Friday, 3 October 2014

प्रेरणादायी प्रेम


मनाचा विकास, विचारांचा नवेपणा असावा, भावनेचा उत्कर्ष दर्शवणारी कृती घडावी, आत सळसळणा-या असंख्य विचारांना व्यक्तता मिळावी, क्षणोक्षणी येणा-या गोड अनुभवांचं उदात्त ह्रदयंगम विश्व तेजस्वी कलाकृतीत प्रतिबिंबित व्हावं, अशी अभिलाषा बाळगणा-या प्रतिभावंत लेखकांच्या प्रेमाची गोष्ट त्यांचं आणि आमचं सेम नसतं या कथासंग्रहात शब्दबध्द झाली आहे.
साहित्यिकांच्या साहित्यकृतींकडे, त्यांच्या खाजगी आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न या कथासंग्रहात आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कोणत्या घटना त्यांच्या सृजनासाठी प्रेरणा ठरल्याएकंदरीतच त्या घटनांनी त्या साहित्यिकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि दृष्टिकोनावर कोणता प्रभाव टाकलेला आहे हे शोधण्याचा प्रयास या कथासंग्रहात आहे



विलक्षण प्रतिभावंतांच्या रहस्यमय व्यक्तिमत्त्वाची झलक वाचकांसमोर पेश करण्याचा प्रयत्न केला आहे.’’ शी मनोगतात मूळ लेखिका पुष्पा भारती यांनी आपली भूमिका मांडली आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी हा कथासंग्रहाचा मराठीत अनुवाद केला आहे. प्रेम या भावनेच्या स्पर्शानेच अनेकांचं आयुष्य बदलतं आणि काहींचं आयुष्य उद्ध्वस्तही होतं, असं आपण पाहिलंय. या उक्तीचा प्रत्यय देणारा त्यांचं आणि आपलं सेम नसतं हा प्रेमकथांचा संग्रह आहे.

कायाकल्प या कथेतून रेनर मारिआ रिल्के आणि बेनवेनुटा यांची पत्रांतून उलगडणारी भावस्पर्शी प्रेमकहाणी वाचताना आपल्याला थक्क व्हायला होते. कवी रेनर मारिआ रिल्के यांच्या सहवासाने समृद्ध झालेली बेनवेनुटा या कथेत आपल्याला भेटते. कवी रिल्के माझ्या प्रत्येक संघर्षात आणि विजयात मला साथ देणारी माझी प्रियदर्शनी’’ असा बेनवेनुटाविषयी आदर व्यक्त करतात. कवी रिल्केंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृताम्याच्या नावाने बेनवेनुटा त्यांना पत्र लिहिते. “माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात तुमचा फार मोठा वाटा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी या शब्दाचं उच्चारण करत राहीन तो शब्द आहेधन्यवाद अशा भावस्पर्शी वाक्याने या तरल प्रेमकथेचा शेवट होतो.

मर्मभेदी लेखन करणारे अँतन चेकॉव्ह आणि लीडिया यांची प्रेमकहाणी मंत्रमुग्ध या शिर्षकाप्रमाणेच वाचकाला मंत्रमुग्ध करते. “जिवंत प्रतिभाच विचारांना जन्म देऊ शकते. जे काही अनुभवाल त्यावर पूर्ण इमानदारीने लिहाअसा सृजनाची वाट चालणा-या प्रत्येकाला आपलासा वाटावा असा प्रेमळ सल्ला देणारे चेकॉव्ह आणि चेकॉव्ह सोबतच्या अनंत आठवणींचे भांडार स्वतःमध्ये सामावून घेऊन जगणारी लीडिया यांची प्रेमकथा अनोखीच म्हणायला हवी

