Saturday, 6 February 2016

चाकरमान्यानु समाज ऱ्हवलो खय?



हे, गजाल खरी काय?
चाकरमानी कोकनात इले काय?...

कोकन रेल्वेच्यो येकशे ईस फेरयो वाढवल्यानी चाकरमान्यांका गनपतीक कोकनात जावसाटी; आनि त्येचा बुकिंग आट मिंटात फुल झाला. ही गजाल वाऱ्यासारकी पसारली. ही गजाल खरीच होती, पन बरी काय वायट ह्येचो इच्यार मनात घुटमाळाक लागलो. वाटला चाकरमानी आजूनव गाववालेच ऱ्हवले हत. मुंबैक त्येंचो जीव रमना नाय.
आमच्याकडे यंदा धाकट्या काकांची वर्सल म्हनान ते इले हत. जोरदार तयारी सुरू झाली आसा गनपतीक हाडूची, हरना, तिर्डे, शेरवडा, कांगला, तौसा, नारळ, शिप्टा, कौंडाळा सगळी फुलपत्री कुंबयाच्या दोऱ्यात बांदान माटवी सजवून झाली आसा. गनपती बसता त्येच्या मागच्ये भितिर कमाळ काडून झाला. करंज्या-लाडवाची तयारी झाली हा.
गनपतीच्या सनामुळे गाव फुलान इलो हा. चाकरमान्यांच्यो मुंबैच्यो गजाली संपता संपत नायत. ही झाली गजालिची पैली बाजू. दुसरी बाजू अशी आसा येकत्र येवन सन साजरो करूक होयो ही मुळातली मजाच हरवत चाल्ली आसा. येका घरात दोघे-तिघे भाव आसतील तर गावाक येवचे पाळये लावतत. चाकरमान्यांच्या शिरमंतीवर गनपतीची मूर्ती मोटी की ल्हान हाडायची ह्या ठरता.  कोकनातल्याच लोकमान्य टिळकांनी ‘येकत्र येवन समाजाक बरोबर घेवन ह्यो सन साजरो करा’, असा सांगल्यानी. पन त्या नेत्याचा कोनीच आयकान घेवक नाय. आसो. आजूनव कोकनात, जुन्या गोयात परत्येकाच्या घरात गनपती येता.
अगोदर टाळ, तबला, मृदंग, पेटी घेवन मोट्या आवाजात आरती-भजना म्हननारे आता आरतीची फुस्तका हातात घेतल्याशिवाय त्येंका आरती म्हनाक यैत नाय. तेवा टाळ, चकी व्हाजवनारे पेटयेवर बसान गानारे गावासाटी मोटे संगीतकार होते. पन आता येळ मारून न्हेवसाटी कशीव भजना गातत नी च्याय-लाडू घेवन घराक जातत. ह्या काय बरा दिसना नाय. गनपतीच्या भितिर कमाळ काडनारे, देकावो काडनारे, गनपती शाळेत गनपती लिपनारे मुंबैच्या जे. जे. स्कूलात जावन मोटे चित्रकार, मूर्तिकार झाले. कलेचो गुन आंगात हाडल्यानी पन समाजातली आपली मुळा इसारले. येकत्र येवन समाज घडाक होयो म्हनान आपन सनसुद साजरे करताव. ‘येक गाव येक गनपती’ ह्या सपान कोकनात परतेकशात कदी बघुक मेळतला. अगोदर धा दिस गनपतीच्ये कशे यैत नि कशे जायत ता कळासुदा नाय. गनपतीच्या पैल्या दिसापासून ते म्हामदा घालून गनपती पोचवीपर्यात सगळो गाव गुंग असायचो. धा-बारा दिस आदीच तयारीची धांदल उडायची. तेवा म्हटला जायचा. गनपतीचो सन साजरो कोनी करूचो तर तो फकस्त कोकनातच.

