Sunday, 28 February 2016

Opaning scene of the story

सकाळची वेळ आहे, आपण पाहतोय की कुलकर्णी फॅमिली पिकनिकला जाण्याची तयारी करत आहेत. गडबडीत आहेत.
अपूर्वाचे आई-बाबा बॅगा भरणं. नाश्ता, गाडीत खाण्यासाठी डबा भरणं यात बिझी आहेत. अपूर्वाची आई स्वयंपाकाच्या खोलीत काम करता करता अपूर्वाला हाक मारतेय.

त्यांच्या स्वयंपाक घराच्या पुढे असलेल्या भागात बाल्कनी आहे. तिथे काही फुलझाडांच्या कुंड्या आहेत. त्यात प्रामुख्याने सदाफुलीची व्हाईट आणि पर्पल रंगाची रोपटी आहेत. अजून इतर दोन तीन प्रकारची फुलझाडेही असू शकतात. किंवा सगळी सदाफुलीची असली तरी चालेल. अपूर्वा त्या फुलांच्या रोपट्यांना पाणी घालतेय. ती स्वतः कपडे घालून तयार झालीय. पण तितक्यात तिला झाडांना पाणी घालायची आठवण होते. म्हणून तसेच चांगले कपडे घातलेले असतानाही ती तिथे झाडांना पाणी घालायला येते. आधी बाल्कनीत आपल्याला दिसतं की कुणीतरी झाडांना झारीनं पाणी घालतंय. हळुहळु तिचे हात दिसतात. मग एकदा ती लांबून आपल्याला पाठमोरी दिसते. तितक्यात अपूर्वाची आई तिला तिकडून हाक मारतेय... अप्पू... अपूर्वा अपूर्वा...

अपूर्वा म्हणते... हो गं मम्मे...आले आले...
मग आपल्याला अपूर्वाचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाच दिसतो.
अपूर्वाचं तोपर्यंत पाणी घालणं पूर्ण झालेलं असतं. ती स्वयंपाक घरात येते.
काय गं किती उशीर...चल नाश्ता करून घे. आपल्याला निघायचय ना...
हो गं मम्मे....अगं मी उशीरा उठले. त्याची सजा बिचाऱ्या माझ्या झाडांना का...पाणी घालायला नको का...आता आपण बाहेर चाललोय ना...मग त्यांना पाणी कोण घालणार...
आई म्हणते...बरं बरं चल बस पटकन... बाजूच्या काकूंना सांगूया आपण...

त्यानंतर मग ते नाश्ता करतात. सगळी आवराआवर करून घरातून रेल्वेस्टेशनला येण्यासाठी निघतात...


Thursday, 18 February 2016

Twist in serial - 5

कल्याणी आज बऱ्याच दिवसांनी एवढा आवाज चढवून बोलली होती. कारणही तसंच होतं. तिने केलेल्या निखळ प्रेमावर, तिच्या चारित्र्यर संशय घेण्यात आला होता. रुपालीला आपण मामाची मुलगी असूनसुद्धा सख्खी बहिण मानलं, समीरवर मनापासून प्रेम केलं. पण यांनी तर माझ्यावर नाही नाही ते आरोप केले. अक्कासाहेब माझ्यासोबत होत्या म्हणून... नाही तर काय केलं असतं मी... कल्याणीला तो प्रसंग आठवून सारखं रडूच येत होतं. नाही आता हे बस झालं... मला आता कठोर व्हायला हवं. कुणीही उठावं... माझ्याकडे बोट दाखवावं... हे मी आता सहन नाही करणार... विचारांच्या धुंदीत असतानाच तिला झोप लागली. समीर रात्रभर खोलीत आलाच नाही... 

सकाळ झाली तेव्हा कल्याणीला खूप खूप मोकळं मोकळं वाटत होतं.  मुलांची शाळेला जायची तयारी करून त्यांना शाळेत सोडून पुन्हा तिने आपल्या रूममध्ये बिछान्याला पाठ टेकली. आणि ती चक्क गाणं गुणगुणू लागली. पुढच्याच क्षणी ती उठून ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागली. तिच्या हाताला स्केचपॅड लागले. तिला आनंद झाला. तिथेच पेन्सिलही सापडली. ती पुन्हा बिछान्यावर बसली. उशीवर रेलून गाणं गुणगुणत ती स्केचेस काढू लागली. कित्येक वर्षांनी तिने आपल्याकडे असलेल्या या कलेसाठी वेळ काढला होता. तिला फॅशन डिझायनिंगची आवड होती. पण या क्षेत्रातील ग्लॅमरला ती घाबरली होती. आणि ही कला स्केचपॅडपुरतीच तिने राहू दिली होती. तिने कधी हिंमतच केली नव्हती. स्वतःची अशी वेगळी ओळख घडवण्याची... पण कधी मनापासून एखादं डिझाईन काढावसं वाटलं तेव्हा तिने स्वतःला कधी रोखलं नाही. तिची ही ओळख तिच्यापुरतीच होती. कुणालाच माहीत नव्हती. कल्याणी स्केच काढण्यात दंग झाली होती... 

बराच वेळ कल्याणी कुठे बाहेर दिसली नाही म्हणून अक्कासाहेब तिच्या रुममध्ये बघायला आल्या आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं. कल्याणीला स्केच काढताना पाहून… कल्याणीने स्वतःपुरती ठेवलेली ही कला आज तिच्या लाडक्या अक्कासाहेबांना कळली होती. त्यांनीही कुतूहलाने सर्व डिझाईन्स पाहिल्या. त्यांना आनंद झाला. पण विश्वासच बसत नव्हता की हे कल्याणीने डिझाईन्स काढले आहेत. त्यांनी तिला शब्द देऊन टाकला... मस्त एखादी थिम घेऊन डिझाईन्स काढ. आपण तुझ्या डिझाईन्सचं एक्झिबिशन भरवुया...
हे काय अक्कासाहेब का थट्टा करताय माझी... कल्याणी बोलली.
अगं थट्टा नाही करत... खरंच सांगतेय मी. तुला तर माहीतच आहे. एकदा मी शब्द दिला म्हणजे दिला… कळलं

कल्याणीला इतक्या वर्षांनी नवं काहीतरी करण्याचा हुरूप आला. तिने खूप मन लावून डिझाईन्स केल्या.
रुपाली सोडून घरातील सगळ्यांनी तिला मदत केली. रूपाली एका वेगळ्याच प्लॅनमध्ये गुंतली होती.

अक्कासाहेबांनी कोल्हापूरात कल्याणीसाठी एक मस्त शोरूम उभं केलं. जणु काही आपल्या सुनेला एक खुलं आभाळच दिलं. मनसोक्त बागडण्यासाठी.
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - 4

एखादी गोष्ट सांगताना सगळंच गोड गोड असून चालत नाही. तसं रूपालीचं वागणं हे तिखटाप्रमाणे आहे. अक्कासाहेबांची तर तिने माफी मागितली आहे. पण ती तिचा मूळ स्वभाव सोडत नाही. तर तिने आता तिचा मोर्चा कल्याणीकडे वळवला आहे. अक्कासाहेबांशी नीट वागून कल्याणीला त्रास देण्यासाठी ती प्लॅन्स आखू लागली आहे.