डेव्हिड कॉपरफिल्ड ही प्रसिद्ध कादंबरी लिहिणारा चार्ल्स डिकन्स ती आत्मकथा आहे हे जाणून होता. या कादंबरीच्या रूपात त्याने आपल्या प्रेयसीला अनमोल अशी भेट दिली होती. आणि त्याची प्रेयसी डोरा हिने ती भेट ओळखली होती. चार्ल्स डिकन्स आणि डोरा यांचं प्रेम एका प्रसिद्ध कादंबरीची सृजनप्रेरणा ठरलं. ही कथा वाचताना आपल्याही स्वप्नाची समाप्ती होऊ नये, असे वाटते.
जगप्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स याने पन्नास पुस्तकं लिहिली. आठशे पानांची आत्मकथा लिहिली. पण त्याच्या आयुष्याचं सार एका अडोतीस पानांच्या माईंड अँड एंड ऑन इट्स टॅथर या पुस्तकात सामावलेलं आहे. त्याची प्रेयसी कॅथी हिचा कॅन्सरने मृत्यू होतो. आणि कॅथीच्या भेटीपूर्वी तो जसा एकटा असतो तसाच तिच्या मृत्यनंतर एकटा, एकाकी होऊन जातो. अशी प्रेमकहाणी आहे एच. जी. वेल्स आणि कॅथीचीहजारों प्रतिबिंब एक सत्य!

आर्थर मिलरच्या लेखक व्यक्तिमत्त्वावर जिवापाड प्रेम करणारी सौंदर्यसाम्राज्ञी मर्लिन मनरो आणि विश्वविख्यात नाटककार आर्थर यांची प्रेमकहाणी दंतकथा बनून तुमच्या आमच्या मनात कायमची जिवंत राहिलेली आहे. कारण दंतकथेला विस्मृतीचा शाप नसतो. असे लेखकाने या कथेविषयी म्हटले आहे. “माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ आहे विश्वास, भरवसा. लहान मूल ज्या विश्वासाने एखाद्याच्या मांडीवर झोपतं. त्याप्रमाणे आपण सर्वस्व सोपवून ज्याच्यावर विश्वास ठेवू शकू अशा माणसावर मी प्रेम करू शकते असा सुंदर विचार देणारी ही प्रेमाची गोष्ट आहे.

दस्तोवस्की आणि मारिया यांची अपराजेय प्रेमकथा आहे. आधुनिक जगातील ताणतणावांचे खोलात जाऊन विश्लेषण करणारा लेखक दस्तोवस्की. विलक्षण प्रतिभेचा धनी असलेला हा साहित्यिक आपल्या व्यक्तिगत जीवनात कसा होता, हे जाणून घेणासाठी अपराजेय ही कथा महत्त्वपूर्ण ठरते.
अशा या प्रेमाला शब्दात मांडू पाहणा-या प्रेमपत्रांसारख्या लिहिलेल्या जगप्रसिद्ध कलावंतांच्या  विलक्षण प्रेमकथा वाचताना प्रेमाची प्रेरणादायी अभिव्यक्ती अधोरेखित होते. म्हणूनच असं म्हणावसं वाटतं की त्यांचं आणि आपलं सेम नसतं


Saturday, 13 September 2014

सहजीवनाची ‘गुरूपौर्णिमा’

नुकताच गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘गुरूपौर्णिमा’ हा चित्रपट पाहिला. नातं की करिअर या प्रश्नाने निर्माण केलेल्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या तरूण पिढीला विवाहानंतरही याच समस्यांशी पावलोपावली झागडावे लागते. यावर उपाय काय, यातून मार्ग कसा काढायचा, तडजोड कुणी करायची, एकमेकांना समजून कसं घ्यायचं…या सर्वांची उत्तरं आपल्या ‘गुरूपौर्णिमा’ या चित्रपटातून मिळतात.

या चित्रपटामध्ये साचेबद्ध आयुष्य जगू पाहणारे पौर्णिमाचे आई-वडील आहेत. आपल्या करिअरचा ध्यास घेतलेली पौर्णिमा आहे. आपल्या कलेवर प्रेम करणारा, नात्यांना सावरण्यासाठी धडपडणारा गुरू आहे. गुरूच्या सुखाचा सतत विचार करणारी त्याची आई आहे. अशी अनेक पात्रं या चित्रपटामध्ये आपल्या ठायी असलेल्या अनेक भावभावनांचा पुरस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटाची कथा स्वप्निल गांगुर्डे यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद जितेंद्र देसाई यांचे आहेत.