रातभर जागून भिती रंगवनारे, गनपती शाळेत शाडूच्या मातयेच्यो मूर्ती घडवणारे, पेट्येवर बसान आऽऽऽआऽऽऽ करीत भजना, डबलबारीत गानारे, सांज झाली काय फुगड्यो घालणारी बायलमानसा ही सगळी जाना खयतरी हरावली आसत. आता हे सगळे जे सन साजरो करतत ते कंत्राटी कामगार वाटतत. बाकी काय नाय. अरे, मोटेपना दाकवसाठी सन साजरो करूचो नसता रे. आता गावकरांचा सनसनीत गाराना आयकाक गावना नाय तर ता नुसता रडगाराना वाटता. गनपतीची आरती करूक इलेल्या भक्तांनी अगोदर वळय भरान जायची. आज सात, आट टकली उबी होती गनपतीफुडे. रडतत काय, आरती म्हनतत ह्याच कळाक नाय. गावड्यांची आजी कालच सांगा होती तिच्या झिलाक सुटी नाय म्हनान त्येंचो गनपती पाच दिवसांनी पोचवतत. तिच्या थकलल्या जीवाक येकच परस्न पडत होतो आता गौरीबाय कशी हाडायची, वौवशे कशे पुजायचे… काय ह्या चाकरमान्यानु ही गजाल बरी नाय. येवडे हौशेन इलास तरी गाववाले खूश नाय झाले. ता सामाजिक भान ऱ्हवला बाजूकच पन आपल्या घराक तरी संबाळा. गनपती काय दरवर्सा येतले. पन फुढल्या वर्सा येशात तेवा तुमचो शिरमंतीचो ढोल मुंबैक ठेवन येवा. नि फुस्तक हातात न धरता आरती करा. मग मिया मानलय तुमका, काय चाकरमान्यानु येवढा तरी करशात ना… 
(मालवणी बोली)

Wednesday, 3 February 2016

न मांडता आलेले काही विचार

आनंद देत असता, आनंद घेत जावेज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांच्या गझलेतील ही अतिशय सुंदर ओळ. आजपर्यंत साहित्याने मला दिलेल्या आनंदात पुरेपूर भिजले.
पु.शि. रेगे यांच्या सावित्रीकादंबरीच्या रूपात मला माझी जीवाभावाची सखी भेटली.
इरावती कर्वेंच्या परिपूर्तीया पुस्तकातून मला माझ्या आईच्या मायेची कूस मिळाली.
प्रकाश नारायण संताच्या वनवास, शारदासंगीत, पंखा आणि झुंबर या कथासंग्रहातून मला लंपन भेटला. त्याने आयुष्यभरासाठी नवी उमेद दिली, आपल्या सोबत इतरांचही जगणं कसं आनंदाचं करावं, ही अनमोल भेट मला त्याने दिली. मीराबाई त्यांच्या भजनात एके ठिकाणी असं म्हणतात की,
गली तो चारों ओर बंद पडी
म्हारो पियासे मिलन कैसे होय
तिच्या या प्रश्नाला उत्तर म्हणूनच की काय
संत कबीर त्यांच्या एका दोह्यात असं म्हणतात,
घूंघट का पट खोल री
तोहे पीव मिलेंगे

अशा प्रकारे साहित्य वाचताना निर्माण झालेले प्रश्न पुढे साहित्यातूनच त्यांची उत्तरे सापडत गेल्याने साहित्याचा अभ्यास माझ्यासाठी अभ्यास न राहता तो माझ्या स्वतःचा शोध झाला आणि साहित्य सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी पुरेपूर आनंद घेऊन आला.





आपलं मन पुष्पवाटिकेत स्वच्छंदपणे बागडणाऱ्या फुलपाखरासारखं असतं. त्याला जपायला हवं…  
कधी कधी असं होतं की आपण शाळेत गेल्यावर शिक्षकांसमोर नुसतेच बसलेले असतो. मनाचा पक्षी मात्र केव्हाच बाहेरच्या मोकळ्या वातावरणात उडून गेलेला असतो. शिक्षणाच्या बाबतीत मी काही वेळा असाच अनुभव घेतला आहे. वर्गात शिकवल्या जाणाऱ्या आपल्या आवडीच्या विषयामुळे आणि शिक्षकांच्या रंगून जाऊन शिकवण्यामुळे मन एकाग्र व्हायचंनाहीतर मनाचं भटकणं सुरुच असायचं. म्हणूनच शिक्षणापेक्षा इतर गोष्टींचीच (म्हणजे चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टींची) गोडी अधिक वाटू लागली...



