Friday, 15 January 2016

मीलनाचा एकांत (Twitter कथा)

शुभ्र चांदणं पडलं. टप्पोरं फुल गालात हसलं. वाऱ्याच्या साथीने झाडं वेली नाचू लागले. नाजूक हिरव्या पानांवर अलगद दवबिंदू ओघळले. चराचर सृष्टी हा आनंद सोहळा साजरा करतेय. पण ती मात्र दुःखी होती. सारं काही असुनसुध्दा तिचं काहीच नव्हतं. ती हसणं विसरली, बागडणं विसरली. ती गुलाबाच्या कळीसारखी होती पण आता हिरमुसलेली होती. मौनव्रत घेतल्यासारखी गप्प राहू लागली. त्या बिच्चाऱ्या परीचं काहीतरी बिनसलं होतं. तिचं तिलाच समजत नव्हतं. कशातच मन रमत नव्हतं. सारखी कुणाचीतरी चाहूल मनाला लागली होती.


ही तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या येण्याची चाहूल होती. प्रेमाच्या वाटेवर तिने पाऊल टाकलं होतं. पैंजण तिची रुणझुणते, ती गाणं गुणगुणते. आणि ती त्याच्यातच गुंतते. त्याच्याच स्वप्नात आकंठ बुडते. अडखळते. बावरते. लाजेने चिंब होते. ही प्रेमाची दुनिया आहे, हे ती जाणते आहे. पण तो अनोळखी असल्यासारखा वागतोय. थेट बोलण्यापेक्षा ती आणि तो अबोलच राहणं पसंत करत होते. तिच्या जीवाची सारखी घालमेल होतेय. त्यालाही असंच वाटत असेल का? हे कसं कळणार. तिच्या आयुष्यात तो आल्यामुळे तिला सूर नवा गवसलाय. प्रेमाच्या या धुंदीतच आता तिचं जगणं असतं. ती वेडी अभिसारिका आता तिच्या आणि त्याच्या मीलनाचा एकांत शोधण्यासाठी धडपडतेय. 
पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

प्रेमाची कळी (Twitter कथा)

तिला त्याच्याशी बोलायचं होतं. त्यालाही तिच्याशी बोलायचं असेल का? माहीत नाही. कॉलेजमध्ये अकरावी, बारावीत ते दोघेही एकत्र होते. पण कधी एकमेकांशी बोलले नाहीत. ती सोडून त्यांच्या वर्गातल्या इतर मुली त्याच्याशी बोलायच्या. त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी विलक्षण होतं. ते तिला भावलं होतं. त्याचं ते देखणं रुप तिच्या डोळ्यात भरायचं. त्याचं ते निरागस हसणं, हास्यभरित बोलणं. रुबाबात चालणं, सारं कसं मोहित करून टाकायचं. एरवी सर्व मुलांपेक्षा तो खूपच वेगळा होता. त्याचे डोळे बोलके होते. कुठुनही तो दिसला तरी तिची नजर आपसूक त्याच्याकडे वळायची. 

बारावीचं वर्ष संपत आलं. काही कळलंच नाही. आता पूर्वपरीक्षा जवळ आल्यात. तरी त्या दोघांचं अजून हेच चाललं आहे. बोलायचं होतं तिलाही काही त्याच्याशी, माहीत नाही त्यालापण तिच्याशी. आता बारावीचं वर्ष पण संपेल. आणि तो जाईल त्याच्या मार्गाने आणि ती जाईल तिच्या मार्गाने. तरीपण तिला त्याची आठवण आल्यावाचून राहणार नाही. तिला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होतं. पण आता ते शक्य नाही. फार उशीर झाला.


या घटनेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आज कॉलेजमध्ये पुन्हा तो ओळखीचा चेहरा तिने पाहिला. आता त्यांच्यात गप्पा सुरु झाल्यात. परस्परांच्या शुध्द मैत्रीतून ओठांची मोहोर उघडली गेली. मैत्री या गोंडस शब्दाआड तिच्या प्रेमाची कळी न फुलताच कोमेजून गेली. प्रेम म्हणजे काय?  या प्रश्नाचं गूढ तिच्या लेखी वाढत गेलं.

  

पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

लेखकास पत्र (Letter to Writer)

प्रिय लेखक मित्रा,
लेखक आणि क्रिएटिव्हिटी
हे एक विविधरंगी भावभावनांचं 'पॅकेज' आहे.
ते कोणीही बनवू शकत नाही.
ते कोणीही नष्ट करू शकत नाही.
ते कोणीही एक्सप्लेन करू शकत नाही.

फक्त तू आणि मीच ते समजू शकतो.


मला असं वाटतं आणि माझा विश्वास आहे की,
लेखक आपल्या लेखणीने,
त्याचं स्वतःचं आभाळ  निर्माण करतो
तो अशी एक क्रिएटिव्ह व्यक्ती असतो
ज्याचं ह्रदय सोन्याचं असतं.

लेखक आयुष्याला नवा अर्थ देतात,
तो जगण्यावर प्रेम करायला सांगतो...
पण त्याची गोष्ट मात्र शब्दात कधीच सांगता येत नाही,
लेखक हा हजारात एक असतो !
त्यातला एक तू आहेस !
धगधगत्या निखाऱ्यासारखं त्याचं आयुष्य असलं तरी
त्याच्या लेखणीतून हिरवा निसर्ग फुलतो
म्हणून मग त्याने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं चांदणं होऊन
वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनाचं आभाळ हसतं.
हीच लेखकाच्या लेखणीची किमया

अॅड, टीव्ही, फिल्मस्... साऱ्या मीडिया वर्ल्डचा तू कणा आहेस
मला तुझा अभिमान वाटतो "तू लेखक आहेस"
असाच लिहित रहा
तुला लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !

रायच्या भरडावर... (मालवणी बोली)