कला सर्वसामान्य माणसाला क्षणभराचा विरंगुळा देते, पण कलेच्या प्रेमात असणा-या माणसाचे आयुष्यच त्या कलेच्या ध्यासाने झपाटलेले असते. अशी व्यक्ती कलेचा ध्यास घेताना आपल्या कलेला समजून घेणा-या व्यक्तीच्याच शोधात असते. या चित्रपटात गुरू कसबेकर या दिग्दर्शकाचे पात्र अभिनेता उपेंद्र लिमये याने साकारले आहे. एक ध्येयवेडा दिग्दर्शक, कलाप्रेमी, प्रियकर आणि पती अशा फेजमधून जाताना तो समर्थपणे यातून मध्यममार्ग शोधतो. पण आपल्या करिअरच्या (अभिनय) क्षेत्रात यशाच्या पाय-या चढताना पौर्णिमा (सई ताम्हणकर) मात्र कौटुंबिक जबाबदा-या पेलताना असमर्थ ठरू लागते. मग पुढे काय होते, नातं की करिअर या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडतं का, पौर्णिमाला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते का, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चित्रपट पहायलाच हवा.

आपल्या मनातील भावना समजू शकेल. आपल्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मानसिक आधार देऊ शकेल, अशा जोडीदाराच्या शोधात आपण असतो. पण अलिकडे लग्न म्हटले की आजच्या तरुणाईसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकलेले दिसतात. लग्न या सर्वोत्तम संस्काराची ते भावना आणि विचार पणाला लावून चिकित्सा करू लागतात. त्यातून प्रश्नांची, समस्यांची भली मोठी यादी तयार होते. नातं आणि करिअर सांभाळून आपलं सहजीवन साजरं करणं, फारच कमी जोडप्यांना जमतं.

प्रेमात पडणं ही नैसर्गिक, सहज स्वाभाविक घटना आहे. पण मग त्यातला स्वप्नाळूपणा विरून गेला की वास्तवाची झळ बसू लागते. एकमेकांबद्दल कितीही प्रेम असलं, वागता - बोलताना एकमेकांना सांभाळून घेतलं, कितीही उदात्त दृष्टिकोन ठेवला तरी उमलणारं प्रेम कोमेजू लागतं.

आपण भारतीय लोक लग्न हा संस्कार मानतो. त्यात प्रेम, शारीरिक गरज आणि कुटुंबव्यवस्था या तीनही गोष्टी अंतर्भूत आहेत. यातील कुठलीही गोष्ट वरचढ ठरू नये. या चित्रपटात या तिन्ही गोष्टींमुळे गुरू आणि पौर्णिमाच्या नात्यात संघर्ष निर्माण होतो. या तिन्ही गोष्टीतील कुठलीही एकच गोष्ट महत्त्वाची मानून विवाहबंधन साजिरे होत नाही. प्रेम, शारीरिक गरज आणि कुटुंबव्यवस्था या तिन्ही गोष्टी लग्न संस्थेत महत्त्वाच्या आणि परस्परपूरक आहेत.

या चित्रपटातील पौर्णिमाच्या आई-वडीलांची भूमिका काही प्रेक्षकांच्या पचनी पडणार नाही. त्यांना वाटेल आजच्या काळात सिनेक्षेत्रात काम करणा-या स्त्रियांकडे आणि पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पण या चित्रपटातील पौर्णिमाच्या आई-वडलांसारखे पालक अजूनही या समाजात आहेत. त्यांना बुरसटलेल्या किंवा मागास विचारसरणीचे न मानता साचेबद्ध आयुष्य जगू पाहणा-या, आयुष्यातील आव्हांनाना घाबरणा-या गटाचे ते प्रतीक आहेत. त्यांनी साधं-सरळ आयुष्य स्वीकारलेलं आहे आणि त्यांना त्यातच आयुष्य सन्मानाने जगल्यासारखे वाटते. पण आपल्या करिअरच्या ध्यासाने, कलेच्या ध्यासाने अनेक आव्हानांना तोंड देण्या-या तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले गुरू आणि पौर्णिमा काही काळासाठी दुरावून पुन्हा आयुष्य नव्याने सांधताना दिसतात. आपलं प्रोफेशन आणि रिलेशन यांच्याकडे स्वतंत्रपणे पाहिले पाहिजे, हा सकारात्मक बदल ही या चित्रपटाची सर्वांत सुंदर बाजू आहे. ऐकावी वाटते, स्पर्शातली कविता पुन्हा पुन्हा… हे गाणं अतिशय रोमॅँटिक आणि श्रवणीय झालं आहे.

