर...' यातली गंमत अनुभवायची असेल तर गावचं घर याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही...
चला तर मग निघूया..


पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती एप्रिल २०१७

Monday, 5 June 2017

'अॅप'ली मालिका... कधीही, कोठेही!

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपापले अॅप आणले आहेत. मालिकांचे दिवाणे असलेल्या प्रेक्षकांना त्यामुळे त्यांच्या आवडीच्या मालिका कधीही, कुठेही पहाता येतात; पण त्यामुळे आता चर्चा सुरू झालीय. हा केबलला पर्याय ठरू शकतो, की हे अॅप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे? त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...



स्मार्टफोन येता घरी, केबलवाला जाईल माघारी... हे शक्‍य आहे? हो अगदी अवश्‍य. दर महिन्याला केबल पॅकेजचे 400 रुपये वसूल करत फिरणाऱ्या केबलवाल्याला आता तुम्ही हमखास बायबाय करू शकता. कारण तुमच्याकडे आहे स्मार्ट फोन. मग हवाय कशाला केबलवाला? तुमच्या स्मार्ट फोनमध्ये तुम्ही स्टार, झी आणि कलर्स समूहाच्या वाहिन्यांची ऍप डाऊनलोड केलीत की झालं... 

खरंतर वाहिन्यांची ऍप येऊन तशी 4 वर्षं होत आलीत; पण आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीपासूनच ऍप प्रत्यक्ष डाऊनलोड करून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. यामध्ये स्टार प्लस, झी टीव्ही आणि कलर्स वाहिनीवरील मालिका ऍपवर पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खच्चून भरलेल्या लोकलमध्ये, प्लॅटफॉर्मवरच्या वाय-फाय झोनमध्ये किंवा खास उपलब्ध करून दिलेल्या वाय-फाय झोनमध्ये जाऊन मालिका पाहणारे अनेक आहेत. हॉटस्टारसारख्या ऍपमध्ये वाय-फाय झोनमध्ये गेल्यावर मालिकांच्या एपिसोडचे व्हिडीयो डाऊनलोड करून मग ते ऑफलाईन बघता येतात. (युट्यूबवरही ही सोय आधीपासून आहेच) मग हे ऑफलाईन व्हिडीयो आपल्याला 24 तासासाठी सेव्ह करता येतात, हवे तेव्हा पाहता येतात. 

टीव्हीच्या तुलनेत ऍपवर जाहिरातीही कमी असतात. सुरुवातीला तर एखादीच असायची; पण गेल्या वर्षभरात ऑनलाईन प्रेक्षकसंख्या वाढल्यामुळे जाहिरातींचे प्रमाण तीन ते चार झाले आहे. स्टार प्लस आणि कलर्स वाहिनीवर मालिका संध्याकाळी प्राईम टाईम स्लॉटमध्ये प्रसारित झाल्यावर त्या मालिकांचे 2-3 मिनिटांचे टीझर यूट्यूबर टाकण्यात येतात. तिथेच मालिकेचा पूर्ण एपिसोड पाहण्याची लिंक देण्यात येते. झी टीव्ही आणि झी मराठीवरील मालिकांचे मात्र 8 ते 10 मिनिटांच्या एपिसोडचे मिनी रूप यूट्यूबवर टाकण्यात येते. त्याचबरोबर मालिकेतील एखादा बेस्ट सीन 4-5 मिनिटांचा यूट्यूबर टाकण्यात येतो. आणि मग सविस्तर भाग पाहण्यासाठी ऍपची लिंक देण्यात येते. हॉटस्टार, वूट आणि ओझी या तिन्ही ऍपवर हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांतील सिनेमे पाहण्याची सुविधा आहे. हे सिनेमे आधी वाहिनीवर प्रसारित करून मग ते काही दिवसानंतर किंवा महिन्यांनंतर ऍपवर दाखवण्यात येतात. त्याचबरोबर काही लोकप्रिय सिनेमा ठराविक रक्कम आकारून तेही या ऍपवर दाखवले जातात. त्यामुळे तीन किंवा दोन तासांचा सिनेमा तुम्ही अधेमध्ये ब्रेक घेत पाहू शकता. 