मे म्हयनो म्हंजे कामव आसता आनि चाकरमान्यांच्या येन्यामुळा मौजपन आसता. मे म्हयन्याच्ये दिवस कश्ये सरतत काय कळना नाय. गेल्या आयतवारी येक क्रिकेट मॅच खेळवची असा सगळ्या तरुन झिलग्यांका वाटला. ही मॅच चाकरमानी पोरगे इरुद्ध गावातले पोरगे अशी खेळाची ठरली. सुटीत लय चाकरमानी इल्लले. त्येंकाव मजा वाटली. आदल्या दिवसा गावकारांच्या पडयेत सगळे जमान ह्याबद्दल बोलाक लागले. गाववाले म्हनाक लागले आमी चाकरमान्यांका हरवतलव. मगेन चाकरमानीव रंगात इले आमीपन तुमका हरवतलव म्हनाक लागले. ते खेळाचा नयीन सामानसुमान, पिवळे-निळे टीशर्ट घालून तयारव झाले.
गावात रामेसराच्या देवळाच्या बाजूक रायचा मोठा भराड आसा. थय ही पेशल मॅच खेळवली जानार होती. गावातल्या पोरांकडे कायच खेळाचा सामान नाय होता. हा, पन खास अशी पिड्याची बॅट होती. ह्या पिड्याच्या बॅटीफुडे यमआरयफची बॅटसुदा झक मारता. गावातले पोरगे वायच घाबारलले, हे चाकरमानी पोरगे जिंकले तर गावच्या पोरींसमोर आपल्याक त्वांड दाकूक नको. आता करायचा काय? समरो, पवलो, निलगो, पकलो जमले इच्यार करुक लागले. ह्या चाकरमान्यांका कायतरी ‘मालवणी भॅट’ देवक होयी. आनि ही मॅच फिक्स करुक होयी. पन त्येनी आपल्यावांगडासुदा असा काय केल्यानी तर? दोनव टीमच्ये पोरगे गावड्यांच्या मांगरात जमले. चाकरमानी पोरगे म्हनाक लागले आमी तुमका एमआरएफच्यो बॅटी देतव तुमी हरा. गावच्ये पोरगे म्हनाक लागले. आमी तुमका आंब्याच्यो पेटयो आनि काजूगराची पाकिटा देतव तुमी हरा. अशी हेनी सामनी सामनी बसानच मॅच फिक्स केल्यानी.
चाकरमानी पागाळले त्येनी हराचा ठरवल्यानी. झाला, मगेन रायच्या भरडावर ही पेशल मॅच झाली. चाकरमानी हरले आनि गाववाले जिंकले. गावात सगळी मंडळी मॅच बघूक जमलली. त्येंका कायतरी खटाकला मगेन ह्याची इचारपूस झाली तेवा मांजरेकरांचो दिपलो पचाकलो, सरपंचाका म्हनालो ही मॅच आधीच फिक्स केल्लली होती. सरपंचासकट सगळ्यांका लय मोठो धक्को बसलो. सरपंचानी दिपल्याक सांगल्यानी जा खेळनाऱ्या सगळ्यांका बोलावन घेवन ये. दिपलो पाटकन गेलो नी सगळ्यांका घेवनच इलो. सगळे मान खाली घालून उबे ऱ्हवले. सरपंचानी त्येंका सनसनीत मालवनीत सुनवल्यानी. मग सगळे पोरगे त्वांड उगडून बोलाक लागले. आमचा चुकला आमी परत असा करूचव नाय. असा चाकरमान्यांनी म्हटल्यानी मात्र, सगळे गाववाले ह्यांचा बोलना आयकाक खळ्यात आनि पेळेवर उबे ऱ्हवलले ते  पोरांच्या पाटी लागले. पॉर फुडे हे पाटसून चाकरमान्यांका कनकवलेक पोचवल्यावरच ते गप ऱ्हवले. मग इली गावच्या पोरांची पाळी. गावल्यांनी त्येंकाव सोडल्यानी नाय. थोड्यांका पाठवल्यानी कवळफोड करुक पातेत, थोड्यांका पिटाळल्यानी शेतीच्या कामाक. पावसाच्ये दिसव जवळ इले हत. हे झिलगे चांगलेच तावडीत गावले.
त्या दिवसा ती पेशल मॅच बघुक गाववाले जमले, कित्याक तर ह्या मॅचीमुळे सगळो गाव येकठय इलोहा. पन ह्या पोरांनी सगळ्या मजेवर पानी वतल्यानी. रायचा भराड म्हंजे आमच्या गावचा ‘वानखेडे स्टेडियम’. यवडा मोठा मैदान चाकरमान्यांनीसुदा पैल्यांदाच बगलल्यानी. गावच्या धयकल्याच्या टायमाक ह्या सगळा रायचा भराड पावन्यापैकानी फुल्लला आसता. मॅचीच्या दिवशीसुदा असाच फुल्लला. पन तेंका काय ठावक मॅच आदीच फिक्स झालीहा म्हनान. आता ह्या रायच्या भरडावर कोनसुदा दिसना नाय. ढोरा नाय आनि ढोराचो राकनोसुदा नाय. जे कदीमदी रायच्या भरडार गमायच्ये. चाकरमानी गेले मुंबैक, गावच्या पोरंग्याका जुंपल्यानी शेतीक. आनि पिड्याच्यो बॅटी गेल्यो चुलीत…


Sunday, 13 December 2015

हळवा कॅनव्हास

निसर्गातील पाना-फुलांचे रंग पाहताना हरवून जाणं...
रात्रीच्या वेळी फांदीआडून दिसणारा चंद्र पाहताना निःस्तब्ध, मूक होणं...
ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील एखादा चित्रपट आठवून तो पाहणं आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीनं अवाक होणं...
गुलजारच्या कवितांमधली वेदना आणि गाण्यांमधल्या हळवेपणानं त्या शब्दांच्या प्रेमात पडणं...

