Thursday, 18 February 2016

Twist in serial -1

पुढचं पाऊल मालिकेच्या या सीनमधील पात्रं – अक्कासाहेब, कल्याणी, समीर, अक्कासाहेबांची सवत कावेरी आणि घरातील सर्व पात्रं)  

आपल्या विचारांच्या आणि आपण घेतलेल्या निर्णयाच्या पक्क्या असलेल्या अक्कासाहेब घरातून निघत आहेत.  घरातील सगळ्या माणसांना आक्कासाहेबांनी घर सोडून जाऊ नये असं वाटतं. अर्थातच याला अपवाद फक्त रूपाली आणि कावेरी. त्या दोघी मनातून आनंदून गेल्या आहेत. पण तोच क्षणात रूपालीच्या डोक्यात विचार येतो. अक्कासाहेबांना थांबवावं. अक्कासाहेब घराबाहेर गेल्या तरी मला काही स्वस्थ बसू देणार नाहीत. आणि त्या काही शांत बसणार नाहीत. काहीना काही करतीलच घरात पुन्हा येण्यासाठी...
अक्कासाहेब आपल्या शत्रू आहेत. आणि आपला शत्रू आपल्या नजरेसमोरच असलेला बरा. असं मनात येऊन रूपाली अक्कासाहेबांच्या पायावर डोकं ठेवते.
आणि म्हणते, अक्कासाहेब मला माफ करा. माझ्या हातून मोठी चूक झाली. मी आणि चिंत्यामामाने कारस्थान रचून तुमच्या डिव्होर्स पेपरवर सह्या घेतल्या. माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला, मला क्षमा करा. (रूपाली अक्कासाहेबांची माफी मागण्याचं खूप नाटक करते.) तुमचा विश्वास बसत नाही ना. दोन मिनिटं थांबा आलेच मी.....
ती धावत तिच्या खोलीत जाते. डिव्होर्स पेपर सर्वांसमोर फाडून टाकते. अक्कासाहेब आणि घरातील सर्वांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करते. कावेरीला मात्र रूपालीच्या या वर्तणुकीचा धक्का बसतो. रूपालीनेच तिच्या मनात स्वार्थबुद्धी जागृत केलेली असते. त्यामुळे साध्या स्वभावाच्या कावेरीला या वाड्याची अक्कासाहेब होण्याची स्वप्नं पडू लागलेली असतात. पण आताच्या या रूपालीच्या वागण्याने ती गोंधळते. तिला चक्कर येते. ती खाली कोसळते.  तिला लगेच हॉस्पीटलमध्ये नेण्यात येतं. तिला वेंटिलेटरवर ठेवलं जातं. रूपाली सोडून घरचे सर्व काळजी करत असतात. रूपालीप्रमाणेच समीरच्याही मनात विचार येत असतात की कावेरी वाचलीच नाहीतर किती बरं होईल. घरात अचानकपणे उद्भवलेले सारे प्रश्न सुटतील.
रूपालीने माफी तर मागितलेली असते. पण ती मनातून खूप घाबरलेली असते. आपणच कावेरीच्या मनात तिच्या हक्काविषयी सांगितले. त्यामुळेच ती हळुहळु आपल्या बाजूची व्हायला लागली होती. पण आता मी अक्कासाहेबांची माफी मागितली आणि डिव्होर्स पेपर फाडून टाकले त्याचाच धसका कावेरीने घेतला आहे. ती शुद्धीवर आली तर अक्कासाहेबांना इनोसन्टली सर्व सांगेल की रूपालीच माझ्या मनात नाही ते विचार भरत होती. रात्र होते. अक्कासाहेब सगळ्यांना हॉस्पीटलमधून घरी जायला सांगतात. पण रूपाली अक्कासाहेबांच्या सोबतच थांबते. रूपालीला कावेरी शुद्धीवर आल्यावर तिच्याशी पहिल्यांदा बोलायचं असतं.  अक्कासाहेब आणि रूपाली रात्रभर हॉस्पीटलमध्येच थांबतात. अक्कासाहेबांना घरून फोन येतो. त्या फोनवर बोलत बाहेर जातात. तितक्यात रूपाली कावेरीजवळ जाते. तिच्या मनात विचार येतो. हिचा मास्क काढून टाकला तर....ती तिच्या तोंडाजवळ हात नेते. तितक्यात अक्कासाहेब मागून मोठ्याने हाक मारतात... रूपाली. रूपाली म्हणते, काही नाही अक्कासाहेब... त्यांना शुद्ध आली का ते बघत होते.

एका सीनमध्ये अक्कासाहेब आणि त्यांची सवत कावेरी

रूपालीच्या हाताला धरून अक्कासाहेब बाहेर घेऊन जातात. इतक्यात कावेरीच्या खोलीत खिडकीतून एक माणूस येतो आणि कावेरीचा मास्क काढून टाकतो. उशीने तिचा गळा दाबतो. कावेरीचा श्वास कोंडतो. तितक्यात कुणीतरी आत येत असल्याची चाहूल त्या व्यक्तीला लागते. तिला तशाच अवस्थेत ठेवून ती व्यक्ती पळ काढते. (स्क्रीनवर त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. फक्त तिची कृती दिसते.) अक्कासाहेब आणि रूपाली आत येतात. कावेरी तळमळत असते. आणि पुन्हा बेशुद्ध होते. डॉक्टर येतात आणि ती मृत झाल्याचे घोषीत करतात.  रूपालीने त्या व्यक्तीला पाहिलेलं असतं. कारण अक्कासाहेबांशी बोलताना अक्कासाहेबांची कावेरीच्या खोलीकडे पाठ असते. रूपालीला मात्र ते खोलीतलं दृश्य दिसलेलं असतं. पण ती काहीच बोलत नाही. ती व्यक्ती त्याच हॉस्पीटलमधीलच असते. डॉक्टर अक्कासाहेबांना सांगतात की कावेरीच्या गळ्याजवळ मारहाणीच्या खुणा आहेत. अक्कासाहेब पोलिसांना बोलावतात. पोलिस हॉस्पीटलची झडती घेतात. कावेरीच्या खोलीत काही क्लू मिळतो का पाहतात. तितक्यात तिथे एक माणूस येतो. तो सांगतो. मीच कावेरीला संपवून टाकलं. ती तिच्या सागरबरोबर संसार थाटायला निघाली होती. मला उद्ध्वस्त करून .... तो माणूस अक्कासाहेबांना सांगतो.... माझं कावेरीवर खूप प्रेम होतं. पण तिने मला नकार दिला. म्हणून मीच तिला....तो शांत होतो... बोलायचा थांबतो. पोलिस त्याला घेऊन जातात.

रूपाली सुटकेचा निश्वास टाकते. अक्कासाहेब आणि रूपाली घरी येतात. घरातल्यांना कावेरी विषयी सांगतात. काही क्षण सारेच गप्प... कुणाला काय बोलावं तेच कळत नाही... त्या दिवसापासून कावेरी नावाचा अध्याय सरदेशमुख कुटुंबासाठी संपतो…

(पुढचं पाऊल या मालिकेसाठी मी सुचवलेला एक twist)

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...