निसर्गाची साथ आहे, ग्रंथांचा सहवास आहे, थोडेसे शब्द आहेत, थोडेसे रंग आहेत, थोडेसे गाणे आहे, थोडेसे कलाकौशल्य आहे, कल्पनेने भारून जायला स्वप्नांचा विस्तीर्ण कॅनव्हास आहे, फक्त तू नाहीस… 







एखादी गोष्ट लहानपणापासून मनावर कोरली गेली, की ती विसरावी म्हटलं तरी विसरता येत नाही. मग ती गोष्ट आनंदाची असो वा दुःखाची किंवा अर्थ लावता येत नाही म्हणून आयुष्याला वळण देणारी घटना, अस आपण तिचं वर्णन करू शकतो. अशीच एक घटना माझ्या बाबतीत घडली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझ्या आयुष्यात घडलेली ती घटना चांगली की वाईट, गमतीशीर की गंभीर याचा संदर्भ मला अजून लागलेला नाही. परंतु चित्रपट पटकथेच्या भाषेत बोलायचं तर ती एक कारक घटना होती. तीच माध्यमांच्या जगात मला नेणारी घटना होती. म्हटलं तर जाणिवपूर्वक लक्षात ठेवण्यासारखी, नाहीतर प्लॉट पॉईंट वनला पूरक ठरणारीपण माझ्या मनावर ती घटना खोलवर रूजलेली आहे... या गोष्टीचा मध्यांतर जवळ आला आहे...प्लॉट पॉईंट टू, क्लायमॅक्स आणि resolution याचाही अर्थ लागतो आहे...त्या घटनेची परिपूर्ण गोष्ट लवकरच पूर्ण होईल असं वाटू लागलंय... 

Monday, 1 February 2016

सोन्याचो तुकडो

आंब्या-फणसाच्ये, काजी-करवंदाच्ये दीस जवळ इले तशे आजी म्हनाक लागली, बायग्या गो बायग्या! मिया काजीचे पातेतलो पतेरो झाडूक आवाटातल्या दोघींका बोलावलय. ती उद्यापासून येतली हत पतेरो झाडूक. काजी काढताना तरास होता कामा नये म्हनान दरवर्साक अशी पातेची झाडलोट करुची लागता. तू वायच पातेत जा आनि नदार टाकून ये झाडापेडांवर. म्होऊर इलो काय बघून ये.
माज्या आजयेन माका खयचा काम सांगल्यान नी मी आयकाक नाय असा कदी झाला नाय. तीना सांगल्याबरोबर मिया पातेत फिरता फिरता खय शेळकुंडा गावली तर ती हाडूक बारकी टोपली घेतलय, न्हानयेत घालूक थोडीशी शिरपूटा हानूसाठी कोयतो पन घेतलय आनि घराकडसून उबी चढन चढत पातेत गेलय…. आनि बघतय तर काय! काजीची झाडा म्होवरान भरान गेलेली. नया न्हवरेसारकी नटलेली दिसत होती. म्होवराचो घमघमाट सूऽऽऽर करुन नाकात भरुन घेतलय. ताजीतवानी पाता बघून मन भरान गेला. बारीक बारीक हिरयीगार करवंदा दिसली. फनसाच्यो कुवऱ्यो, आंब्याच्या कलमांचो थाट काय विचारुच नुको.
कुड्याच्या पानांची खोलपी करुन थोडी करवंदा काढलय चटनेसाठी, फनसाच्यो चार कुवऱ्यो काढलय फूस भाजयेसाठी. कोयत्यान आतेमेरेची सुकी लाकडा बारीक केलय, त्येंचो भारो बांधलय. सात-आठ शेळकुंडा गावली ती टोपलेत भरलय आनि मिया पातेतसून खाली उतराक लागलय तर रडन्याचो आवाज कानार पडलो. पैल्यांदा भीती वाटली पन सावारलय पाटकन आनि आवाजाच्या दिशेन जावन बघलय तर गावड्यांची आजी त्येंच्या पातेत काजीच्या झाडाखाली बसान रडा होती. मिया जवळ जावन तिका इच्यारलय, अगे आजये रडतं कित्याक, काय झाला? तुमची पाता तर चांगली फुल्ली आसा. मग रडाक काय झाला? पायाबुडी फुरसा सरसरला की काय? अगो नाय गो बायग्या, माज्या मुबैंच्या नातवान नाना सावतांकडे चिटी पाठवल्यान आसा. अगे मग त्यात काय रडण्यासारक्या. सगळ्यांची खुशाली कळवल्यान ना त्येना. अगो खुशाली कसली इच्यारतस बायग्या, नातवान चिटयेत लिवल्यान आसा ही पाता त्येका इकूची आसा म्हनान. आता सांग रडा नको तर काय करु मिया. आपन आपल्या झिला – नातवंडांसाठी जमनीचो तुकडो राखान राखान ठेवचो आनि ह्येंनी तो इकून टाकूचो. ह्यो कसलो न्याय?