सागराची गाज ऐकता ऐकता त्याच्या निळ्या कॅनव्हासवर हरवून जाणं...
गुरुदत्त ते अलिकडच्या इम्तियाज अलीचे सिनेमे पाहिल्यावर आपलं मत आवर्जून मांडावसं वाटणं
एखाद्या कोरीव शिल्पावरील भाव आणि व्हिन्सीच्या मोनालिसाच्या हास्याने मोहित होणं...
व्हॅनगॉगची नक्षत्र उधळणारी निळीरात्र आणि पिवळा रंग उधणारी सूर्यफुलांची शेतं सारखीच गूढ वाटणं...
कवी ग्रेस आणि आरती प्रभूंच्या कवितेतील पावसाने मनाला न्हाऊ घालणं, अस्वस्थ करणं...

घर शोपीस ने भरून न जाता प्रेम आणि विश्वासाच्या नात्यांनी भरून जाणं...
हुसेनच्या चित्रांतला घोडा, राजा रविवर्माच्या चित्रांमधल्या नऊवारी साडीतल्या अप्रतिम लावण्यामागची प्रेरणा जाणून घेणं...
प्रियकराने दिलेल्या गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि प्रेयसीने दिलेलं मोरपीस वहीत असणं...




कधीतरी एकटे असताना एखादी कविता किंवा गाणं गुणगुणं...
हाती लागलेला एखादा कागद घेऊन त्यावर आपणच आपल्यासाठी चार शब्द लिहिणं...
दिवसभरात एकदातरी बागेतली फुलं आणि बागडणारी मुलं पाहून आपणही मनमोकळं हसणं...
पुन्हा लहान मूल होऊन आईच्या कुशीत शिरणं...

भावनांचा हा निरागस हळवा कॅनव्हास कुठेतरी हरवलाय...
म्हणून त्यावरील चित्रं आता खोटी वाटू लागलीत...

Wednesday, 9 December 2015

QUARREL SCENE

(अपूर्वाने फेसबुक ओपन केलं आहे, ती स्वतःची वॉल बघते आहे, त्यातले स्वतःचे फोटो बघून खूश होते आहे. तितक्यात तिचा फोन वाजतो, म्हणून ती फोन उचलून बाहेर बोलत जाते. तितक्यात विपुल तिथे येतो आणि तिची फेसबुक वॉल बघू लागतो... आणि त्याचा चेहरा गंभीर होतो.)


अपूर्वा – (विपुल तिच्या मागे येऊन उभा राहतो. तिचं लक्ष नाहीय. मग लक्षात येतं) विपुल हे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या नकळत त्याचं फेसबुक अकाऊंट बघणं.
विपुल – कम ऑन अप्पू, मी नवरा आहे तुझा... कुणी परका नाही...
अपूर्वा – पण मी आजवर तुझ्या कुठल्या सोशल गोष्टीत ढवळाढवळ केलीय का?
विपुल – पण इतकी का चिडतेस...आणि मला एक सांग...तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं ना, हे फोटो काढून टाक म्हणून...पण अजूनही तू ते फोटो तसेच ठेवलेस...

अपूर्वा – ते माझे फोटो आहेत...आणि ते माझं अकाऊंट आहे, मी ठरवणार कुठला फोटो ठेवायचा आणि कुठला नाही ते...तू मला धमकी देऊ नकोस...कळलं ना...