सध्यस्थिती पाहता विवाहसंस्था - कुटुंबव्यवस्था यांचा पायाच ढासळण्याची लक्षणे प्रकट होऊ लागली आहेत. आजच्या नात्यांमध्ये दिखाऊगिरी वाढलेली दिसते. लग्न तर कुणीही करतं परंतु वैवाहिक जीवन समृद्ध आणि समाधानी होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांनाच त्या वैवाहिक, कौटुंबिक जीवनातून सहजीवनाचा खरा आनंद मिळतो.

शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा अलिखित करार म्हणजे प्रेम. हा विश्वास विवाहबंधनाने अधिक दृढ होतो. असं म्हणतात की माणूस जोडणं म्हणजे जग जोडणं. आपल्या समाजात आपण विवाह संस्काराने माणसं जोडण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात करतो. ही समज या चित्रपटातील नायक गुरूकडे आहे. त्याला नाती तोडण्यापेक्षा नाती जोडायला आवडतं.

विवाहानंतर सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित व्हायला हवे. आपल्या कुटुंब पद्धतीत आपण सहजीवनाचा आग्रह धरत नाही. त्यामुळे सहजीवन ही संकल्पना आजतागायत प्रत्यक्षात साकारतानाचं प्रमाण कमी आहे.
स्त्री-पुरुष यांच्यात सामंजस्य आणि स्नेह नांदताना दिसेल तेव्हाच ख-या अर्थाने समानता येईल. एकमेकांवर अंमल गाजवण्याची धडपड जिथे असते तिथे सहजीवन शक्य होत नाही. म्हणजेच समाजात दोघांचाही दर्जा, कदर व किंमत सारखी राहू शकली तरच सहजीवन शक्य होते.
स्वतःच्या व जोडीदाराच्या स्वभावाची वैशिष्ट्ये समजली की ती जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये काय व कोणते बदल करायचे हे समजते. आणि असे सकारात्मक बदल वैवाहिक नात्याला वेगळं परिमाण देत असतात.

विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी एके ठिकाणी असं म्हणतात की, परस्पर सहवासातून एकमेकांची भावनिक समृद्धी करणं, आस्था दाखवणं, दिलासा देणं, एकमेकांचा आदर करणं अशातून वैवाहिक नातं उमलतं, फुलतं आणि मग कौटुंबिक जीवन सुंदर होतं. म्हणूनच जेव्हा स्त्री, पुरुष एकमेकांतील भेद-वैशिष्ट्य यांचा जाणिवपूर्वक आणि प्रेमादरानं स्वीकार करतील तेव्हाच प्रेम बहरण्याची शक्यता निर्माण होते. आणि त्यांच्या नात्यातील ही पौर्णिमा चंद्रासोबत साजरी होते… या चित्रपटाचे गुरूपौर्णिमा हे नाव अतिशय समर्पक आणि सूचक आहे. चित्रपटातून तरुण पिढीला ब-याच प्रश्नांची उकल होईल. हा चित्रपट नवविवाहितांनी जरूर बघावा आणि आपल्या वैवाहिक जीवनात थोडसं डोकावून पहावं. नात्यांना जपणारी सहजीवनाची ही गुरुपौर्णिमा अनुभवायलाच हवी.



