Thursday, 28 December 2017

कलेच्या क्षितीजावरील एक 'हिरा'बाई

'पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा अपेक्षिणाऱ्या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत...' अशा वेळोवेळी धाडसी विचार मांडणाऱ्या हिराबाई पेडणेकर. त्यांचं आद्य महिला नाटककार म्हणून कार्य तसं दुलर्क्षित राहिलं असतं. पण लेखिका शिल्पा सुर्वे यांनी मात्र या गुणी, कलावंत ह्रदयाच्या आणि धाडसी लेखिकेचं चरीत्र शब्दबद्ध केलं आणि आजच्या पिढीला त्यांची ओळख करून दिली. अलिकडे काहीही माहिती हवी झाल्यास आपण विकीपीडीवर जातो. गुगल करतो. तिथे जेवढं काही वाचायला मिळेल, सापडेल तेवढंच आपल्याला वाटतं की एवढीच माहिती आहे. यापुढे फार काही कुणाचं कार्य नसेलच. अशा व्यक्तिमत्त्वांविषयी वाचायला क्वचित हल्ली पुस्तकांचा आधार घेतो. पण काही निखळ, निरलस सुंदर वाचायचं असेल तर आजही पुस्तकांशिवाय पर्याय नाही.
कारण मराठीतही काही वेगळ्या वाटेवरची, एखाद्या विस्मृत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य उलगडणारी पुस्तकं तितक्‍याच तरलतेने लिहिली जातायत. याचं अलिकडंचं ताजं उदाहरण म्हणजे शिल्पा सुर्वे


यांनी लिहिलेलं हिराबाई पेडणेकरांचं चरीत्रात्मक पुस्तक.
पत्रकारितेचा 13 वर्षाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या लेखिका शिल्पा सुर्वे यांना पत्रकाराच्या शोधक नजरेने त्यांना हिराबाईपर्यंत पोहोचवलं आहे. कारण अतिशय मनापासून घडवलेली ही कलाकृती आहे, हे पुस्तक वाचताना जाणवतंय. ज्या काळात स्त्रिया रंगभूमीवर काम करत नव्हत्या. नाटकातंही स्त्रीपात्र पुरुषच करत अशा काळात हिराबाईंचं संगीत दामिनी रंगभूमीवर झळकलं. हिराबाईंचा संगीतमय असला तरी हा काळजाला भिडणारा प्रवास लेखिकेने ओघवत्या शैलीत रेखाटलाय. हिराबाईंची संगीत साधना, कलेच्या क्षेत्रात वेगळं काही करण्याची धडपड, प्रस्थापितांच्या साम्राज्याला त्यांनी धडका देणं, एक माणूस म्हणून प्रत्येक पावलांवर त्यांना करावा लागलेला संघर्ष हे वाचताना सुन्न व्हायला होतं. पालशेतला निघण्याआधी हिराच्या मैत्रिणी सुधा आणि अंजनी भेटायला येतात तो प्रसंग अधिक तरल हळवा झालाय. हिरा सगळ्यापासून दूर पालशेतला जाऊन राहणार याचं मैत्रिणींना दुखही झालं होतं आणि अखेर तिच्या जिवाभावाचा माणूस भेटला म्हणून समाधानही झालं होतं. पुस्तकातील असे कित्येक छोटे छोटे प्रसंग छान रंगले आहेत. गिरगावातील कांदेवाडीचा परीसर कधी मधी दिसतो. पण आता तो परीसर पाहताना एक वेगळी दृष्टी मिळेल. या परीसराने एका महत्त्वाकांक्षी कलावंत गायिकेची धडपड पाहिली, तिचा संघर्ष पाहिला. तिची कला पाहिली. पण त्यातून इतर वलयांकित नाट्यमंडळींसारखा आपल्याला मान मिळावा या स्वप्नाला मात्र या जागेने अपुरं राहताना पाहिलं. हे सारं आठवेल. अशा त्या काळातील कित्येक कलावंतांची धडपड मुंबईने खास करून दक्षिण मुंबईने पाहिली असेल. त्यातल्या हिराचा परीचय आपल्याला शिल्पा सुर्वे या लेखिकेमुळे झाला. हे वाचक म्हणून प्रत्येकाला समाधान देणारं आहे. पण हिराची शोकांतिका चटका लावून जाते.

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती

Thursday, 21 December 2017

त्यांचा चार्ली, आपला देवा!

आज देवा हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने चार्लीच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि लिहावसं वाटलं. कारण हेच की चार्लीसारखा अप्रतिम सिनेमा मराठीत यायलाच हवा होता...

टेसा नावाची एक ग्राफिक आर्टीस्ट... तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी सतत मागे लागलेत. तिला तर एवढ्यात लग्नच करायचं नाहीय आणि ती एके दिवशी घरातून पळते. आणि केरळमधल्या अशा एका ठिकाणी येऊन पोहोचते, जिथवर तिचे घरचे पोहोचू शकत नाहीत. आपल्या एका फ्रेंडच्या मदतीने ती एक खोली भाड्याने घेते. त्या खोलीत पाऊल टाकताच क्षणी खोलीतला सगळा पसारा पाहून ती खोली तिला अगदी नकोशी वाटते. आणि ती खोली बदलून मिळावी अशी मागणी तिथल्या संबंधितांकडे करते. पण नेमक्या त्याचवेळी तिला त्या खोलीत एक अतिशय भन्नाट, आश्चर्यचकीत करून सोडणारं असं काहीसं हाती लागतं. तिच्यासाठी तो एक खजिना असतो. (कारण काय तर तिचं ग्राफिक आर्टीस्ट असणं, म्हणजे थोडक्यात प्लॉट पॉईंट वन आधीचा ओपनिंग सीन) आता तो काय खजिना, कसला खजिना ते सिनेमा पाहताना किंवा ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्यांना कळलंच असेल. तर हा सिनेमा आहे २०१५ मध्ये मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला चार्ली.
त्या खजिन्यात तिला जे काही सापडतं त्यामुळे तिची चार्लीला भेटण्याची उत्सुकता आणि कुतूहल दिवसेंदिवस वाढत जातं. तिच्या डोक्यात एकच विचार... कसा आहे चार्ली, कोण आहे हा चार्ली, मी त्याला कधी भेटणार...आणि ती त्याच्या शोधात निघते. मग कशी ती त्याच्या रोज नव्याने प्रेमात पडते, तिचा शोध पूर्ण होतो का? ती चार्लीला भेटते का? चार्ली आणि टेसाचं नातं कसं उलगडत जातं? हे सगळं सिनेमात पाहताना आपलीही क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतं आणि कुतूहल कायम ठेवत शेवटी आनंदाचा सुखद धक्का दिग्दर्शक आपल्याला देतो.


चार्लीची भूमिका मल्याळम सिनेमात डुलकर सलमानने (Dulquer Salmaan) साकारलीय. ती इतकी अप्रतिम की त्याला तोड नाही. या अभिनेत्याची याच सिनेमामुळे फॅनच व्हायला झालं मला. त्यानंतर त्याचे आधीचे उस्ताद हॉटेल, काली, बँगलोर डेज, हंड्रेड डेज ऑफ लव्ह, ओ कधाल कनमनी हे सिनेमे पाहिले. तो अभिनेता म्हणून एक वेगळंच रसायन आहे. तो अजून एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. मल्याळममधील स्टार अभिनेते मामुटी यांचा तो मुलगा म्हणून नव्हे तर त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. तो अफलातून अभिनेता तर आहेच. पण अतिशय गोड गळ्याचा गायकही आहे. या सिनेमातलं गाजलेलं गाणं चुंदरी पेन्ने हे त्याने गायलंय. यामागेही एक लय भारी कारण आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी, त्यातलं चुंदरी पेन्ने हे गाणं डुलकरनेच गावं अशी संगीतकार गोपी सुंदर याची इच्छा होती. गोपी सुंदर हा डुलकरचा खूप चांगला मित्र. त्यामुळे डुलकरने हे गाणं गायलं. हे गाणं चार्ली सिनेमात चार्ली त्याच्या शोधात निघालेल्या टेसाला उद्देशून गातोय. असं दाखवण्यात आलंय आणि देवा सिनेमात याच चालीत देवा अँथम बांधण्यात आलंय.

चुंदरी पेन्ने म्हणजे सुंदर मुलगी आणि टेसाला उद्देशून या गाण्याची मल्याळम शब्दरचना फारच सुंदर आहे. अभिनेता डुलकर सलमानचं जसं कौतुक करावं तितकं कमी तसंच पार्वथी या अभिनेत्रीचं. तिनेही मस्त भूमिका साकारलीय. क्युरीयस, क्षणाक्षणाला चकीत होणं, शोधक नजर, टेसाची उत्सुकता खूप छान अभिनीत केलीय. ही भूमिका देवा सिनेमात तेजस्विनी पंडीत करतेय. (पण ती यात लेखिका दाखवलीय.) आणि अर्थातच चार्लीची भूमिका अंकुश चौधरी करतोय. ट्रेलर आणि गाण्यांमधला दोघांचा अभिनय बघून असं वाटतंय की दोघांनीही आपल्या भूमिका छान पेलल्या आहेत. चार्लीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती म्हणजे डॉ. कनी. अपर्णा गोपीनाथ हीने ती भूमिका केलीय. ही भूमिका देवा सिनेमात स्पृहा जोशी करतेय. तिचा लूक यात खूपच छान दिसतोय.

देवा सिनेमा मल्याळम चार्लीचा ऑफीशीयल रिमेक आहे, असं विकीपीडीवर नोंदवण्यात आलंय. आणि हे आता सगळ्यांना माहितेय. पण मल्याळम सिनेमा जशाच तसा आम्ही घेतला नसून त्याच्या कथेचं मराठीत रुपांतरण केलंय असं देवाच्या टिमने काही प्रमोशनल इव्हेंट दरम्यान सांगितलंय. आणि ते जाणवतंय. पण ट्रेलर, ‘जराशी जराशी’ आणि ‘रोज रोज नव्याने’ या गाण्यांमधले काही सीन ओळखीचे वाटले.
सिनेमा बघताना माझ्या आणि माझ्या बहिणीच्या डोक्यातही असाच विचार आला होता की याच चार्लीचा मराठीत रिमेक वगैरे करण्यात आला तर त्याला कोकणची पार्श्वभूमीच असायला हवी. आणि नेमकं तसंच घडलं. हे खूप भारी वाटतंय. (खरंतर माझी बहिण हर्षदा हिच्या आग्रहामुळेच मी चार्ली पाहिला.) सिनेमातलं खेळकर, हलकं फुलकं तरीही गूढ, रम्य आणि कोड्यात टाकणारं तिथल्या जागांचं सौंदर्य हे सारं कोकणातच दिसू शकतं. देवा सिनेमाच्या निमित्ताने कोकण एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला मिळणार आहे. कोकणातल्या लोककला दशावतार, नमन असं सगळं देवा सिनेमात पहायला मिळणार.

काहींचा असा समज असतो की दाक्षिणात्य सिनेमे म्हणजे तद्दन मसालापट असतात. त्यांच्यासाठी चार्ली म्हणजे सणसणीत चपराक ठरावी. कारण इतका कलात्मक आणि मनोरंजनाने परीपूर्ण असा हा सिनेमा आहे की आपणच कल्पनाच करू शकत नाही. अशा प्रकारे याच्या पटकथेची मांडणी आणि दिग्दर्शन करण्यात आलंय. सारंच भन्नाट आहे. अक्षरशः वेड लावतं. मार्टीन प्रक्कट यांनी चार्ली दिग्दर्शित केलाय. त्यांनीच उन्नी आर.(जयचंद्रन परमेश्वरन नायर) यांच्यासोबत मिळून त्याची पटकथा लिहिलीय. त्यासाठी दोघांनाही विभागून केरळ राज्याचा पुरस्कार मिळालाय. मूळ कथा उन्नी आर. यांची. तेसुद्धा एक लघुकथेतलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. मल्याळम साहित्य आणि सिनेमात उन्नी आर. यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते कथालेखक तर आहेतच. तसंच ते अभिनेते, निर्मातेही आहेत. पण त्यांच्या करिअरची सुरुवात केरळमधील एका साप्ताहिकात उपसंपादकाच्या नोकरीने झाली. त्यांचा पत्रकारीतेचाच अनुभव या कथेपर्यंत घेऊन आला असेल असं चार्ली बघताना वाटून जातं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी कुठल्यातरी वेगळ्याच स्टोरीच्या शोधात असणं, हे तिथून आलं असावं, टेसाचं पात्र. असो यात खूप काही सांगण्यासारखं आहे.


मुळात माणसाला प्रत्येकाला या ना त्या नावाने संबोधून त्याला चौकटीत अडकवण्याची घाई असते. पण काही माणसं अशी चार्लीसारखी असतात. ती मात्र आपल्याला कोड्यात टाकतात त्यांच्या वागण्याने... त्यांना काय नावं द्यावं, काय म्हणावं, कुठल्या चौकटीत बसवावं या विचारात आपण असतो. नी ही चार्लीसारखी व्यक्तिरेखा आपल्याला सतत आश्चर्यचकीत करत राहते. मग तिला काय म्हणावं स्वच्छंदी, असीम, मुक्त पक्षी, अलबेला, अद्भूत, वाऱ्याची शितल सुखद झुळूक की अतरंगी...अख्खा आनंदाचा गाव ज्याच्यात वसलाय त्याला नेमकी हाक कशी मारावी, कुठल्या नावात बंदीस्त करावं. तर खरंच त्यांना असं कुठल्याही चौकटीत बंदीस्त करूच नये. त्यांना त्यांच्या आनंद वाटण्याच्या मिशनवर सोडून द्यावं. त्यांच्या चौकसपणाला चमत्काराचं रुप देता येईल, पण तात्पुरतं.