विपुल – पण एवढी काय मिरवायची हौस आहे तुला...फोटोच्या खाली कमेंट्स बघ...
अपूर्वा – हे बघ...तुला शेवटचं सांगतेय...तू यात अजिबात पडू नकोस...मला एक गोष्ट कळत नाही, तुला का इतका राग येतोय. मला कोणी छान कॉम्प्लीमेंट्स दिल्या तर तुला वाईट का वाटतंय.... आणि एक मिनिट, त्या दिवशी तू माझा फोनही चेक करत होतास...मी पाहिलं तुला...पण तेव्हा काही बोलले नाही... तुझा माझ्यावर विश्वास नाही. तुला इतकं कमकुवत वाटतं आपलं नातं...
विपुल – मी फक्त बघत होतो, फोन ब्लिंक होत होता म्हणून..
अपूर्वा – आणि फोनवर आलेला मॅसेजही तू वाचलास, पाहिलं मी ते... पण मी म्हणते का...गरजच काय त्याची...

विपुल – का म्हणजे...तू माझी बायको आहेस...तुला कोणी (त्याचं वाक्य पुरं करू देत नाही)
अपूर्वा - मग तुझा विश्वास का नाही माझ्यावर, त्या दिवशी माझ्यासाठी एक ऑफिशियल लेटर आलं तेही तू उघडून पाहिलंस...बस, आता मी हे सहन करू शकत नाही...तू तुझ्या बालमैत्रिणीला कॉफी शॉपमध्ये भेटतोस. आणि मला सांगतोस… ऑफिसची मिटिंग होती म्हणून...तुला काय वाटतं...मला हे कळणार नाही...
विपुल – अगं तू समजतेस तसं काही नाही...तिला काही गोष्टी माझ्याशी मित्र म्हणून शेअर करायच्या होत्या, म्हणून आम्ही दोनदा भेटलो... बस एवढंच...तू त्याचा इतका इश्यू का करतेस...
अपूर्वा – नाही, मला कसलाही इश्यू करायचा नाही. पण तुझ्या खोट्या वागण्याचा मला कंटाळा आलाय...
(ती आपलं सामान पॅक करू लागते.)

विपुल- अगं अप्पू ऐक माझं...तुझं तिच्याशी पटत नाही, म्हणून नाही सांगितलं की मी तिला भेटायला गेलो होतो...
अपूर्वा - पण का...लपवलंस माझ्यापासून...
विपुल – कारण मला भीती वाटली...
अपूर्वा – कसली भीती...
विपुल – तू मला सोडून जाशील म्हणून...
अपूर्वा – मला आता तुझ्यासोबत रहायचंच नाही...(अपूर्वा बॅग भरते. लॅपटॉप बंद करते. आणि निघू लागते.)
विपुल - ए ऐक ना माझं...चुकलो मी ...आय अम सॉरी...
अपूर्वा – (त्याचं काहीही ऐकत नाही. निघून जाते.)






पहिली भेट

ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली असते. विपुल ट्रेनमध्ये त्याच्या जागेवर जाऊन बसतो. समोरच्या सीटवर अजून कुणी न आलेलं पाहून त्या सीटवर पाय सोडून मस्त स्टाईलमध्ये बसतो. आणि नंतर स्मार्टली कॅमेरा घेऊन खिडकीतून लोकांची चाललेली धावपळ कॅप्चर करू पाहतो. आज तो खूपच रिलॅक्स मूडमध्ये आहे. त्यातच तो रमून गेला आहे. तेवढ्यात अपूर्वा येते.

अपूर्वा - अहो...शुक शुक, पाय बाजूला करा....ही माझी सीट आहे. (खिडकीतून बाहेर बघत असलेला विपुल मागे वळतो. अपूर्वाला बघतो आणि पाहतच राहतो. जणू काही तिच्यासारखी सुंदर मुलगी कधी पाहिलीच नाही. तो पाहतच राहतो. तिच्यावर असलेली त्याची नजर हटत नाहीय. त्याचं लक्ष नाहीय. हे पाहून अपूर्वा आवाज चढवून म्हणते..... ) अहो ऐकू येतंय ना तुम्हाला....पाय खाली घ्या...
विपुल भानावर येत पाय खाली घेतो.
अपूर्वा पुटपुटते, मान हलवते (काय मुलगा आहे हा, हिरोगीरी करायला आलाय वाटतं या अर्थी)
विपुल – तुम्ही मला काही बोललात का?
अपूर्वा – नाही नाही, या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याशी बोलतेय...
विपुल – नुसताच हसतो...