( ही चित्रपट समीक्षा नसून चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात उमटलेल्या विचारांचं संकलन आहे.)

Sunday, 24 August 2014

स्वप्न (भाग दोन)

अशा या शिकारी मंडळींना मिळणारा मानसन्मान पाहून मुकुंदालाही वाटले की आपणसुद्धा बंदूक घ्यावी आणि शिकारीसाठी निघावे. एखादे रानडुकर मारूनच घरी परतावे. खूप दिवस याबाबत विचार करून त्याने बंदूक घेतली. गावातल्या नावाजलेल्या दोन शिकारी मित्रांकडून शिकारीचे धडे घ्यायला सुरुवात केली. मुकुंदाचा मुलगा आपल्या पित्याचे बंदूकीचे प्रशिक्षण न्याहाळीत होता. 

थोडी सवय झाली आनी बंदूक चालवचो अनुभव इलो काय, तू येवस्तीत शिकार करशीत, गावकरी मुकुंदाला प्रोत्साहन देऊ लागले. तर मुकुंदाच्या विरोधात असलेले तोंडातील पानाची पिंक टाकून म्हणायचे, ह्या मेल्याक काय जमाचा नाय पारधीचा. ह्यो नुसतो बारीक-सारीक  जनावराचीच शिकार करतलो. ह्येका काय रानडुकर कदी गावाचो नाय. मुकुंदा मात्र निराश न होता नियमितपणे पारधीला जात होता. पण अजूनही एकही शिकार त्याच्या हातून झाली नव्हती. त्यामुळे तो जरा चिंताग्रस्त होऊ लागला होता. 

पण त्या दिवशी रात्री तर त्याने कमालच केली. संध्याकाळी तो रम्या आणि सु-या या आपल्या शिकारी मित्रांसोबत शिकारीला गेला होता. हळूहळू अंधार पसरत चालला होता. घनदाट जंगलात ते तिघे वाट काढत-काढत सावजाचा माग काढत होते. खूप टेहळणी करूनसुद्धा सावजाचा पत्ता नव्हता. अचानक झुडूपात सरसर ऐकू आली. कुठले तरी जनावर आपल्या दिशेने येत असल्याची मुकुंदाला पक्की खात्री झाली. तो नीट न्याहाळू लागला. त्याचे शिकारी मित्र आसपास सावजाचा माग काढत होते. इतक्यात मुकुंदाला त्याच्या समोर थोड्या अंतरावर एक मोठेसे रानडुकर दिसले आणि त्याने लागलीच चतुराईने नेम धरला. बंदुकीचा चाप ओढून क्षणात रानडुकराला दोन बारात ठार केले. बंदूक झाडल्याचा आवाज ऐकून रम्या आणि सु-या चपापले ते मुकुंदाच्या दिशेने धावले. ते थोडे घाबरले होते. मुकुंदाने काय केले असे कोण जाणे…असे मनात येऊन ते समोर बघताच आश्चर्यचकित झाले. शाब्बास रे मुकुंदा…शेवटी तुया रानडुकराची शिकार केलंसच. तुया आता चांगलो तरबेज शिकारी झालंस. रम्या आणि 
सु-या त्याला असे काय काय बोलून त्याच्या धाडसाचे कौतुक करत होते. 

पण मुकुंदा मात्र स्तब्ध उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने हातातली बंदूक खाली टाकली आणि मटकन खाली बसला. मुकुंदाला काय झाले? रम्या, सु-याला काहीच कळेना. “आज मी एका निरपराध मुक्या प्राण्याचा जीव घेतला रे…” असे म्हणून मोठ्याने कळवळून मुकुंदा रडू लागला. त्याच्या अशा बोलण्याने रम्या, सु-यालाही आपली चूक कळून आली. त्यांनी शरमेने माना खाली घातल्या. 