या सर्व ऍप्समध्ये प्रेक्षकांना आपल्याकडेच खेचण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे काही ऍप्स खास ऍप्सच्या प्रेक्षकांसाठी वेबसिरिज बनवून प्रेक्षकांना आपलेसे करताना दिसतायत. यासाठी विविध वाहिन्यांनी खास ऑनलाईन कॉन्टेन्ट निर्माण करण्यासाठी टीमही बनवली आहे. 
हॉटस्टार ऍपवर मालिका दुसऱ्या दिवशी पाहता येतात; तर ओ झी ऍपवर त्याच दिवशी रात्री तुम्हाला त्या दिवशी प्रसारित झालेल्या मालिका पाहायला मिळतात. हे वेगळेपण म्हणता येईल किंवा याच मुद्दावरून या दोन ऍपमध्ये स्पर्धा होऊ शकते. 
थोडक्‍यात टीआरपीचे वॉर आता छोट्या पडद्यावरून अति छोट्या पडद्यावर आलेय तर! 
ऍपची गर्दीच गर्दी 
स्टार ग्रुपचे हॉटस्टार ऍप, झी ग्रुपचे ओ झी ऍप, कलर्स ग्रुपचे वूट ऍप, सोनी एन्टरटेनमेंटचं सोनी लिव या वाहिन्यांच्या लोकप्रिय ऍपची स्पर्धा टीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या यूट्यूब चॅनेलच्या ऍपशी आहे. आता तर काही गाजलेली यू'ट्यूबर चॅनेल्स ऍपच्या स्वरूपात दाखल होऊ लागली आहेत; पण टीव्हीएफने त्यांना कडी टक्कर दिली आहे. त्याचबरोबर स्कूपवूप, शुद्ध देसी गाने, बीईंग इंडियनसारखी वेबसाईट बेस मंडळीही एखाद्या गाजलेल्या मुद्द्यावर छोटे छोटे विनोदी, तर कधी गंभीर आशय मांडणारे, तर कधी भारतीय मनाला साद घाललणारे व्हिडीयो बनवून ऑनलाईनविश्‍वात मनोरंजन धमाका करतात. आता तर मालिकाविश्‍वातील राणी एकता कपूर तिचं "अल्ट बालाजी' हे ऍप घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. यावर बालाजीने निर्मिती केलेले सिनेमे आणि खास वेबसिरिज इथे पाहता येतील. त्यामुळे ही स्पर्धा आता अधिक तीव्र होईल. 

फायदा कोणाचा? 
वाहिन्यांची ही ऍप्स हा केबलला पर्याय ठरू शकतो का? की ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे, हा मुद्दाच नाही. त्यांचा प्रेक्षक त्यांच्याकडे राहणारच आहे. टीव्हीवर की स्मार्ट फोनवर हाच मुद्दा आहे! वेगवेगळ्या माध्यमाला वेगवेगळी प्रेक्षक संख्या लाभलीय हा मुद्दा त्यातून अधोरेखित होतोय. यामध्ये फायदा आहे तो वाहिनी आणि प्रेक्षक अशा दोघांचाही! 
काय बरं, काय उत्तम? 
स्टार ग्रुपने पहिल्यांदा ऍपविश्‍वात पाऊल टाकून हॉटस्टार हे ऍप लॉन्च केलं. हे ऍप सगळ्या ऍपमध्ये वरचढ ठरलं आहे. या ऍपवर व्हिडीयो पाहताना बफर होत नाही; पण ओ झी ऍपवर व्हिडीयो सुरू झाल्यावर सुरुवातीला एक मिनीटभर व्हिडीयो नीट दिसत नाही. ब्लरसारखं दिसतं आणि मध्येच एखादी जाहिरात आल्यावर पुन्हा व्हिडीयो सुरू होताना ब्लर दिसतं आणि मग नीट दिसू लागतं. त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांना ओ झी ऍप तितकंसं पसंत नाही. याविषयी ते व्हिडीओखाली कमेंटही वारंवार करत असतात. वूट ऍप ठीकठाक आहे; पण आपल्या आवडत्या मालिकेचे व्हिडीयो पाहणं तसं त्रासदायकच आहे. या ऍपवर सर्च करणं जरा कंटाळवाणं वाटतं. हॉटस्टारचं दिसणं आणि त्यांनी दिलेल्या सुविधा पाहता त्यांचे ऍप या साऱ्यांच्या तुलनेत सध्या तरी उजवे वाटतेय.  


पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती 
८ एप्रिल २०१७

राजकुमारी अनुष्का

'सुपर' या तेलुगू चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अनुष्काचे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या "अरुंधती' चित्रपटामुळे दाक्षिणात्य सिने क्षेत्रात स्थान निर्माण झाले. त्यानंतर "बिल्ला', "मिर्ची', "नागावल्ली', "सिंघम', "वेदम', "रुध्रमादेवी' आणि आता "बाहुबली'मधील देवसेना. अनुष्काने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांमध्ये वेगळेपण दिसते. खरेतर ती साक्षात राजकुमारीच आहे...




अभिनेत्री अनुष्का शेट्टी हे तेलुगू आणि तमिळ सिने क्षेत्रातील उल्लेखनीय नाव. "बाहुबली 2- द कन्क्‍लुजन'मुळे आता तिची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होतेय. तिने साकारलेली देवसेना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजकुमारी देवसेनासारखा लूक सगळीकडे लोकप्रिय होतोय. यूट्युबवर देवसेना लूक या नावाने काही व्हिडीओज पोस्ट करण्यात आले, ते बघून अनेकांना देवसेना लूकविषयी कुतूहल निर्माण झाले. गुगलवरही तिचे देवसेना लूकमधील फोटो सर्च केले जात आहेत. इतकेच नाही तर प्री वेडिंग फोटो शूटमध्येही देवसेना लूक नववधूंच्या अधिक पसंतीस उतरला आहे.
साहजिकच त्यामुळे अनुष्काविषयी जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनुष्का योगाभ्यासाची शिक्षिका होती. तिला सुरुवातीला एका कन्नड चित्रपटात काम नाकारले गेले; पण तिने आपला ध्यास सोडला नाही. 2005 तिने "सुपर' चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर तिची अभिनयातील घोडदौड सुरूच राहिली. "विक्रमारकुडू' हा तिने एस. एस. राजामौलींसोबत केलेला पहिला चित्रपट होता. अनुष्का राजामौलींना आपल्या गुरूस्थानी मानते. "अरुंधती'मध्ये तिने कमालच केली. या हॉरर काल्पनिक चित्रपटात तिने अरुंधती राणीची भूमिका साकारली जी दुष्टांचा संहार करते. अनुष्काने आपल्या अभिनय कौशल्याने अरुंधतीची भूमिका अजरामर केली. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. स्विटी या आपल्या खऱ्या नावाप्रमाणेच तिने गोड चेहऱ्याने आपली छाप पाडली. साहजिकच रुध्रमादेवी चित्रपटातही तिने स्वतःला इतके झोकून दिले की तिच्याशिवाय ही भूमिका दुसरे कुणीच करू शकत नाही, हे तिच्या चाहत्यांच्या मनावर ठसले. "अरुंधती' आणि "रुध्रमादेवी'तील भूमिकेसाठी फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांची तिच्यावर