काही क्षण कुणीच बोलत नाही...
आता दोघेही अधून मधून एकमेकांकडे पाहतायत....विपुल किंचित हसतोय. अपूर्वा त्याच्याकडे पाहून नाकाचा शेंडा उडवते. पण तितक्यात अपूर्वाचं त्याच्या कॅमेराकडे लक्ष जातं. ती म्हणते...
अपूर्वा - तुम्ही फोटोग्राफर आहात?
विपुल – (चेहऱ्यावर किंचित हसू आणत म्हणतो...) नाही, फोटोग्राफी करायला आवडतं इतकंच....
आपण कोण आहात...
अपूर्वा – (पटकन म्हणते....) मी एक राजकुमारी आहे.....राजकुमारी. मालेगावात आमचा राजवाडा आहे...
विपुल इम्तीयाज अलीच्या तमाशा मुव्हीचा इफेक्ट वाटतं,  आर यू जोकींग... आय नो यु आर ए ब्युटिफूल प्रिसेन्स... पण
(पुढे काही बोलणार तोच अपूर्वा त्याच्याकडे लक्ष न दिल्यासारखं करत आपल्या पर्समधून स्मार्ट फोन काढते. शो ऑफ करण्यासाठी. विपुलही बोलणं थांबवतो. हात उंचावून मोकळे करून घेतो. आणि खिशातून आयफोन 6 काढतो. अपूर्वा त्याच्याकडे बघतच राहते. तो आपल्या मित्राला फोन लावतो. बेल वाजते. मित्र फोन उचलतो.)

विपुल – हॅलो, हॅलो (ट्रेनचा आवाज) हाय आशू झोपलायस का?....बरंय तुमचं... व्हॉट्स अपवर मॅसेज वाचले सगळ्यांचे, तुम्ही सगळे येणार म्हणून मी तुमच्याबरोबर ट्रेनने यायला तयार झालो. आणि तुम्हीच ऐनवेळी नाही म्हणून सांगितलं. मी जाम चिडलोय तुमच्यावर....आपण नवीन प्रोजेक्टच्या वेळी भेटू ना... तेव्हा बघतो एकेकाला...पण इट्स ओके तसंही ट्रेनने आलो ते बरंच झालं म्हणायचं (अपूर्वाकडे स्माईल करत बघतो, अपूर्वाही फोनवर बोलणाऱ्या विपुलकडे पाहतेय. नजरानजर होते... त्याने फोन ठेवल्यावर मात्र आपण काही तुझ्याकडे पाहत नव्हतो अशा अविर्भावात खिडकीबाहेर पाहू लागते. खिडकीतून छान हिरवागार निसर्ग दिसत असतो.)
अपूर्वा – wow beautiful…
(विपुलची बाहेर काय दिसतंय ते पाहण्याची उत्सुकता वाढते. तोही खिडकीतून पाहू लागतो. दोघांची डोकी परस्परांना लागतात. ते पहिल्यांदाच एकमेकांच्या इतक्या जवळ येतात. अपूर्वा पटकन सावरते. मागे सरकून बसते. मग विपुलही मागे सरकून बसतो.)

विपुल – (अपूर्वाकडे पाहून म्हणतो....) त्याचं काय आहे ना की...कॅमेरा हातात असला की असं वाटतं कुठलंही Visual  नजरेतून सुटू नये... (असं म्हणत विपुल खिडकीतील हिरवागार निसर्ग बॅग्राऊंडला ठेवत अपूर्वाचा फोटो काढतो... Scene Cut


आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...