तिला माहीत आहे की समीर आणि कल्याणीच्या नात्यामध्ये काही प्रमाणात का होईना दुरावा आहे. समीरला या गोष्टीचं वाईट वाटतं की आपलं आणि कल्याणीचं बाळ असूच शकणार नाही. कारण कल्याणीला प्रेग्नसीमध्ये कॉप्लिकेशन्स आल्यामुळे आता यापुढे ती कधीच आई होऊ शकणार नाही. समीरला याचं दुःख आहे. त्यामुळे कल्याणी आणि समीरच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे.  तो वरवर निवळल्यासारखा वाटतो पण तसे नाही. आपल्या आई-वडलांपासून दुरावलेला समीर सरदेशमुख कुटुंबात परत येतो. तोपर्यंत याआधी तो सगळ्या नात्यांना पारखा झालेला असतो. आपलं कुणीच नाही. आपण एकटे आहोत. या फेजमधून तो गेला असल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे. त्याचं कल्याणीवर खूप प्रेम आहे. पण त्याला वाटतं की आपलं जेवढं कल्याणीवर प्रेम आहे. तेवढं तिचं आपल्यावर नाही. सोहमचं मूल हेच तिचं सर्वस्व आहे. त्यामुळे या गोष्टीची समीरला चीड आहे.  याचाच फायदा उठवत  रूपाली त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती समीरला सांगते तुझ्यावर कल्याणीचं प्रेमच नाही.  त्यामुळे समीर आणि कल्याणीच्या नात्यात तेढ निर्माण होते...

सरदेशमुख कुटुंबात आल्यामुळे समीरला एका कर्त्या मुलाचे सर्व अधिकार मिळाले आहेत. यामुळे तो सुखावला आहे. वैवाहिक आयुष्यात फारसा समाधानी नसलेला समीर बिझनेस फिल्डमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे रोहित आणि त्याच्यात स्पर्धाच सुरू झाली आहे. पण रूपालीने त्याच्या मनात कल्याणीविषयी संशय निर्माण केल्यामुळे समीरचं ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाहीय. त्याच्याकडून चूका होतात.  त्या निस्तरण्यासाठी रोहित पुढे येतो. रूपालीला अजून बळ मिळतं. तिला वाटतं, समीर असाच दुखावलेला राहिला तर रोहितकडे बिझनेसची मोठी जबाबदारी येईल. रूपाली आनंदून जाते. कल्याणीही घरात सर्वांशी तुटकपणे वागू लागते. तिचं कशात मन लागत नाही. अक्कासाहेबांना लक्षात येतं की कल्याणीचं काहीतरी बिनसलं आहे. त्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतात. परंतु वेगळ्या प्रकारे... अक्कासाहेब रूपालीने आखलेल्या प्लॅन्सना उधळून लावत नाहीत. त्यांना पहायचं असतं की आपल्या संसारावर आलेलं संकट कल्याणी धाडसाने परतून लावू शकते की नाही. त्यांना कल्याणीला सरदेशमुख घराण्याच्या एक सक्षम सूनबाईच्या रूपात पहायचे असते. त्यामुळे रूपालीच्या कल्याणीवरील कारवायांवर त्या लांबून लक्ष ठेऊन असतात.


रूपालीची इतपर्यंत मजल जाते, की कल्याणी मुलांना शाळेत सोडायला जाते तेव्हा ती रोज एका मुलाला भेटते. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. असं ती समीरला सांगते. तिच्याकडे कल्याणी आणि त्या मुलाचे काही फेक फोटो असतात. ती ते समीरला दाखवते. समीरचा राग अनावर होतो. तो कल्याणीला घराबाहेर काढायला निघतो. कल्याणी त्याची मनोमन विनवणी करते. पण समीर ऐकत नाही. शेवटी कल्याणीच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती पेटून उठते. ती म्हणते, देवा ब्राम्हणांच्या साक्षीने सात फेरे घेऊन आपलं लग्न झालंय. अक्कासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आपलं लग्न लावलं आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणीच नाही. मी घराबाहेर जाणार नाही. मी या सर्व प्रकरणाचा छडा लावेन. आजपर्यंत मी गप्प राहून सारं सहन केलं. पण आता नाही, हद्द झाली. चूक माझी नाही. समीर तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझं पाऊल मी कधीच वाकडं पडू दिलं नाही. मी शोधून काढेन याच्या मुळाशी कोण आहे ते....कल्याणीच्या अशा कॉन्फिडन्ट बोलण्यामुळे अक्कासाहेबांचा हेतू साध्य होतो. त्या रूपालीनेच हे सर्व कारस्थान घडवून आणलं आहे, असं समीरला पुराव्यानिशी सांगतात...

समीरला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो. तो कल्याणीची माफी मागतो. पण कल्याणी त्याला सांगते. तुला सहजासहजी माफ करणं मला शक्य होणार नाही. माझं मन तू खूप दुखावलं आहेस. मला थोडा वेळ हवाय.... अक्कासाहेब समीरला सांगतात की तू थोडा वेळ तिला दे. तिच्या मनाचा विचार कर. कल्याणीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अक्कासाहेब एक नवा प्लॅन करतात. समीरच्या वागण्याने दुखावलेल्या कल्याणीला आता एक वेगळं क्षितीज खुणावतं आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिला अक्कासाहेबांची साथ लाभणार हे वेगळं सांगावयास नको. पाहूया कल्याणीला आता कुठलं वेगळं क्षितिज खुणावतं आहे ते...
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - 3

अक्कासाहेबांचं वय ५० ते ५५ च्या आसपास आहे. अक्कासाहेबांचं जयवंत सरदेशमुख यांच्याशी तडकाफडकीतच लग्न होतं. जयवंताची पहिली बायको मेल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न अक्कासाहेबांशी होतं. तरुण वयात त्यांनीही काही स्वप्नं पाहिली असतील. पण सरदेशमुखांच्या घरात लग्न होऊन आल्यामुळे काही अधिक उण्या वेगळ्या जबाबदाऱ्या अक्कासाहेबांना पेलाव्या लागतात. त्यातुनच त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी घडत जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये लिडरशीप क्वालिटी येते. डिसीजन मेकिंग पावर येते. आतापर्यंत अक्कासाहेबांनी घरातील सर्वांना एकत्र कुटुंबात मायेने बांधुन ठेवलं. 