बरसात झाली. राजकन्या, राजकुमारी किंवा देवी अशाच भूमिकांमध्ये अनुष्का दिसणार की काय, असे वाटत असताना तिने प्रभाससोबत "बिल्ला' आणि "मिर्ची' चित्रपट केले. त्यामुळे अनुष्का मॉडर्न लूकमध्येही तितकीच सुंदर दिसू शकते, हे सर्वांनाच पटले. पाश्‍चिमात्य वेशभूषा आणि प्रभाससारखा स्टार अभिनेता तिच्यासोबत काम करत असतानाही अनुष्का कशातच कमी पडली नाही. या दोन चित्रपटांमुळे प्रभाससारखा चांगला मित्र तिला मिळाला. इतकेच नव्हे, तर या दोघांनी एकत्र खूप चित्रपट करावेत, असे त्यांच्या चाहत्यांना वाटू लागले. अनुष्का आणि प्रभासचा चाहता वर्ग सोशल मीडियावर खूपच प्रभावी आहे. प्रभास आणि अनुष्का फॅन क्‍लब अशा नावांनी कित्येक अकाऊंट्‌स आहेत. जिथे प्रभास आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले जातात. इतकेच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांना वाटतेय की त्या दोघांनी लग्न करावे; पण अनुष्काला तर तिच्या आई-वडिलांनी निवड केलेल्या मुलाशीच लग्न करायचे आहे. अनुष्काने आतापर्यंत कॉलीवूड आणि टॉलीवूडच्या सुपरस्टार अभिनेत्यांबरोबर काम केलेय. ज्यामध्ये रजनीकांत, नागार्जुन, सूर्या, रवी तेजा आणि प्रभास यांचा समावेश आहे. 
'रुध्रमादेवी'साठी तिला पाच कोटी मानधन मिळाले तेव्हा ती दाक्षिणात्य सिने क्षेत्रात सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली. "बाहुबली'च्या दोन्ही भागांमध्ये मातब्बर कलाकारांची फौज आहे; पण अनुष्का कुठेही कमी पडत नाही. "बाहुबली'च्या पहिल्या भागात काही मोजकेच सीन तिच्या वाट्याला आले होते; पण दुसऱ्या भागात मात्र तिने आणि प्रभासने प्रचंड मेहनत घेतलीय. ती पडद्यावर दिसतेच आहे. "बाहुबली'प्रमाणेच अनुष्काने साकारलेली देवसेनाही प्रेक्षकांना भावतेय. "बाहुबली'च्या पहिल्या भागानंतर तिचा "रुध्रमादेवी' प्रदर्शित झाला आणि तो खूपच गाजला. त्यानंतर तिने लगेचच "साईज झीरो' या चित्रपटातील सौंदर्या नावाच्या लठ्ठ मुलीची भूमिका साकारली. तिला या चित्रपटात सुरुवातीला वजन वाढवून नंतर कमी करायचे होते. हा समतोल आणि त्यातील वेगळेपणा तिने उत्तमरीत्या साधला. देवसेना साकारल्यानंतर आता तिचा "भागमती' येतोय. यात आजच्या युगाची एक रोमांचक गोष्ट मांडण्यात आलीय. यातही अनुष्का आपला वेगळा ठसा उमटवेल, हे वेगळे सांगायला नकोच. तिचा मोठ्या पडद्यावरील वावर, डौल, शान यामुळे ती अष्टपैलू अभिनेत्री ठरलीय. खरेच अनुष्काचा अभिनय पाहताना साक्षात राजकुमारीच अवतरलीय असेच वाटते...