खरंतर चार्लीची गोष्ट साधीसोपी आहे. त्याला आपल्या आजुबाजुच्या साऱ्या माणसांना सुखी झालेलं पहायचंय. माणसांना आश्चर्याचा धक्का देताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पहायचंय. जसं देवा सिनेमातल्या एका संवादात अभिनेता अंकुश चौधरी म्हणतो. देवा सिनेमाच्या साऱ्या टिमचं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी चार्लीला मराठीत आणलं. महत्त्वाचं म्हणजे कोकणच्या पार्श्वभूमीची निवड केली. चार्ली सिनेमा संपूर्ण आश्चर्याने भरलेला आणि भारलेला आहे. पण तरीही त्यातला शेवटचा सीन अगदी बारकाईने पाहण्यासारखा आहे. केरळमध्ये थ्रिसुर पुरम फेस्टीव्हल होतो. तो यात क्लायमॅक्सला दाखवलाय. आणि इतक्या लार्ज स्केलवर हे शूट करण्यात आलंय की त्याची भव्यता कित्येक दिवस डोळ्यांसमोरून हटणार नाही अशीच.
देवा सिनेमात दिसणारं कोकणही असंच आश्चर्यचकीत करतं. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी यांचे लूक खूपच छान, फ्रेश वाटतायत. अमितराज यांची गाणीही मस्त आहेत. हर्षवर्धनचा आवाजही जराशी जराशी गाण्यात मस्त वाटतोय. दिग्दशर्क मुरली नलप्पा यांच्या कामगिरीचं कौतुक तर सिनेमा पाहिल्यानंतरच करता येईल. पण विश्वास वाटतोय देवा निराश करणार नाही.आणि आर्वजून उल्लेख करावा लागेल तो लेखकांच्या टीमचा. देवा सिनेमाची पटकथा अश्विनी शेंडे हिने लिहिलीय. असं म्हणतात की Writer and Creativity is the package of feelings. Nobody can make it, Nobody can destroy it, Nobody can explain it, But innocent people can feel it…
म्हणून कदाचित अश्विनी हिने तेजस्विनीच्या माया नावाच्या पात्राला लेखिका दाखवलंय. कारण चार्लीत तर इनोसंस आहेच पण टेसाही तितकीच इनोसंट आहे. गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचं गीतलेखनही छान झालंय.

आपल्याला चार्लीच्या गोष्टीतून काय शिकायला मिळतं. तर कुतूहल. आपलं कुतूहल नेहमी जागृत असेल तर व्यक्ती म्हणून आपण नव्या गोष्टींचा शोध घेत राहतो. आणि शोधाच्या वाटेवर येणाऱ्या साऱ्यांना आनंदाचे क्षण देऊ शकतो. पण कुतूहल संपलं तर सारंच निरस होऊन जाईल...काहीही झालं तरी चेहऱ्यावरचं गोड हसू आणि प्रत्येक दिवस सुरू झाल्यावर आपल्याला एक वेगळं, काही छान करता येईल ते बघणं... अतिशय सकारात्मक उर्जा देणारा हा सिनेमा आहे. कलावंत ह्रदयाच्या माणसाने तर हा सिनेमा अजिबात चुकवू नये. कारण प्रत्येक कलावंताला (लेखक, चित्रकार) यांना हा सिनेमा वेगळा जाणवेल. आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना हा सिनेमा ‘आनंद देत असता आनंद घेत जावे’ हे विंदांनी सांगितलेल्या ओळींचा अर्थ उमगावा तसा उमगेल...
अगदी थोडक्यात चार्ली म्हणजे गोड स्माईल...So Keep Smiling…

Tuesday, 5 December 2017

स्त्रीविषयक कायदे आणि बाबासाहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार परिवर्तन घडवून आणणारे होते. स्त्रियांना समान न्याय मिळावा यासाठी हिंदू कोड बिल कायद्याच्या स्वरूपात ते साकार करू पाहत होते. बाबासाहेबांचा स्त्रीविषयक आणि स्त्रियांच्या प्रश्‍नांविषयी दृष्टिकोन कसा होता. हे 'डॉ. आंबेडकर आणि हिंदु कोड बिल' या चांगदेव  भगवान खैरमोडे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन मांडण्याचा हा प्रयत्न...



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीमुक्तीविषयक विचार काळाच्या कक्षा ओलांडून जाणारे होते. समस्त मानवजातीच्या आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यांसाठी ते लढले. स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून असते, असे त्यांचे मत होते. "लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावं; मात्र गुलामासारखं वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा.' बाबासाहेबांचा हा विचार आजही आदर्शवत आहे. बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा विचार राष्ट्रीय दृष्टिकोनातून केला. ज्या देशात 50 टक्के स्त्रिया स्वतंत्र नसतात तो देश अर्धाअधिक गुलाम असतो, असे सांगताना स्त्रीशक्तीचं सृजनात्मक स्वरूप राष्ट्रविकासाला जोडण्याचं कार्य त्यांनी केलं. बाबासाहेबांची स्त्रीमुक्तीची वैचारिक बैठक गौतमबृद्ध, ज्योतिबा फुले, कबीर या तीन गुरूंच्या प्रभावातून निर्माण झाली होती. कुटुंबप्रमुखाची हुकूमशाही आणि स्त्रियांची गुलामगिरी हाच सामाजिक विषमतेला, गुलामगिरीला खतपाणी घालणारा घटक आहे. या घटकाला हादरे दिल्याशिवाय कुटुंबात व समाजातही स्त्री-पुरुष समानता येणे अशक्‍य आहे. हे बाबासाहेबांनी पुरते ओळखले होते. म्हणून त्यांनी महिलांविषयक प्रश्‍नांचा सुक्ष्मपणे अभ्यास केला.

पुरुषप्रधान धर्मव्यवस्थेत स्त्रिया या पुरुषांच्या गुलाम आहेत. बालविवाह, पुनर्विवाहास विरोध, विधवा विवाहास विरोध, सतीची चाल अशा घातक रूढी-परंपरेच्या बेड्यांनी स्त्रियांना जखडून ठेवून त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे हे त्यांनी जाणले. भारतातील जाती, हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती, पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी तसेच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांतून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी विचारपेरणी केलेली आहे. स्त्रिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला कवडीचीही किंमत नाही. हा मनूचा कोता दृष्टिकोन आजही दिसतो. धर्म कोणताही असो, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. स्त्री स्वातंत्र्यामुळे समाजात स्वैराचार माजेल. अनैतिकता, उपभोगवास, पाश्‍चात्याचं अंधानुकरण, कुटुंबसंस्थेचा विध्वंस इ. दोष निर्माण होतील, अशी टीका केली जाते. स्त्री स्वातंत्र्याचा विचारही एक फॅशन आहे, असेही म्हटले जाते.

स्त्रियांची सर्जनशीलता केवळ मुलं जन्माला घालण्यापुरती मर्यादित न ठेवता, विविध क्षेत्रांत तिला कर्तृत्वाची उंच शिखरं गाठण्याची संधी देणं. यात मानव जातीचे हित आहे. ही भूमिका घेऊन आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचा वसा घेतला आणि स्त्रियांच्या धर्मप्रणित गुलामगिरीच्या विरोधात ते उभे ठाकले.
डॉ. आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं जे कार्य केलं ते ऐतिहासिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यघटनेत स्त्रीविषयक कायद्यांचा समावेश त्यांनी केला. मजूरमंत्री या पदावर असताना गिरण्या, कारखाने येथे काम करणाऱ्या कामगार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं वेतन मिळावं. स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळावी. महिलांच्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघर असावीत. वयात आलेल्या सर्वच पुरुषांबरोबर स्त्रियांनाही मताधिकार असावेत, अशा विविध मागण्या करून त्या संमत करून घेतल्या. एक भारतीय नागरिक म्हणून स्त्रियांना ते सर्व हक्क असावेत जे पुरुषाला असतात. स्त्रीला खऱ्या अर्थाने एक नागरिक, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगता यावं यासाठी ठोस विचार व खंबीर भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मसुदा मांडला होता.

हिंदू कोड बिलातील स्त्रीला मिळालेले हक्क व अधिकार महिला सबलीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणारे होते. द्विभार्या प्रतिबंध, घटस्फोटाचा अधिकार, वारसा हक्क, दत्तक कायदा स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्‍यक असलेली समान संधी इ. अनेक गोष्टींना कायद्याचे रूप देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या रूपाने त्यांनी केला. कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांनी सक्षम व्हावे यासाठी ते झटले. आंबेडकरांनी स्त्री शिक्षणावरही भर दिला. सामाजिकदृष्ट्या महिलांची उन्नती व्हावी, असे बाबासाहेबांचे मत होते. स्त्रियांना स्वयंनिर्णयाच्या अधिकारापासून वंचित केल्यास राष्ट्रीय आर्थिक विकासाची गती रोखली जाईल. म्हणून स्त्रिया स्वावलंबी असल्या पाहिजेत, असे ते आपल्या भाषणांतून सांगत. आज स्त्रियांना सामाजिक क्षेत्रात व्यावसायिक स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याचा पाया घालण्याचं काम आंबेडकरांनी केलं. त्यांच्यामुळेच महिला सबलीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. "स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे.' आंबेडकरांचे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील असे विचार अतिशय प्रेरणादायी आणि कल्याणकारक आहेत. जुन्या चालीरीती, परंपरांवर आधारित असलेली क्रूर विषमता, समाजातील रूढी-परंपरा की ज्या स्त्रियांना मानसिक, शारीरिक दुबळं बनवितात, स्त्रियांचं स्वातंत्र्य नष्ट करतात अशा विषमतेत होरपळणाऱ्या स्त्रियांना स्वतंत्र करणं, समान हक्क प्राप्त करून देणं हा हिंदू कोड बिलाचा उद्देश होता.

स्त्रीला जागृत करून तिला अधिक संरक्षण देऊन पुरुषांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी तिला समानता, आर्थिक, राजकीय, सामाजिक स्वातंत्र विशेष कायद्याने द्यावे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होते. म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला होता. महिला सबलीकरण म्हणजे स्त्रियांचं आध्यात्मिक, राजनैतिक, सामाजिक आणि आर्थिक सामर्थ्य वाढविणं. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या क्षमतांसंबंधी त्यांचा आत्मविश्‍वास विकसित करण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. बाबासाहेबांची स्त्रीविषयक भूमिका ही अशी अत्यंत व्यापक आणि दूरगामी होती. हिंदू कोड बिल हे स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होतं. 1947 पासून 1951 पर्यंत संसदेमध्ये भारतीय स्त्रियांचा हक्क आणि अधिकारांसाठी बाबासाहेब सनातन्यांशी संघर्ष करत होते. भारत सरकारने 2001 हे महिला सबलीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे. त्याचा जो बोजवारा उडाला त्याची फलनिष्पत्ती आज आपण पाहतो आहोत. अशा वेळी लक्षात येतं की, बाबासाहेबांसारख्या द्रष्टा विचारवंत पुन्हा होणे नाही. आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्री स्वातंत्र्याची चर्चा विज्ञान, तंत्रज्ञान, पोलिस, शिक्षण आदी क्षेत्रांत स्त्रियांचा जो सहभाग आहे, त्यामागे डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्यकर्तृत्वाची संपदा आहे. बाबासाहेबांनी महिला सबलीकरणांचं महत्त्व जाणलं होतं. त्या दृष्टीने ठोस पावलंही उचलली. कायद्याच्या माध्यमातून आज पुन्हा आपणा सर्वांना बाबासाहेबांचे विचार आठवण्याची गरज आहे. महिला सबलीकरणाच्या बाबतीत तरी त्यांच्या विचारांना पुन्हा अनुसरण्याशिवाय तरणोपाय नाही. 

Friday, 1 December 2017

ससूनची कलासंध्या!

Intro - समुद्रकिनारा ही अशी जागा आहे जिथे संध्याकाळ खूपच सौंदर्यवती होऊन भेटते; पण अशी संध्याकाळ `कला`वती होऊन भेटली तर? अशी संध्याकाळ अनुभवायला मिळाली ससून डॉकला. खरंतर इथल्या हवेतला गंध साधारणतः मत्स्यप्रेमींनाच आवडतो, इतरांचा मात्र नाकाला हात जातो! पण, या दोघांनीही ससूनला जाऊन कलाप्रेम जपायला हरकत नाही. कारण तिथे एक प्रदर्शन तुमची वाट पहातंय. कलाप्रेमी नसलात तरीही इथली कला भावेलच तुम्हाला... कारण जीवनापेक्षा कला कधीही वेगळी नसतेच...


ही गोष्ट आहे शनिवारी संध्याकाळी साधारण साडेपाचच्या दरम्यानची. एरवी चित्रपट, मॉल, हॅंगआऊट किंवा फूड जॉईट्‌सकडे वळणारी तरुणाईची पावलं ससून डॉककडे वळत होती. तीही कलेच्या ओढीने. इतक्‍या उत्साहाने सहभागी झालेल्या १५ ते ३० वयोगटातील तरुणाईला खूप दिवसांनी असं कलेत रमताना पाहता येत होतं. हे खूपच भारी वाटत होतं. तसं पाहायला गेलं तर १४२ वर्षांपासूनचा सर्वांत जुना मासळी बाजार अशी ससून डॉकची ओळख. ‘साऊथ मुंबई इज द हार्ट ऑफ मुंबई’ आणि ‘अदर्स आर ओन्ली पार्ट ऑफ मुंबई’ असं अभिमानाने सांगणाऱ्या दक्षिण मुंबईकरांच्या खूप आठवणी या जागेशी जोडल्या गेल्या आहेत. हे मासेखाऊ मुंबईकरांचं एक हक्काचं मार्केट; पण अलीकडे मच्छी का पानी असं कोणी ओरडलं तरी लांब पळणारे अनेक जण माशांचा इतका तीव्रतेने वास येणाऱ्या त्या ठिकाणी होते.