रूपाली, तिची आई, चिंत्या मामा आणि स्वप्नाली यांनी घरावर आणलेल्या संकटांशी अक्कासाहेब एकहाती लढल्या. त्यांचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत आपल्या घरासाठीच सर्व काही करत आल्या. आता त्या समीर, रोहित, कल्याणी, स्वप्नाली यांच्या रूपाने आपलं तरुणपण पुन्हा अनुभवू लागल्या आहेत. त्यामुळे आधी त्यांनी आपला मोर्चा त्यांच्या लाडक्या कल्याणीकडे वळवला आहे. त्यांना माहीत आहे. कल्याणीचा सोशिक स्वभाव आहे. पण तिच्यावर अशी एखादी वेळ आलीच तर ती कठोर आणि धैर्याने वागू शकते. असा विश्वास अक्कासाहेबांना आहे. त्यामुळे कल्याणीला ग्रूम करण्यासाठी पुन्हा एकदा अक्कासाहेबांनी कंबर कसली आहे.

कल्याणीला एका जाहिरात एजन्सीकडून जाहिरातीमध्ये काम करण्याची ऑफर येते. (कल्याणीला ऑफर येण्याचा प्लॅनही अक्कासाहेबांनीच आखलेला असतो. ते नंतर ओपन होतं. तोपर्यंत कल्याणीचं रूपांतर एका कॉन्फिडन्ट तरुणीत झालेलं असतं.) त्यासाठी तिला मुंबईला जावं लागणार असतं. कल्याणी पहिल्यांदा साहजिकच नकार देते. अक्कासाहेब तिची समजूत काढतात. कल्याणी आणि समीरला त्या मुंबईला पाठवतात. त्यांना परतायला निदान आठवडा तरी लागणार असतो. त्यामुळे लहानग्या करणला असं सोडून मुंबईला कसं जायचं, असा प्रश्न कल्याणीला पडतो. पण अक्कासाहेब तिला सांगतात. आठवडाभराचाच तर प्रश्न आहे. मी सांभाळेन त्याला...कल्याणी आणि समीर मुंबईला जायला निघतात. बऱ्याच दिवसांनी कल्याणी आणि समीरच्या नात्याला एक वळण यानिमित्ताने मिळतं. कल्याणी, समीर आणि आपल्यामधील रिलेशनशिप स्ट्राँग करण्याचा यशस्वी प्रयत्न करते. ती समीरला सांगते की लग्न म्हणजे मूल जन्माला घालणं, एवढंच नाही तर त्या पलिकडेही आपल्या नात्यांना अधिक दृढ करणं हे आहे. संसारात राहून एकमेकांना त्यांची हवी असलेली स्पेस देणं म्हणजे सहजीवनातील खरा आनंद मिळतो.  आपण जर आपल्या इच्छा जोडीदारावर लादल्या तर आपलं सहजीवन सुखाचं होणार नाही. तू मला समजून घेतलंस याचा मला खूप आनंद झाला आहे.

समीर कल्याणीच्या अशा बोलण्याने भारावून गेला आहे. त्याला असं वाटतं की ही ती रडूबाई कल्याणी नाहीच. किती धिटाईने ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलते आहे... समीरला असं आपल्याकडे एकटक पाहताना कल्याणी लाजते.... (बॅग्राऊंडला एक रोमँटिक गाणं लागतं.)

एका जाहिरातीत काम करण्यामुळे का होईना पण कल्याणीमध्ये आता काही नवीन गोष्टी करून पाहण्याची जिद्द निर्माण झाली आहे. तिचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आता मुळुमुळु रडणारी कल्याणी राहिलेली नाही. कल्याणी आणि समीर मुंबईला गेल्यामुळे इकडे अक्कासाहेबांना आपल्या नातवंडात रमण्याची संधी मिळते. त्यामुळे आपल्या घरातील या नव्या पिढीच्या अधिक जवळ जातात.  
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial - business minded अक्कासाहेब

सरदेशमुखांचा बिझनेस यशवंत सांभाळत असतो. त्याच्याबरोबरीने समीर आणि रोहित बिझनेसमध्ये जबाबदारी सांभाळत असतात. पण अक्कासाहेब फर्मान काढतात की बिझनेसची धुरा नव्या पिढीच्या हाती द्यालला हवी. देवकी नाराज होते तिला वाटतं अक्कासाहेब समीरच्या हाती सर्व सोपवतील. पण अक्कासाहेब एक वेगळाच निर्णय घेतात. त्या घरातल्या सर्वांसमोर समीर आणि रोहितला सांगतात की मी तुम्हाला चॅलेन्ज देणार आहे. ते तुम्हा दोघांपैकी जो कोणी पूर्ण करेल त्याला बिझनेसमधील महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. अक्कासाहेब दोघांना एक टार्गेट अचिव्ह करण्यासाठी देतात. ते टार्गेट असं असतं की समीर आणि रोहितने कोल्हापुरातील प्रत्येकी दहा तरुणांना बिझनेस फिल्डमध्ये येण्यासाठी तयार करायचे. त्यांचे मन वळवायचे. 

रोहित आणि समीर ते टार्गेट अचीव्ह करायला सज्ज होतात. घरातील कुणाचीही मदत घेऊ नये, असं अक्कासाहेब त्यांना बजावतात. त्याचबरोबर त्या दहा तरुणांना तुम्हाला हे टार्गेट देण्यात आलं आहे, हे कळू देऊ नका. असं अक्कासाहेब त्यांना सांगतात.  रूपाली इथेही प्लॅन आखते. ती चिंत्यामामाला समीरच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगते. तरीही या सगळ्यातून पार होत शेवटी समीर १० तरुणांना बिझनेस फिल्डमध्ये येण्यासाठी तयार करण्यात यशस्वी होतो. तो त्यांना घेऊन अक्कासाहेबांना भेटायला घरी येतो. रोहित ९ तरुणांना घेऊन येतो. अक्कासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समीर टार्गेट पूर्ण करतो. रूपालीनेही रोहितचं टार्गेट पूर्ण व्हावं यासाठी मेहनत घेतलेली असते. त्यासाठी तिने काही प्लॅन्सही आखलेले असतात. पण फेल होतात.  समीरच्या हातात बिझनेसमधील महत्त्वाची सूत्रं येतात.