या सर्व घडलेल्या प्रकारानंतर गावात कुणाच्याही घरात बंदूक दिसेनाशी झाली. रामेश्वराला कौल त्यानंतर कधी गुरवाने लावला नाही आणि गावात रक्तबंबाळ झालेले रानडुकर काठीला बांधून देवळात आणले गेले नाही. मात्र गावाला सांस्कृतिक दृष्टीने जोडणारी रामेश्वराची जत्रा आणि जत्रेतील दशावतार दणक्यात साजरा झाला. आज त्या गावातली ती अंधश्रद्धा कायमची नाहीशी झाली होती. शिकारी असल्याचा मानसन्मान गळून पडला होता. ही घटना ज्या मुकुंदामुळे घडली त्याला आता गावातले लोक मानसन्मान देऊ लागले. मुकुंदाची बायको आपल्या नव-याचे शिकारीचे वेड कायमचे गेले म्हणून आनंदून गेली. पण मुकुंदाच्या मुलाचे नामवंत शिकारी होण्याचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.    


शिकारीची ही प्रथा या कथेत फक्त संपुष्टात आली आहे. अजूनही कोकण आणि गोव्याच्या काही भागात अशा प्रकारची अंधश्रद्धा ठाण मांडून बसली आहे. तिचा समूळ नाश करण्यासाठी अशा अनेक मुकुंदांनी पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे…

Friday, 15 August 2014

स्वप्न (भाग एक)


काही स्वप्न स्वप्नच राहिली तर चालू शकते. कारण काही अशी स्वप्नं प्रत्यक्षात साकार झाली तर घातक ठरू शकतात. आपल्या मूल्यांना ती हादरा देऊ शकतात. भूतदया हे आपले मूल्य आपण कसे विसरू शकतो…
 मिलला टाळे लागल्यावर लालबागहून मुकुंदने थेट आपल्या बायको मुलासह कोकण गाठले. वडिलोपार्जित जमिनीच्या तुकड्यावरच आता आपला पुढचा संसार सुरू ठेवायचा निश्चय त्याने पक्का केला. तो गावाला आला, पण गावक-यांना त्याचे काही विशेष असे काहीच वाटले नाही. तसा मुकुंद गावातील लोकांच्या तितकासा परिचयाचा नव्हता. मुंबईला राहत असताना तो गावी एक-दोन दिवसापुरता येई.
त्याने आपले जुने घर दुरुस्त करून घेतले. चाळीतल्या दहा-बाय बाराच्या खोलीतल्या संसाराला त्याने कौलारू घरात सजवायला सुरुवात केली. जमिनीत घामाच्या धारा वाहेपर्यंत तो खपू लागला. त्याचा मुलगा गावच्या शाळेत जाऊ लागला. बायको आजुबाजूच्या बायकांच्या गोतावळ्यात मिसळू लागली. नव-याला धीर देत संसार सावरू लागली. मुकुंदला हळूहळू गावकरी आपल्या गावचो माणूस म्हणून वागवू लागले.
मुकुांदाला शेतात राबताना पाहून गावक-यांना आपले हसू आवरणे कठीण जायचे. ह्येका आजून वायच कुदळीन खनाक येना नाय. ह्यो शेती काय करतलो? असा गावक-यांना प्रश्न पडे. बाकी मुकुंदाला शेतीचे काम तितकेसे काही जमले नाही.  
त्याने आपल्या सबंध शेतजमिनीत आंब्या-काजूच्या झाडांची आणि नारळाची लागवड करायचे ठरवले. तसे केलेही कारण जमिनीच्या तुकड्यात राबण्यात मुकुंदाला अजिबात रस नव्हता. त्याचे लक्ष  गावातल्या शिकारी लोकांकडे होते.
गावात पारध करणा-या लोकांना खूप मानसन्मान मिळायचा. रानटी प्राण्यांची शिकार करणे ही गावात प्रथा होती. नव्हे रानडुकरांची शिकार करणे ही एक अंधश्रद्धाच होती.
शिमग्याचे दिवस संपले की गावातल्या गुरवाकडून रामेश्वराला कौल लावला जायचा आणि त्या दिवसापासून पुढे दोन महिने पारधीचा हंगाम सुरू व्हायचा. गावातले नावाजलेले शिकारी म्हणजे ज्यांच्या नावावर चार-पाच तरी रानडुकर मारल्याची नोंद होती असे हे नावाजलेले शिकारी दोन-तीन दिवस घरी राहून बंदुकीच्या साफसफाईत वेळ घालवत. मग ते पारधीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन एखाद्या वीरोत्तमासारखे सज्ज होत. आणि जंगलाच्या दिशेने वाटचाल करत. रात्रीच्या किर्र अंधारातही संपूर्ण जंगल पिंजून काढत.
एखादे रानडुकर पाणथळी जागेत आपली तृष्णा भागवत असलेले दिसले की त्याला बंदूकीने आडवे पाडले जायचे. त्याला काठीवर बांधून गावात आणायचे. गावातल्या सर्व घरांच्या मधून हर हर महादेव अशी गर्जना करत हिंडायचे. मग घराघरांतून सुवासिनी स्त्रिया बाहेर येऊन काठीवर चार पाय बांधलेल्या अवस्थेत लोंबकळणा-या डुकराला ओवाळायच्या आणि रक्तबंबाळ झालेल्या त्या डुकराच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार घालायच्या. ही मिरवणूक पार पडल्यानंतर डुकराला देवळात न्यायचे.
देवाला नैवेद्य दाखवला जायचा आणि नंतर त्याचे मटण करून गावजेवण घातले जायचे. हे सर्व यथासांग पार पडले की ज्याने हे रानडुकर मारले त्याची गावात एकदम कॉलर टाईट. दोन-तीन आठवडे मग त्याचा कौतुकसोहळा असायचा...पुढील कथा भाग दोनमध्ये.