मस्त मॉड फंकी, हिप्पी, शॉर्टसमध्ये आलेली कूल तरुणाई कलेचा आस्वाद घेत होती. नेहमीपेक्षा इथला नूर वेगळाच होता. मच्छीमारांची संथ लगबग होती. काही जण जहाजांवर सामानसुमान लादत होते. काही जण जाळी सोडून ठेवत होते. मधूनच एक कोळंबीने भरलेला ट्रक दिसला. काही सुके मासे खाली पडलेले दिसले. कोळी महिलांची टोपल्या घेऊन जाण्याची लगबग असं सगळं सुरू होतं. त्याचबरोबर तिथे दिसणारी कलात्मकताही लक्ष वेधून घेत होती. जिथे जहाजं थांबतात आणि मासे बाहेर नेण्यासाठी भरले जातात, त्या लांबलचक शेडची भिंत रंगात न्हाऊन निघाली होती. रस्त्याच्या कडेला लागूनच असलेल्या एका मोठ्या शेडच्या भिंतीवर मासेवाल्या कोळी महिलेचं चित्रं दिसलं. तिच्या टोपलीत एक मोठा मासा होता आणि तिच्या चेहऱ्यावरचे बोलके भाव आकर्षित करणारेच होते.


या डॉकवर एक चार मजली इमारत आहे. ती इमारत बाहेरून आणि आतून कलेने आणि कलाकारीने अगदी ओतप्रोत नटली आहे. इथला कोपरा न्‌ कोपरा पाहायला एक संध्याकाळ तर अपुरीच पडेल. या इमारतीत आत जाण्यासाठी मोठी रांग लागली होती. निःशुल्क असलं तरी हे प्रदर्शन पाहण्यासाठी फॉर्मालिटी पार पाडव्या लागतात. त्या करून आम्ही आत गेलो आणि अक्षरशः अवाक्‌ झालो.

‘द स्टार्ट फाऊंडेशन’ने हे कलाप्रदर्शन मच्छीमार कोळी बांधवांना समर्पित केलंय आणि आम्ही हे त्यांना डेडिकेट करतोय असा गाजावाजा न करता ते कलेतूनच दाखवून दिलंय. ‘आर्ट इज ॲक्‍टिव्हिटी दॅट प्रोड्युसेस ब्युटी’ या टॉलस्टॉयच्या म्हणण्याचा मथितार्थ ही संपूर्ण इमारत पाहताना समजला. चित्रकलेचे विविध प्रकार इथे पाहायला मिळाले. कुठे प्लास्टिकचा वापर करून केलेलं डिझाईन; तर कुठे भिंतीवर सर्वसामान्य माणसांची काढलेली पोर्ट्रेट, अमूर्त कलेचे काही नमुनेही इथे पाहायला मिळाले. स्प्रे पेंटिंग, वॉल पेंटिंग, कागदाचा आणि खास करून टाकाऊ वस्तूंचा वापर करून इथे शिल्पकला आणि आर्ट वर्क करण्यात आलं होतं. शेवटच्या मजल्यावर एक महाकाय माशाचा सापळा मधोमध टांगलेला होता. त्या मजल्यावर खुर्च्याही मांडलेल्या होत्या आणि स्क्रिनिंगसाठी खास जागा होती. तिथे स्टार्ट इंडिया फाऊंडेशनने कशा प्रकारे कलात्मक विचार करून ससून डॉकचा मेकओव्हर केला, त्याची चित्रफीत तिथे दाखवली जात होती.

कोळी वेशभूषेतील कमरेवर टोपली घेतलेली महिला, जाळं टाकणारे मच्छीमार आणि फक्त जाळ्याचा वापर करून केलेली कलाकृती आत शिरताच दृष्टीस पडते. तिथे अजून भारी सोनेरी लालसर रंगांच्या मशांनी भरलेलं फिश टॅंक होतं. त्यात काही मोबाईल आणि काही इतर इलेक्‍ट्रिक गॅजेट्‌स टाकलेली होती. म्हणजे हा एक प्रकारचा प्लास्टिक कचराच आणि तो माशांना म्हणजेच एकूणच सागरी जिवांना कसा हानीकारक आहे, हे अगदी उत्तमरीत्या दाखवलं होतं. तर एके ठिकाणी चांदीच्या रंगाचा पत्रा आणि चादरी किंवा गोधड्यांसारखा दिसणारं डार्क रंगाचं कापड वापरून एक सुंदर आर्ट वर्क करण्यात आलं होतं; पण भिंतीवरची कलाकारी सगळ्यात भन्नाट होती. त्यावर एका स्त्रीचं चित्रं खूपच बोलकं होतं. साडी नेसलेली आणि कमरेवर हात घेतलेली अशी ती. त्यातला तिचा स्वाभिमानी स्वॅग लक्षवेधी होता.

शहरातील सार्वजनिक इमारती आणि रस्त्यांवर साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीला ‘स्ट्रीट आर्ट’ म्हणतात. त्यानुसार ‘स्ट्रीट आर्ट’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्ट इंडिया फाऊंडेशन’ने मुंबईत दुसऱ्यांदा हा फेस्टिव्हल आयोजित केलाय. ससून डॉकप्रमाणेच मुंबईतील अजून काही महत्त्वाच्या ठिकाणांचा कलात्मक कायापालट या फेस्टिव्हलमधून करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यातच इथे कलाकारीला सुरुवात झाली. अजून काही भाग सुशोभित करण्याचं आणि स्ट्रीट आर्टचं काम इथे सुरू आहे. संपूर्ण डिसेंबर महिना हे कलाप्रदर्शन सगळ्यांना पाहता येणार आहे.
कला ही अशी गोष्ट आहे, जिने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नेहमीच समाजात बदल घडवून समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. ही क्षमता असलेली कला ही एकमेव गोष्ट आहे, यावर पुन्हा नव्याने विश्‍वास बसला. याला कारण ससूनला अनुभवलेली कलामय संध्याकाळ. कलेचा आनंद आणि कलेचा आस्वाद सर्व स्तरातील कलारसिकांना घेता यावा. विविध कलाप्रकार समजून घेता यावेत यासाठी अशी प्रदर्शनं भरायला हवीत.
ससून डॉकला माशांचा वास सहन करूनही जाणारे खूप असतात, मत्स्यप्रेम (ताजी मासळी) हे त्याचं कारण होतं; पण आता मत्स्यप्रेमींबरोबर कलाप्रेमीही तिथे मुद्दाम जातील हे नक्की!

पूर्वप्रसिद्धी - सकाळ मुंबई आवृत्ती 
1 डिसेंबर 2017 
टुडे पुरवणी (पान क्रमांक 4, कलारंग)




Sunday, 19 November 2017

हंपीः मुक्त प्रवासाची ‘प्रेम’कविता

आपण आपल्या भावना सोशल मीडियावर इमोजी, स्माईलीज मधून व्यक्त करतो. मित्र-मैत्रिणीने एखादी टच्ची, सॅड, इमोशनल, फनी पोस्ट किंवा स्टेटस टाकलं की आपल्याला तिचा मूड कळतो. पण समोरासमोर बसून एकमेकांशी बोलून व्यक्त होताच येत नाहीय यार...अशी परिस्थिती. ते फेमस वाक्य आहे ना ‘मुझे टुटने से खौफ आता है’... असं झालंय आपलं. कुणी चार वाक्य समजुतीची आपल्याशी बोललं तरी आपण त्याला म्हणतो, चल आता ग्यान देऊ नकोस, लेक्चर देऊ नकोस, फिलॉसॉफी झाडू नकोस असं सगळं बोलून त्याला गप्प करतो. पण इमोजी, स्माईलीज तरी किती काळ आपल्या भावनेला व्यक्त करणार? मग सगळं नकोसं वाटू लागतं. अशा वेळी केला पाहिजे एखाद्या अनवट वाटेचा प्रवास किंवा काहीही प्लॅन न करता घरातून निघालं पाहिजे...आणि या प्रवासात मग आपल्याला जे जे दिसतं, जे कुणी भेटतात, जे अनुभवायला मिळतं ते सारं अवर्णनीयच असतं. अप्रतिम, सुंदर किंवा मॅजिक असेच शब्द तोंडून निघतात.

हंपी या सिनेमातली ईशासुद्धा अशीच हंपीला येऊन पोहोचते. आपले आई-बाबा विभक्त होतायत हे ती सहन करू शकत नाहीय. ती कुठल्यातरी भावनिक गुंत्यात सापडलीय. तिला त्यातून बाहेर पडायचंय. रिक्षावाला आर. रंजितच्या (प्रियदर्शन जाधव) आवो बैठो, वेलकम टू हंपी या संवादानेच आपण हंपीच्या सफरीवर जाऊ लागतो. आणि या हंपीत अगदी शेवटपर्यंत रमण्याची जबाबदारी अमलेंदू चौधरी यांच्या कॅमेऱ्याने घेतलेली असते. त्यामुळे आपण जराही हंपीतून बाहेर येत नाही.

सिनेमा सुरू होतो तेव्हा आधी रस्ता दिसतो. मग गाडी येताना दिसते. सिनेमाचं शेवटचं लोकेशनही रस्ता हाच आहे. रस्ता हा आपल्याला प्रवासात पुढे पुढे जाण्याची प्रेरणा देतो. कसल्यातरी शोधात असलो की आपण नेहमी म्हणतो ना...मला जरा रस्ता तर सापडू दे मग बघ... तर रस्त्याचा आणि रस्त्यावरून चालणाऱ्यांची (प्रवासाला निघालेल्या आपल्या पात्रांची) मनोरंजक सफर दिग्दर्शकाने (प्रकाश कुंटे) अतिशय खुबीने आखलीय. त्यामुळे कुठेच थांबल्यासारखं वाटत नाही. अचानक एकापाठोपाठ घडणाऱ्या प्रसंगात आपण रंगत जातो.
आपल्याही आसपास ईशा (सोनाली कुलकर्णी), गिरीजा (प्राजक्ता माळी) आणि कबीर (ललित प्रभाकर) सारखी माणसं आहेत किंवा ती आपल्याला भेटतीलही. फक्त आपल्याला थोडं लक्ष द्यायला हवं. आपल्या मोबाईलमध्ये आणि दिवसभराच्या रहाटगाडग्यात स्वतःला बिझी ठेवत असलो, तर मात्र शक्यता कमी आहेत. त्यामुळे होतं काय की अशी माणसं आपल्याला भेटली तर ती अशीच बोलतील काय? जसं ईशा, गिरीजा आणि कबीर बोलतात. हो, ती अगदी तश्शीच बोलतील. पण हल्ली एकाच भाषेतली चार वाक्य सलग जरी कानावर पडली तरी आपल्याला ती खोटी वाटू लागतात. कदाचित या सिनेमातल्या या तिघांचे संवाद तुम्हाला नक्कीच खोटे वाटू शकतात. पण साचेबद्ध चौकट मोडून ऐकाल तर असं नाही वाटणार. कारण प्रत्येक वेळी माणसं दुसऱ्याला फक्त इंप्रेस करावं म्हणून असं बोलत नाहीत तर ते त्यांच्या जगण्यातून अनुभवातून आलेलं असतं. कबीर वास्तुविशारद आहे, (आणि मुळात तो एक भटक्या आहे.) गिरीजा लेखिका आहे (मनसोक्त प्रत्येक क्षण जगणारी) आणि ईशा मानववंशशास्त्राची अभ्यासक आहे. (तिला नृत्याची आवड आहे.) मग असे हे तिघे प्रवासात भेटतात तेव्हा सुंदर आणि वेगळ्या विचारांची देवाणघेवाण त्यांच्या संवादातून होणं साहजिक आहे. आणि ती होते.

ईशाला कबीर सुंदर कॉम्प्लीकेटेड कठीण म्हणतो. तर ईशा म्हणते, माझा ना मॅजिक वर विश्वास आहे, ना प्रेमावर. पण हंपीच्या प्रवासात तिचं हे मत बदलतं. गिरीजाचं आनंदाने ओरडणं हंपी हिअर आय ऍम आणि तिचं बोलणं जसं की जागा सुंदर असतात पण ती संस्मरणीय व्हायला माणसंच लागतात. हे आपल्याला हंपीच्या प्रवासात खरं वाटू लागतं. कारण या तिघांच्या एकत्र भेटण्यामुळे आणि असण्यामुळे अनप्लॅन्ड प्रवासाला गती मिळते, उत्साह येतो आणि रंजकता येते. कबीरही ईशाकडे पाहून मनातून ठरवून टाकतो की ईशाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलवायचा. पण ते तो सांगत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून तिला दाखवून देत असतो. ‘अपनेही रंग में’ या गाण्याची योजना अगदी योग्य ठिकाणी झालीय. या प्रसंगात ईशाला तल्लीन होऊन नृत्य करताना पाहून कबीरची मनोमन खात्री पटते की ईशा आता सावरलीय. (माणूस तेव्हाच नाचतो जेव्हा त्याला आतून आनंद झालेला असतो. हे चिरंतन सत्य आपल्याला माहित आहे.) म्हणून त्यानंतर ईशा आणि त्याच्यातील एका भांडणाच्या प्रसंगानंतर कबीर न सांगता निघून जातो. आणि शेवट पाहील्यावर आपल्याला भारी वाटतं की ईशामध्ये बदल झालाय. तो कसा झालाय यासाठी हंपी सिनेमा बघावाच लागेल.