घरातील सगळ्यांना अक्कासाहेबांचा हा डिसिजन योग्य वाटतो. रूपाली आणि रोहित मात्र नाखूश असतात. पुढे अक्कासाहेब रोहित आणि समीरने बिझनेससाठी मन वळवलेल्या १९ तरूणांपैकी काही तरुणांची सरदेशमुखांच्या कंपनीत काम करण्यासाठी निवड करतात. इतरांना त्यांच्या पुढील करिअरसाठी मदत करण्याचं आश्वासन अक्कासाहेब देतात. कोल्हापूरमधील तरुणांनी बिझनेसकडे वळावं म्हणूनच समीर आणि रोहितला तसं टार्गेट त्यांनी दिलेलं असतं. अक्कासाहेबांनी तरुणांसाठी केलेल्या या कामगिरीची दखल घेतली जाते. त्यांना कोल्हापूरच्या युथ आयकॉन म्हणून गौरवण्यात येतं. 
(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

Twist in serial -1

पुढचं पाऊल मालिकेच्या या सीनमधील पात्रं – अक्कासाहेब, कल्याणी, समीर, अक्कासाहेबांची सवत कावेरी आणि घरातील सर्व पात्रं)  

आपल्या विचारांच्या आणि आपण घेतलेल्या निर्णयाच्या पक्क्या असलेल्या अक्कासाहेब घरातून निघत आहेत.  घरातील सगळ्या माणसांना आक्कासाहेबांनी घर सोडून जाऊ नये असं वाटतं. अर्थातच याला अपवाद फक्त रूपाली आणि कावेरी. त्या दोघी मनातून आनंदून गेल्या आहेत. पण तोच क्षणात रूपालीच्या डोक्यात विचार येतो. अक्कासाहेबांना थांबवावं. अक्कासाहेब घराबाहेर गेल्या तरी मला काही स्वस्थ बसू देणार नाहीत. आणि त्या काही शांत बसणार नाहीत. काहीना काही करतीलच घरात पुन्हा येण्यासाठी...
अक्कासाहेब आपल्या शत्रू आहेत. आणि आपला शत्रू आपल्या नजरेसमोरच असलेला बरा. असं मनात येऊन रूपाली अक्कासाहेबांच्या पायावर डोकं ठेवते.
आणि म्हणते, अक्कासाहेब मला माफ करा. माझ्या हातून मोठी चूक झाली. मी आणि चिंत्यामामाने कारस्थान रचून तुमच्या डिव्होर्स पेपरवर सह्या घेतल्या. माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला, मला क्षमा करा. (रूपाली अक्कासाहेबांची माफी मागण्याचं खूप नाटक करते.) तुमचा विश्वास बसत नाही ना. दोन मिनिटं थांबा आलेच मी.....
ती धावत तिच्या खोलीत जाते. डिव्होर्स पेपर सर्वांसमोर फाडून टाकते. अक्कासाहेब आणि घरातील सर्वांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करते. कावेरीला मात्र रूपालीच्या या वर्तणुकीचा धक्का बसतो. रूपालीनेच तिच्या मनात स्वार्थबुद्धी जागृत केलेली असते. त्यामुळे साध्या स्वभावाच्या कावेरीला या वाड्याची अक्कासाहेब होण्याची स्वप्नं पडू लागलेली असतात. पण आताच्या या रूपालीच्या वागण्याने ती गोंधळते. तिला चक्कर येते. ती खाली कोसळते.  तिला लगेच हॉस्पीटलमध्ये नेण्यात येतं. तिला वेंटिलेटरवर ठेवलं जातं. रूपाली सोडून घरचे सर्व काळजी करत असतात. रूपालीप्रमाणेच समीरच्याही मनात विचार येत असतात की कावेरी वाचलीच नाहीतर किती बरं होईल. घरात अचानकपणे उद्भवलेले सारे प्रश्न सुटतील.
रूपालीने माफी तर मागितलेली असते. पण ती मनातून खूप घाबरलेली असते. आपणच कावेरीच्या मनात तिच्या हक्काविषयी सांगितले. त्यामुळेच ती हळुहळु आपल्या बाजूची व्हायला लागली होती. पण आता मी अक्कासाहेबांची माफी मागितली आणि डिव्होर्स पेपर फाडून टाकले त्याचाच धसका कावेरीने घेतला आहे. ती शुद्धीवर आली तर अक्कासाहेबांना इनोसन्टली सर्व सांगेल की रूपालीच माझ्या मनात नाही ते विचार भरत होती. रात्र होते. अक्कासाहेब सगळ्यांना हॉस्पीटलमधून घरी जायला सांगतात. पण रूपाली अक्कासाहेबांच्या सोबतच थांबते. रूपालीला कावेरी शुद्धीवर आल्यावर तिच्याशी पहिल्यांदा बोलायचं असतं.  अक्कासाहेब आणि रूपाली रात्रभर हॉस्पीटलमध्येच थांबतात. अक्कासाहेबांना घरून फोन येतो. त्या फोनवर बोलत बाहेर जातात. तितक्यात रूपाली कावेरीजवळ जाते. तिच्या मनात विचार येतो. हिचा मास्क काढून टाकला तर....ती तिच्या तोंडाजवळ हात नेते. तितक्यात अक्कासाहेब मागून मोठ्याने हाक मारतात... रूपाली. रूपाली म्हणते, काही नाही अक्कासाहेब... त्यांना शुद्ध आली का ते बघत होते.

एका सीनमध्ये अक्कासाहेब आणि त्यांची सवत कावेरी

रूपालीच्या हाताला धरून अक्कासाहेब बाहेर घेऊन जातात. इतक्यात कावेरीच्या खोलीत खिडकीतून एक माणूस येतो आणि कावेरीचा मास्क काढून टाकतो. उशीने तिचा गळा दाबतो. कावेरीचा श्वास कोंडतो. तितक्यात कुणीतरी आत येत असल्याची चाहूल त्या व्यक्तीला लागते. तिला तशाच अवस्थेत ठेवून ती व्यक्ती पळ काढते. (स्क्रीनवर त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. फक्त तिची कृती दिसते.) अक्कासाहेब आणि रूपाली आत येतात. कावेरी तळमळत असते. आणि पुन्हा बेशुद्ध होते. डॉक्टर येतात आणि ती मृत झाल्याचे घोषीत करतात.  रूपालीने त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं. कारण अक्कासाहेबांशी बोलताना अक्कासाहेबांची कावेरीच्या खोलीकडे पाठ असते. रूपालीला मात्र ते खोलीतलं दृश्य दिसलेलं असतं. पण ती काहीच बोलत नाही. ती व्यक्ती त्याच हॉस्पीटलमधीलच असते. डॉक्टर अक्कासाहेबांना सांगतात की कावेरीच्या गळ्याजवळ मारहाणीच्या खुणा आहेत. अक्कासाहेब पोलिसांना बोलावतात. पोलिस हॉस्पीटलची झडती घेतात. कावेरीच्या खोलीत काही क्लू मिळतो का पाहतात. तितक्यात तिथे एक माणूस येतो. तो सांगतो. मीच कावेरीला संपवून टाकलं. ती तिच्या सागरबरोबर संसार थाटायला निघाली होती. मला उद्ध्वस्त करून .... तो माणूस अक्कासाहेबांना सांगतो.... माझं कावेरीवर खूप प्रेम होतं. पण तिने मला नकार दिला. म्हणून मीच तिला....तो शांत होतो... बोलायचा थांबतो. पोलिस त्याला घेऊन जातात.