गावड्यांच्या आजयेक कसाबसा समजावलय आनि पातेतसून त्येंच्या घराकडे हानून सोडलय. नी मिया आमच्या घराकडेन इलय. आमची आजी खळ्याच्या पेळेवर उबी ऱ्हवान माज्या वाटेकडे बघित होती. माका पातेतसून येवक उशीर झालो. आनि मिया कसलोतरी इच्यार करीत हळुहळु चलतय. ह्या बघून आजयेन इच्यारल्यान, काय गो बायग्या उशीर कसो झालो तुका? तर मिया तिका गावड्यांच्या आजयेची गजाल सांगलय. तशी मग आजी गप झाली. पन थोड्या येळान परत बोलाक लागली… अगो बायग्या समुंद्राकडच्यो जमनी शिरीमंत लोकांनी हाटेला नि बंगले बांधाक बळकावल्यानी. माळावरच्यो चांगल्यो जमनी कसल्या कसल्या प्रकल्पांका गेल्यो. आनि त्येच्यातना ज्यो जमनी ऱ्हवल्यो त्यातल्यो रस्त्यांका आनि कोकन रेल्वेच्या रूळाखाली गेल्यो. येवढा सगळा होवन जे जमनीच्ये तुकडे शिल्लक आसत ते आता आमच्यासाठी सोन्याच्ये तुकडे आसत. अगो म्हनानच ती गावड्यांची आजी रडत होती. कळला तुका बायग्या! आजयेचा बोलना आयकान आमची म्होवारलली काजीची पाता रातभर माझ्या सोप्नात येत होती. आजयेक आनि माका इच्यारलास तर आमची पाताआमच्यासाठी जमिन नाय तर ‘सोन्याचो तुकडो’ आसा. माका वाटता परत्येकाक ह्या सोन्याच्या तुकड्याचा मॉल कळाक व्हया… 
(हा ललित लेख मालवणी बोलीत लिहिलेला आहे.)

Sunday, 31 January 2016

चला, आंगणेवाडीच्या जत्रेक जावया !!!

२५ फेब्रुवारी २०१६… आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कळली आनी गावच्या आठवनींच्ये घोस वाऱ्यावर झुलाक लागले. गावाक होतय तेवा माझ्या धाकट्या काकां वांगडा आंगणेवाडीच्या जत्रेक आमी सगळे मिळान जाव. ते दिवस आता सरले. कारण शिक्षनासाठी नोकरी-धंद्यासाठी हयसर मुंबै शहरात आमी इलव.