स्वतःला आणि सगळ्यांनाच निसर्गाची एक मोठी चूक मानणाऱ्या ईशाचं मत परिवर्तन होतं. छाया कदम (कलाकुसरीच्या वस्तू विणणारी), रिक्षावाला, साधू (विजय निकम), लक्ष्मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबीर ईशाला भेटतो... आणि हंपीचं वातावरण मूकपणे याचं साक्षीदार असतं. हे सगळं तिच्या आयुष्यात कुठलीही पूर्वसूचना न देता घडतं. त्यामुळे ती त्या घटना प्रसंगांचा आनंदाने स्वीकार करते. आधी काहीशी चिडकी असलेली, माणसं ही वाईट होती आणि तशीच राहतील...म्हणणारी ईशा अंतर्बाह्य बदलते. आणि सोबत आपल्यालाही आनंदाच्या झऱ्यापाशी नेऊन सोडते.



तुझा उद्धार करण्यासाठी माझी योजना केलेली आहे बालिके... असं कबीर ईशाला म्हणतो आणि ते खरं करून दाखवतो कसं तेही सिनेमा पाहिल्यावरच कळेल. खरंच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात कबीरसारखा कुणी भेटायला हवा. पण तो भेटण्यासाठी आपण घरातून बाहेर पडलं पाहिजे ना... मोबाईल नाहीतर लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून तो नाही भेटणार. त्यासाठी न ठरवता मनसोक्त भटकंतीसाठी निघालं पाहिजे. कारण आपण आनंदी असलो तर इतरांना आनंद वाटू शकतो नाही का...ठरवून सगळ्या गोष्टी करण्यात मज्जा नसते राव.
सगळं कसं मॅजिकसारखं घडलं पाहिजे असं आपल्याला मनातून वाटतं असतं, मानत नसलो तरी. त्यासाठी बघायला हवा हंपी. हा सिनेमा काव्यासारखा आहे. या सिनेमात त्याचे संदर्भ आहेत म्हणून नव्हे. किंवा ईशा कविता ऐकत असते म्हणून नव्हे, तर काव्याचं कसं असतं कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणं. तुमचा जसा मूड असतो तशी ती कविता तुम्हाला भासते. कमॉन हे सगळं लेखातून उलगडून सांगण्यापेक्षा हंपीच्या सफरीवर जाच एकदा...

सिनेमातली दोन्ही हिंदी आणि कन्नडमिश्रित (अपनेही रंग में, मरुगेलारा ओ राघवा) गाणी उत्तम झाली आहेत. आपल्याला अचानकपणे प्रवासात भेटणाऱ्या माणसांची भाषा एकच कशी असेल. त्यामुळे ती गाणी त्या त्या ठिकाणी चपखल बसलीत. तसंही भाषा, प्रांत, रुढी, पंरपरा असे सगळे पाश गळून पडतात. तेव्हाच आपली एखाद्याशी भन्नाट मैत्री होऊ शकते ना जशी ईशा, गिरीजा आणि कबीरची होते. कथा, पटकथा, संवाद लिहिणाऱ्या आदिती मोघेने हंपीच्या निमित्ताने एक निखळ निर्मळ विचार आपल्यापर्यंत पोहोचवलाय. मानलं पाहिजे तिला...तसंच संकलक - प्राची रोहिदास, संगीत – नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर, कला दिग्दर्शक – पूर्वा पंडीत, वेशभूषा - सायली सोमण, गीतं – वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी या सगळ्यांचंच काम भारी झालंय. गयिका रुपाली मोघे आणि गायक राहुल देशपांडे लाजवाब. मॅजिक आपल्या सोबतही घडेल आणि आपल्यालाही आपलं प्रेम सापडेल, हा विश्वास आपल्याला हंपी सिनेमा देतो. बाकी जो है सब ऑलराईट है...

ख्वाबों की दुनिया, यहाँ से वहॉं तक...! भाग 2

(कृपया आधी या लेखाचा भाग 1 वाचावा.)

काही लक्षवेधी चेहरे 
"बुनियाद', "वागले की दुनिया', "ये जो है जिंदगी', "श्रीमान श्रीमती', "खिचडी', "हम पॉंच', "साराभाई व्हर्सेस साराभाई', "तू तू मैं मैं', "हम सब बाराती' अशा लोकप्रिय विनोदी मालिकांतून अनेक चेहऱ्यांनी घराघराला हसवून सोडलं आणि आपल्या अभिनय करिअरचा समतोलही साधला. सतीश शहा, स्वरूप संपत, शफी इनामदार, अंजन श्रीवास्तव, राकेश बेदी असे कलाकार... आणि आलोकनाथ... संस्कारी बाबूजी म्हणून त्यांना सगळेच ओळखतात. त्यांनी "बुनियाद'पासून ते आता सुरू असलेल्या "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है'मधील दादाजीच्या भूमिकेपर्यंत आपली अभिनेता म्हणून असलेली कारकीर्द नीट जोपासली. हिंदी सिनेमांमध्येही त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. अभिनेते अशोक सराफ यांनीही हिंदी-मराठी सिनेमातील करिअर आणि मालिकांमधील करिअर लीलया सांभाळलं. हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आहे. जो आजच्या अभिनेत्यांनीही शिकायला हवा. सुमित राघवनसुद्धा हिंदी-मराठी सिनेमा आणि हिंदी-मराठी मालिकांमधील आपलं अस्तित्व छान जपतोय. फास्टर फेणेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास लक्षवेधी आहे. साराभाईमधील त्याची भूमिका कोणीच विसरू शकत नाही. 


बालाजी प्रॉडक्‍शन हाऊसने अनेक कलाकार घडवले आणि अनेकांची कारकीर्द भरभराटीला आली. "क्‍योंकी सांस भी कभी बहू थी', "कहानी घर घर की', "कही तो होता' अशा "क'वाल्या मालिकांनी इतिहास घडवला आणि कलाकारांची मोठीच्या मोठी फौज नावारूपास आली. "क्‍यों की'मध्ये तुलसी बनून स्मृती इराणीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना इतर कुठल्याही भूमिकांमध्ये तेवढं स्वीकारलं नाही. त्यानंतर त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं. राजकारणातही अधून मधून त्यांच्या विधानांमुळे चर्चेत त्या असतातच. 
"क्‍यों की'मधून मिहिर विराणीची भूमिका करणारा अमर उपाध्याय नंतर काही मालिकांमध्ये काम करत होता. पण तेवढा लक्षात राहिला नाही. आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. राम कपूरने "घर एक मंदिर' मालिकेपासून जी लोकप्रियता मिळवली, ती आजतागायत टिकून आहे. त्याने हिंदी मालिका, बॉलीवूड आणि वेबसीरिजमध्येही तितकीच लोकप्रियता मिळवली. त्याला यातील योग्य समतोल साधता आला. रत्ना पाठक शहा यांनी "मंडी' सिनेमापासून सुरुवात केली. हिंदी सिनेमात आईच्या भूमिका साकारल्या. नाटकात काम केलं. "साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेतील माया साराभाईची भूमिका कोणीच विसरणार नाही. तसंच याच मालिकेत इंद्रवदन साराभाईची भूमिका करणारे सतीश शहा यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी करिअरचा समतोल नीट साधला. 
सुमित व्यास हा कलाकार सध्याचा स्टार आहे. सध्या तो एका सिनेमात करिना कपूरसोबत काम करतोय. पण हाच सुमित जेव्हा छोट्या पडद्यावर मालिका करत होता, तेव्हा एका मालिकेच्या सेटवरून त्याला "तुला अभिनय नीट जमत नाही आणि जमणारही नाही' असं म्हणून अक्षरशः हाकलून दिलं होतं. पण हा कलावंत "परमनंट रूममेट' या वेबसीरिजमध्ये झळकला आणि स्टार झाला. त्यानंतर हिंदी सिनेमात गेला. मग प्रेक्षक त्याचा शोध घेऊ लागले, की हा आतापर्यंत होता कुठे? तेव्हा कळलं त्याने छोट्या पडद्यावर काही मालिका केल्यात. तो यशस्वी लेखकही आहे. त्याने आपल्या करिअरला डुबता डुबता वाचवलं.




मराठी कलाकारांचा समतोल 


दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी सुरू झाली आणि मराठी कलाकारांना नाटकासोबत अजून एक सक्षम दालन कला सादरीकरणासाठी उपलब्ध झालं. मग काय विचारता थाट गाण्याच्या मैफिली येथे झडू लागल्या. गप्पांचे फड रंगू लागले. महाराष्ट्राची लोककला कलात्मकतेने इथे सादर होऊ लागली. चिमणराव, गुंड्या भाऊ, फास्टर फेणे, रणजित देसाईंची स्वामी अशा पुस्तकांवर आधारित मालिका सादर होऊ लागल्या. त्यात मराठीतील लोकप्रिया कलाकार काम करू लागले. दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, दामिनी या महामालिकेतून पत्रकाराची लेखणी तलवारीसारखी घेऊन लढलेली रणरागिणी प्रतीक्षा लोणकर आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आता प्रतिक्षा झी मराठीच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत जिजाऊंची भूमका करतेय. सिनेमा आणि मालिका ही दोन्ही माध्यमं तिनं समर्थपणे हाताळली. मृणाल कुलकर्णीनेही स्वामी, अवंतिका यासारख्या मराठी सिनेमा हिंदीत सोनपरीसारख्या मालिकेत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला. 

दामिनी, अवंतिका, घरकुल, आभाळमाया, चार दिवस सासूचे या मालिकांमध्ये, तर मराठी कलाकारांची फौज होती. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची जोडी नाटकात आणि टीव्हीवर बघताना धमालच यायची. त्यांचा विनोदी अंदाज हास्यचकीत करायचा. हिंदितल्या कृष्णा मालिकेत छोट्या कृष्णाच्या भूमिकेतला लोकप्रिय चेहरा स्वप्नील जोशीनंतर झी मराठीच्या अधुरी एक कहाणी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत गाजला. त्याने साकारलेला घना विसरण्याजोगा अजिबात नाही. मराठी सिनेमातही त्याने यशस्वी घोडदौड केली आणि करतोय. मराठीतलं अजून एक उल्लेखनीय नाव म्हणजे श्रेयस तळपदे. त्यानेही मराठी मालिका, हिंदी, मराठी सिनेमात धमाल केली. बेधुंद मनाच्या लहरी, एक होता राज्या, मग रियालिटा शोचं सूत्रसंचालन असं सगळं करत निर्माताही बनला. 
महाराष्ट्राची लाडकी सून अलका कुबल यांनी ओटी खणा-नारळाची, माहेरची साडीसारख्या सिनेमांतून घराघरात पोहोचल्या. नंतर मराठी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. अगदी आतापर्यंत कलर्स मराठीच्या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या कार्यक्रमाचं त्या सूत्रसंचालक आहेत. सुप्रिया पिळगावकर यांनी मराठी सिनेमा आणि मालिका या दोन्हीही बाजू नीट सांभाळल्या. सध्या त्या "कुछ रंग प्यार के ऐसेही' मालिकेत आईच्या भूमिकेत आहेत.
मराठीत सिनेमात काम करणाऱ्या जवळ जवळ सर्वच कलाकारांनी मालिका गाजवल्या. मराठी कलाकारांच्या अभिनयकलेचा पाया नाटकात काम केल्यामुळे भक्कम असतो म्हणून हिंदी सिनेमात त्यांना आता ताकदीचे रोल मिळताय. एकीकडे विजया मेहतांचं सत्यजित रे च्या स्कूलमधून बाहेर पडलेले मालिकांमध्ये बायका छान छान कपडे, लिपस्टिक लावून दागिने घालून घरात वावरतात. तशाच झोपतात अशी टिका करणाऱ्या विजयाबाईचं ऐकतातही. पण मालिकेतही समर्थपणे कामही करतात. अशीही एक कलाकार पिढी आहे. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, विनय आपटे, रिमा लागू, निर्मिती सावंत, भरत जाधव, प्रसाद ओक, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांनी टीव्ही हे माध्यम आपल्या अभिनयाने समृद्ध जेवढं की त्यांनी सिनेमा आणि नाटकासाठी केलं. 
म्हणून मराठी कलाकारांना दाद द्यावीशी वाटते की त्यांनी टीव्ही, सिनेमा, नाटक आणि हिंदीतही अधूनमधून का होईना आपल्या या अभिनयाने ते लक्षवेधी ठरले. फारसे विस्मृतीत गेले नाहीत. त्यांचाच वारसा आजही तरुण कलाकारांची पिढी जपतेय. 
अमेय वाघ, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, देवदत्त नागे, वैभव तत्त्ववादी, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, प्रिया बापट, उमेश कदम, शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुरूची आजरकर, अनिता दातेही काही मोजकी नावं पण यांच्याबरोबर असे अनेक गोड चेहरे आपली ओळख निर्माण करतायत. 
मराठीत सध्या तीन प्रमुख वाहिन्या आहेत. यातील सध्या सुरू असलेल्या मालिकांतील मुख्य भूमिकेत अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. ज्यांनी मराठी सिनेमात आणि नाटकात लोकप्रियता मिळवली तितकीच लोकप्रियता इथेही मिळवली. 
किशोरी शहाणे, निर्मिती सावंत, श्रुती मराठे, अभिजित खांडकेकर, प्राजक्‍ता माळी, सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र लिमये, अमोल कोल्हे, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, स्वप्नील जोशी, वैभव तत्त्ववादी अशी किती तरी नावं घेता येतील. ज्यांनी मराठी सिनेमा, कधी हिंदी सिनेमा किंवा मालिकेत काम तर कधी मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत समतोल साधला आणि प्रेक्षकांच्याही ते लक्षात राहिले. 