रूपाली सुटकेचा निश्वास टाकते. अक्कासाहेब आणि रूपाली घरी येतात. घरातल्यांना कावेरी विषयी सांगतात. काही क्षण सारेच गप्प... कुणाला काय बोलावं तेच कळत नाही... त्या दिवसापासून कावेरी नावाचा अध्याय सरदेशमुख कुटुंबासाठी संपतो…

(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

खरा सोना



अॅलिस मन्रो 
अॅलिस मन्रो ह्या कॅनेडीयन कथालेखिकेक २०१३ ह्या वर्साचो साहित्याचो नोबेल पुरस्कार गावलो. तिका गोष्टी सांगाची लय आवड होती. आनि गोष्टी सांगता सांगता ती चांगल्यो कथा लिवाक लागली. पांढऱ्या केसांची, गोड चेहेऱ्याची अॅलिस आजी कथेमुळा फेमस झाली. मानसाच्या सोन्यासारक्या नात्यांवरच्यो तिच्यो गोष्टी वाचनाऱ्याक सोन्यासारको इच्यार देतत. आणि आता तिका ह्यो नोबेल पुरस्कार मिळालो. तिना आतापर्यात लिवलल्या येक येक शब्दाचा सोना झाला.
आता तुमी म्हनशात कोकनातल्यो गजाली आनि गमतीजमती सांगनारा मिया, नोबेल आनि अॅलिस आजयेच्या कथेचा गुनगान ख्येका करतंय? तर त्येचा काय झाला, ती नोबेल बक्षिसाची गजाल वाचून माका लय बरा वाटला. आजयेच्या गोष्टींकासुद्धा सोन्याचा मॉल आसता ह्या परत येकदा पटला माका.
आमच्या आजयेकसुद्धा गोष्टी सांगाक लय आवडायचा. ती काय शिकलली नाय. पन तिच्याकडे गजालींचो आनि गोष्टींचो खजिनोच होतो. रोज नईन नईन गोष्टी तिका सुचतत तरी कशो? माका प्रश्न पडायचो. माका वाटायचा मिया दिवसभर खेळन्यात रमलला आसतय तेव्हा आजी हळूच फुस्तक काढून येकादी गोष्ट पाठ करून ठेवता आसात. आनि मग माका ती झोपताना रंगून जावन सांगत आसात. तशो तिना सांगलल्यो सगळ्यो गोष्टी माका आजूनव आटावतत. पन त्यातली सोन्याची गोष्ट माका मॉप आवडायची.
त्या दिवशी आमची जेवना लवकर झाली होती. खळ्यातसून मस्त निळा निळा आकाश दिसत होता. दिवाळीसुदा येका आठवड्यावर येवन ठेपली होती. दिवाळेच्या पैल्या दिवशी गोड फॉव करूक होये म्हनान, आई नया भात भिजत घाली होती. दुसऱ्या दिवशी तिका सुकळवाडीक जावचा होता फॉव कूटुक. म्हनान ती लवकर निजाक गेली. पन माका अजिबात नीज यैयना. मिया आजयेक सांगलय, माका आज लय मोटी आनि जादूबिदूची असनारी गोष्ट सांग.
मग तिना गोष्ट सांगाक सुरवात केली…. आपल्या कोकनातली मानसा सोन्यासारकी आसत. मनान लय शिरमंत आसतत. पन त्येंकाव कदी कदी लोभीपना नडता. ही माणसांच्या लोभीपनाची गोष्ट आसा. येका गावात येक नदी होती. ती नदी येका बाजून खूप खोल होती. थयसर मोटी कोंड होती. त्या गावातली मानसा खूप गरीब होती. कोनाकडेच सोन्याच्ये दागिने नसायचे. मग ते त्या कोंडीकडे जायचे. थय जादू व्हायची. कोनाकडे लगीनकार्य असला काय, त्येंका लग्नात मिरवासाठी दागिने होयेशे वाटायचे. तेवा मानसा काय करायची तर परत्येक दागिन्याच्या नावान याक याक देवचाप्याचा फूल एक परडी घेवन त्याच्यात टाकायची. अशी दागिन्यांच्या नावान सात-आठ देवचाप्याची फुला असलेली ती परडी कोंडीत सोडून द्यायची. फुलांची ती परडी वायच येळ त्या कोंडीतल्या पान्यावर तरंगायची. नंतर बुडान तळाक जायची. परडी सोडलेलो मानूस थयसरच उबो ऱ्हवायचो. तौसर ती परडी चमचमत्या लकलकत्या सोन्याच्या दागिन्यांनी भरान त्या कोंडीतसून वर यायची. दागिन्यांनी भरलेली परडी बघून तो मानूस खूश व्हायचो. आपन ज्या दागिन्यांचा नाव मनात ठेवून इच्छा धरली, ते सगळे दागिने तो हात लावन निरखून बघायचा. आनि ती परडी घेवन घराक जायचा. मग लग्नकार्यात ते दागिने घालून मिरवायचा. दोन दिवसानंतर पुन्ना ते दागिने तशेच त्या परडीत ठेवून नदीवर त्या कोंडीत सोडून द्यायचा. ती परडी वायच तरंगान मग तळाक जायची. मग तो मानूस मनापासून हात जोडून घराकडे परतायचा.
अशी ही जादू लय वरसा टिकाव धरून होती. पन येका वर्सा काय झाला? येका मानसान अशीच मनात इच्छा धरून ते परडीतले दागिने घेतल्यान आणि परत करूची येळ इली तेवा तेतलो येक दागिनो चोरल्यान. त्या दिवसापासून कोंडीतल्या परडीतसून गावणारे दागिने बंद झाले. ती जादूपन संपली. त्यानंतर कदीच फुलांनी भरलेली परडी खाली जावक नाय आनि दागिने काय वर येवक नाय. येका मानसाच्या लोभीपनामुळे सोन्याची ती जादू कायमची संपली. मग त्या गावातल्या लोकांची सोना घालून मिरवण्याची हौस-मौज सोपनातच ऱ्हवली. अशी ती आजयेन सांगलली सोन्याची गोष्ट. गोष्टीतसून बोध काय घेवचो तर सोना काय किंवा आनखीन खयच्याव गोष्टीची, वस्तूंची लय हाव बरी नाय.
आजयेन सांगतली ही गोष्ट आता ह्या येळेक आटवाचा कारन ह्याच की, आजूनव आपनाक सोन्याची हाव लय आसा. आंगभर सोन्याच्ये दागिने घालून मिरवायची इच्छा आसा. मग त्येच्यासाटी आपन कायपन करूक तयार. सोन्याचो भाव उतारलो तरी आणि सोन्याचो भाव चढलो तरी सोना खरेदी करूची आपली हाव काय सुटता सुटत नाय.
रोज दिवस उजाडल्यावर खयचो पेपर हातात घेवचो त्येच्यात सोन्याच्या तरेतरेच्या दागिन्यांची मोठमोठ्या दुकानांची अर्धा पानभर जायरात आसता. फेमस नट-नटी सोना, हिरे, मोत्यांच्ये दागिने घालून त्या जायरातीत दिसतत. खयच्या गोष्टीक महत्त्व देवचा ता आपल्याक कळनाच नाय.
अगदी गेल्या वर्सा घडलेली ती गोष्ट… तो उत्तर प्रदेशातलो उन्नाव जिल्ह्यातलो साधू. तेकापन सपान पडलला. थयसरच्या राजाच्या किल्ल्यात सोन्याचो खजिनो आसा म्हानान. आनि सरकारपासून सगळ्यांनी मिळान थय खनाक सुरवातसुदा केल्यानी. आता काय म्हनायचा ह्या गजालीक? सोन्यासारक्या मानसाचो जीव सोन्यासाटी तळमळता. म्हूर्त बघून सोना खरेदी करणाऱ्या लोकांची तर अडानीपनाची लक्षना.
आपल्यासाटी सोन्याचा मॉल काय? तर येकादो सोन्याचो दागिनो आंगार आसलो तर बरा वाटता. इतपर्यात ठीक आसा. पन सोन्यासाटी यवढ्यो उलाढाली करूक कोनी सांगल्यान हा. सोन्यासारको निसर्ग आसा, सोन्यासारकी नाती आसत. कोनाकडे सोन्यासारके चांगले गुन आसत ते जपाचे सोडून सोन्याच्या पाठी धाव ख्येका व्हयी? सोना घालून नटान-थटान काय मिळतला? पन ह्या सोन्याच्या लोभापायी सोन्यासारको येळ आणि सोन्यासारक्या मानसांची मात्र परवड होतली. बघा आजूनव येळ गेलेली नाय ‘खरा सोना’ वळखा लौकर.