पन ह्यावर्षी ठरवलंय कायपन करून आंगणेवाडीच्या जत्रेक गावाक जावकच व्हया.
माका आजूनव तो दिवस आटावता जेवा आमी धावी पास झाल्यार आमच्या वर्गातले धा-बारा जन मेळान मुंबैक जावक तयार झालव. आमका कोनाकव तेवा गाव सोडून शहरात जावचा नव्हता. तरीपन आमी शिकन्याच्या धडपडीमुळा आनि घराक आधार म्हणून पैसोआडको कमवूक म्हणान गावाभायर पडलंव.
आमचो मुंबैक जावयो दिवस जसजसो जवळ यैत होतो तसतसो आमचो जीव जळत होतो. आमी गावातल्या थोरा-मोठ्यांच्ये आशीर्वाद घेवन भायर पडाक लागलवं तेवा गावातली बरीच मानसा येष्टीच्या थांब्यांपर्यात पोचवक इल्ली.
गावड्यांच्या आजयेन आमका आमच्या वांगडा सात-आठ पावला चलत येवन निरोप दिलो. तेवा ती म्हनाली, पोरांनु तुमी सगळे मुंबैक चल्लास आता माज्या घराच्या पडयेत धिंगानो कोन घालतला आणि दारातल्या आवळनीचे आवळे कोन काडतला असा म्हनान तिना आपलो फाटको पदर तोंडाक लावल्यान. आनी मग आमी सगळेच रडाक लागलवं.
आज शहरात येवन आमी सगळी पोरा चांगले शिकलव-सवरलव. येगयेगळ्या ठिकानी नोकरेक लागलव. अधून-मधून गणपतीक आनि मे म्हयन्यात गावाक येतच ऱ्हवलय, गावाक कदीच इसालव नाय, गावाक काय वायच जरी खूट झाला तरी आमी येकमेकांका सांगून सवरून गावची खबरबात घेतच आसतव.
हयसरल्या कामात स्वतःक बांधून ठेयत आसलव तरी मनात मात्र गावच्या आठवनींचो सोनचापो परमाळता. तो वास आजूनव तसोच आसा. म्हनान आज जेवा आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कळली तेवा पुन्हा येकदा सगळा आठवाक लागला आनि मन गावच्या वाटेक लागला आणि कोकणकन्याच्या रूळावर धावाकय लागला.
माकाच ही पयली बातमी कळली म्हनान मिया अंजू, महेश, संदीप, निर्मला ह्या चौघांका फोन केलंय आनि तुमी आनखीन बाकीच्या ऱ्हवलेल्या वर्गातल्या आपल्या मित्रांका फोन करून कळवा म्हनान सांगलंय.
ह्या वर्षी आपन सगळे मिळान आंगणेवाडीच्या जत्रेक जावया आनि शाळेतल्या दिवसाच्ये, खळ्यातल्या मातीत रंगलेले सगळे दिवस पुन्हा आठवया. पन एक गोष्ट मात्र खटकतली की यावेळेस आमचे काका आमच्या वांगडा नसतले. जे आमका सगळ्या पोरांका एकत्र घेऊन जत्रेक जायचे. त्यांची कमी आता नेमीच ऱ्हवतली तरी पन त्यांच्या बरोबरच्यो आठवणी नेमीच ताज्यो ऱ्हवतल्यो. भराडी देवीचो आशिर्वाद आनी कृपा आपल्या सगळ्यांवर आसाच... 

(सिंधुदूर्ग जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीत लिहिलेला हा ललितलेख आहे.)

रात्रीच्या वेळी देवळाचा परिसर असा दिसतो.
भाविकांनी फुललेला मंदिर परिसर

Saturday, 30 January 2016

रिमझिम क्षण

आजवर छत्री असूनही अनेकदा पावसात भिजले होते. मनात बरसणाऱ्या या पावसाचा भार कागदाने आणि शब्दांनी कितीदा वहायचा. म्हणून उंबऱ्यावर बसून त्याची वाट पाहत होते. दुपारपासून तो येण्याची चाहूल लागली होती. मागल्या सहवासाच्या आठवणींनी मन भरून गेलं होतं. पण संध्याकाळ होतं आली तर अजून तो आला नव्हता. मन कासावीस झालं. मनात असंख्य प्रश्नांचं वादळ सुरू झालं होतं. तेवढ्यात त्याच क्षणी मंद वाऱ्याची झुळूक आली. पाठोपाठ तोही आला. त्याला पाहताच माझे डोळे तृप्त झाले. मन शहारून गेलं. त्याला भेटण्यासाठी आतुर होऊन मी त्याच्या जवळ गेले. अंगणात हात फैलावून उभी राहिले. त्याच्या स्पर्शाने माझं तन मन मोहरून गेलं. आनंद गगनात मावेना झाला. 