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती 

साहो रे बाहुबली!

मुन्ना, बिल्ला, डार्लिंग, मिस्टर परफेक्‍ट, यंग रिबेल स्टार, मिर्ची सिनेमातला जय आणि आता बाहुबली अशा विविध नावांनी ओळखला जाणारा लाडका प्रभास. काही वर्षांपूर्वी फक्त तेलुगू अभिनेता म्हणून चर्चेत होता; पण त्याच्या बाहुबली सिनेमाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. तो आता जागतिक स्तरावरचा अभिनेता म्हणून नावारूपास येतोय. त्याच्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत तो टप्प्याटप्प्याने यशाच्या शिखरावर पोहोचला. बाहुबली प्रभासचा अभिनय प्रवास कुणालाही थक्क करेल असाच आहे...


लायब्ररीत पुस्तक आणायला गेले तेव्हा एक बाई ग्रंथपालांशी बोलत होत्या. मी बाहुबली सिनेमा तीन तीन वेळा पाहिला. फक्त प्रभासला बघण्यासाठी. त्यांचं ते बोलणं ऐकूण मलाही कुतूहल वाटलं. त्या दिवशी घरी आल्यानंतर प्रभास कोण आहे तरी कोण? असं म्हणून त्याची माहिती काढली. त्यानंतर त्याचे सात सिनेमे पाहिले. तेव्हा कळलं प्रभास या नावात काय जादू आहे ती. त्याचा एखादा सिनेमा जरी पाहिला तरी आपण त्याचे चाहतेच होऊन जातो.
त्याची संवाद म्हणण्याची शैली, त्याचं हास्य, त्याचं मध्येच एखादा संवाद इंग्रजीत बोलणं, त्याचा डान्स, त्याची ऍक्‍शन, इतर सहकलाकारांसोबतचा वावर सारं काही प्रेमातच पाडतं आपल्याला. बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाच्या आणि प्रभासवरच्या प्रेमापोटी अनेक चाहत्यांनी हा सिनेमा पाहण्यासाठी काय काय करामती केल्यात हे बातम्यातून येतंच आहे. बाहुबली सिनेमा हा भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं बोललं जातंय. जगभरातून या सिनेमाचं कौतुक होतंय. यामागे सर्व टीमची मेहनत आहे; पण खास करून आपलं सर्वस्व पणाला लावलं ते प्रभासने आणि त्याचाच परिणाम हा भव्य दिव्य स्वरूपात दिसून येतोय. त्याचे चाहते अक्षरशः वेडे झालेत. प्रभासचं किती आणि कसं कौतुक करावं यासाठी आता शब्दच सापडत नाहीत. अशी अवस्था आहे; पण प्रभास अजूनही तसाच आहे... नम्र! जसा तो पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर होता. 2002 मध्ये प्रभासने आपल्या अभिनय कलेची सुरुवात केली. ईश्‍वर हा त्याचा पहिला सिनेमा. या सिनेमाने चांगली कमाई केली; पण प्रभासची खास ओळख झाली नाही. यानंतर आलेल्या वर्षम सिनेमाने त्याला तेलुगूमध्ये नाव मिळालं. मग 2005 मध्ये आलेला छत्रपती नावाचा सिनेमा एस. राजामौलींसोबतचा त्याचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर प्रभास यशाची पायरी वर वर चढतच राहिला; पण खास उल्लेख करावासा वाटतो ते 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या डार्लिंग या सिनेमाचा. डार्लिंगमुळे प्रभासला लोकप्रियता मिळाली. चाहत्यांचं प्रेम मिळालं आणि आणि सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही. प्रभास तेलुगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार झाला.
प्रभास सिनेमामध्ये जे पात्र साकारतो तो तसाच आहे असं चाहत्यांना वाटतं आणि त्याचे चाहतेही त्याला त्याच नावाने ओळखू लागतात. डार्लिंग सिनेमानंतर प्रभास चाहत्यांना डार्लिंग म्हणू लागला आणि त्याचे चाहते त्याला डार्लिंग म्हणून लागले. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने चाहत्यांना प्रेमाने डार्लिंग असं संबोधलेल्या कित्येक पोस्ट सापडतील. डार्लिंग आणि मिस्टर परफेक्‍ट हे दोन सिनेमे रॉमॅन्टिक कॉमेडी प्रकारात मोडणारे होते आणि त्यात दाक्षिणात्य स्टाईल ऍक्‍शनही होती. या दोन्ही सिनेमांत त्याच्यासोबत काजल अग्रवाल ही नायिका होती. या सिनेमातली गाणी आणि काही संवाद खूप गाजले. प्रभास आणि काजलची जोडी खूपच छान दिसली. अनेकांना त्यांची जोडी खूप आवडली. काजल सिनेमात प्रभासला हाक मारते. त्यात खूप वेगळेपण आहे. ते एकमेकांना पाहून संवाद म्हणताना मान हलवतात. दोघांचं अचूक टायमिंग हे सारं काही प्रेक्षकांना खूप भावतं. दोघांची गाणीही हिट आहेत. त्यानंतर अनुष्का शेट्टीसोबत प्रभासचे चार सिनेमे झाले. तेही लोकप्रिय झाले. बाहुबलीच्या दोन भागांचं यश तर आपल्यासमोर आहे. या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांनी तितकीच उचलून धरली. अनुष्काबरोबरचा मिर्ची हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर प्रभासने बाहुबलीचं कॉन्ट्रॅक्‍ट साईन केलं. मग सिनेमासाठी पाच वर्ष स्वतःला वाहून घेतलं. या वेळी त्याला अनेक निर्माते प्रलोभनं दाखवत होते. त्याच्या घरी फेऱ्या मारत होते. इतकंच कशाला त्याचं सिनेमाप्रती समर्पण इतकं की त्याने आपलं लग्नही पुढे ढकललं. आता दिग्दर्शक सुजीथ यांच्या साहो नावाच्या धम्माल ऍक्‍शपटात तो काम करतोय. त्याचा टिझर हिंदीसह सर्व दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल. पहिल्याच सिनेमापासून प्रभासची माचो आणि चार्मिंग पर्सनॅलिटी बनली होती. त्यामुळे प्रभासचा सिनेमा बघायला जाताना चाहते काही प्रश्‍नांविषयी कुतूहल असतं. जसं की या सिनेमात त्याची एंट्री कशी असेल. त्याचे ऍक्‍शन सीन्स कसे असतील. गाण्यांमध्ये डान्स कसा असेल? त्याचा नायिकेसोबतचा पहिला सीन कसा असेल. तो नायिकेला कसं प्रपोज करेल. असे अनेक प्रश्‍न चाहत्यांना पडतात आणि ते पूर्ण सिनेमाभर त्याचा पडद्यावरील वावर पाहून थक्क होतात. प्रभास व्यक्तिशः लाजाळू स्वभावाचा आहे. त्याचं त्याच्या चाहत्यांवर विशेष प्रेम आहे. त्यांना तो कधीच नाराज करत नाही. त्यामुळे थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या तोंडी साहो हाच शब्द उच्चारला जातो. सध्या बाहुबलीचा दुसरा भाग पाहताना प्रेक्षकांची प्रतिक्रियाही अशीच आहे, "साहो रे बाहुबली...' बाहुबली हे सिनेमाचं नाव असलं तरी ते आता प्रभासचंच दुसरं नाव होऊन गेलंय आणि "साहो रे बाहुबली' हे गाणं म्हणून नाही तर प्रेक्षकांच्या त्याच्याप्रती त्याच भावना आहेत.
प्रभासच्या सिनेमातील नायिका....(चौकट)
प्रभासने आतापर्यंत त्रिषा, असिन, इलियाना डिक्रूज, कंगना राणावत, तापसी पन्नू, काजल अग्रवाल, अनुष्का शेट्टी, नयनतारा, तम्मनाह या नायिकांसोबत काम केलं आहे; पण त्याची लोकप्रिय जोडी ठरली ती अनुष्का आणि काजलसोबत. त्याच्या चाहत्यांना त्याला अनुष्का आणि काजलसोबत बघायला अधिक आवडतं.
प्रभासविषयी थोडक्‍यात... (चौकट)
व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं प्रभासचं पूर्ण नाव. भक्त कन्नप्पा, गीतांजली हे त्याचे आवडते तेलुगू सिनेमे. प्रभास राजकुमार हिरानीचा चाहता आहे. त्याने मुन्नाभाई एमबीबीएस आणि 3 इडियट्‌स हे सिनेमे जवळजवळ 20-25 वेळा पाहिले आहेत. रॉबर्ट डे निरो हा प्रभासचा आवडता हॉलीवूड कलाकार. प्रभास हा पहिला दाक्षिणात्य कलाकार आहे ज्याचा पुतळा वॅक्‍स म्युझियममध्ये उभारण्यात आला. प्रभासला वाचनाची खूप आवड आहे. त्याच्या घरातच एक लायब्ररी आहे. फाऊंटन हेड त्याचं आवडतं पुस्तक. त्याला खेळाचीही प्रचंड आवड आहे. खासकरून व्हॉलीबॉल खेळायला आवडतं. त्याच्या घराच्या जवळच त्याने व्हॉलीबॉल कोर्ट केलाय. मित्रांसोबत खेळण्यासाठी. त्याला वाटतं हा खेळ हाच उत्तम व्यायाम आहे. प्रभास निसर्गात रमतो. त्याला पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणं आवडत नाही. म्हणूनच घरासमोर सुंदर बाग करून काही पक्ष्यांना त्याने बागेत ठेवलंय. चिकन बिर्याणी ही त्याची आवडती डिश. प्रभासला काळा रंग आवडतो आणि सूटही करतो. 

पूर्वप्रसिद्धी - सकाळ मुंबई आवृत्ती

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...