(अॅलिस मन्रो या कॅनेडीयन कथालेखिकेला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने लिहिलेला हा मालवणी बोलीतील लेख)
गोष्ट सांगणारी आजी

Saturday, 6 February 2016

खॉळ आनी इरला घेवया

हिरवोगार तरवो वाऱ्यावर डुलाक लागलो आनी पावसाच्या दिवसात झोपाळ्यार बसान म्हनाचा गाना सुरू झाला…
तुज्या झोपाळ्याबुडी
माज्या झोपाळ्याबुडी
चिकन चिकन माती
ती दिली ती दिली
कुंभाराच्या हाती

घरातली च्येडवा झोपाळ्यावर बसान झुलाक लागली. असो, गाव असा माती आनी हिरया रंगात रंगान गेला हा. गेले दोन आटवडे पावसान जोर धरलो आसा. सगळे नदी, व्हाळ भराळ गेले आसत. तेतुरच तरवो काडुचो टायम इलो. त्येच्या वांगडा लावनेची घाय. कामाक काय तोटोच नाय. गावच्ये सगळे झिलगे, बायलमानसा कंबार मोडापरयात वाकान तरवो काडतत. आनी कोपऱ्यात नी मोठे फाळयेत चिकल करून लावनी करतत. घराकडना सकाळची न्हेरी आनी दुपारचा जेवान येता. मगेन मेरेवर, बांदावर बसानच जेवतत. 

शेतात न्हेरयेचो घमघमाट सुटलेलो. कदी हुनहुनीत पेज, कदी भाजलेलो सुको बांगडो, बोंबिल नायतर पेडवो. कदी नुसतीस कांदो चिरून तेच्यात मालवणी मसालो नि त्याल टाकून केलेली कांद्याची भाजी. कदी मदी झणझणीत, चमचमीत उसळी. शेतातल्या मेरेवर बसान न्हेरी खाताना त्या न्हेरयेची चव पन काय मस्तच लागायची. आसो, मिया काय सांगा होतय...
त्या दिवशी गावड्यांची आजी अगदी खुशीत हुंबऱ्यावर बसान सुपात उकडे तांदूळ घेवन पेजेसाटी निवडी होती. मिया तिका इच्यारलय, काय आजये लय खुशीत आसस? काय नयीन खबर...
गावड्यांची आजी बोल्ली, माजो धाकटो झील, सून आनी नातू इलोहा मुंबैसुन
मिया म्हटलंय, ह्या बरा झाला, मग आता इच्यार काय तेंचो? नुसते पावसात भिजाक इले हत, काय तरवो काडूक ऱ्हवतले हत?"
आजी म्हनाली, होय गो बायग्या, तुया बघीतच ऱ्हव, माजी धाकटी सून कसो तरवो काडतली आनी आवो लावतली ती...
गावडे काकांच्या मदतीक त्येंचो धाकटो भाव इलो म्हनान, माकाव बरा वाटला. इले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती मुंबैकर घो-बायला उटली, न्हेरी बांदान घेतल्यानी, मुंबैच्या मॉलमधना हाडलेली विनशिटरा बॅगेतसून काडल्यानी. आजी बघीतच ऱ्हवली त्येंच्याकडे. तेवा धाकटो झील म्हनता कसो, अगे, आवशी ही विनशीटरा (windcheater) आसत, ही घातली म्हंजे केदो मोठो पावस इलो तरी आमी भिजाचव नाय.तुजी ती खॉळ आनी इरला आमका नुको. आजयेन आपला मॉप वरसा टिकून ठेवलला इरला आनी मॅनकापडाच्या कागदाची केलेली खॉळ मग तशीच चोपाळ्यावर पडान ऱ्हवली. आनी इरला टांगल्यानी खायले पडयेच्या खुट्याक.
जोराच्या पावसामुळा कोपऱ्यात ढोपारभर पानी जमा झालेला. ह्या पानी भायर काडूसाठी, कोपऱ्यांच्यो मेरा फोडून घातल्यानी. मग वायच पानी कमी झाला नी सगळे जान तरवो काडूक उतारले. दुपारनंतर बाजुच्या मोठ्या फाळयेत लावनेक चिकल करूसाटी जॉत धरल्यानी. गावड्यांच्या आजयेची सून तरवो काडूक पयल्यांदाच इल्ली म्हनान तिका तरवो काडतना, लावनेचो आवो लावतना लय मजा वाटत होती. पन तुमका म्हायती हा, तरवो काडूच्या कोपऱ्यात तिना पयलो पाय ठेवल्यान तेवा काय केल्यान. तर आयका. तिना मोबाईल घेवन दोन-तीन सेल्फी काढल्यान. मगे ते सोशल मीडियावर #लावनी #तरवो #ricefield #green #चिखल #muddy #farming #शेती अशे कितीतरी हॅशटॅग वापरून फोटो पोस्ट केल्यान. आणि तिच्यो मैत्रिणी पन दनादन लाईक्स करत ऱ्हवल्यो मुंबैतसून... 