बॉलीवूड लाखो-करोडोंची उड्डाणं करत असताना आता छोटा पडदाही मागे नाही. मालिका आणि रिऍलिटी शोचं बजेट आता सिनेमांएवढंच असतं. त्यात बॉलीवूडच्या सुपरस्टारना आणण्याच्या प्रयत्नात वाहिन्या असतात. कधी कधी ही गणितं जुळतात. काही फिस्कटतात. "सत्यमेव जयते' शो मधून आमीर खान छोट्या पडद्यावर आला. तेव्हा पहिल्या एपिसोडला सर्व रस्ते सामसूम होते आणि सारे प्रेक्षक टीव्हीसमोर होते. मग हळूहळू या शोची लोकप्रियता कमी होत गेली. दुसरं पर्व फारसं हीट झालं नाही. मग या शोची "पाणी फाऊंडेशन'च्या रूपात लोकचळवळ बनली तीही पुन्हा शोच्या रूपात प्रेक्षकांनी पाहिली. 
रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून बॉलीवूड कलाकार येतात किंवा सूत्रसंचालक म्हणून. असं आतापर्यंत अमिताभपासून, मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी ते शबाना आझमी ते अगदी शिल्पा शेट्टीपर्यंत दिसतं. तिन्ही लोकप्रिय खान आता छोट्या पडद्याला सरावले आहेत. सध्या अक्षयकुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन हे छोट्या पडद्यावर धमाल उडवत आहेत आणि शाहरूख खानही छोट्या पडद्यावर वाहिनीवर येण्यासाठी पुन्हा सिद्ध झाला आहे. 
"स्टार', "सोनी', "झी', "कलर्स' अशा लोकप्रिय वाहिन्यांची सिनेमा क्षेत्रातल्या मंडळींना छोट्या पडद्यावर आणण्याची स्पर्धा सुरू असते. तसे या याच वाहिन्यांवर मुख्य भूमिकेत काम करणारे चेहरे बॉलीवूडची स्वप्नं पाहत असतात. 
प्रेक्षकांनाही वाटत असतं, यांनी बॉलीवूडमध्येही गेलं पाहिजे यार. 
एकूणच छोट्या पडद्याला मोठ्या पडद्याची भुरळ पडते आणि मोठ्या पडद्याला छोट्या पडद्याची. आणि हे चालायचंच. कारण मुळात आता भूमिका महत्त्वाची ठरतेय. कॉन्टेट इज किंग नाऊ... सिनेमा, मालिका, वेबसीरिज सारं आपलंच आहे. 


2017 सकाळ मुंबई दिवाळी अंक #स्वप्नांचीफॅक्टरी साठी लिहिलेला लेख.

ख्वाबों की दुनिया, यहाँ से वहॉं तक...! भाग 1

ख्वाबों की दुनिया असली तरी वास्तवात खूप साऱ्या घडामोडी मनोरंजन क्षेत्रात घडतात. कुछ बनते है, कुछ बन जाते है। तरीही कलेची नाळ तुटत नाही. म्हणून मग छोटा पडदा आणि मोठा पडदा असा राहिला न भेद, अशी स्थिती होते. पण या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागतो. पण एक काळ असा होता, की मोठे छोट्या पडद्यावर आले आणि छोटे मोठ्या पडद्यावर गेले की बातमी व्हायची. आजही ती होते; पण तिचा अँगल बदललाय... पण हा बदलेला अँगल सहजासहजी आला नाही. त्यासाठी काही कलाकारांना विस्मृतीत जावं लागलं; तर काहींना तारेवरची करसत करावी लागली... 


मुंबईत सिनेसृष्टी हरिश्‍चंद्र फाळके या अवलियाच्या अथक प्रयत्नांनी अवतरली. नंतर कपूर खानदानाने तिला पुढे नेली. मग सिनेसृष्टी गाजवणारे अनेक कलावंत इथे घडू लागले. तसे काही जण 'बम्बई में जा के हिरो बनने का' स्वप्न पाहू लागले. त्यातल्या काहींनी सुखासुखी; तर काहींनी अक्षरक्षः बंड करून मुंबई गाठली होती. कित्येक महिने मुंबईच्या रस्त्यावर, फूटपाथवर काढले होते. गल्लीबोळातून कामाच्या शोधात भटकले होते. मग ते पुढे सुपरस्टार झाले होते. 
      

आता मुंबईत जाऊन मालिकेत काम करायचंय, या मजबूत इराद्याने कित्येक पावलं मुंबईकडे वळू लागली आहेत आणि हे चित्र बदलायला तीस वर्षांचा काळ जावा लागला. आता बॉलीवूड आणि छोटा पडदा हातात हात घालून चालू लागले आहेत. एकमेकांच्या सान्निध्यात हे मनोरंजनाचे दोन्ही वटवृक्ष बहरू लागले आहेत. पण इथवरचा प्रवास कठीण होता. अनेक धोकादायक वळणांचा होता. कित्येक कलावंत या प्रवासात थकले. काही धडपडत चालले आहेत. काहींनी तर चालायचंच सोडून दिलं आणि ते विस्मृतीत गेले. पण "बुनियाद' मालिकेपासून ते आजच्या मालिकांचा विचार करता अनेक लोकप्रिय, नवोदित कलाकारांनी योगदान दिलं आहे. 
मीडियाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला सिनेमाचं आकर्षण असतं. पण टीव्हीचंही आकर्षण काही कमी नाही. त्यामुळे कधी टीव्ही कलाकारांना बॉलीवूड मोहिनी घालतं; तर कधी बॉलीवूडला प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी टीव्हीची भुरळ पडते. आज आपण ज्या माध्यमासाठी अभिनय करतोय त्याचा आशय महत्त्वाचा वाटतोय. भूमिका किती लांबीची आहे, यापेक्षा भूमिका कोणती आणि कशी आहे, याला महत्त्व आहे. पण जेव्हा दूरदर्शन सुरू झालं, तेव्हा असं नव्हतं. दूरदर्शनच्या पाठोपाठ झी, सोनी, स्टार समूहाच्या वाहिन्या सुरू झाल्या. त्या वेळी नाटकात काम केलेले आणि सिनेसृष्टी गाजवलेले अनेक कलाकार छोट्या पडद्यावर आले. कारण सिनेमा आणि नाटक ही माध्यमं तेव्हा बऱ्यापैकी रसिकांच्या जवळची झाली होती. अगदी "बुनियाद' पासून रंगोली, "आरोहन' मालिका ते मराठीतील "आभाळमाया' ते आत्ताचा नंबर वन शो "कौन बनेगा करोडपती'पर्यंत बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर कमाल केली आणि आता छोट्या पडद्यावर गाजलेले अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर यशस्वी वाटचाल करताहेत. 
     

सध्या छोट्या पडद्यावर असलेले बॉलीवूडकर अनेक आहेत. सोनी टीव्हीच्या ड्रामा कंपनी शोमधून मिथुन चक्रवर्ती, सुपर डान्सरच्या दुसऱ्या पर्वात शिल्पा शेट्टी, गीता कपूर, अनुराग बासू, कौन बनेगा करोडपतीचं नववं पर्व सुरू आहे. त्यात बिग बी अमिताभ प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवताहेत. तसंच याच वाहिवीवर "हासिल' मालिकेतून अभिनेता झायेद खानही येतोय. झी टीव्हीच्या "लिटिल चॅम्स'मध्ये हिमेश रेशमिया, नेहा कक्कर, जावेद अली झळकतायत. स्टार प्लसच्या चंद्र नंदिनी मालिकेत काम करणारी श्वेता बासू प्रसाद "मकडी'सारख्या काही हिंदी आणि तेलुगु सिनेमात काम करून मग छोट्या पडद्यावर स्थिरावली. छोट्या पडद्यावर तिने बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती. तिला सिनेक्षेत्राने काहीशी हूल दिली; पण तिचा म्हणावा तसा जम बसला नाही. छोट्या पडद्यावरचा सध्याचा कूल, डॅशिंग, हॅंडसम हिरो नकुल मेहता मॉडेल, ऍक्‍टर, डान्सर, डिरेक्‍टर, निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने "हाल ए दिल' सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. योगायोग म्हणजे त्या सिनेमात त्याने शेखर ओबेरॉयची भूमिका केली होती आणि आता "इश्‍कबाज' मालिकेत सिंग ओबेरॉय बनून हा ब्लू आईड चॉकलेट बॉय लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. इश्‍कबाज मालिकेच्या आधी तो "आय डोन्ट वॉच टीव्ही' या स्वतःचीच निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये स्वतःचीच भूमिका करत होता. आता तो लाखभर मानधन घेणाऱ्या टीव्ही कलाकारांच्या यादीत पोहोचला आहे. 
"इश्‍कबाज'मधली सुरभी चांदना या मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीचेही छोट्या पडद्यावर लाखो चाहते आहेत. तिने "बॉबी जासूस' सिनेमापासून सुरुवात करून नंतर काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. नंतर इश्‍कबाजमध्ये मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली. स्टार प्लसच्या "लप सिंग बॅटल'ध्ये काही बॉलीवूडची मंडळी आणि लोकप्रिय चेहरे येतात आणि फराह खान या शोचं सूत्रसंचालन करते. याच वाहिनीच्या "रिश्‍तों का चक्रव्यूह' मालिकेतून विस्मृतीत गेलेली अभिनेत्री नारायणी शास्त्री मुख्य भूमिकेत आहे. ती आता परत आलीय. आधी हिंदी-मराठी सिनेमात काम केल्यानंतर काही वर्षं ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर होती. 


ऍक्‍शन स्टार आणि खिलाडीकुमार अक्षयकुमार "ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याआधी तो मास्टर शेफ या खवय्येगिरीची स्पर्धा असलेल्या शो मधे सूत्रसंचालक होता. त्यातही त्याने धम्माल उडवून दिली होती. हा शो लोकप्रियही त्याच्यामुळेच झाला आणि तो पुन्हा स्टारसोबत छोट्या पडद्यावर आलाय. अभिनेता संजय कपूरसुद्धा छोट्या पडद्यावर येतोय. त्याला बॉलीवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. फक्त त्याचा "सिर्फ तुम' हा सिनेमा तेवढा लक्षात राहिला. 
"लगान' आणि "मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातून लक्षात राहिलेली अभिनेत्री ग्रेसी सिंग "ऍड टीव्ही'च्या "संतोषी मॉं' या मालिकेत साक्षात संतोषी मातेच्या भूमिकेत आहे. तिने "अमानत' या झी टीव्हीवरच्या मालिकेने करिअरला सुरुवात केली होती. मध्ये बॉलीवूडमध्ये नशीब आजमवायला गेली आणि आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर स्थिरावली आहे. 
मुकेश खन्ना ऍड टीव्हीच्या "वारीस' मालिकेत लालाजीच्या भूमिकेत नुकतेच दिसले होते. 1981 पासून सिनेमात तगडं करियर करणारे अभिनेते मुकेश खन्ना "महाभारत' मालिकेतील भिष्म आणि "शक्तिमान' मालिकेतील "शक्तिमान'च्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले. आजही शक्तिमान हे नाव कोणी उच्चारलं तर त्यांची गोल गोल फिरून मग कमरेवर हात ठेवून उभी राहणारी छवी नजरेसमोर दिसते. शक्तिमाननंतर त्यांनी "आर्यमान' हा सुपरहिरो साकारला होता. पण ती मालिका फारशी चालली नाही. पण छोटा पडदा आणि मोठा पडदा असा समतोल त्यांनी नीट साधला. 
"बिग बॉसम'ध्ये भाईजान सलमान खान अकरावं पर्व घेऊन दाखल झालेत. बिग बॉस म्हणजे सलमान हे समीकरण आता प्रेक्षकांच्या डोक्‍यात फिट बसलंय. पण टीआरपीवर छोट्या पडद्याचं यश-अपयश अवलंबून असतं. त्यामुळे या सगळ्या छोट्या पडद्यावरील बॉलीवूडकरांवर अमिताभ बच्चन भारी पडतायत. कारण "कौन बनेगा' सध्या नंबर वन चा शो बनला आहे. 
कलर्सच्या "24' नावाच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात अनेक सिनेइंडस्ट्रीतले गाजलेले चेहरे होते. अनिल कपूर, मंदिरा बेदी, किशोर कदम, नील भोपालन, रिचा चढ्ढा, टिस्का चोप्रा, अजिंक्‍य देव अशी तगडी कास्ट होती. पण या मालिकेचं पहिलं पर्व चर्चेत राहिलं. आणि ही मालिका टीआरपीच्या गणितावर खरी उतरली नाही. 

