अॅलिस मन्रो |
अॅलिस मन्रो ह्या कॅनेडीयन
कथालेखिकेक २०१३ ह्या वर्साचो साहित्याचो नोबेल पुरस्कार गावलो. तिका गोष्टी
सांगाची लय आवड होती. आनि गोष्टी सांगता सांगता ती चांगल्यो कथा लिवाक लागली.
पांढऱ्या केसांची, गोड चेहेऱ्याची अॅलिस आजी कथेमुळा फेमस झाली.
मानसाच्या सोन्यासारक्या नात्यांवरच्यो तिच्यो गोष्टी वाचनाऱ्याक सोन्यासारको
इच्यार देतत. आणि आता तिका ह्यो नोबेल पुरस्कार मिळालो. तिना आतापर्यात लिवलल्या
येक येक शब्दाचा सोना झाला.
आता तुमी म्हनशात कोकनातल्यो गजाली आनि गमतीजमती सांगनारा मिया, नोबेल आनि अॅलिस आजयेच्या कथेचा गुनगान ख्येका करतंय? तर त्येचा काय झाला,
ती नोबेल बक्षिसाची गजाल वाचून माका
लय बरा वाटला. आजयेच्या गोष्टींकासुद्धा सोन्याचा मॉल आसता ह्या परत येकदा पटला
माका.
आमच्या आजयेकसुद्धा गोष्टी सांगाक लय आवडायचा. ती काय शिकलली नाय. पन
तिच्याकडे गजालींचो आनि गोष्टींचो खजिनोच होतो. रोज नईन नईन गोष्टी तिका सुचतत तरी
कशो? माका प्रश्न पडायचो. माका वाटायचा
मिया दिवसभर खेळन्यात रमलला आसतय तेव्हा आजी हळूच फुस्तक काढून येकादी गोष्ट पाठ
करून ठेवता आसात. आनि मग माका ती झोपताना रंगून जावन सांगत आसात. तशो तिना
सांगलल्यो सगळ्यो गोष्टी माका आजूनव आटावतत. पन त्यातली “सोन्याची गोष्ट” माका मॉप आवडायची.
त्या दिवशी आमची जेवना लवकर झाली होती. खळ्यातसून मस्त निळा निळा आकाश
दिसत होता. दिवाळीसुदा येका आठवड्यावर येवन ठेपली होती. दिवाळेच्या पैल्या दिवशी
गोड फॉव करूक होये म्हनान,
आई नया भात भिजत घाली होती. दुसऱ्या
दिवशी तिका सुकळवाडीक जावचा होता फॉव कूटुक. म्हनान ती लवकर निजाक गेली. पन माका
अजिबात नीज यैयना. मिया आजयेक सांगलय,
माका आज लय मोटी आनि जादूबिदूची
असनारी गोष्ट सांग.
मग तिना गोष्ट सांगाक सुरवात केली…. आपल्या कोकनातली मानसा सोन्यासारकी
आसत. मनान लय शिरमंत आसतत. पन त्येंकाव कदी कदी लोभीपना नडता. ही माणसांच्या
लोभीपनाची गोष्ट आसा. येका गावात येक नदी होती. ती नदी येका बाजून खूप खोल होती.
थयसर मोटी कोंड होती. त्या गावातली मानसा खूप गरीब होती. कोनाकडेच सोन्याच्ये
दागिने नसायचे. मग ते त्या कोंडीकडे जायचे. थय जादू व्हायची. कोनाकडे लगीनकार्य
असला काय, त्येंका लग्नात मिरवासाठी दागिने होयेशे
वाटायचे. तेवा मानसा काय करायची तर परत्येक दागिन्याच्या नावान याक याक
देवचाप्याचा फूल एक परडी घेवन त्याच्यात टाकायची. अशी दागिन्यांच्या नावान सात-आठ
देवचाप्याची फुला असलेली ती परडी कोंडीत सोडून द्यायची. फुलांची ती परडी वायच येळ
त्या कोंडीतल्या पान्यावर तरंगायची. नंतर बुडान तळाक जायची. परडी सोडलेलो मानूस
थयसरच उबो ऱ्हवायचो. तौसर ती परडी चमचमत्या लकलकत्या सोन्याच्या दागिन्यांनी भरान
त्या कोंडीतसून वर यायची. दागिन्यांनी भरलेली परडी बघून तो मानूस खूश व्हायचो. आपन
ज्या दागिन्यांचा नाव मनात ठेवून इच्छा धरली,
ते सगळे दागिने तो हात लावन निरखून
बघायचा. आनि ती परडी घेवन घराक जायचा. मग लग्नकार्यात ते दागिने घालून मिरवायचा.