Monday, 11 August 2014

श्रावणसरी मनसोक्त बरसल्या...

आज सकाळपासून मन फार उदास होतं. पूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. बाहेर निसर्ग श्रावणसरींत न्हाऊन निघाला होता. माझं मन मात्र आतल्या आत कुढत होतं.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर छत्री घेऊन पावसातून चालताना मन हळूहळू
था-यावर येऊ लागले. इतक्यात लक्ष बागेतल्या झाडांकडे आणि पानवेलींकडे गेले. असं वाटलं झाडं आणि ती हिरवीगार भिजणारी पानं खदखदून हसतायत. त्यांच्याकडे पाहून मलाही खूप छान वाटू लागलं. आपणच का बरं दुःखीॽ असा प्रश्न मीच मला विचारला... मन झालं पुन्हा हिरवं, ताजंतवानं... कोरंकोरं.

एखादा क्षण निघून जातो. एखादी घटना घडून जाते. एखादी व्यक्ती मनाला छळून जाते. या अशा गोष्टी लवकरात लवकर विसरून जाण्याची सवय मनाला लावायला हवी. नाहीतर वेड लागालची वेळ येईल. पण आज चांगला धडा मिळाला.
उगाच कुठे नि कसल्या मनात साचून राहिलेल्या गोष्टींचा विचारच सोडून द्यायचा. आता मागे वळून पहायचे नाही...पुढेच जायचे. मी ठरवलेले ध्येय गवसेपर्यंत नकारात्मक विचारांना माझ्या मनात आता जागा नाही.

श्रावणसरींनी माझं मन अगदी स्वच्छ धुवून टाकलं. त्या हिरव्यागार झाडांना पाहताना शुद्ध विचारांची शाल माझ्यावर पांघरली गेली. श्रावणसरींची किमया आजवर साहित्यातून अनुभवत आले होते. पण आज प्रत्यक्ष मी अनुभव घेतला. असं वाटतंय मनाला सुखावणा-या या श्रावणसरी बरसतच रहाव्यात

पुन्हा पुन्हा वाट आवर्जून वाट पाहीन या श्रावणसरींची...

फिलींग चिंब चिंब...श्रावणसरी मनसोक्त बरसल्या...


आपल्या संस्कृतीत श्रावणाचं असलेलं स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झालं.