"विकी डोनर' ते "शुभमंगल सावधान' या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमांतून पुढे आलेला लक्षवेधी चेहरा म्हणजे आयुषमान खुराना. हा चेहरा एम टीव्हीमुळे बॉलीवूडला मिळाला. तसंच सुशांत सिंग राजपूत बिहारमधील छोट्याशा गावातून शिकण्यासाठी दिल्लीत आला आणि मग मुंबईत. इंजिनिअरिंगचा खूप हुशार विद्यार्थी होता तो. मुंबईत आला तेव्हा एका नाटकात त्याला काम मिळालं. त्याच्याच प्रयोगाला एनसीपीएला जात असताना बालाजी प्रॉडक्‍शन हाऊसला इंटर्न म्हणून काम करणाऱ्या असीम लाटकर या होतकरू दिग्दर्शकाने त्याला ऑडिशनसाठी बालाजीमध्ये नेलं. सुशांत आधी ऑडिशन द्यायला तयार नव्हता. त्याचा नाटकाचा प्रयोग चुकेल म्हणून नाही नाही म्हणत होता. मग असीमने तिथेच त्याची ऑडिशन शूट करून बालाजीच्या ऑफिसमध्ये पोहोचवली. आणि काय आश्‍चर्य! सुशांतची निवड "किस देश में है मेरा दिल' मालिकेतील छोटुशा भूमिकेसाठी झाली; पण नंतर लगेचच बालाजी प्रॉडक्‍शनच्या "पवित्र रिश्‍ता' मालिकेत मानव देशमुखची भूमिका साकारायला मिळाली. या लोकप्रिय मालिकेनंतर त्याने "काय पो छे' सिनेमात काम केलं. मग "पीके', "एम. एस. धोनी' यासारख्या सहा सिनेमांमध्ये यशस्वी कामगिरी केली. आता त्याच्याकडे तीन सिनेमे आहेत. 
"हम पाँच' या गाजलेल्या विनोदी मालिकेपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री विद्या बालन आज बॉलीवूडमधली यशस्वी अभिनेत्री आहे. त्या मालिकेत ती होती, असं म्हटल्यावर अनेकांना आठवणारही नाही कदाचित; पण ती होती. ती नाही का, कानात यंत्र घातलेली, कमी ऐकू येणारी, त्यामुळे चेहऱ्यावर कायम गोंधळल्याचा भाव असलेली. पण चेहऱ्यावर गोंधळल्याचा भाव असला तरी तेव्हाही तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा लपला नव्हता. त्यामुळेच तिला तो सरकार नावाच्या दिग्दर्शकाचा गाण्याचा व्हिडीओ मिळाला आणि त्या व्हिडीओमुळे सिनेमा! 
द किंग खान शाहरूख खानने "फौजी', "सर्कस' आणि काही दूरदर्शन मालिकांमधून भूमिका करत 1992 मध्ये "दीवाना' सिनेमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्याचा आजवरचा यशस्वी प्रवास आपण पाहिलाय. आता तोही "टेड टॉक्‍स इंडिया की नई सोच' या शोमधून छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झालाय. याआधी त्याचा "क्‍या आप पाचवी पास से तेड है' हा शो फ्लॉप झाला होता. पण शाहरूख तो शाहरूख है। त्याचा करिश्‍मा अजूनही कमी झाला नाहीय. 



जाने कहाँ गये वो लोग - 
मधुर भांडारकरच्या "पेज- 3' सिनेमातलं गाणं आठवतंय? कितने अजीब रिश्‍ते है यहॉं पे... त्यात एक मधली ओळ अशी आहे, "ले जाए नसीब किसको कहापे...' मनोरंजन क्षेत्र म्हणजे "वक्त यहॉं कौनसा खेल खेलेगा किसी को पता नही चलता' असंच काहीसं घडलं काही कलाकारांच्या बाबतीत. दूरदर्शनवर "महाभारत' मालिकेत नितीश भारद्वाज हा अभिनेता पहिल्यांदा दिसला. नंतर "गीतारहस्य', "विष्णू पुराण' या मालिकेतही त्याने कृष्णाची भूमिका केली. त्यानंतर तो विस्मृतीत गेला. काही मोजके हिंदी-मराठी सिनेमे केले. नंतर तो लेखनाच्या क्षेत्रात उतरला आणि "पितृऋण' या सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आलेल्या त्याच नावाच्या मराठी सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन त्याने केलं. त्यासाठी त्याला लेखनाचा पुरस्कार मिळाला. अलीकडेच एका वृत्तपत्रात जाहिरात झळकली होती. तो 26 वर्षांनंतर कृष्ण साकारतोय अशी. सध्या हा सदा हसऱ्या चेहऱ्याचा गोड अभिनेता छोट्या पडद्यावर दिसत नाहीय. 
"कैसा ये प्यार है' मालिकेच्या मुख्य भूमिकेतील लोकप्रिय चेहरा इक्‍बाल खान लगेचच बॉलीवूडमध्ये गेला; पण तिथे त्याला यश मिळालं नाही. मोजके चार सिनेमे करून तो छोट्या पडद्यावर परत आला. पण छोट्या पडद्यासाठी अजूनही तो सुपरस्टार आहे. 2015 मध्ये "प्यार को हो जाने दो' मालिकेत मुख्य भूमिकेत तो दिसला होता. नंतर काही छोट्या भूमिका केल्या. त्याच्या पुनरागमनाची प्रेक्षक वाट पाहतायत. 
"महाभारत' मालिकेतून सुरुवात केली तरी "सुराग' मालिकेमुळे लोकप्रिय झालेला सुदेश बेरी बॉलीवूडमध्येही चांगला स्थिरावला होता. अलीकडे तो छोट्या पडद्यावर नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. पण आता तो कुठेच दिसत नाहीय. 
दूरदर्शनच्या ज्युनिअर जी मालिकेत सुपरहिरो साकारणारा अमितेश कोचर या अभिनेत्याची तर काहीच खबरबात नाही. त्याच्यासोबत शैलीची भूमिका करणारी अभिनेत्री कुठेही दिसली नाही. एकता कपूरच्या "कही तो होगा'मध्ये सुजल गरेवालच्या भूमिकेत गाजलेला अभिनेता राजीव खंडेलवाल. त्यानेही बॉलीवूडची वाट चोखाळली. सात सिनेमांमध्ये कामं केली; पण लोकप्रियता तेवढी मिळाली नाही. मग छोट्या पडद्यावर पुन्हा परतला. तेव्हाही त्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं. 2015 मध्ये आलेल्या "रिपोर्टर्स' मालिकेत तो मुख्य भूमिकेत लय भारी दिसला होता. एका धडाडीच्या टीव्ही जर्नालिस्टची भूमिका होती. तेव्हाही प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला; पण त्यानंतर हा हॅंडसम हंक कुठे दिसत नाहीय. 
शमा सिकंदर... 'मन' सिनेमातलं ते गाणं आठवतंय... मेरा मन क्‍यूं तुम्हे चाहे...' त्यात ती ती मधे मधे येणारी तीच ती शमा सिकंदर. हिचं फिल्मी करिअर अपयशी ठरलं; पण मालिकांमुळे लक्षात राहिली. "ये मेरी लाईफ है...' मालिकेत गुज्जू टोनमध्ये तिचं बोलणं प्रेक्षकांना आवडायचं. रवि बहल सूत्रसंचालक (बुगीवुगी) विस्मृतीत गेला. लहानपणी त्याचं कॉमेडी सूत्रसंचालन खूप आवडायचं. म्हणजे आजच्या काळातल्या नीलेश साबळेला बघितलं की त्याची आठवण होते. जावेद जाफरी मात्र सिनेमा आणि छोटा पडदा अशी नोकझोक करतायत. त्याचा एपिक टीव्हीवरचे शो मात्र चांगलेच आहेत. 
प्राची देसाई "कसम से' मालिकेतून लोकप्रिय झाल्यावर तिनेही बॉलीवूडचा रस्ता धरला खरा; पण काहीतरी बिनसलं, नाही जमलं नीट. सध्या तिची धडपड आणि संघर्ष पुन्हा नव्याने सुरू झालाय. रामायण, महाभारत, श्री कृष्णा, जय हनुमान अशा लोकप्रिय पौराणिक मालिकांमधले लोकप्रिय चेहरे हल्ली कुठे दिसत नाहीत. खास करून मोठेपणीच्या कृष्णाची भूमिका करणारा कलाकार, बलरामाची भूमिका करणारा दीपक देऊळकर, रामायणातील राम अरुण गोविल, सीता दीपिका चिखलिया ही कलाकार मंडळी आठवतात अजुनही प्रेक्षकांना; पण ती दिसत नाहीत. 
खळीदार हास्याने लक्षात राहणारी पल्लवी जोशी बालकलाकाराची भूमिका साकारत छोट्या पडद्यावर आली. दूरदर्शनवरील "आरोहन' मालिका ते अलीकडे सारेगमपची सूत्रसंचालक झाली. त्यानंतर ती दिसलीच नाहीय. "झी'टीव्हीच्या "अंताक्षरी'मध्येही तिने आणि अन्नू कपूर यांनी त्यांच्या सूत्रसंचालनाने बहार आणली होती. अन्नू कपूरही एका खासगी रेडिओ चॅनेलवर सध्या एक शो करतोय. पण पल्लवीची काही खबरबातच नाही. स्टार वाहिनीवरच्या "यात्रा' मालिकेची लोकप्रिय सूत्रसंचालक दीप्ती भटनागर आठवतेय का? आता ती कुठेच दिसत नाहीय. 2000 मध्ये तिने म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं. काही दाक्षिणात्य सिनेमातही तिने काम केलंय; पण ती सध्या काय करतेय कुणास ठाऊक. 


पुढे वाचण्यासाठी भाग 2 ची पोस्ट पहा...
सकाळच्या मुंबई आवृत्ती सकाळ दिवाळी 2017 #स्वप्नांचीफॅक्टरी या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग

Sunday, 29 October 2017

गुज्जू संस्कृतीची आनंदयात्रा

कुछ दिन तो गुजारो गुजरातमें... बीग बीअमिताभ यांचा आग्रह एेकत होते, अशातच गुजरात टुरिझमचं आमंत्रण आलं. केला दौरा गुजरातचा. गुजरातमध्ये ‘गुजारलेले’ ते चार दिवस म्हणजे, दिवाळीआधीच दिवाळीचा फिल देणारे होते. गुजरातमधली अहमदाबाद आणि वडोदरा ही दोन शहरं, तिथल्या वास्तू आणि सृष्टीसौंदर्य जवळून पाहता आलं, त्याचा आनंद तुमच्यासोबत शेअर करतेय...

लक्ष्मी विलास राजवाडा
शाळेतल्या इतिहास-भूगोलाच्या पुस्तकांनी आपल्या देशाचंच नाही; तर जगाचं दर्शन घडवलेलं असतं. नेमक्‍या त्याच शाळेच्या दिवसात आपल्याला इथे जाता आलं असतं तर...?  पण शक्‍य नसतं. पण तिथे कधीतरी गेलं पाहिजे, ही यानिमित्तानं आपल्या मनात रुजलेली पर्यटनाची पहिली पायरी असते. 
 
असं सगळं मनात असताना अचानक योग जुळून आला... गुजरातभेटीचा. गुजरात म्हणजे पहिल्यांदा आठवतात ते महात्मा गांधी. नवरात्र, गुजरातची खाद्यसंस्कृती आणि गुजराती भाषा असं बरंच काही. एका मालिकेसाठी तयारी करत असताना गुजराती संस्कृतीचा जवळून परिचय झाला होता. पण प्रत्यक्षात गुजरातला जाणं झालं नव्हतं. त्यामुळे अहमदाबाद एअरपोर्टला उतरल्यापासून आपल्या मनात असलेल्या गुज्जू गोष्टी तिथे गेल्यावर तशाच जुळतात का, हे पाहणं नकळत सुरू झालं. 
 
अहमदाबादला हॉटेलवर पोहोचलो. हॉटेलच्या मागच्या बाजूला साबरमतीचा सुंदर सुशोभित नदीकाठ दिसत होता. नदीकाठी सुंदर बाग होती. हा भाग रिव्हर साईड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या मोढेराला गेलो. सूर्यमंदिराचा अतिशय शांत आणि रम्य परिसर होता तो. पुष्पावती नदीच्या तीरावर वसलेला. चालुक्‍य साम्राज्याचा राजा दुसरा भीमदेव याने हे मंदिर बांधलं. हिंदू वास्तुकलेचं अतिशय देखणं रूप. सभामंडप, त्याच्या छतावरील नक्षी, समोरचं कुंड, गाभारा, त्यावर कोरीवकाम करून केलेली नक्षीदार कलाकुसर आम्हाला आश्‍चर्यचकित करत होती. आपली प्राचीन संस्कृती किती समृद्ध होती, याचीच साक्ष पटली. आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे एका हिंदी मालिकेचं शूटिंगही सुरू होतं. गुजरात टुरिझमचा सिनेमॅटिक टुरिझम हाही एक विभाग आहे. त्याचंच उदाहरण हे असं दिसलं. गुजरात राज्याला बॉलीवूड फ्रेंडली टुरिझमसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. हे आपल्या महाराष्ट्रातही अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, असं वाटून गेलं.
मोढेराचं सूर्यमंदिर
 
 
मेहसाणा जिल्ह्यातल्या परतीच्या प्रवासात एका रस्त्यालगत असलेल्या पथिक आश्रमामध्ये गुजराती खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला आणि मन तृप्त झालं. गुजराती पद्धतीची कढी,  सेवा भाजीसारख्या काही विशेष तिथल्या भाज्या. बाकी ढोकळा, खाकरा, फाफडा, गाठीया तर गल्लोगल्ली दिसायचेच. त्यातले काही वेगळे प्रकार तिथे खायला मिळाले.
 
अहमदाबाद म्हणजे गुजरात का दिल आणि इथे आलात नि ‘लॉ गार्डन’ला गेला नाहीत, तर खूप काही मिस कराल! तिथे खूप सारी मनसोक्त शॉपिंग करता येते. अगदी स्वस्त भावात आपल्याला तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, काही ज्वेलरीचे प्रकार... बांधणीची डिझाईन तिथे मस्तच मिळते. 
 