दोन दिवसानंतर पुन्ना ते दागिने तशेच त्या परडीत ठेवून नदीवर त्या कोंडीत सोडून
द्यायचा. ती परडी वायच तरंगान मग तळाक जायची. मग तो मानूस मनापासून हात जोडून
घराकडे परतायचा.
अशी ही जादू लय वरसा टिकाव धरून होती. पन येका वर्सा काय झाला? येका मानसान अशीच मनात इच्छा धरून ते परडीतले दागिने घेतल्यान आणि परत
करूची येळ इली तेवा तेतलो येक दागिनो चोरल्यान. त्या दिवसापासून कोंडीतल्या
परडीतसून गावणारे दागिने बंद झाले. ती जादूपन संपली. त्यानंतर कदीच फुलांनी भरलेली
परडी खाली जावक नाय आनि दागिने काय वर येवक नाय. येका मानसाच्या लोभीपनामुळे
सोन्याची ती जादू कायमची संपली. मग त्या गावातल्या लोकांची सोना घालून मिरवण्याची
हौस-मौज सोपनातच ऱ्हवली. अशी ती आजयेन सांगलली सोन्याची गोष्ट. गोष्टीतसून बोध काय
घेवचो तर सोना काय किंवा आनखीन खयच्याव गोष्टीची, वस्तूंची लय
हाव बरी नाय.
आजयेन सांगतली ही गोष्ट आता ह्या येळेक आटवाचा कारन ह्याच की, आजूनव आपनाक सोन्याची हाव लय आसा. आंगभर सोन्याच्ये दागिने घालून
मिरवायची इच्छा आसा. मग त्येच्यासाटी आपन कायपन करूक तयार. सोन्याचो भाव उतारलो
तरी आणि सोन्याचो भाव चढलो तरी सोना खरेदी करूची आपली हाव काय सुटता सुटत नाय.
रोज दिवस उजाडल्यावर खयचो पेपर हातात घेवचो त्येच्यात सोन्याच्या
तरेतरेच्या दागिन्यांची मोठमोठ्या दुकानांची अर्धा पानभर जायरात आसता. फेमस नट-नटी
सोना, हिरे,
मोत्यांच्ये दागिने घालून त्या
जायरातीत दिसतत. खयच्या गोष्टीक महत्त्व देवचा ता आपल्याक कळनाच नाय.
अगदी गेल्या वर्सा घडलेली ती गोष्ट… तो उत्तर प्रदेशातलो उन्नाव
जिल्ह्यातलो साधू. तेकापन सपान पडलला. थयसरच्या राजाच्या किल्ल्यात सोन्याचो खजिनो
आसा म्हानान. आनि सरकारपासून सगळ्यांनी मिळान थय खनाक सुरवातसुदा केल्यानी. आता
काय म्हनायचा ह्या गजालीक? सोन्यासारक्या
मानसाचो जीव सोन्यासाटी तळमळता. म्हूर्त बघून सोना खरेदी करणाऱ्या लोकांची तर अडानीपनाची
लक्षना.
आपल्यासाटी सोन्याचा मॉल काय?
तर येकादो सोन्याचो दागिनो आंगार आसलो
तर बरा वाटता. इतपर्यात ठीक आसा. पन सोन्यासाटी यवढ्यो उलाढाली करूक कोनी
सांगल्यान हा. सोन्यासारको निसर्ग आसा,
सोन्यासारकी नाती आसत. कोनाकडे
सोन्यासारके चांगले गुन आसत ते जपाचे सोडून सोन्याच्या पाठी धाव ख्येका व्हयी? सोना घालून नटान-थटान काय मिळतला?
पन ह्या सोन्याच्या लोभापायी
सोन्यासारको येळ आणि सोन्यासारक्या मानसांची मात्र परवड होतली. बघा आजूनव येळ गेलेली
नाय ‘खरा सोना’ वळखा लौकर.
(अॅलिस
मन्रो या कॅनेडीयन कथालेखिकेला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने लिहिलेला हा मालवणी बोलीतील लेख)
गोष्ट सांगणारी आजी |
No comments:
Post a Comment