कोपऱ्यात तरवो काडूक इलेली इतर बायल मानसा गावड्यांच्या सूनेकडे बघीतच ऱ्हवली. फोटोचे लाईक्स बघल्यावर मगे गावड्यांची सून शिस्तीत तरवो काडूक लागली. तेच्यानंतर चिखल केलेल्या कोपऱ्यात सगळीजना तो तरवो लावक गेली. गावड्यांच्या सुनेची ही पयलीच लावनी, त्यामुळे आवो लावतना तिचो आवो पसरत होतो, मग मोठी जाव तिचो आवो सरळ करी होती. वायच येळान तिची नदार बाकीच्या बायलमानसांकडे गेली. तेवा तिका दिसला सगळ्या बायकांनी डोक्यावर इरली घेतल्यानी आसत. तिका वाटला आपनव इरला घेवक होया. पयल्या दिवसाची लावनी संपल्यावर ती घराक गेली तेवा तिना साशयेक सांगल्यान, उद्यापासून मियाव इरला घेवन तरवो काडूक जातलय. सुनेचा बोलना आयकान आजयेचा मन भरान इला. ती म्हनाली, जा गो बाय, आजपासून तुजाच आसा ता इरला. अगो आता अशी इरली, खॉळ खय गमतच नाय. सगळीकडे तुमच्यो छत्र्यो आनी काय ती विनशीटरा दिसतत. आनकी थोड्या वरसांनी अशी इरल्यांची कारागिरी खय सोदून सापडाची नाय. जुन्या काळात मानसा आपली ही इरल्यांची गावठी कला जपत इरली इनायचे. आता कोनाक सवड आसा इरली करूक.
गावड्यांची आजयेची सून मग इरला घेवनच तरवो काडूक जावक लागली. आनी तिचो झिल पन कांबळा खांद्यावर नी मॅनकापडाच्या कागदाची खॉळ घेवन चिकल करूक लागलो. मग फुडे काय बोलाची सोय नाय. 
सूनबाय इरला घेवन जी तरवो काडूक लागली ती शेवटच्या कोपऱ्यातलो शिरवनेचो नारळ मेळापर्यात तरवो काडीतच ऱ्हवली. 

आजी मगे रोज भाकरी नि कांद्याची भाजी, कदी सुक्या कोलंबीची भाजी तर कदी मोड इलेल्या कडधान्याची उसळ अशी न्हेरी शेतात पाठवक लागली. भातशेतीच्या लावनेच्या कामान चांगलोच जोर धरलो. कामाक गेलेल्या मंडळींका घराक येवक सांज जावक लागली. 
मगे काय, गावड्यांची आजी नातवाक हुंबऱ्यावर घेवन बसली नी लागली गुनगुनाक...
आराड गे बांडके
सांज जाव दे
बाबूची आये
घराक येव दे...


(मालवणी बोली)

न्हिंबार नि पावस, सरावन इलो...



सरावन म्हयन्यात
न्हिंबार नि पावसाचो खेळ,
तडफडता जीव माशासाटी…..
असा वाटता आपन बारीकशा मेरेवर उबे ऱ्हवलंव. येका बाजूक माशे आसत आणि दुसरे बाजूक सनवार. गावकारांच्या बावडेर गेल्लय हांडो घेवन पानी हाडूक, तर खायल्या पडयेतल्या चोपाळ्यार गावकारांच्ये नाना पेजेचा वाडग्या फुड्यात घेवन नुसते बसलले गमले. पेज काय त्येंच्या घशाखाली उतरत नाय होती. मिया इच्यारलंय, काय वो नानानू काय झाला? ते बोल्ले, ‘काय नाय गो बायग्या सरावन सुरू झालो ना. आता गनपती पोचवीपर्यात माशे खावक गावाच्ये नाय. माशाशिवाय जेवनाचो इच्यारच माज्यान करवत नाय.’
माशे म्हंजे मालवन्यांचो जीव की परान. माशाशिवाय दोन म्हयने काडूच्ये म्हंजे लयच वांदे सगळ्यांच्ये. अगदीच माशाचा कालवन नाय पन येकादो सुकटाचो तुकडो भाजलो तरी लय झाला. पिटी, उकडो भात आनि वांगडा भाजलला सुकाट आ… हा… हा… येकदम झक्कास मालवनी मेजवानीच.
लावनेची कामा नुकतीच आटापली. पैऱ्यांका न्हेरी वांगडा देवन सुके माशेसुदा संपले. गेल्या आठवड्यात डॉब मारलल्यानी त्येचे माशेपन खावन झालले. पकल्या केरकरान बिळात हात घालून घालून मोट्या मोट्या डेंग्याच्यो कुर्ल्यो हानलेल्यान. ते पन तेना चार घरांका वाटून बाकी उरलेले आपल्या घरात न्हेवन रांधल्यान.
तरवो काडून दमलली बायलमानसा सरावनातल्या सनासुदीच्या तयारीक लागली. गुळाच्यो ढेपा हाडा, खय मोट्या वळयाचो नारळ बाजूक ठेवा. ल्हाये काडूसाठी सुपात भात काडून ठेवा. सांजावला काय फुगड्यांची गानी म्हना. पन बापयांचो मात्र सरावन सोमवाराच्ये पुजेत लक्ष लागलो नाय. देवळात जमले तर भजनाचे टाळ कुटूच्ये सोडून मनात सगळ्यांच्या बांगडो, पेडवो तळल्याचो वास भरान ऱ्हवललो. पैल्या सोमवाराकच सगळ्या बापयांची नाराजी दिसा व्हती. मयेकरांचो किसना म्हनाक लागलो, ‘सरावन पाळूक व्हयो. ह्या बरोबर आसा. पन मनातसून माशे खावशे वाटतत. त्येचा काय करायचा. आजून तीन सोमवार बाकी आसत. सरावनातल्या पैल्याच दिसाक आपलो लक्ष नाय होतो भजनात. माका वाटता या वर्सापासून आपून सरावन पाळायचोच नाय असा ठरवला तर…’
सगळेजान चमाकले. मगे येकयेक करून सगळे तयार झाले. त्येनी ठरवल्यानी याच आयतवारी जावया कसालच्या बाजाराक आनि मॉप माशे हाडूया. गावड्यांच्या मांगरात सावशीत पार्टीच करूया. नाना गावकार लय खूश झाले.
न्हिंबार नि पावस
कोल्याचा लगीन.
कोल्याची बायको
वयवर उबी

सरावन म्हयनो म्हंजे अख्ख्या कोकनात नुसती हिरवळ. तिरडे, हरनांचे बगिचे आनि मदीच पावस तर मदीच न्हिंबार. मन भरान जाता. पावसाचा पानीसुदा आंगार पडला तरी तो मोत्याचो थेंब वाटता.
सांज झाली तशी वाडीतल्या बायकांनी गावड्यांच्या घरात जमाचा ठरवल्यानी फुगडी खेळाक. गावड्यांच्या सुनेन सगळ्यांसाटी तौशाचा टोपातला केलेल्यान. मोट्या बायकांका फुगडेची लय गानी पाट होती. चेडवांका त्येंच्याकडून मॉप गानी शिकाची होती. फू बाय फू फुगडी, चमाकता माजी बुगडी… फू, फू, फू. मोटी बायका म्हनाक लागली, ‘शिक्शीत बाय, शिक्शीत, चेडवा आमची शिक्शीत, त्येंच्यावांगडा फुगडी खेळता माधुरी दिक्षित.’ चेडवांका लयच मजा वाटली. गावड्यांच्या घरात बायकांची फुगडी रंगात इली. आनि तकडे गावड्यांच्याच मांगरात माशांच्या पार्टीक सुरुवात झाली. सगळ्यात फुडे गावकारांच्ये नाना. माशांवर सगळ्यांनीच ताव मारल्यानी.