दुपारी इथे वामकुक्षीची पद्धत नसावी. साबरमती आश्रमात दुपारी पोहोचलो. तेव्हा जाताना रस्त्यांवरही चहल-पहल दिसली आणि आश्रमात तर पर्यटकांची झुंबडच होती. तिथून दिसणारी साबरमतीही नितांतसुंदर होती. गाधींजींचा मुख्य साबरमती आश्रम आणि त्याच्या आजूबाजूलाही छोटी घरं वाटावीत, अशी रचना केलेले इतर आश्रम होते. सगळ्यांना पांढरा आणि चॉकलेटी रंग होता. आजूबाजूला खूप सारी फुलझाडं होती. तिथे गेल्यावर ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ या गाण्याची धून कानात ऐकू येतेय की काय असं वाटलं. गंमत म्हणजे सोबतच्या मैत्रिणीच्या कानातही ती धून होतीच... गंमतच. मग कळलं की प्रत्यक्षात तिथे काही गाणंबिणं वाजत नव्हतं. (केमिकल लोचा? नाही...)  तो त्या वातावरणाचा परिणाम होता. 
 
गांधीजी जिथे सूत कातायला बसायचे ती जागा, कस्तुरबांची खोली, पाहुण्यांची खोली, स्वयंपाकघर असं सगळं त्या आश्रमात पाहायला मिळालं. समोर व्हरांडा. तिथून खाली उतरलं की साबरमतीकाठची पांढरी वाळू. तिथे गांधींजींचा जीवनप्रवास उलगडणारं संग्रहालयही आहे. ‘दांडी मार्च’ निघाला ती प्रतिकृती तिथे आहे. इतिहासात आपण गांधीजींचा सत्याग्रह, त्यांची असहकार आंदोलनं, असं सगळं वाचलंय. पण त्याची सुरुवात आणि दिशा साबरमतीतून ठरवली गेली. त्या वास्तूने तो सारा इतिहास अजूनही जागता ठेवलाय आपल्यासाठी. 
साबरमतीच्या परिसरातून भारावलेल्या अंतःकरणाने (हे थोडंसं अती वाटेल; पण व्हायला झालंच होतं भावूक) बाहेर पडलो. 
 
साबरमती आश्रम
सिद्दी सय्यद मशीद पाहिली. मार्बलवर सुबक जाळीकाम केलेल्या नक्षीने लक्ष वेधलं. अहमदाबादमधील ही प्रसिद्ध मशीद. लगोलग आमचा प्रवास वडोदऱ्याच्या दिशेने सुरू झाला. वडोदरा ही गुजरातची सांस्कृतिक राजधानी. इथला थाट, इथला रुबाब काही औरच. 
इथे वातावरणात उत्साह आहे. म्हणजे ‘केम छो’ म्हटल्यावर ‘मजामा’ असं उत्तर आलं की समजावं ती व्यक्ती वडोदऱ्याचीच आहे. इथल्या नुक्‍कडवर मसाला चहा, फाफडा, गाठीया खाण्यासाठी पावलं वळतातच. वडोदरा म्हणजे जुनं बडोदा संस्थान. त्यामुळे यहाँ की फिजाएँ मराठा राजा तिसरे सयाजीराव गायकवाडांचे गुण गाते. इथे मराठमोळेपणही पुरेपूर आहे. 
वडोदऱ्यातल्या प्रत्येक ठिकाणी सयाजीरावांची सोबत आपल्याला जाणवते. सयाजी बाग, लक्ष्मी विलास राजवाड्यासमोरची बाग, तिथलं संग्रहालय सारं काही डोळ्यांचं पारणं फेडतं. सयाजीरावांच्या काळात बडोदा संस्थान कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी होती. ती ओळख आजही टिकून आहे. ‘लक्ष्मी-विलास’ राजवाड्याची भव्यता आपल्या नजरेत मावत नाही, कॅमेऱ्यातही बंदिस्त करता येत नाही. ते वैभव तिथे जाऊनच अनुभवता येतं. तिथल्या वस्तुसंग्रहालयातलं कलादालन समृद्ध आहे. जगभरातील कलाविश्‍वाचा उत्कृष्ट नजारा तिथे पाहायला मिळतो. कलेची श्रीमंतीच इथे वसली आहे.
वडोदरा संग्रहालय
 
लक्ष्मी-विलास राजवाड्याच्या समोरची हिरवळ, कारंजी, मोरांचं बागडणं हे सगळं काही शब्दात मांडणं अवघडच. वास्तुकलेचा इतका अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी चार दिवस नाहीच पुरणार. वडोदरा शहरातलं हे वैभव पाहण्यासाठी घाई करून चालत नाही. राजा रविवर्मा यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीत उल्लेख होता, की त्यांना सयाजीरावांनी खास चित्रं काढण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. रविवर्मांनी इथे येऊन जी तैलचित्रं काढली, त्याचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. आजच्या आर्ट एक्‍झिबिशनचा तो पाया आहे. ती चित्रं तिथे पाहायला मिळाली. आर्ट गॅलरीची रचना अशी होती की, नैसर्गिक प्रकाश त्यावर पडून चित्रांचं सौंदर्य उलगडलं जावं. न्यूड पेंटिंग; तसंच शिल्पकला पाहताना त्या काळातील कलात्मकता किती प्रगल्भ होती हे जाणवलं. अलीकडे आपण ‘कलाजाणीवा’ यावर व्याख्यान देत आणि ऐकत बसतो. त्यापेक्षा ती खरी अनुभूती घेण्यासाठी वडोदऱ्यातील लक्ष्मी-विलास राजवाडा आणि संग्रहालय परिसरात जायलाय हवं.
 
माझा दृढ विश्वास आहे, की आपल्या संस्कृतीमध्ये जेवढं समृद्धीचं भांडार आहे, तेवढं कोणाकडेच नाही. आपण आपल्याला संस्कृतीला पुरतं ओळखलेलं नाही, असे गांधीजींचे शब्द साबरमतीच्या संग्रहालयात वाचले होते, ते या क्षणी आठवतायत. अहमदाबाद आणि वडोदरामध्ये गुजारलेल्या त्या चार दिवसांत तिथल्या गुज्जू संस्कृतीला जाणून घेता आलं. ती आनंदयात्रा आठवणीत कायम राहील.

पूर्वप्रसिद्धी १९ ऑक्टोबर २०१७ सकाळ मुंबई आवृत्ती, टुडे पुरवणी सदराचे नाव भ्रमणरंग

Saturday, 30 September 2017

बॉलीवूडच्या सप्तनायिका

मला भावलेल्या बॉलीवूडच्या सप्तनायिकांविषयी हे थोडसं आणि थोडक्यात...

प्रभावी रम्या 
बाहुबली सीरिजमधील शिवगामी देवीच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखली जाणारी पसुपुलेती रम्या म्हणजेच रम्या क्रिष्णन. आतापर्यंत तिने 200 सिनेमांमध्ये काम केलंय. त्यात हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचा समावेश आहे. तिला तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत आणि इतर दक्षिणेकडील सिनेक्षेत्रातही पुरस्कार मिळवले आहेत. तिने अभिनयाची सुरुवात केली फक्त 13 वर्षांची असल्यापासून. "सूत्रधारुलु' या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. तमीळ कुटुंबात जन्मलेल्या रम्याला तिचे काका म्हणजेच प्रसिद्ध विनोदी अभिनेते चो रामास्वामी यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. रम्या क्रिष्णनने विविध नृत्य प्रकार अथक साधनेने आत्मसात केले आहेत. कुचीपुडी, भरतनाट्यमसोबत पाश्‍चात्य नृत्य प्रकारांचीही तिला चांगली जाण आहे. नेरम पलारुमबोल हा तिचा पहिला सिनेमा मल्याळम भाषेत होता. हिंदीमध्ये बडे मिया छोटे मिया, शपथ, बनारसी बाबू, दयावान, चाहत, परंपरा या सिनेमांमधील काम विशेष लक्षात राहिलं; पण तिची शिवगामीची भूमिका स्त्री शक्तीची वेगळी ओळख करून देणारी ठरली. 


मेहनती भूमी 
यशराज फिल्म प्रॉडक्‍शनसाठी सहायक कास्टिंग डिरेक्‍टर म्हणून काम करणारी भूमी पेडणेकर. "दम लागे हईशा' या सिनेमासाठीही ती नेहमीप्रमाणेच बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच कास्टिंग करत होती. त्यांना ती भूमिका समजावून सांगत होती. एकेदिवशी लेखक, दिग्दर्शक शरत कटारिया तिला म्हणाला, "तू ही भूमिका खूप छान समजावून सांगतेस, तूही ऑडिशन दे.' आणि काय आश्‍चर्य तिची निवड झाली. त्यानंतर भूमीच्या रूपातील अभिनेत्रीने प्रेक्षकांची वाहवाच मिळवली आहे. तिने यशराज फिल्म प्रॉडक्‍शन सोबत आणखी तीन सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. या 27 वर्षीय अभिनेत्रीचा सोशल मीडियावर जास्त वावर नसतो; पण तिच्या ट्विटर हॅंडल आणि इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर तिच्याविषयी तिने लिहिलंय की ऍक्‍टर ड्रीमर, फ्युचर लीडर... हे वाचून ती पुढे राजकारणात जाणार आहे की काय असंही बोललं जातंय. भूमी लहानपणापसूनच एक फिल्मी गर्ल आहे. तिला सिनेमाविषयी खूप जिव्हाळा आहे. तिच्या पहिल्याच सिनेमासाठी तिला पदापर्णाचा पुरस्कार मिळाला. एकूणच दम लगा के हईशासाठी तिला एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत. तिने आतापर्यंत काम केलेल्या दम लगा के हईशा, टॉयलेट एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान हे तिन्ही सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या हिट आहेत. त्यातील तिच्या भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरल्यात. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या तिन्ही भूमिका स्त्रीमधला ठामपणा मांडणाऱ्या 
होत्या. 


चुलबुली आलिया 
संघर्ष या सिनेमात प्रीती झिंटाने साकारलेली रित ओबेरॉयच्या भूमिकेत लहानपणीची रित आलियाने साकारली होती. तेव्हापासून खरंतर आलियाचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला होता. चार वर्षांची असतानाच आपण छोट्या मोठ्या बाळबोध घोषणा करतो तसं तिने केलं होतं की मी अभिनेत्री होणार... आणि खरंच एकूण नऊ सिनेमांमध्ये काम करून आलिया बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालीय. स्टुडंट ऑफ द इयरमध्ये तिने कथेप्रमाणे छानच अभिनय केला होता; पण हायवे सिनेमातील भूमिकेत तिने खरंच मेहनत केलेली दिसली. मग तिला कोणीच रोखू शकलं नाही. 2 स्टेस्टस्‌, हम्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उडता पंजाब, बद्रीनाथ की दुल्हनिया यातल्या तिच्या भूमिका उत्तम होत्याच; पण डिअर जिंदगी सिनेमातील तिने साकारलेल्या कायराला तर कोणीच विसरू शकत नाही. तिला सेल्फी काढायला खूप आवडतं. 4 वर्षांची असल्यापासून तीने शामक दावर अकादमीमध्ये डान्स शिकायला सुरुवात केली. हायवेमधील सुहा साहा या गाण्यात तिची गाण्याची झलक दिसली. ती फिटनेस फ्रिक आहे. चुलबुली आलिया भूमिका निवडण्याबाबत चोखंदळ राहिली तर खास तिच्यासाठी भूमिका लिहिल्या जातील. 


स्ट्रॉंग तापसी
तेलुगू, तमीळ, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषेत अभिनय करणारी तापसी एक दिल्लीवाली गर्ल आहे. एका वाहिनीच्या शोसाठी मॉडेल बनली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आली. मॉडेलिंग करताना प्रसिद्ध ब्रॅंडसाठी काम केलंय. डेविड धवन यांच्या चश्‍मेबद्दूर सिनेमातून तिने हिंदीत प्रवेश केला. आतापर्यंत तिने बेबी, पिंक, नाम शबाना, रनिंग शादी, गाझी अटॅक, जुडवा 2 या सिनेमांमध्ये लक्ष्यवेधी भूमिका साकार केल्यात. खास करून पिंक आणि नाम शबाना हे तिच्यासाठीच बनलेले सिनेमा वाटावेत इतका अप्रतिम अभिनय तिने केला. लहानपणी ती कसलीच काळजी नसलेली एक मुक्त मुलगी होती. मॅगी हे तिचं निक नेम. ती ब्युटी विथ ब्रेन आहे...कारण ती अभ्यासात अतिशय हुशार होती. अजूनही ती तिच्या दिल्लीतल्या शाळेला भेट देते आणि शाळेसाठी काहीना काही करत असते. तिला इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही रस आहे. तिची वेडिंग प्लॅनिंग करणारी द वेडिंग फॅक्‍टरी नावाची कंपनी आहे. तिच्यासोबत या कंपनीत दोन पार्टनर आहेत. ते काम बघतात. सामाजिक कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांच्या जीवनावर सिनेमा बनतोय आणि यात तापसी काम करतेय, अशी चर्चा आहे. तिला स्क्वॅश हा खेळ खेळायला आवडतं. सिनेमातले सगळे स्टंट ती स्वतः करते. 2011 मध्ये या एका वर्षात तिचे 7 सिनेमे प्रदर्शित झाले. अशी ती एकमेव अभिनेत्री असावी. तिच्या भूमिका तिच्यासारख्याच स्ट्रॉंग होत्या.
 