Friday, 1 August 2014

कलावंत आणि समाज

कलावंताला वास्तवाची जाणीव असते, असेही म्हणता येते आणि नसतेही असेही म्हणता येते. कारण कलावंताला वास्तव आहे त्या स्वरूपात स्वीकारण्याची इच्छा नसते. आणि ते वास्तव त्याला पूर्णपणे नाकारताही येत नाही. म्हणून ते बदलण्याची जबरदस्त ओढ असतेम्हणजेच त्याची कलाकृती. वास्तव बदलण्याचा हा जो कलावंताचा प्रयत्न आहे, तो ब-यापैकी समाजावर अवलंबून आहे. म्हणूनच हे पाहणे महत्त्वाचे आहे की समाज या वास्तवाचा सामना कसा करेलॽ

माणूस आपल्या आनंदासाठी, आधारासाठी समाज निर्माण करत असतो. आणि मरेपर्यंत या समाजालात घाबरत जगत राहतो...कसाबसाजे समाजाला घाबरत नाहीत, ते समाजाला एक वेगळी दिशा देऊ इच्छितात. त्यांना स्वतःच्या विचारांवर विश्वास असतो. ते समाजाला बदलण्याचा ध्यास घेतात. आपल्या कृतीवर आपल्या बोलण्यावर ठाम राहून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतात. हीच असते समाजपरिवर्तनाची नांदी. समाजपरिवर्तनाची नांदी कलावंताच्या हातूनही होऊ शकते. जर त्याची स्वतःची एक ठाम भूमिका, दृष्टिकोन असेल तर

आजकाल जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. क्षणभर विश्रांती घ्यायलाही कोणाकडे वेळ नाही. शांत बसून विचार करणेही शक्य नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारणाने वातावरण एवढे ढवळून निघाले आहे की या युद्धजन्य परिस्थितीतून कलावंतच सर्व सामान्य माणसाला बाहेर काढू शकतो. कारण कलेच्या सान्निध्यात माणसाला त्वरित विरंगुळा मिळतो. तो एका वेगळ्याच जगात ओढला जातो. कला माणसाच्या आयुष्यात सुखद क्षण निर्माण करते.

आपल्याला वाटते, भारतात धर्म, जातपात, समाजव्यवस्था, भाषावार प्रांतरचना या सर्वांमुळे एकसंघ भारताला धोका आहे. परंतु खरे मूळ राजकारणात आणि अर्थकारणात सापडते. कारण भारतीय संस्कृतीच्या सर्व मुलभूत गोष्टी राजकारणाने नियंत्रित केलेल्या दिसून येतात. कलाकृतीसुद्धा यातून सुटलेली नाही. श्रीमंत वर्ग आपल्याकडील धनाने कलेला तोलतो. अभिजन वर्ग आपल्या आकलनाने कलेचे सौंदर्य जाणून घेतो. मग सामान्य माणसाने काय करावेॽ तो बापडा उथळ रंजनातच समाधान मानून घेतो. कलाकृती आणि राजकारण याबाबत न बोललेलेच बरे! 



रविंद्रनाथ टागोर म्हणतात, कलावंत हा निसर्गाचा प्रेमी आहे. त्यामुळे तो निसर्गाचा गुलाम आहे तसाच तो मालकही आहे. पण सामान्य माणसाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर तो कधी निसर्गाचा गुलाम राहणे पसंत करतो, नाहीतर आपल्या ताकदीच्या जोरावर निसर्गावरच मालकी हक्क गाजवू लागतो. निसर्गावर मात एकटा माणूस करू शकत नाही. त्याला इतरांचीही सोबत लागते. यातूनच समूहभावनासमाज निर्माण झाला असावा

कलावंत स्वतः कितीही दुःखी असला तरी तो आपल्या कलेने रसिकांना आनंद देतो. सर्जनशील कलावंतांना असलेला वेदनेचा शाप आणि त्याचे मूळ नेमके कशात आहे, हे सहसा त्यांना कधीच कळत नाही. यासाठी समाजाला मात्र जबाबदार धरता येणार नाही. कलावंताची शोकांतिका रसिकांच्या मनावरही आघात करतेच

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...