...असा मी पहिल्या पावसाचा तो रिमझिम क्षण अनुभवला...


Sunday, 17 January 2016

असं की तसं (ट्विटर कथा)

आमचा कॉलेजमधला सगळा ग्रुप गिरगाव चौपाटीवर धमाल करण्याच्या हेतूने आला होता. पाहिलं तर सगळीकडे अगदी मरीन लाईन्सच्या टोकापर्यंत कपल्स बसली होती. आमची सगळ्यांची एकसारखी बडबड चालूच होती. इतक्यात रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही पाहिलं तर अगदी सगळ्यात शेवटी टोकाला एक कपल बसलं होतं. ते दोघे कितीतरी दिवसानंतर आज भेटत आहेत असं दिसलं. दोघांचेही डोळे अश्रुंनी भरले होते. हा भेटीचा आनंद होता की दुराव्याचं दुःख काही कळण्याला मार्ग नव्हता. त्यांना त्यांच्या भावना एरवी सगळ्यांसोबत असताना व्यक्त करता येत नसाव्यात असं वाटलं. कदाचित ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नसतील. ऑफीसचं टेन्शन, मुला-नातेवाईकांचा गोतावळा आणि सतत इतरांची किरकिर आणि एकुणच आपल्या आयुष्यावरच ते दोघे वैतागलेले दिसत होते. त्यामुळे त्या दोघांना परस्परांचा सहवास दुर्मिळ होत चालला असेल. 


त्या दिवशी ते दोघे एकमेकांपासून दूर जाताना पुन्हा पुन्हा एकमेकांकडे मागे वळून पाहत होते. त्यांच्याकडे पाहताना असे कितीतरी विचार मनात आले. अरे, चला ना काय हम तुम मधला सीन बघताय का?” आमच्या ग्रुपमधलं कुणीतरी बोललं. सगळे पुढे चालू लागले. त्या दोघांच्या भेटीचं रहस्य काय? का इतर कपल्स सारखे ते ही... काय खोटं, काय खरं काहीच कळलं नाही. ते सारंच समजण्यापलिकडचं होतं. कारण सहवास हा शब्द हल्ली शहरात कितीदा वाईट अर्थानेच घेतला जातो. वेळेच्या आणि जागेच्या अभावी संवाद खुंटतो आहे, हे मात्र खरं...

पूर्वप्रसिध्दी - ट्विटरसंमेलन २०१६

Friday, 15 January 2016

CHASE OF WORDS

लिहित होते ARTICLE, पण सुचत होती POEM
ARTICLE लिहायला मला WORDS आठवेनात.
POEM मध्ये मात्र WORDS छान गुंफून येत होते. काय करावं ARTICLE WRITING COMPETITION चं?
ARTICLE ऐवजी POEM च लिहावी का?
पण अथक प्रयत्नानंतर POETIC MIND ला थोड्या वेळापुरता आवर घालत एक मोठं पानभर BEAUTIFUL ARTICLE  लिहिलं.  मग ARTICLE च्या शेवटी मात्र POETIC MIND ला वाट करून दिली. ARTICLE  च्या LAST LINE ची काट छाट करून दोन ओळी POEM च्या लिहिल्या.

WHY THIS HAPPENS?
ARTICLE लिहायला घेतलं की POEM का सुचते?
ओळीओळींमधला WORD, तालासुरात का गुंफला जातो?
असं वाटतंय माझं POETIC MIND,
ARTICLE लिहिताना माझा पाठलाग करतंय…




आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...