 शिस्तप्रिय अनुष्का 
सध्या विराट कोहलीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत असली तरी अनुष्का शर्मा अभिनेत्री, मॉडेल आणि यशस्वी निर्माती आहे, हे विसरून कसं चालेल? रब ने बना दी जोडीमधील अनुष्का ते जब हॅरी मेट सेजलमधील अनुष्का...तिने आपलं वेगळेपण प्रत्येक वेळी दाखवून दिलंय. तिच्यावर लहानपणासून आर्मीचे संस्कार झालेत आणि शिस्तही. तिचे वडील आर्मी ऑफिसर आणि तिचा भाई मर्चंट नेव्हीमध्ये. तिने लहानपणापासून मॉडेल व्हायचं स्वप्नं पाहिलं होतं. त्यासाठी ती बंगलोरहून मुंबईला आली. तिने जर्नालिझमचं शिक्षण घेतलं. कारण तिने मॉडेलिंग आणि जर्नालिझम असे दोन पर्याय समोर ठेवले होते. रणबीर कपूरने एकदा बॉम्बे वेल्वेट सिनेमाच्या सेटवर तिची गंमत करावी म्हणून एक प्रॅंक केला होता; पण तिला ते कळलं नाही. तिला त्यावेळी रडू आलं. तो खूप मस्तीखोर असल्यामुळे मग तिने त्याला माफ केलं. बॅंड बाजा बारात, सुलतान, एनएच 10 आणि फिल्लौरीमधील भूमिकांसाठी तिचं कौतुक केलंच पाहिजे. हम भी कुछ कम नही हे वेळोवेळी ती दाखवून देते. 


कणखर स्वरा 
बॉलीवूड नायिकांच्या मुख्य प्रवाहातील यादीत स्वरा भास्कर नसली तरी तिने आपलं अभिनयातील वेगळंपण नेहमीच सिद्ध केलंय. बहीण, मैत्रीण किंवा नायिकेच्या कुणी जवळची अशा व्यक्तिरेखा साकारणारी स्वरा काही सिनेमात मुख्य भूमिकेत दिसलीय, हे विसरून चालणार नाही. संजय लीला भन्साळींच्या गुजारिशमधून हिंदी सिनेमात काम केलं तरी तनू वेड्‌स मनूमधील पायलच्या व्यक्तिरेखेमुळे ती लक्षात राहिली. त्यानंतर चिल्लर पार्टी, औरंगजेब, रांझणा, प्रेम रतन धन पायो या सिनेमांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. मग नील बाटे सन्नाटा आणि अनारकली ऑफ आराह या दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ज्या की तिच्याच व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱ्या होत्या. 
इट्‌स नॉट दॅट सिंपल या मिनी वेब सीरिजमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली. टीव्हीवर काही कार्यक्रमांचं निवेदन तिने केलंय. स्वरा आपली राजकीय आणि सामाजिक मत व्यक्त करायला अजिबात घाबरत नाही. याबाबतीत तिला मानायलाच हवं, कारण तिला ट्रोल करणाऱ्यांना ती पुरून उरलीय. 


स्पष्टवक्ती कंगना 
सध्या बॉलीवूडमधली फटकळ अभिनेत्री म्हणून चर्चेत असणारी कंगना अभिनयातही तितकीच ग्रेट आहे. एक विलक्षण तेज आहे तिच्यात असं नेहमी वाटतं. तिचे सिनेमे पाहताना. क्वीन सिनेमात काम केलं म्हणून नाही, तर ती आहेच बॉलीवूडची राणी. 2006 मध्ये गॅंगस्टर सिनेमापासून ते सिमरनपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. 2011 मध्ये तनू वेड्‌स मनूमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि अभिनयाचं शिखर गाठलं. उंचपुरी, कुरळे केस, बोलके डोळे, उत्तम बोली यामुळे ती उठून दिसते. तनूची व्यक्तिरेखा दोन्ही वेळेस ती अक्षरशः जगली. क्वीनमधला तिचा प्रत्येक संवाद सिनेमागृहात टाळ्या वाजवायला लावणारा होता. तमीळ आणि तेलुगू सिनेमातही तिने काम केलंय. तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा मिळालाय आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत. ती स्पष्टवक्तेपण अनेकदा फटकळपणाकडे झुकतं. तिने सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत काम करायला सुरुवातीपासूनच नकार दिलाय. एका मध्यमवर्गीय घरातील मुलीने स्वप्न पाहिलं तर किती मोठं यश मिळवू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कंगना. तिने मुंबईत आल्यावर मॉडेलिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कथ्थक शिकली. आता ती गाणंही शिकतेय. माझे सत्याचे प्रयोग हे तिचं आवडतं पुस्तक आहे. विश्‍वास नाही बसत पण आहे. लेखन करणं, स्वयंपाक करणं, वाचणं आणि बास्केटबॉल खेळणं तिला खूप आवडतं. महिला सक्षमीकरण हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. तेच ती मणकर्णिका सिनेमातूनही दाखवून देणार आहे.


Tuesday, 26 September 2017

गरबा झुमे छे!

नवरात्राच्या काळात कुणी गुजरातला चाललोय, असं म्हटलं की लगेच प्रश्‍न येऊ शकतो... गरबा रमवा माटे? कारण- गरबा, नवरात्र आणि गुजरात हे आता समानार्थी शब्द झालेत. नवरात्रीच्या दिवसांत तर गुजरातचा कोपरा न्‌ कोपरा गरब्याच्या उत्साहात रममाण दिसतो. पाहावं तिकडे जो-तो देवीच्या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेला आणि रात्री देवीची स्तुती करणाऱ्या गरब्यात रमलेला... पर्यटकांसाठी तर पर्यटन आणि प्रत्यक्ष उत्सवात सहभागी होणं हा दुहेरी आनंद असतो... गुजरात भेटीनंतरचा हा स्पेशल रिपोर्ट ...



नवरात्री एटले,                                    
भक्ती अने शक्ती नु पर्व...
गुजरातमा गरबा रमवा नथी, झुमे छे...
अशा काही वाक्‍यांनी आणि
सनेडो सनेडो सनेडो लाल सनेडो...
तारा विना शाम मने एकलडु लागे रास रमवाने वहेलो आवजे... अशा काही गाण्यांनी माझी गुजरातच्या नवरात्रीविषयीची उत्सुकता काही वर्षांपासून वाढवली होती. आणि या वर्षी थेट गुजरातमध्ये जाऊन नवरात्रीचं अक्षरशः वेड अनुभवण्याचा योग जुळून आला.
 
अहमदाबाद एअरपोर्टपासूनच नवरात्रीची चाहूल लागत होती. ठिकठिकाणी नवरात्रीच्या शुभेच्छांचे संदेश, तर कुठे आमच्या इथे गरबा रमवायला या, अशा निमंत्रणांचे फलक अन्‌ त्यासोबत ठिकाणाचा पत्ता. हॉटेलवर उतरल्यापासून त्या उत्सुकतेची जागा कुतूहलानं घेतली आणि या नऊ दिवसांतलं गुजरात काही वेगळंच असतं. याची प्रचिती येऊ लागली. रात्री गरब्याला जायचं तर जरा पारंपरिक वेशातच जाऊ, असं आमच्या ग्रुपचं ठरलं. नवली नवरात्र हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उद्‌घाटनाचा औपचारिक कार्यक्रम जीएमडीसी मैदानात थाटामाटात पार पडला. गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी आणि इतर मान्यवरांच्या छोटेखानी भाषणानंतर देवीच्या शक्ती रूपाची, दुष्टांचा संहार करणारी छबी इथे पाहायला मिळाली. जणू काही छोटेखानी सिनेमाच बघतो आहोत, असा भास झाला. तिथल्या सादरीकरणाने सर्वांना खिळवून ठेवलं. पारंपरिक लोकनृत्य आणि विविध नृत्यप्रकारांचा तो अनोखा मेळ पाहायला या वेळी सुमारे चार ते पाच हजार पर्यटक आणि स्थानिक लोकांनी हजेरी लावली होती. 
 
दुसऱ्या दिवशी त्याच मैदानात रंगलेल्या रास गरब्यामध्ये सामील होण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही. आम्ही मनसोक्त त्यांच्यासोबत गरब्यामध्ये रंगलो. सुरुवातीला नीट जमत नव्हतं. त्यामुळे तिथे गरब्यात धुंद झालेल्या काहींशी आपटाआपटी झाली. धक्का लागला. तरी त्यांनी हसून ‘ओके’ म्हणत आम्हाला कसं नाचायचं त्याच्या टिप्स दिल्या आणि दाखवलंही.
रात्री १२ नंतर पावलं घराकडे, हॉटेलकडे वळू लागली. आम्ही फेस्टिव्हल टुरिझम या मस्त संकल्पनेचे साक्षीदार होत होतो. दिवसभर पर्यटकांचा ओघ हॉटेलच्या दिशेनं जाताना दिसायचा. हॉटेल्सही नवरंगांनी नटली होतीच. तिथेही देवीच्या पारंपरिक गाण्यांचं लाईव्ह सादरीकरण आणि सोबत गुजराती, तसंच इतर भारतीय व पाश्‍चात्त्य जेवण आणि सोबत हटके खाद्यपदार्थांची रेलचेल.
 
नवरात्रीच्या दिवसांत गुजरातमधे सगळीकडे असा एकूण नजारा बघायला मिळतो. फेस्टिव्हल टुरिझममुळे पर्यटकांना रात्री गरब्याच्या ठिकाणांना भेट द्यायची आणि दिवसभर आजूबाजूची पर्यटनस्थळं बघत शॉपिंगही करायची पुरेपूर संधी मिळते. गुजरात टुरिझमची ही एक खासियत आहे.  
 
नवरात्रीचा हा मॅडनेस, लाईव्हनेस असे कितीतरी उत्साहवर्धक शब्द वापरून वर्णन करता येणार नाही इतकी धमाल अगदी गल्लोगल्ली दिसते. संध्याकाळच्या वेळात सगळ्यांची लॉ गार्डन, मंगल मार्केट, अलकापुरी अशा ठिकाणी पारंपरिक घागरा चोली, कुर्ता, फेटे, पगडी असं सगळं खरेदी करायला झुंबड उडते. कारण- गरब्याच्या ठिकाणचा तसा अलिखित नियमच आहे आणि तो पाळावाच लागतो. पारंपरीक पोशाखात आला नाहीत तर गरब्यात रमण्याच्या उत्साहावर पाणी पडू शकतं. डेस्पॅसिटो गाणं गुणगुणत शॉपिंग करणारी तरुणाई वडोदरा, अहमदाबाद बाजारपेठांमध्ये पारंपरिक पोशाख गरब्यासाठी खरेदी करताना दिसते. आणि तीच तरुणाई कुठल्याही बॉलीवूड गाण्याचा किंवा मॉडर्न संगीताचा आग्रह न धरता पारंपरिक गरबा गीतांवर बेधुंद थिरकते. हे विशेष. 


नवरात्रीचा मॅडनेस
नवरात्रीच्या नवलाई दिवसांतील मॅडनेस अनुभवायचा असेल, तर गरब्याची उत्सुकता जिथे शिगेला पोहोचते अशी काही ठिकाणी गुजरातमध्ये आहेत. तिथे आवर्जून जायला हवं. द युनायटेड वे गरबा, फाईन आर्ट फॅकल्टी गरबा, नवलाखी गरबा, मा शक्ती गरबा, वडोदरा नवरात्री फेस्टिव्हल, जीएमडीसी मैदान, अहमदाबाद त्याचबरोबर गुजरातमध्ये देवीची शक्तीपीठं असलेल्या खोडियार, पावागड, कच्छ (आशापुरा मंदिर), अंबाजी मंदिर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गरबा रंगतो. ते नुसतं बघणं हेही पर्यटकांसाठी आकर्षण असतं.
 
एक भारत श्रेष्ठ भारत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली संकल्पना म्हणजे एक भारत - श्रेष्ठ भारत. यामध्ये दोन राज्यांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये गुजरातची जोडी छत्तीसगडसोबत आहे. या संकल्पनेला आजपासून सुरुवात करत आहोत, अशी घोषणा या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपानी यांनी केली. त्यानिमित्ताने छत्तीसगडची लोककला, संस्कृती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. नवली नवरात्र कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी छत्तीसगडच्या लोककलावंतांनी ठकसाडी नृत्य सादर केलं आणि विविध स्टॉल्समध्ये खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या.
ठकसाडी हे लोकनृत्य सादर करताना छत्तीसगडचे लोककलावंत
 
 
कसे जाल?
विमानाने किंवा रेल्वेने अहमदाबाद किंवा आणि वडोदरा एअरपोर्ट किंवा रेल्वेस्थानकावर उतरून तिथेच गुजरात टुरिझमच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता. ते पर्यटकांना गाईड आणि कुठल्या ठिकाणांना भेट द्यायची, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं याचं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर एकेकटे जाणार असाल, तर थेट अहमदाबाद, वडोदरा, सौराष्ट्र या ठिकाणी पोहोचून खासगी बसेस, रिक्षांनी गरब्याच्या ठिकाणी आरामात पोहोचू शकता. अगदी रिक्षावालाही तुम्हाला कुठे जायचं, खरेदी, खाद्यपदार्थ कुठे छान मिळतात. हे सांगतो. याचा अनुभव आम्हालाही आला. गरबा रात्री सुरू होतो. त्यामुळे दिवसभरात साबरमती आश्रम, नदीचा परिसर, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस, पिकॉक गार्डन आणि त्याचं म्युझियम, मोढेराचं सूर्यमंदिर अशी आसपासची पर्यटनस्थळं बघता येतात. 

 
 

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...