तर मंडळी या सरावन म्हैयन्यात लय मजा करा. माशे खावचे की नाय ता मनापासून ठरवा. सरावनात वातावरन निर्मळ आसता. तुमीसुदा इच्यार करा. माशांची सनावारांची सांगड घालून, सोदून काडा कायतरी मधलो मार्ग. काय म्हनतास, पटला की नाय माजा म्हनना… अगे, बाय! मिया गजालीच मारीत ऱ्हवलंय तुमच्यावांगडा. जातय मिया सुकटाचो वास येताहा कोनाच्या घरातसून तो बघतंय… 
(मालवणी बोली)

चाकरमान्यानु समाज ऱ्हवलो खय?



हे, गजाल खरी काय?
चाकरमानी कोकनात इले काय?...

कोकन रेल्वेच्यो येकशे ईस फेरयो वाढवल्यानी चाकरमान्यांका गनपतीक कोकनात जावसाटी; आनि त्येचा बुकिंग आट मिंटात फुल झाला. ही गजाल वाऱ्यासारकी पसारली. ही गजाल खरीच होती, पन बरी काय वायट ह्येचो इच्यार मनात घुटमाळाक लागलो. वाटला चाकरमानी आजूनव गाववालेच ऱ्हवले हत. मुंबैक त्येंचो जीव रमना नाय.
आमच्याकडे यंदा धाकट्या काकांची वर्सल म्हनान ते इले हत. जोरदार तयारी सुरू झाली आसा गनपतीक हाडूची, हरना, तिर्डे, शेरवडा, कांगला, तौसा, नारळ, शिप्टा, कौंडाळा सगळी फुलपत्री कुंबयाच्या दोऱ्यात बांदान माटवी सजवून झाली आसा. गनपती बसता त्येच्या मागच्ये भितिर कमाळ काडून झाला. करंज्या-लाडवाची तयारी झाली हा.
गनपतीच्या सनामुळे गाव फुलान इलो हा. चाकरमान्यांच्यो मुंबैच्यो गजाली संपता संपत नायत. ही झाली गजालिची पैली बाजू. दुसरी बाजू अशी आसा येकत्र येवन सन साजरो करूक होयो ही मुळातली मजाच हरवत चाल्ली आसा. येका घरात दोघे-तिघे भाव आसतील तर गावाक येवचे पाळये लावतत. चाकरमान्यांच्या शिरमंतीवर गनपतीची मूर्ती मोटी की ल्हान हाडायची ह्या ठरता.  कोकनातल्याच लोकमान्य टिळकांनी ‘येकत्र येवन समाजाक बरोबर घेवन ह्यो सन साजरो करा’, असा सांगल्यानी. पन त्या नेत्याचा कोनीच आयकान घेवक नाय. आसो. आजूनव कोकनात, जुन्या गोयात परत्येकाच्या घरात गनपती येता.
अगोदर टाळ, तबला, मृदंग, पेटी घेवन मोट्या आवाजात आरती-भजना म्हननारे आता आरतीची फुस्तका हातात घेतल्याशिवाय त्येंका आरती म्हनाक यैत नाय. तेवा टाळ, चकी व्हाजवनारे पेटयेवर बसान गानारे गावासाटी मोटे संगीतकार होते. पन आता येळ मारून न्हेवसाटी कशीव भजना गातत नी च्याय-लाडू घेवन घराक जातत. ह्या काय बरा दिसना नाय. गनपतीच्या भितिर कमाळ काडनारे, देकावो काडनारे, गनपती शाळेत गनपती लिपनारे मुंबैच्या जे. जे. स्कूलात जावन मोटे चित्रकार, मूर्तिकार झाले. कलेचो गुन आंगात हाडल्यानी पन समाजातली आपली मुळा इसारले. येकत्र येवन समाज घडाक होयो म्हनान आपन सनसुद साजरे करताव. ‘येक गाव येक गनपती’ ह्या सपान कोकनात परतेकशात कदी बघुक मेळतला. अगोदर धा दिस गनपतीच्ये कशे यैत नि कशे जायत ता कळासुदा नाय. गनपतीच्या पैल्या दिसापासून ते म्हामदा घालून गनपती पोचवीपर्यात सगळो गाव गुंग असायचो. धा-बारा दिस आदीच तयारीची धांदल उडायची. तेवा म्हटला जायचा. गनपतीचो सन साजरो कोनी करूचो तर तो फकस्त कोकनातच.

रातभर जागून भिती रंगवनारे, गनपती शाळेत शाडूच्या मातयेच्यो मूर्ती घडवणारे, पेट्येवर बसान आऽऽऽआऽऽऽ करीत भजना, डबलबारीत गानारे, सांज झाली काय फुगड्यो घालणारी बायलमानसा ही सगळी जाना खयतरी हरावली आसत. आता हे सगळे जे सन साजरो करतत ते कंत्राटी कामगार वाटतत. बाकी काय नाय. अरे, मोटेपना दाकवसाठी सन साजरो करूचो नसता रे. आता गावकरांचा सनसनीत गाराना आयकाक गावना नाय तर ता नुसता रडगाराना वाटता. गनपतीची आरती करूक इलेल्या भक्तांनी अगोदर वळय भरान जायची. आज सात, आट टकली उबी होती गनपतीफुडे. रडतत काय, आरती म्हनतत ह्याच कळाक नाय. गावड्यांची आजी कालच सांगा होती तिच्या झिलाक सुटी नाय म्हनान त्येंचो गनपती पाच दिवसांनी पोचवतत. तिच्या थकलल्या जीवाक येकच परस्न पडत होतो आता गौरीबाय कशी हाडायची, वौवशे कशे पुजायचे… काय ह्या चाकरमान्यानु ही गजाल बरी नाय. येवडे हौशेन इलास तरी गाववाले खूश नाय झाले. ता सामाजिक भान ऱ्हवला बाजूकच पन आपल्या घराक तरी संबाळा. गनपती काय दरवर्सा येतले. पन फुढल्या वर्सा येशात तेवा तुमचो शिरमंतीचो ढोल मुंबैक ठेवन येवा. नि फुस्तक हातात न धरता आरती करा. मग मिया मानलय तुमका, काय चाकरमान्यानु येवढा तरी करशात ना… 
(मालवणी बोली)

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...